स्टोरीज ऑफ युअर लाईफ अँड अदर्स-पुस्तक परिचय

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
5 Jan 2018 - 10:16 am

मागच्या वर्षात अनेक पुस्तकं अर्धवट वाचून सोडून दिली, काही तीच तीच पुन्हा पुन्हा वाचली, अगदी मोजकी पूर्ण केली. त्या पूर्ण केलेल्यातलं एक 'स्टोरीज ऑफ युअर लाईफ अँड अदर्स'. हे पुस्तक वाचायला निमित्त झालं ते याच्याही आधीच्या वर्षात आलेल्या 'अरायव्हल' चित्रपटाचं. या पुस्तकातील एका लघुकथेवर आधारलेला हा चित्रपट बराच नावाजला गेला. पण हे निमित्ताचं अवांतर आवरून नेहमीसारखं आवडलेलं नोंदवण्यापुरतं पुस्तकाबद्दल लिहिलेलं हे थोडंसं.

टेड चियांग या लेखकाच्या ठिकठिकाणी प्रकाशित झालेल्या आठ वेगवेगळ्या लघुकथांचा हा संग्रह आहे. या लेखकाबद्दल फारसं माहीत नाही, पण त्याचं वेगवेगळ्या विषयांवरचं प्रभुत्व, आणि अमूर्त संकल्पनांची विलक्षण पकड प्रत्येक कथेत जाणवतात, खिळवतात. या सगळ्या आठ कथांबद्दल लिहीत बसण्याऐवजी त्यांतील विशेष आवडलेल्या तीन-चारांबद्दल लिहिते.

'Tower of Babylon' मध्ये स्वर्गापर्यंत किंवा निर्मात्यापर्यंत पोहोचण्यासाठी बॅबिलोनचा मनोरा बांधणाऱ्या जगाची कल्पना आहे. अनेक शतके बांधकाम चालत आलेल्या या मनोऱ्याची एक वेगळी संस्कृती आहे. मनोऱ्यावर थोड्या थोड्या अंतरांवर वस्त्या आहेत, शेतीचे प्रयोग आहेत. बेबलच्या मनोऱ्याच्या आख्यायिकेवर बेतलेली ही कथा शेवटाकडे अनपेक्षित वळण घेते. एका तुकडीतील एका कुशल कामगाराच्या नजरेतून ही कथा घडते.

'Division by zero' ही एका गणितज्ञेची कथा. संशोधन करताना एक तार्किकदृष्ट्या सुसंगत प्रमेय ती मांडते, ज्यातून अंकगणिताचा पायाच चुकीचा सिद्ध होतो. इतकी वर्षं ज्यावर जीव ओतून काम केलं, ते मुळातूनच चुकीचं ठरत असलेलं बघून ती हादरते. तिचं हे अस्वस्थ होणं तिच्या नवऱ्याला समजत नाही. पण तिचा ताण जाणून घ्यायचा तो प्रयत्न करतो. दोघांची निरनिराळी तडफड दोघांच्या दृष्टीकोनातून या कथेत मांडली आहे.

'Story of your life' ही अर्थात मला सगळ्यात आवडलेली कथा आहे. ही चित्रपटापेक्षा थोडीशी वेगळी आहे. भाषिक सापेक्षतेवर आधारित विलक्षण वेगळी कल्पना या कथेत आहे. भाषिक सापेक्षता सिद्धांत असा, की आपण जी भाषा वापरतो, त्याप्रमाणे आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन ठरतो. परग्रहावरून येऊन धडकलेल्या जीवांची भाषा जाणून घ्यायचा प्रयत्न करताना मानवी विचार करण्याची पद्धतच त्यांच्यापेक्षा वेगळी आहे हे लुईसा या भाषाशास्त्रज्ञेला जाणवत जातं. त्यांची भाषा शिकताना ती त्यांच्याप्रमाणे विचार करायला शिकते, आणि मग तिच्यासमोर काही मूलभूत प्रश्न उभे राहतात. लुईसाने तिच्या पुढे होणाऱ्या मुलीला लिहिलेलं पत्र, असं या कथेचं स्वरूप आहे. परग्रहवासी, त्यांची भाषा इ.च्या पलीकडे जाऊनही या कथेत (इतर कथांसारखेच) जे तात्त्विक प्रश्न येतात, त्यांच्यामुळे ती एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते.

'Liking what you see: a documentary' ही सुद्धा अतिशय आवडलेली कथा. दिवसेंदिवस सौंदर्याच्या पारंपारीक निकषांमध्ये बसण्यासाठी कृत्रिमतेकडे झुकत चाललेलं बाह्य सौंदर्य, त्यामागचं अर्थकारण, आणि त्याला विरोध म्हणून उभी राहणारी एक विद्यार्थी चळवळ या सगळ्यांमधून उभी राहणारी ही कथा. मेंदूमधली बाह्य सौंदर्याला प्रतिसाद देऊ शकणारी जागा बोथट करून टाकण्याची प्रक्रिया कॉलेजमध्ये अनिवार्य करणे, असं त्या विद्यार्थी चळवळीचं स्वरूप. त्याच्यावर निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया, ही प्रक्रिया शाळेपासून करवून घेतलेल्या एका मुलीचे अनुभव, ही चळवळ हाणून पाडण्यासाठीचे प्रयत्न इत्यादी गोंधळामध्ये ही कथा पुढे जाते.

या सगळ्या कथानिका साध्या-सरळ पुढे जाणाऱ्या नाहीत. अनेक वळणं घेत, गोल फिरवत, मध्येच धक्के देत कुठच्यातरी ओळखीच्या वाटणाऱ्या, पण अनोळखी ठिकाणी आणून सोडणे ही या लेखकाची खासियत आहे. मानवी भावनांचा धांडोळा घेणाऱ्या या कथा स्वतः मात्र अलिप्त, रुक्ष आहेत. म्हणायला गेलं तर तशा विज्ञानकथा, पण या प्रकाराच्या रूढार्थाशी काही प्रमाणात विसंगत आहेत. प्रत्येक कथेच्या शेवटी नवीन प्रश्न पाडणे, कशाचीच सरळ उत्तरं मिळू न देणे, हा एकूण प्रकार उत्सुकता चाळवणारा, आणि मग ताणणारा. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांवरच्या अर्थउकलीचे न संपणारे खेळ आवडणाऱ्या लोकांना नक्की आवडेल असं हे पुस्तक आहे.

वाङ्मयkathaaलेख

प्रतिक्रिया

वा. उत्सुकता वाढली. वाचायलाच हवीत ही पुस्तके

प्राची अश्विनी's picture

5 Jan 2018 - 10:45 am | प्राची अश्विनी

सुरेख परिचय. नक्की वाचणार

हे पुस्तक बर्‍याच दिवसांपासून माझ्याकडे आहे. वाचलंच नाही.
तुमचा पुस्तकपरिचय वाचून उत्सुकता वाढली. नक्की वाचणार. पण माझ्याकडे असलेल्या या पुस्तकाचे नाव अरायव्हल असे आहे.

वाघमारेरोहिनी's picture

5 Jan 2018 - 3:40 pm | वाघमारेरोहिनी
वाघमारेरोहिनी's picture

5 Jan 2018 - 3:40 pm | वाघमारेरोहिनी
वाघमारेरोहिनी's picture

5 Jan 2018 - 3:41 pm | वाघमारेरोहिनी
गामा पैलवान's picture

6 Jan 2018 - 4:08 pm | गामा पैलवान

धन्यवाद रोहिणी वाघमारे. पण तुम्ही दिलेल्या धारिकेत फक्त ३०६ पानांपैकी ३३ पानं आहेत. बहुधा अल्पवाचन आवृत्ती असावी.
आ.न.,
-गा.पै.

आदूबाळ's picture

5 Jan 2018 - 5:13 pm | आदूबाळ

अनेक आभार!

पिशी अबोली's picture

6 Jan 2018 - 11:13 am | पिशी अबोली

धन्यवाद!

प्राची अश्विनी's picture

6 Jan 2018 - 4:56 pm | प्राची अश्विनी

Story .... आणि Tower वाचली. ब-याच दिवसांनी, खिळवून ठेवणारं काही वाचलं. जबरदस्त.
Division by zeroचा शेवट कळला नाही.

पिशी अबोली's picture

9 Jan 2018 - 1:41 pm | पिशी अबोली

अरे वा, लगेच वाचलंत पण.

Division by zero या कथेत सुरुवातीला तिची होणारी तडफड, ज्या गोष्टीवर आपलं निःसंशय प्रेम असतं, ती गोष्टच चुकीची आहे हे लक्षात येणं हे दिसतं. कथा संपत येताना हीच गोष्ट त्याच्या संदर्भात घडते, जेव्हा त्याचं तिच्यावर प्रेम संपल्याची जाणीव त्याला होते. थोडक्यात एकच भावना दोघांना वेगवेगळ्या प्रकारे अनुभवाला येते. हे असं वाटल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या कधीच नसतील, हे त्या दोघांना प्रकर्षाने जाणवतं, पण त्याबाबतीत हतबलताही जाणवते. कथेच्या सुरुवातीला जे division by zero हुशारीने वापरून 1=2 हे सिद्ध केल्याची गोष्ट आहे, ती या संदर्भात महत्वाची आहे. हे दोघंही स्वतःला निश्चितपणे वाटणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कुठे division by zero सारखी एखादी चूक आहे का हे शोधत राहतात, आणि त्या ठिकाणी ही कथा संपते.

अर्थात हा मला लागलेला अर्थ आहे, अजून कितीतरी असू शकतात...

पैसा's picture

7 Jan 2018 - 11:03 pm | पैसा

छान परिचय

आनंदयात्री's picture

8 Jan 2018 - 5:08 am | आनंदयात्री

या पुस्तकपरिचयाबद्दल अनेक धन्यवाद. वाचायच्या यादीत आधीच अनुक्रम बदलून सगळ्यात वर टाकले आहे.

नंदन's picture

9 Jan 2018 - 1:41 pm | नंदन

आवडला. मिळवून वाचायच्या यादीत या पुस्तकाची भर घातली आहे.

पिशी अबोली's picture

9 Jan 2018 - 1:41 pm | पिशी अबोली

धन्यवाद!

टर्मीनेटर's picture

15 Jan 2018 - 8:03 am | टर्मीनेटर

पुस्तक परिचय आवडला...'Tower of Babylon' वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, बाकीच्या विषयांमध्ये रस नाही. किंडल वर आहे का हे पुस्तक चेक करावे लागेल...

पिशी अबोली's picture

15 Jan 2018 - 12:04 pm | पिशी अबोली

धन्यवाद.

किंडलवर आहे. स्वतंत्र कथा पण वाचायला मिळतील कदाचित, पण थोड्या हुडकाव्या लागतील.

माधुरी विनायक's picture

15 Jan 2018 - 5:01 pm | माधुरी विनायक

उत्सुकता वाढली. नक्की वाचणार हे पुस्तक. वेधक परिचय करून दिल्याबद्दल आभार...

पिशी अबोली's picture

17 Jan 2018 - 9:32 am | पिशी अबोली

धन्यवाद!

रुपी's picture

19 Jan 2018 - 4:19 am | रुपी

छान परिचय.
लेख आला तेव्हा वरवर चाळला होता आणि एका लायब्ररीत गेले तिथे पुस्तक आहे का हे पाहिले, पण नाही मिळाले. दुसरीकडे मिळते का बघते.

मिहिर's picture

28 Jan 2018 - 3:41 am | मिहिर

उत्तम परिचय. वर उल्लेखलेल्यांतल्या शेवटच्या दोन कथा फारच रोचक वाटताहेत. नक्की वाचणार.