पुनश्च टेबल माऊंटन

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
9 Dec 2017 - 8:15 pm

मागच्या वर्षी केप टाऊनला कामानिमित्त जाऊन आले, त्यानंतर परत लगेच जाता येईल असं वाटलं नव्हतं (झैरात-http://www.misalpav.com/node/38109). पण पुन्हा एकदा मला नेण्यापुरता प्रोजेक्टकडे फंड आहे, हे सांगत दीडेक महिन्याभरानंतरची तारीख नक्की करणारा तिथल्या प्रोफेसरचा मेल आला, आणि तयारीची गडबड सुरू झाली. मागच्या वेळेस भेटलेल्या लोकांना कळवणे, वर्षभरातल्या कामाचा आढावा घेणे या सगळ्या धामधुमीत दसरा-दिवाळी पार पडली. माझ्या नशिबाने व्हिसा वेळेत आला, पण जाण्याच्या दिवशी पर्यंत करन्सी मिळालेली नव्हती. त्यामुळे यथायोग्य पॅनिक होऊन आसपासच्या लोकांना जीव नकोसा व्हावा असा गोंधळ घालत एकदाची विमानात बसले, आणि तेव्हा जाणीव झाली की आपण परत एकदा चाललोय, दूरवरच्या आपल्या झालेल्या लोकांमध्ये...

केप टाऊनला एका दिवसात तीन ऋतू बघता येतात, ही तिथल्या लोकांची एक आवडती म्हण. मागच्या वेळेस याचा चांगलाच अनुभव घेतला होता, त्यामुळे तिथल्या उन्हाळ्याची सुरुवात असली, तरी भरपूर थंडीची तयारी करून गेले होते. पण यावेळी स्वागत केलं ते कडक उन्हाने. यावर्षी तिथे चांगला पाऊस झाला नाही, त्यामुळे भेटेल ती व्यक्ती पाणी जपून वापरायचा सल्ला देत होती. मुळात उन्हाळा नावडता, त्यात पाणी कमी. पहिले तीन चार दिवस अगदीच अपेक्षेपेक्षा वेगळे गेले. पण नंतर एखादा आठवडा मधेच पाऊस, मधेच थंडी असं काहीपण सुरू झालं. त्यात माझ्या घराच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर चोरी, सुरीने धमकावणे वगैरे गोष्टी सुरू झाल्यामुळे हिंडण्या-फिरण्यावर अशक्य बंधनं आलेली होती. एखादी गोष्ट उद्यासाठी ठरवावी, आणि मग काहीतरी पाऊस-वार्‍याचे निमित्त होऊन ती घडूच नये, असं सतत व्हायला लागल्यावर मला घरच्या हिवाळ्याची सतत आठवण यायला लागली. मग शेवटी काम गेलं खड्ड्यात, असं ठरवून मस्तपैकी एका ओळखीच्या कुटुंबासोबत बोल्डर्स बीच वरचे आफ्रिकन पेंग्विन, आणि केप पॉईंटचं दर्शन घेऊन आले. कदाचित मी हेच करावं, आणि पक्क्या केप टोनियनसारखं शिस्तीत रिलॅक्स व्हावं, अशी त्या शहराची इच्छा असावी. कारण चिंता करायचं सोडून दिल्यावर पुढच्या आठवडाभरात बरंचसं काम उरकलं, आणि आता मला फिरायला थोडा वेळ मिळेल असं दिसू लागलं. पण तरीही जी टेबल माऊंटन हाईक करायच्या इच्छेची मागच्या वर्षी सतत भुणभुण लावली होती, तिचा विषय प्रोफेसर स्वतःहून काढतील असं वाटलं नव्हतं. पण भारतातून आलेल्या गुजराती भाषेवर काम करणार्‍या लोकांसोबत मला जाता येईल असं त्यानी सुचवलं, आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या. वर चालत जाऊन केबल कारने खाली यायचं, असं ठरलंही.

पण म्हणून प्रत्यक्ष तिथे जाणं सोपं थोडंच होतं. टेबल माऊंटन हा खराखुरा पर्वतराज आहे. त्याला भेटायला जायचं तर त्याच्या लहरी सांभाळत जावं लागतं. एका रविवारी जायचं ठरवलं होतं, पण त्या दिवशी एवढा वारा, की बाहेर पडणं मुश्किल होऊन गेलं होतं. सकाळी सकाळी केबल कार बंद असल्याची सुवार्ता वेबसाईटवर कळली. अजून फक्त एकच आठवडा राहिला होता. पुढच्या रविवारी काहीही करून जाता आलं पाहिजे, असं मनात होतं...

आणि तो या वर्षी हुलकावण्या देणारा पाऊस शनिवारी हजर झाला. पावसाला बघून इतकी नाराज मी कधीच झाले नव्हते. रात्री पाऊस पडल्याने सकाळी ढग असणार, पुन्हा रस्ता निसरडा असणार. सकाळी याला दुजोरा देत बेत रद्द झाल्याचा सरांचा मेल आला. आता जाता येणार नाही असंच वाटत होतं.

आणि दुपारपर्यंत कडक ऊन पडलं. इतकं कडक, की पुन्हा दुपारी मेल आला की तुम्हाला अजून जायचं असल्यास आपण पायथ्याशी जाऊन परिस्थितीचा अंदाज घेऊ शकतो. मनातल्या मनात उड्या मारत मी तयारीला सुरुवात केली. पाऊण तासात गाडीत बसून आम्ही निघालोही होतो. पर्वतरांगांच्या शेंड्यांवर ढग दिसत असले, तरी बर्‍यापैकी स्वच्छ वातावरण दिसत होतं. एकदाचे पायथ्याशी पोचलो, आणि खडखडीत वाळलेल्या पायर्‍या दिसल्या, आणि अशा प्रकारे 'ताफेलबर्ग' चढायला एकदाची सुरुवात झाली.

त्यातल्यात्यात सगळ्यात सोपा रस्ता आम्ही निवडला होता. ज्याचं नाव 'प्लॅटक्लिप गॉर्ज (लांबवलेला 'ट')'असं आहे. पायथ्याशी खूप सार्‍या गाड्या दिसल्याने, आणि बरेच लोक चढताना दिसल्याने आम्ही निर्धास्त होतो.

Platteklip

उन्हाळ्याची सुरुवात असल्याने खूप सारी फुलं फुललेली होती. सुरुवातीलाच राष्ट्रीय फूल प्रोटियाने आमचं स्वागत केलं. माऊंटन लिली, पेलागॉर्निया मध्ये मध्ये पेरलेला दगडी रस्ता बघून सुरुवातीपासून उल्हसित वाटत होतं. पाण्याचा आवाज पण येत होता. वीसेक मिनिटं चालल्यावर रात्रीच्या पावसाने जिवंत केलेला छोटा झरा आम्हाला दिसला. तिथे थोडं थांबून अजून उत्साहात आम्ही पुढे निघालो.

waterfall

path
पण आता हळू हळू रस्ता कठीण व्हायला लागला होता. वरून उतरणारे लोक चढणार्‍यांचा उत्साह वाढवत होते. 'यू आर अल्मोस्ट देअर, जस्ट अबाऊट टू मोर अवर्स' म्हणून डोळे मिचकावून गेलेल्या हाइकरच्या विनोदावर हसलो खरे, पण रस्त्यावरची एकमेव दिशादर्शक पाटी दिसेपर्यंत थकायला सुरुवात झाली होती. व्यायामाची सवय नसणे, आणि तीनेक आठवडे साधं चाललेलंही नसणे हे चांगलंच भोवत होतं. त्यात सकाळपासून बेत रद्द झाल्याच्या दु:ख्खात मी नीट जेवले नव्हते, आणि निश्चित ठरल्यावर वेळ मिळाला नव्हता. नक्की काय झालं कळलं नाही, पण मला आयुष्यात पहिल्यांदा चालताना गरगरायला लागलं. सोबत चालणार्‍यांना सांगून मी बसले, पण तरी तोल सावरेना. शेवटी मी चक्क आडवी झाले. तेव्हा सोबतच्या लोकांना चांगलंच टेन्शन आलं असणार आहे. पण ज्या वेगाने भोवळ आली, त्याच वेगाने मला बरंही वाटलं. डोळे मिटलेले असताना वरून खाली चालत आलेली एक बाई म्हणालेली ऐकू आलं 'आय वुडंट गो अहेड इन धिस सिच्युएशन'. कदाचित ते पचलं नसेल, पण आता हा हाइक पूर्ण करायचाच, असं ठरवूनच डोळे उघडले. पुढे मला काहीच झालं नाही, पण माझ्यासोबतच्या गुजराती लोकांनी सतत 'आम्ही तुला टाकून जाऊ' असा त्यावर जोक करणं, आणि त्या जोक्सना मी त्यांना २०१९ च्या निवडणुकीची शपथ घालणं असं चालू राहिलं.

प्लॅटक्लिप म्हणजे सपाट दगडांचा रस्ता. १५०३ मध्ये टेबल माऊंटन चढून जाणारा पहिला मनुष्य याच रस्त्याने गेला होता. यावरचे दगड बर्‍यापैकी पक्के आहेत, आणि नावाला जागण्यापुरते सपाटही. पण म्हणून चढ कमी नाही.जवळ येऊ तशी अजून उंच दिसणारी शिखरं, आणि चढून पार केलेलं अंतर, दोन्ही थोडंसं दडपण जाणवून देतात. पण जिथे बघू तिथे निसर्गदत्त सौंदर्य-खडबडीत दगड, नाजुक फुले, आणि मागे वळून दिसणारा समुद्र. मधे पसरलेलं शहर इतकंसं डोळ्यांना खुपत नाही.
back

mountain

साधारण तासाभराने वरून येणारे लोक 'आता अर्धाच तास राहिलाय'असं सांगू लागले. त्यामुळे वर जायचा उत्साह टिकून राहिला खरा, पण अर्धा तास झाल्यावरही 'अजून अर्धा तास'हे ऐकायला लागल्यावर धाप जरा जास्तच लागू राहिली. मग आम्ही 'हम होंगे कामयाब' हे गाणं दम लागलेल्या आवाजात म्हणत पुढे जाऊ लागलो. वरून येणारी प्रत्येक व्यक्ती 'इट इज टायरिंग, बट इट्स वर्थ इट' हे सांगून मनोधैर्य वाढवत होतीच. वरून उड्या मारत येणारे एक आजोबा, एक पाण्याची बाटली तेवढी घेऊन आम्हाला मागे टाकून गेलेली एक तरुणी, दूरवरून खणखणीत आवाजात आफ्रिकन गाणं गात अनवाणी चालत आलेला मनुष्य, या वल्ली बघून अजून बरं वाटत होतं. वाटेवरच्या निसर्गसौंदर्याला मात्र तोडच नाही. आम्ही मध्ये विसाव्यासाठी टेकलो, की पक्षी बिनधास्त जवळ येऊन बसायचे. पर्वताचे ओलसर कडे सावली धरत होते. दोन कड्यांच्या मधली वाट जवळ येत होती.

near the gorge

crossed
एक चिंचोळी वाट दिसू लागली, आणि आता अर्ध्या तासावरून 'दहा मिनिटं फक्त' अशी आशा येणारे लोक दाखवू लागले. अशा पद्धतीने अजून अर्धा तास चालल्यावर खरोखर त्या वाटेवर पोहोचलो. दोन्ही बाजूच्या कड्यांवरून पाण्याचे मोत्यासारखे थेंब टपकत होते. ही वाट पार केली, आणि दोन लोक भेटले. त्यांना विचारलं तुम्ही परत चाललात का, तर म्हणाले छे छे, आम्ही तर इथे फक्त फोटो काढायला आलोय...

पोचलो बाबा! असं वाटून आम्ही वळसा घेतला, तर समोर दुसर्‍या बाजूने भारतीय महासागर सामोरा आला. आत्तापर्यंत आम्हाला मुळीच त्रास न दिलेले शहाणे ढग पर्वतांची नक्कल करत पुंजके बनवून तसेच निश्चल वाटावेत असे पसरले होते.

Indian ocean

clouds

इथे अजून थोडं वळून साखळीचा आधार घेऊन अजून दहा मिनिटं चाललो, आणि एकदाची दूरवर ती केबल कारची पर्वतावरची एकमेव मानवी इमारत दिसली. टेबल माऊंटन/ ताफेलबर्ग सर झाला. या खालच्या लिंकमध्ये आम्ही गेलो तो रस्ता बघता येईल.
https://www.youtube.com/watch?v=zCmW4Ak2zTg

आता उत्साहात पटापट फोटो काढायला फोन काढला, आणि लगेचच माझ्या हातातून निसटून खालच्या दगडावर पडून तो खळ्ळकन फुटला. माथ्यावर एकही फोटो काढता आला नाही. पण तिथे जे बघता आलं, ते कदाचित कॅमेर्‍यात बांधता आलंच नसतं मला. आम्ही पोहोचेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती. शॉपमध्ये मनसोक्त खरेदी करून आणि कॅफेमधून खायला घेऊन कुसुंबी रंगापासून लाल होत जाणार्‍या क्षितिजाला बघत आम्ही शांत बसलो. दृष्टिक्षेपातील संपूर्ण क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्रात तो रंग विरघळत होता. अस्तंतीचे रंग, तो गूढगंभीर समुद्र आणि त्यात बुडत जाणारा तो तेजाचा गोळा... नि:शब्द व्हायला झालं होतं. सूर्यास्त होईपर्यंत ७.३० वाजले, आणि केबल कारचा भोंगा वाजायला सुरुवात झाली. आम्ही त्या दिशेने वळलो मात्र...

तिकडून आत्ता दिसलेल्या दृश्याशी स्पर्धा करत दुसरं दृश्य उभं होतं. खाली शहरात लागलेले चमचम दिवे, आणि वर चांदणं प्रसवणारा पुनवेचा चंद्र. त्या दिवशी 'सुपरमून'होता हे आम्हाला माहितीच नव्हतं. इतक्या उंचावरून इतक्या जवळ दिसणारा, पृथ्वीला मोहवू पाहणारा सुधांशू दिसला, आणि सुखाने कोंदायला झालं. बोरकरांची 'दीस गेला खाला, चंद्रिम वयर आयला' कविता अशी अनुभवायला मिळाली. फोन नव्हता, आणि फोटो काढता आले नाहीत, याचा आनंदच वाटला.

शेवटच्या ८.३० च्या केबल कार मध्ये गेल्यावर त्याच्या ऑपरेटरने लाईट्स बंद केले, आणि चांदण्यात न्हालेला पर्वत, पाझरणारा चंद्र, आणि खाली ते नशीबवान शहर, हे सगळं बघत आम्ही खाली पोहोचलो. केबल कार थांबत आल्यावर अनाउन्समेंट करताना ऑपरेटर 'टेक मी होम' गाणं म्हणत होता. आणि कुठच्यातरी स्वर्गीय घराच्या कुशीत शिरून आल्याचा अनुभव मी मनात साठवून ठेवत होते...

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

9 Dec 2017 - 8:41 pm | Nitin Palkar

आवडलं! छान लिहिलंय!!

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 8:48 pm | पगला गजोधर

हाऊट बे, डेविल्स पीक, चापमॅन ड्राइव्ह, ट्राय केलं की नाही ?
केप टाऊन गावठाणात चार्लीज बेकरी ?? काही ट्राय केलं की नाही ? नॉनव्हेज चालत असतील तर गॅट्सबि सँडविच ट्राय केलं का ???

मनिमौ's picture

9 Dec 2017 - 10:07 pm | मनिमौ

छान लिवल वो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2017 - 10:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सहलवर्णन ! जरासे घामाघूम होऊन गेल्यावर डोंगरावरून दिसणारे दृश्य अधिकच खुलून दिसते. :)

सोबतची व्हिडिओ क्लिप मस्तं आहे.

पद्मावति's picture

9 Dec 2017 - 10:27 pm | पद्मावति

फारच सुरेख.

सुंदर वर्णन.. झकास लिहीलंय!!

एस's picture

10 Dec 2017 - 12:01 am | एस

गुड.

पिशी अबोली's picture

11 Dec 2017 - 6:42 pm | पिशी अबोली

धन्यवाद! :)