आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल !
ताईने दिलेली ओळ होती...
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
*********************
नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला
चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला
तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे
बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला
रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो
चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला
थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे
भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला
बा निसर्गा का असा छळवाद तू रे मांडला?
बरसणे त्या पावसाचे फक्त आठवते मला
ओळखीचा चोर कोणी मान अलगद कापतो
त्याच खांद्यावर कधी मी स्फुन्दलो गमते मला
संपला रस्ता विशाला चल नव्या वाटा धरू
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
© विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
16 Jan 2018 - 4:44 pm | पद्मावति
सुरेख!!
16 Jan 2018 - 4:57 pm | खेडूत
खूप छान! आवडली..
16 Jan 2018 - 6:05 pm | प्राची अश्विनी
वा!
तरही गजल धागा मिपावर सुद्धा सुरू झाला तर मजा येईल
17 Jan 2018 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
या निमित्ताने सगळे मान्यवर लिखण्या पारजतील.
होउन जाउद्या मिपा आपलेच आहे.
पैजारबुवा,
17 Jan 2018 - 4:12 pm | विशाल कुलकर्णी
खरोखर चांगली कल्पना आहे. मजा येईल.
17 Jan 2018 - 10:31 am | विनिता००२
मस्त रे! सकाळी सकाळी वाचून मन प्रसन्न झाले :)
17 Jan 2018 - 4:13 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद विनीता !
18 Jan 2018 - 9:57 am | विनिता००२
काही मोजक्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड केलेली.
रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो
चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला >> हा शेर सर्वांना फार आवडला :)
17 Jan 2018 - 11:43 am | अत्रुप्त आत्मा
येक नंबर!
17 Jan 2018 - 3:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
सुरेख लिहीली आहे .
जिओ विशाल
पैजारबुवा,
17 Jan 2018 - 4:15 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद बुवा !
मनःपूर्वक आभार मंडळी _/|\_
17 Jan 2018 - 11:54 pm | नाखु
समयोचित
18 Jan 2018 - 9:02 pm | माधुरी विनायक
खूप आवडला.. छान काव्य...
18 Jan 2018 - 9:30 pm | पैसा
मस्त!
19 Jan 2018 - 4:43 pm | पुंबा
अप्रतीम.
20 Jan 2018 - 12:16 am | थॉर माणूस
क्रमशः लिहायला विसरले का हो विकुभौ? :P
बाकी आवडेश हे बाय डिफॉल्ट आहेच...
20 Jan 2018 - 11:25 am | जेडी
सुंदर, आवडली
23 Jan 2018 - 11:10 am | विशाल कुलकर्णी
मनःपूर्वक आभार मंडळी !