कबुलीजबाब ... एका ज्ञानियाचा! (भावानुवाद)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
6 Jan 2018 - 9:40 pm

ज्याने आपल्या आंतरिक चिदानंद अस्तित्वाची असीम ब्रह्माशी असलेल्या एकतानतेची प्रचिती घेतली; अशा ज्ञानियासाठी पुनर्जन्म, कुठलेही स्थित्यंतर आणि बंधमुक्ती संभवत नाहीत. तो या सगळ्यांच्या पलीकडे असतो. तो आपल्या सर्वार्थाने परिपूर्ण अशा सच्चिदानंद मूळस्वरूपात अविचलपणे स्थित झालेला असतो.

त्या पुढील वाटचालीत स्वतःचा देह आणि बाह्य जगताचा आभासी स्वरूपात येणारा प्रत्यय ज्ञानियाला पूर्णपणे नष्ट करता येत नसला तरी (आत्मस्वरूपापासून विचलीत होण्याइतके) हे मृगजळ त्याला कदापी चकवा देउ शकत नाही. जडदेहाचा मृत्यु झाल्यानंतर, तसेच जगत असताना, जसा आहे आणि जिथे आहे त्या अनंत स्वरूपातच तो राहतो - जे सगळ्या जिवांचे आणि पदार्थमात्रामागचे निराकार, अनामिक, अनाकलनीय, शाश्वत, अमित आणि पूर्णपणे उपाधीरहित असे आदि तत्व आहे.

मृत्यु त्याला स्पर्श करू शकत नाही, भोगलालसा त्याचा छळ करू शकत नाहीत, पापाने तो कलंकित होत नाही; सगळ्या वासना आणि पाप -ताप - दैन्यापासून तो नित्यमुक्त असतो. एकच अनादि अनंत स्वस्वरूप त्याला सर्वत्र दिसते, आणि सारी चैतन्यमय आणि जडसृष्टी त्याच असीम स्वरूपाच्या ठायी दिसते, जे त्याचे 'तत्वमसी' अस्तित्वमात्र असते.

आपल्या (अपरोक्ष) अनुभूतीचा कबुलीजबाब ज्ञानी असा देतो:

मी असीम, अविनाशी, स्वयंप्रकाशीत आणि स्वयंभू आहे. मला आदि किंवा अंत नाही. मला जन्म नाही, मृत्युही नाही तसेच माझ्या ठायी कुठलेही परिवर्तन आणि क्रमश: होत जाणारा र्‍हासही संभवत नाही. सगळा माझाच विस्तार आहे, नव्हे मीच एकांशाने सारे काही व्यापलेले आहे. विचार आणि सृजनातून जन्मलेल्या अगणित ब्रह्मांडांमधे फक्त माझे आत्मस्वरूपच एकत्वाने नांदते आहे.

(रॉबर्ट अ‍ॅडम्स यांच्याशी झालेल्या संवादांचे संकलन असलेल्या 'सायलेन्स ऑफ द हार्ट' या पुस्तकातील एका उतार्‍याचा भावानुवाद)

दुवा:
https://www.amazon.in/Silence-Heart-Adams-Robert/dp/8188479950/ref=sr_1_...

धर्मभाषांतर

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

7 Jan 2018 - 6:31 am | अर्धवटराव

अनुवाद वाचताना सगळं कळल्यासारखं वाटतं पण अ‍ॅक्च्युली कळलं काहिच नाहि :)

मूकवाचक's picture

7 Jan 2018 - 10:09 am | मूकवाचक

रॉबर्ट अ‍ॅडम्स यांच्याविषयी विकीपेडियावरही माहिती आहे: https://en.wikipedia.org/wiki/Robert_Adams_(spiritual_teacher)

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायलेल्या ज्ञानेश्वरीमधील 'जाणे अज मी अजर' ही रचना आणि अ‍ॅडम्स साहेबांचा हा कबुलीजबाब यात कमालीची एकवाक्यता आहे:

पैसा's picture

7 Jan 2018 - 9:15 pm | पैसा

स्फुट आवडले.

चांगलंय. पण ज्ञानियांचा मार्ग जरा कठीणच म्हणायचा..!
माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपला भक्तीमार्गच बरा! :-)