पुस्तक परिचय - द मराठाज्

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
26 Feb 2018 - 7:51 pm

नुकतेच एक अतिशय वेगळ्या विषयावरील चांगले पुस्तक वाचले. डाॅ. स्टुअर्ट गाॅर्डन लिखित आणि र.कृ. कुलकर्णी अनुवादित - द मराठाज्


मुखपृष्ठ

सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की पुस्तकाचे नाव जरी 'द मराठाज्' असे असले तरी इथे ‘मराठा’ हा शब्द जात म्हणून नाही तर महाराष्ट्रीय या अर्थाने आहे. हा इतिहास आहे मरहठ्ठ्यांचा….मराठी राज्यकर्त्यांचा. मूळ लेखक, म्हणजे स्टुअर्ट गाॅर्डन, अमेरीकन आहे आणि त्याने आशियातील इतिहास या विषयावर phd केलेली आहे. भारतात अनेक वर्ष राहून मराठ्यांच्या राज्यपद्धतीचा अभ्यास केला आहे.

सर्वसाधारणपणे मराठी माणसाला शिवाजी महाराज आणि त्या नंतरचा इतिहास माहिती असतो. म्हणजे अगदीच अपरिचित नसतो. विविध बखरी, दफ्तरे, रूमाल यासारखे एेतिहासिक दस्तएेवज, राजवाडे, सरकार, सरदेसाई, वाकसकर यांसारखे इतिहास संशोधकांचे कार्य व साहित्य, भारत इतिहास संशोधन मंडळासारख्या संस्थांद्वारे संग्रहित व प्रकाशित झालेले साहित्य इत्यादींमुळे आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी समजायला मदत झाली. पण बाकी गोष्टींप्रमाणेच इतिहासकारांमधेही आपल्याकडे सहसा दोन गट पडलेले दिसतात. म्हणजे असं की एकीकडे एक गट म्हणत असतो की संभाजी महाराज विलासी व व्यसनी होते तर त्याच वेळी दुसरा गट संभाजी महाराजांनी 9 वर्ष कसे मोघलांना झुंजवले हे एेकवत असतो. पेशवे नाच, गाणी, तमाशा यात कायम बुडलेले होते असे मानणारा एक गट असतो तर त्याचवेळी दुसरा गट हातावर कणसे मळत घोडदाैड करणा-या बाजीरावाच्या सुरस कथा सांगत असतो. हे दोन गट कायम एकमेकांवर कुरघोडी करायच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे झालंय काय की आपल्या इतिहासात एेकीव माहिती, मनघडत कहाण्या, अतिरंजित कल्पनाविलास याचा पुरेपुर शिरकाव होत गेला. शिवाय 'इतिहास जेते लिहीतात' या उक्तीप्रमाणे आपण एेकत वा वाचत असलेला इतिहास हा लिहिणा-याच्या दृष्टीने जे नायक-खलनायक यांभोवतीच फिरत राहिला.
तर या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकाचे वेगळेपण भासले. मराठ्यांच्या इ.स. 1600 ते 1818 या कालखंडातील इतिहासाचा उहापोह या पुस्तकात केला आहे परंतू यात वेगळेपण असे की ही केवळ घटनांची मांडणी नाही. तर तत्कालीन सत्ताकेंद्रांचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या देशमुख घराण्यांच्या अनुषंगाने या इतिहासाची मांडणी केली आहे. मराठे मुळात कोण होते, त्यांनी प्रतिष्ठा कशी मिळवली, त्यांची निष्ठा कशी बदलत होती व त्यामुळे महाराष्ट्राचे सत्ताकारण व समाजकारण कसे बदलत होते वगैरे गोष्टीचा उहापोह या पुस्तकात केला आहे. मराठे म्हणजे केवळ भोसले वा पेशवे घराणे नव्हे. तर ईतर महत्त्वाची घराणी - उदा. शिंदे, दाभाडे, होळकर, कदमबांडे, माने, दिक्षित, देसाई, गायकवाड आणि ईतर लहान मोठे सरदार वगैरे. आपापल्या प्रदेशात ही घराणी म्हणजे लहान लहान सत्ताकेंद्रे होती आणि मुख्य प्रवाहातील सत्तेशी त्यांच्या (बदलणा-या) निष्ठा होत्या. सत्तेची समीकरणे यांच्यामुळे जमत अथवा बिघडत होती. तसेच त्यांचे समाजातील स्थानही मुख्य सत्तांमुळे बळकट किंवा नाहीसे होत होते. हे नक्की कसे कसे होत होते याचे विस्तृत वर्णन पुस्तकात आहे. लेखकाची या विषयावरील पकड लेखनातून व पानापानावर दिलेल्या संदर्भसूचीतून दिसून येते. आणि अनुवाद अत्युच्च दर्जाचा उतरला आहे. ईतकं की वाटावं हे मूळ मराठीतूनच लिहिलेलं पुस्तक आहे.
हे पुस्तक वाचताना माझं स्वतःचं असं मत होत गेलं की एका अभारतीयाच्या नजरेतून आपल्या ईतिहासाची मांडणी झाल्यामुळे लिखाण तटस्थ आणि वस्तुनिष्ठ झालेले आहे. मला व्यक्तिशः असे तटस्थ लिखाण आवडते. म्हणजे लेखकाच्या व्यक्तिगत निष्ठांचा आपल्या मतांवर परिणाम होत नाही व
आपल्याला आपली स्वतःची मते तयार करता येतात. तर या तटस्थपणामुळे कुठल्याही प्रसंगांना विनाकारण भावनांची झूल चढवली नाहीये. असे तटस्थ लिखाण आवडणा-यांना हे पुस्तक नक्की आवडेल.
दुसरं असं की आपल्याला विशेष माहीत नसणा-या अनेक पैलूंवर पुस्तक उजेड पाडते. उदा. शिवाजी महाराजांपासून चालत आलेले मराठ्यांच्या युद्धतंत्राचे वैशिष्ट्य. ‘गनिमी कावा’ हा शब्द आणि लपून छपून हल्ले हे सोडले तर आपल्याला याबद्दल विशेष माहिती नसते. मराठ्यांची भिस्त कायम अत्यंत जलद घोडदळावर होती. याऊलट मोघल वा आदिलशाही सैन्य मोठा लवाजमा घेऊन येई. त्यात पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व नंतर नंतर तोफा यांचा समावेश असे. पण या सगळ्या जामानिम्यामुळे त्यांच्या सैन्याचा वेग अतिशय मंदावत असे. शिवाय त्यांना इतक्या मोठ्या सैन्याला पोसायला खर्चही भरपूर होत असे. मराठ्यांचा भर समोरासमोर लढण्याएेवजी शत्रूची सरद तोडणे व जलद गतिने मुख्य सैन्यापासून थोडे दूर असणा-या तुलनेने कमकुवत प्रदेशावर हल्ले करणे यावर असे. भल्या मोठ्या सैन्याची रसद तुटली की सैन्याची उपासमार होत असे, पर्यायाने शत्रूला माघार घेणं भाग पडत असे. ही पद्धत मलिक अंबरने 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात अमलात आणली व पुढे शिवरायांनी त्याचा खुबीने वापर करून घेतला. जवळपास 100-120 वर्षे मराठे या पद्धतीनेच लढत होते. ईंग्रजांच्याही नाकी नऊ आणले होते आपण या तंत्रामुळे. पुढे जसाजसा मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार झाला आणि सैन्यात तोफा वगैरेंचा समावेश झाला तसतसा त्यांचा फाैजफाटा वाढला आणि त्यांच्या वेगवान हालचालींवर मर्यादा येऊ लागल्या.
दुसरे देण्यासाखे उदाहरण, जो पुस्तकाचा मुख्य विषयसुद्धा आहे, ते म्हणजे ‘देशमुख’ संद्न्येचा उदय व या पदाविषयी विस्तृत माहिती. हा जरी पुस्तक परीचय असला तरी मुख्य विषयच असल्याने याबद्दल जरा विस्ताताने लिहिणे अगदीच अप्रस्तुत ठरू नये.
पुस्तकात लिहिल्याप्रमाणे 16व्या, 17व्या शतकात महाराष्ट्राची लोकसंख्या बरीच कमी होती. त्यामुळे नदीकाठच्या सुपीक जमिनी सहज उपलब्ध होत होत्या. जो कोणी आपल्या कुटुंब कबिल्याच्या सहाय्याने ही जमीन पिकाऊ करत असे तो त्या नवीन वसाहतीचा / खेड्याचा पाटील होत असे. याहीपुढे जाऊन एखादा विशेष कर्तृत्त्ववान माणूस अश्या प्रकारे बरीच मोठी जमिन लागवडीखाली आणून त्या प्रदेशात बरीच खेडी वसवण्यात यशस्वी होत असे. ओघानेच तो त्या खेड्यांच्या समूहाचा प्रमुख...म्हणजे देशमुख होत असे. या देशमुखांचे काम अतिशय गुंतागुंतीचे असे. म्हणजे प्रदेशात महसूल घडी बसवून करसंकलन करणे, न्यायनिवाडे करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, शत्रूचे आक्रमण परतावून लावणे, मुख्य सैन्याच्या शिबंदीची सोय करणे, बंडखोरांचा बंदोबस्त करणे, दुष्काळीे परिस्थिती हाताळणे, इतर सैन्याबरोबर मुख्य मोहिमांमधे भाग घेणे वगैरे. सतराव्या शतकात हे देशमुखी अथवा पाटीलकी हक्क ‘सनद’ स्वरूपात दिले जाऊ लागले. ‘सनद’ म्हणजे सरकार व हक्कदार यांच्यात असलेला करार. महाराष्ट्रात 4 प्रकारचे हक्क प्रचलित होते- 1. वतन, 2. इनाम 3. सरंजाम / मोकासा 4. वृत्ती. पुस्तकात या चारही प्रकारांची माहिती आहे. या सनदेद्वारे देशमुखांना वसूल केलेल्या करातील काही भाग स्वतःकडे ठेवण्याची मुभा होती. शिवाय दरबाराकडून रोख रक्कमही मिळे. इतर हक्कही मिळत. देशमुख पद हे मानाचे पण तितकेच जबाबदारीचे होते. काही कारणाने देशमुखी गेली तर त्यांना कसलाच आधार रहात नसे. वडिलोपार्जित जमीन जर नसेल तर उपजिवीका कठीण होऊन जायची. मग एखाद्या त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या नातेवाईकांकडे त्यांना आश्रित म्हणून जगावे लागे. साधारणपणे दरबारातील दोन पक्षातील कलहात चुकीच्या पक्षाला, म्हणजे पुढे जाऊन पराजित झालेल्या पक्षाला, पाठिंबा दिल्यामुळे अथवा आपल्या भागातील परकीय आक्रमणामुळे असे नुकसान ब-याच जणांना भोगावे लागले. एके काळी मानमरातब उपभोगलेल्या देशमुखांना दुस-या सैन्यात सामान्य शिपायापासून सुरूवात करावी लागे. आणि मग विशेष कामगिरी करून सत्ताधीशाची मर्जी संपादन करावी लागे. कधी यात एक दोन पिढ्याही जात. आत्ता नोकरदार माणसे कशी कंपन्या बदलतात त्याप्रमाणे त्यावेळी हे मराठे सरदार कोणत्या ना कोणत्या राज्यकर्त्याला सामील होत. खुद्द शहाजीराजेंनीसुद्धा अहमदनगरच्या मलिक अंबरच्या दरबारातून सुरूवात केली, मधे काही काळ मोघलांना जाऊन मिळाले, परत मलिक अंबरकडे परतले, मग विजापूर दरबारी रूजू झाले. योग्य वेळी योग्य ठिकाणी निष्ठा असलेल्या देशमुखांचा भरपूर फायदा व्हायचा. याऊलट काही घराणी नंतर नामशेषही झाली. यात लेखकाने तळेगाव येथील दाभाडे घराण्याचाही उल्लेख केला आहे. छत्रपती शाहूंविरोधात महाराणी ताराराणीला जाऊन ते मिळाले. पुढे शाहूगटाची सरशी झाली आणि दाभाड्याचे महत्त्व खूपच कमी झाले. सैनिकी ताकद किती यावर या सरदारांचे महत्त्व ठरत असे. मुख्य सत्तेने एखादा प्रदेश नव्याने काबीज केला की एकतर पूर्वीच्या देशमुखाकडून हे हक्क काढून घेउन आपल्या विश्वासातील माणसाला ते ईनामस्वरूपात दिले जात, किंवा जर तो देशमुख नव्या सत्ताधीशाप्रती निष्ठा ठेवायला तयार असेल तर ते हक्क अबाधितही ठेवले जात असत. शिवरायांनी आपले राज्य वाढवताना ज्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दरा-याला धक्का लावला नाही. यापैकी जे बलवान होते त्यांच्यावर त्यांनी हल्ले केले. पण बहुतांशी देशमुखांचे पिढीजात हक्क त्यांनी अबाधित ठेवले. यामुळे एक मोठा फायदा हा झाला की त्या प्रदेशातून महसूल वसूली सुरळीत चालू राहिली. आणि त्यावेळी राज्यनिर्मितीसाठी याची अत्यंत आवश्यकता होती.
तर अश्या प्रकारे देशमुख घराण्यांचे हक्क, कर्तव्ये, मुख्य सत्ताप्रवाहांबरोबर त्यांचे असलेले परस्परसंबंध यासारख्या अनेक विषयांवर पुस्तकात अभ्यासू विवेचन आहे. पेशवाईच्या उदय, उत्कर्ष व अस्ताबद्दलही पुस्तकात चांगले भाष्य आहे. पेशव्यांनी महसूल व्यवस्थाही ब-यापैकी चांगली लावली होती. आणि त्यांनी देशमुखी देण्याचे हक्क स्वतःकडे ठेवले होते. याचा सत्तेची घडी बसण्यात खूप फायदा झाला. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रातील राजकारण एकंदरीतच फार गुंतागुंतीचे होते. विविध सत्ताधीशांकडून महाराष्ट्रावर सतत आक्रमणे होत होती. आणि आक्रमण झाले की प्रदेश लुटणे, पिके जाळुन टाकणे वगैरे प्रकार होत. साधारणपणे दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातील कोणता ना कोणता भूभाग होरपळून निघे. बाकीच्या सलतनती कमी म्हणून की काय भरीत भर म्हणून ईंग्रजही आले. ईंग्रजांना म्हणावा असा दीर्घकालीन प्रतिकार झाला तो शीख, रजपूत आणि मराठ्यांकडून. आणि त्यातल्या त्यात मराठ्यांकडून जास्त. कारण त्या वेळेपर्यंत मराठा साम्राज्य जवळपास भारतभर पसरले होते. पेशव्यांनी व त्यांच्याशी निष्ठा राखून असलेल्या देशमुखांनी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जवळपास सगळा भारत आपल्या अधिपत्याखाली आणला होता. पुस्तक वाचताना असाही एक विचार येउन गेला की
शेवटी शेवटी पेशव्यांच्या वारसदारावरून कलह झाला नसता तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. कारण पानिपतासारख्या मोठ्या पराभवानंतरी पुढची दोन दशकं मराठे सत्ता राखून होते. पण या जर तर ला काही अर्थ नाही. युद्धात जो अधिक लायक तोच जिंकणार.
तर ज्यांना आपला इतिहास राजवाड्यातून बाहेर पडून आणि मुख्य राजधानीच्या बाहेर पडून एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघायचा आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

पुस्तकाचे नाव:- द मराठाज्
मूळ लेखक:- डाॅ. स्टुअर्ट गाॅर्डन
अनुवाद:- र.कृ. कुलकर्णी
प्रकाशक:- डायमंड
पृष्ठसंख्या:- 220
किंमत:- 300

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

26 Feb 2018 - 7:57 pm | चाणक्य

अनेक प्रयत्न करूनही फटु काही चढवता आला नाही. काय क्रावे ब्रे ? मदतपानावरच्या सगळ्या पाय-यानुसार करून झाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2018 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर पुस्तक ओळख. खरा इतिहास तटस्थ माणसाकडून कळू शकतो. इतर कोणत्या तटस्थ माणसाच्या लेखनातून त्याला दुजोरा मिळाला तर ते जास्त विश्वासू म्हणायला हरकत नसावी.

फोटो आता नीट केला आहे. तुम्ही "पूर्ण आकारातल्या चित्राचा दुवा" न वापरता, फोटोच्या थंबनेलचा दुवा वापरला होता, त्यामुळे तो दिसत नव्हता.

चाणक्य's picture

26 Feb 2018 - 10:20 pm | चाणक्य

धन्यवाद एक्का काका.

पुस्तकपरिचय आवडला. नेटका लिहिला आहे.

अमितदादा's picture

27 Feb 2018 - 12:44 am | अमितदादा

सुंदर पुस्तक परिचय आणि लेख मांडणी..

मराठी कथालेखक's picture

26 Feb 2018 - 11:29 pm | मराठी कथालेखक

प्रथम प्रकाशन कधी झाले ?

चाणक्य's picture

27 Feb 2018 - 6:21 am | चाणक्य

डिसेंबर २०१६ चे आहे.

फारएन्ड's picture

27 Feb 2018 - 7:06 am | फारएन्ड

सुंदर माहिती! आणायच्या लिस्ट मधे टाकले हे पुस्तक.

प्रचेतस's picture

27 Feb 2018 - 8:27 am | प्रचेतस

छान ओळख.
आम्ही मिपाकरांसोबत अक्षरधारा येथे पुस्तक प्रदर्शनाला गेलो असता एका मिपाकराने हे पुस्तक घेतले होते, त्यांनाही ते फार आवडले.

सतिश गावडे's picture

27 Feb 2018 - 11:36 am | सतिश गावडे

पुस्तक अतिशय सुंदर आहे. शिवकालीन दैनंदिन जीवन कसे होते, त्यावेळी प्रचलित असणारी जहागिरी पद्धत कशी होती याबद्दल सखोल माहिती मिळते.

सस्नेह's picture

27 Feb 2018 - 11:00 am | सस्नेह

छान लिहिलंय.
पुस्तक वाचण्याची इच्छा आहे. पाहते लायब्ररीत मिळतंय का.

सस्नेह's picture

27 Feb 2018 - 11:01 am | सस्नेह

रच्याकने 'ईतिहास, ईतर' हे आजच्या मराठी दिनी जरा खटकले.
जमले तर 'इतिहास',' इतर ' असे करून घ्या.

दुर्गविहारी's picture

27 Feb 2018 - 12:13 pm | दुर्गविहारी

"मिळून मिसळून"वर तुम्ही या पुस्तकाविषयी सांगितले होते. तेव्हा मागवले आहे. पण त्या आधीच पुस्तकाचा साधारण आवाका या धाग्यामुळे समजला, याबध्दल धन्यवाद.

जमल्यास प्रकाशकांचा संपर्क क्रमांक आणि पत्ता टाकता येतोय का ते पहा.

पद्मावति's picture

27 Feb 2018 - 4:55 pm | पद्मावति

उत्तम पुस्तक परिचय.