रोज रोज

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
2 Dec 2017 - 11:11 pm

रोज रोज -- कथा ( काल्पनीक )

"रोज़ रोज़ आँखोंतले
एक ही सपना चले
रात भर काजल जले .."

हे गीत ऐकु आले आणी काहि वेळासाठी तिचे मन भुतकाळात हरवुन गेले . तिला तिचे कॉलेजचे सोनेरी दिवस डोळ्यांसमोर दिसु लागले . कॉलेजमधील मनमोकळे वातावरण , मित्र मैत्रिणींचा नवा जमलेला ग्रुप , रोजच्या रंगलेल्या गप्पा टप्पा , ग्रुपबरोबर त्या दिवसांत केलेली धमाल तिला परत एकदा आठवु लागली .

या ग्रुपमधेच तिची त्याच्याशी पहिली ओळख झाली . ती एका साध्या , मध्यमवर्गातील घरातली . तर तो शहरातील एका श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा . कायम लेटेस्ट मॉडेलच्या बाइकवरुन नाहीतर कारमधुन कॉलेजला येणारा , कायम रुबाबदार कपडे घालुन मिरवणारा तो कसा कोण जाणे पण तिच्या ग्रुपमधे चांगलाच मिसळुन गेला . तिच्याशी , ग्रुपमधल्या सगळ्यांशी तो नेहमीच निगर्वीपणे वागत , बोलत असे . आपल्या ग्रुपमधल्या मित्रांसाठी काहिही करण्याची , त्यांच्या अडी अडचणीला धावुन जाण्याची त्याची एका पायावर तयारी असे . कॉलेजमधे पैसेवाल्या मुला मुलींचे वेगळे ग्रुप होते . ती मुले कायम आपल्या श्रीमंतीच्या गुर्मीत इतर मुलां मुलींपासुन फटकुन वागत असत . पण तो मात्र अशा घमेंडखोर पैसेवाल्या मुला मुलींपासुन कटाक्षाने दुर राहात असे .

बघता बघता दोन वर्षे निघुन गेली . दोन्ही वर्षी , आपल्या वाढदिवसाला त्याने आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना शहरातील एका आलिशान हॉटेलमधे पार्टी दिली होती . " तु दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला आमची हॉटेलमधेच बोळवण करतोस . या वर्षीच्या वाढदिवसाला मात्र आम्हाला तुझ्या घरी पार्टी हवी . या वर्षीच्या वाढदिवसाला आम्ही तुझ्या घरीच येणार ." ग्रुपमधला एकजण त्याला गमतीने म्हणाला . हे ऐकुन तो थोडा चपापला . पण त्याने लगेच हसत हसत विषय बदलला . ऐन वेळी काहितरी कारण सांगुन त्याने पार्टी देताना शेवटी हॉटेलमधेच दिली .

या दोन तीन वर्षांमधे तिची त्याची चांगलीच ओळख झाली होती . त्याचा निगर्वी , हसतमुख स्वभाव तिला आवडु लागला होता . त्यातच या वर्षीच्या गॅदरींगमधे त्या दोघांनी मिळुन चांगली तयारी करुन एकत्र गाणे सादर केले .

"रोज़ रोज़ आँखोंतले
एक ही सपना चले
रात भर काजल जले .."

त्यांच्या गाण्याची सर्वांनीच खुप वाहवा केली . काहिंनी दोघांची थट्टा मस्करीही केली . अर्थातच दोघांनीही ती थट्टा हसण्यावारी नेली .

नकळत ती त्याच्यामधे गुंतत चालली होती . तिलाही हळु हळु हि जाणीव होत होता . पण त्याच्याशी याबद्दल मनमोकळे बोलण्याचा तिला धीर झाला नाही . ती आपली मनाशीच स्वप्ने रंगवत बसली .

तिच्या ग्रुपमधल्या एका जवळच्या मैत्रीणीला मात्र तिच्यात झालेला हा बदल जाणवला . तिची झालेली अवस्था लक्षात आली .

"असं नुसतंच गप्प राहुन आणी मनातल्या मनात गुंतुन बसलीस तर त्यात तुझंच नुकसान आहे . त्याच्याशी एकदा मोकळेपणाने बोल आणी काय तो सोक्ष मोक्ष लाव . तुला धीर होत नसेल तर मला सांग . मी तुझ्या वतीने त्याच्याशी बोलेन . "

तिच्या रोखठोक स्वभावाच्या फटकळ मैत्रीणीने तिला सल्ला दिला . काहिच न सुचुन ती आपली परत गप्प राहिली आणी तिथुन निघुन गेली .

काहि दिवसांनंतर ती कॉलेजच्या लायब्ररीमधे पुस्तके आणायला जात होती . जाताना , वाटेतल्या एका रिकाम्या क्लासरुममधुन तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला . आवाज ऐकुन थबकुन ती क्लासरुमच्या दाराच्या अलीकडेच थांबली . हा आवाज तिच्याच त्या फटकळ मैत्रिणीचा होता . ती कुणाशी तरी , नव्हे , त्याच्याशीच बोलत होती .

"मला माझ्या मैत्रिणीची अवस्था बघवत नाही . ती काही तुझ्याशी मोकळेपणाने बोलेल असं दिसत नाही . म्हणुन मीच शेवटी एक घाव नी दोन तुकडे करायचे ठरवलं . ती तर तुझ्यामधे गुंतलेली आहे . पण तुला तिच्या बद्दल काय वाटतं आहे ? "

"तु जे काही सांगत आहेस त्याबद्दल मला काहिच कल्पना नव्हती .ती स्वभावानी खुप चांगली आहे . पण मी तिच्याकडे केवळ एक मैत्रिण , एक ग्रुपमेट म्हणुनच बघत आलो आहे . बाकी माझ्या मनात कसल्याही भावना नाहीत. " त्याचा आवाज तिला क्लासरुममधुन ऐकु आला . तिचा श्वास क्षणभर कोंडल्याचा तिला भास झाला .

"का ? ती तुझ्यासारखी पैसेवाल्या घरातील नाही म्हणुन ? " तिच्या फटकळ मैत्रीणीने त्याला रोखठोक सवाल केला . त्याने थोड्या दुखावल्या आवाजात उत्तर दिले .

"तसे काहि नाही . आणी श्रीमंतीबद्दल बोलशील तर तिला माझ्यापेक्षाही श्रीमंत नवरा सहज मिळेल . एक मित्र म्हणुन माझ्या तिला कायम शुभेच्छा असतील . माझ्या घरामधे सध्या खुप प्रॉब्लेम्स सुरु आहेत . बिझनेसच्या वाढत्या ताणामुळे अलिकडे डॅडचं पिणं खुप वाढलं आहे . त्यावरुन त्यांचे रोज मम्मीशी खटके उडतात . सतत वाद विवाद होत असतात . घरातली शांतता जशी नाहिशी झाली आहे . अशा वेळी लग्न करुन या अशांत वातावरणात एखाद्या नवीन व्यक्तीला आणण्याचा मी विचारही करु शकत नाही . लवकरात लवकर बिझनेस सांभाळुन घरातील ताण कमी करणे हेच माझे सध्या एकमेव ध्येय आहे . "

यापुढे काहिही न ऐकता ती तिथुन घरी निघुन गेली . तिला घडल्या प्रकाराने खुप वाइट वाटले होते . पण त्याच बरोबर कुठेतरी मनावरचा एक मोठा ताण हलका झाल्यासारखेही वाटत होते . पुढल्याच दिवशी तिला तिची फटकळ मैत्रिण भेटली . तिने आपले त्याच्याबरोबर झालेले सगळे संभाषण ऐकवले आणी त्याला विसरुन जाण्याचा सल्ला दिला .

"जे झालं ते चांगलंच झालं . तुझ्या मनावरचा ताण वेळीच हलका झाला . आता सगळं विसरुन जा आणी अभ्यासाला लाग . परीक्षा आता दोन महिन्यांवर आली आहे ."

तिनेही काही माहित नसल्याचे भासवत आपल्या मैत्रिणीचे आभार मानले . आणी अभ्यास , परीक्षा याच्यावर लक्ष केंद्रीत केले . बघता बघता परीक्षा संपली . ती पदवीधर झाली . पुढे एका वर्षात तिचे लग्नही ठरले . तिचा होणारा नवरा पराग हाही एक बिझनेसमन होता . आपल्या लग्नाला , रीसेप्शनला तिने आपल्या कॉलेजच्या सगळ्या ग्रुपला बोलावले . या ग्रुपबरोबर तोही आला होता .

"अभिनंदन ..आणी शुभेच्छा..." असे हसतमुखाने म्हणत तो स्टेजवर आला . सोबत आणलेला पुष्पगुच्छ त्याने तिच्या आणी परागच्या हातात दिला . दोन तीन मिनीटे आपली ओळख करुन देत तो परागशी हसतमुखाने बोलला . जेव्हा दोन बिझनेसमन अगदी थोड्या वेळासाठीही एकमेकांना भेटतात , तेव्हा बहुतांशी वेळा त्यांच्यामधे बोलणे होते ते बिझनेसबद्दलच . या दोन तीन मिनीटाच्या भेटीतही त्याच्या व्यक्तीमत्वाने , त्याच्या बिझनेसविषयक ज्ञानाने पराग अगदी भारावुन गेला . तो स्टेजवरुन उतरताच परागने तिच्याकडे बघुन " हा अगदी जाणकार माणुस आहे ." अशा अर्थाची खुण केली . तिला काय बोलावे हे काहीच सुचेना . ती आपली नुसतीच मक्खपणे बघत बसली .

लग्नानंतरचे नव्या नवलाइचे दिवस संपले . परागला सतत बिझनेस टुरसाठी बाहेर जावे लागत असे . अशा वेळी घरामधे अनेक दिवस ती एकटीच असे . ते घर तिला अगदी खायला उठत असे . ती अगदी कंटाळुन गेली होती . अशा वेळी तिच्या मनामधे आयुष्यातल्या जुन्या घटना आठवुन नको नको ते विचार येत असत . आपण परागपासुन काही लपवत तर नाही आहोत ना ? आपण परागला त्याच्याबद्दल काहीच सांगीतले नाही . आपण हे परागला सांगायला हवे होते का ? असे अनेक अपराधीपणाचे विचार तिच्या मनात येत असत .

अखेरीस ही रुखरुख असह्य होउन तिने एकदा आपल्या रोखठोक स्वभावाच्या फटकळ मैत्रीणीला फोन केला . आणी आपल्याला होणारा त्रास बोलुन दाखवला . पण तिच्या मैत्रीणीने उलटी तिचीच चांगली खरडपट्टी काढली .

"तु जर वेळीच सावध झाली होतीस आणी तुझ्या हातुन जर काहि घडलेलंच नाही , तर तु सांगणार तरी काय ? उलट तु जर काही घडलेलं नसतानाही काहितरी सांगायला गेलीस , तर त्यातुन अजुन गुंतागुंत निर्माण होईल . तेव्हा तु मनातुन ही अपराधीपणाची भावना काढुन टाक आणी स्वताला कशात तरी गुंतवुन घे . "

मैत्रीणीने केलेला हा उपदेश ऐकल्यावर तिला थोडे बरे वाटले . पण तरीही तिच्या मनातील अपराधीपणाची भावना अजुन पुर्ण गेली नव्हती . असेच दिवस जात राहिले .

आज खुप दिवसांनंतर पराग लवकर घरी आला होता . एक महत्वाचे बिझनेस डील फायनल झाल्यामुळे तो खुशीत होता . एकदम सेलीब्रेशनच्या मुडमधे होता . आल्या आल्याच त्याने तिला सांगितले .

"चल , लवकर तयार हो . आज आपण लाँग ड्रायव्हींगला जाउ . बाहेरच एखाद्या चांगल्या हॉटेलमधे जेवायला जाउ . "

त्याचा हा बदललेला आनंदी मुड तिच्यासाठी नवीनच होता . पण तिलाही बरे वाटले . ती झटपट तयार झाली .

दोघंही कारमधुन फिरायला बाहेर पडली . थोड्याच वेळात त्यांची कार शहरापासुन बाहेर पडली आणी एका पिकनीक स्पॉटच्या दिशेने जाउ लागली . रस्ता तसा मोकळाच होता . आजुबाजुला वारा ही हलकेपणाने वाहात होता . खुशीत येउन परागने कारमधल्या सिडी प्लेयरवर गाणी सुरु केली . एखादे आवडते गाणे लागले तर तोही जोर जोरात गाउ लागला . थोड्या वेळाने अचानक त्याचे लक्ष तिच्याकडे गेले . त्याचे हे बदलेले रुप ती चकीत होउन पाहात होती .

" सॉरी .. मी माझ्याच नादात होतो . तुझ्याकडे माझे लक्षच गेले नाही . " पराग थोडा वरमुन म्हणाला . ती काहीच बोलली नाही .

परागला अचानक काहितरी सुचले . तो तिला उत्साहाने म्हणाला . "आता मी तुझ्या आवडीचं गाणं लावतो ."

"आपल्या आवडीचं गाणं ? " ....तिला काहीच समजेना . पण तोपर्यंत परागने सिडी प्लेयरवर गाणे सुरु केले होते .

"रोज़ रोज़ आँखोंतले
एक ही सपना चले
रात भर काजल जले .."

ती चपापली . तिच्या मनात अनेक प्रश्न , अनेक नको त्या शंका , कुशंका येउ लागल्या . " या गाण्याबद्दल परागला कसं काय कळलं ? " .

तिच्या मनातली अपराधीपणाची जाणीव परत वर येउ पाहात होती . तरीही तिने चाचरतच त्याला कसेबसे विचारले .

" तु... तुला हे माझे आवडतं गाणं आहे हे कसं कळलं ? "

"असतात ... आमचेही काही दोस्तलोग असतात . " परागने हसत हसत उत्तर दिले .

आज तिला खुप दिवसांनंतर शांत झोप लागली .

------------------------------------ समाप्त ------------- ( काल्पनीक ) --------------------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

2 Dec 2017 - 11:35 pm | शब्दानुज

फुलायच्या आधीच कळी तोडलि

खूप शांत आणि समाधानी मनाने झोप लागली असेल, 'त्याने'च परागला 'तिच्या' मनाची घालमेल सांगितली असेल आणि ते आवडीचे गाणेही..

अभ्या..'s picture

3 Dec 2017 - 10:07 am | अभ्या..

मस्त लिहिलेय.
आवडले.

रमेश आठवले's picture

3 Dec 2017 - 10:10 am | रमेश आठवले

आँखोंतले की आँखों तले ?

ज्योति अळवणी's picture

3 Dec 2017 - 1:37 pm | ज्योति अळवणी

आवडली

सिरुसेरि's picture

4 Dec 2017 - 12:00 pm | सिरुसेरि

सर्वांचे आभार .

मराठी कथालेखक's picture

4 Dec 2017 - 6:01 pm | मराठी कथालेखक

ते गाणं खरंच खूप मस्त आहे..

रंगीला रतन's picture

7 Dec 2017 - 9:43 pm | रंगीला रतन

छान.

बोबो's picture

22 Dec 2017 - 7:00 am | बोबो

छान आहे कथा

विजुभाऊ's picture

22 Dec 2017 - 7:54 am | विजुभाऊ

मस्त.... खूपच तरल आहे

नाखु's picture

25 Dec 2017 - 9:48 am | नाखु

साधेपणा जपणारी

सरधोपट नाखु

सिरुसेरि's picture

11 May 2021 - 3:42 pm | सिरुसेरि

गाण्याची लिंक - https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo