हे टाळता आले असते?- ५ कॉन्कॉर्ड एयरफ्रांस- फ्लाईट- ४५९०

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
28 Nov 2017 - 5:38 pm

हे टाळता आले असते? -१ वारिग फ्लाईट २५४
हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३
हे टाळता आले असते? -३ एरोपेरू: फ्लाईट- ६०३
हे टाळता आले असते? - ४ एरोफ्लोट फ्लाईट -५९३

con

सुरक्षित प्रवासाचा जणू मानदंडच मानल्या गेलेल्या कॉन्कॉर्ड विमानाच्या अपघाताची ही घटना घडली २५ जुलै, २००० रोजी पॅरिस येथे.

या प्रवासासाठी जर्मनीच्या एका कंपनीने हे विमान चार्टर्ड केले होते. या विमानाने प्रवास करून प्रवासी पुढे न्यूयॉर्क ते मांता (व्हेनेज़ुएला) या कैरेबियन समुद्रातील क्रुजच्या प्रवासाला जाणार होते.

दुपारी ४.४० च्या सुमारास चार्ल्स दी गोल विमानतळावर उड्डाणासाठी तयार असणारे हे विमान, नेवार्क ला जाणा-या कॉटीनेंटल एअर लाईन्स च्या विमानापाठोपाठ पाचच मिनिटांत म्हणजे दुपारी चार वाजून ४२ मिनीटांनी हवाईपट्टीवरून धावू लागले या विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच या विमानाच्या शेपटा कडील भागाला आग लागल्याचे अनेक लोकांनी पाहिले. नियंत्रण कक्षातील कर्मचारी देखील या उड्डाणांचे निरीक्षण करीत होते. ही आग वेगाने वाढत होती. सामान्य परिस्थितीमध्ये कॉन्कॉर्ड चे उड्डाण पहाणे हा एक नेत्रसुखद अनुभव असायचा मात्र हे उड्डाण नेहमीप्रमाणे प्रेक्षणीय नव्हते तर अतिशय भयावह होते. वैमानिक आवश्यक ती उंची गाठण्यासाठी आणि पुन्हा सुरक्षीतपणे जमिनीवर आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र विमानाची दोन इंजीन बंद पडल्यामुळे विमान अनियंत्रित होत जावून अखेर विमानतळाजवळच्या एका हॉटेलवर कोसळून विमानातील सर्व १०९ प्रवासी आणि हॉटेलातील ४ असे एकुण ११३ जण केवळ दोन मिनिटांच्या उड्डाणांत मृत्युमुखी पडले होते. विमानतळावरील, रस्त्यावरील, विविध घरातील अनेकांनी हा अपघात पाहिला होता.

i

हवाई वाहतूक क्षेत्रातील स्वप्नवत वाटणारे कॉन्कर्ड. मानवी कल्पना आणि इच्छाशक्ती दोन्हींचा संगम असलेले हे विमान जणू काही अभिजात कलाकृतीच होती. या विमानाने प्रवास करावा असे अनेकांचे स्वप्न असायचे. १९६९ पासून २५ जुलै, २००० पर्यंत ३१ वर्षे चाळीस हजार उड्डाणे, नउ लाख तांस प्रवास केलेले आणि अतिशय सुरक्षीत प्रवासाचे मानदंड ठरलेले हे विमान. या सपूर्ण कालावधीत एकही अपघात झाला नव्हता आणि कोणीही प्रवासी प्राणाला मुकला नव्हता. प्रवासी वाहतूक करणारे इतर कोणतेही विमान सुरक्षेच्या या परिमाणाच्या जवळपासही पोहोचत नव्हते. ध्वनीच्या गतिपेक्षा दुप्पट वेगाने जाणारे कॉन्कॉर्ड पॅरिस - न्यूयॉर्क अंतर केवळ सव्वा तीन तासात कापत असे. याच अंतरासाठी सर्व विमान सेवाना नउ ते दहा तास लागतात.

कॉन्कॉर्ड चा इतिहास मोठा रोचक आहे. १९५० ते ६० च्या दशकात अमेरिका आणि रशियाच्या शीतयुध्दाच्या दरम्यान या देशांचा अंतराळात क्षेत्रात प्रवेश आणि याच क्षेत्रात या दोन देशांची तीव्र स्पर्धा सुरु होती त्याचवेळी अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रांस मधील विमान निर्माण कंपन्या स्वानातीत (आवाजापेक्षा अधिक गतीने) वेगाने जाणा-या विमानाच्या निर्माणाच्या शक्यता आजमावत होत्या ब्रिटन आणि फ्रांस मधील कंपन्यांना या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी मदत मिळत होती. १९६० च्या सुमारास या विमानाचा आराखडा तयार झाला आणि या विमानाची निर्मिति दृष्टीक्षेपात आली. मात्र या प्रकल्पावर येणारा खर्च फारच मोठा होता कोण्या एका देशाला खर्च परवडण्या सारखा नव्हता म्हणून दोन्ही देशातील ब्रिटिश एरोस्पेस आणि फ्रांस एरोस्फटिका एकत्र आल्या. त्यांनी एकत्र येताना केलेल्या कराराचे स्वरुप दोन खासगी कंपन्या मधील व्यवहार नव्हता तर दोन देशांनी केलेला सामंजस्य करार होता. हा करार १९६२ मध्ये झाला. कॉन्कॉर्ड या फ्रेंच शब्दाचा अर्थ करार, सहकार्य किंवा एकत्रीकरण असा आहे. हेच नांव दोन देशांच्या सहकार्याने साकारात असलेल्या या विमानाला देण्यात आले. १९६९ मध्ये कॉन्कॉर्ड पॅरिस एअर शो मध्ये पहिल्यांदा सामिल झाले. जानेवारी १९७६ मध्ये कॉन्कॉर्डची नियमित व्यावसायिक प्रवासी सेवा सुरु झाली.

अत्यंत सुरक्षित विमानाच्या इतक्या भयानक अपघाताची घटना धक्कादायक होती. या अपघाताच्या चौकशी कडे सर्वच प्रसार माध्यमांचे लक्ष होते.

या अपघातानंतर प्रवासी वाहतुकीसाठी कॉन्कॉर्ड वापराणा-या ब्रिटन आणि फ्रांस या दोन्ही देशांनी कॉन्कॉर्डचा वापर थांबवला. त्यामुळे चौकशीचे निष्कर्ष लवकरात लवकर येऊन अपघाताचे निश्चित कारण समजणे आवश्यक होते.

या अपघाताची अधिकृत चौकशी फ्रान्सच्या अपघात चौकशी विभागाने (BEA) ने केली.

विमान अपघाताच्या ठिकाणावरून तसेच धावपट्टी वरुन मोठ्या प्रमाणात अवशेष गोळा करण्यात आले. त्यांची तपासणी करताना धावपट्टी वर विमानाच्या टायरचे अवशेष सापडले. सापडलेल्या आणि सुस्थितीत असणा-या विविध भागांची तपासणी करीत असताना धावपट्टीवर सापडलेला एक धातूचा तुकडा कॉन्कॉर्डशी संबंधीत नाही असे आढळून आले. हा तुकडा टिटेनियम या धातूचा असल्याचे निष्पन्न झाले. हा धातु अतिशय मजबूत असल्याने विमानाच्या विविध भागात वापरला जातो. त्यामुळे हा धातूचा तुकडा जर कॉन्कॉर्डचा नसेल तर तो धावपट्टीवर कसा आला. या अपघाताशी याचा काही संबंध आहे का यावर तपास केंद्रित केला गेला आणि हा लहानसा धातूचा तुकडा ११३ जणांचे जीव घेणारा; सुरक्षेच्या बाबतीत जणू दंतकथा बनलेल्या विमानाच्या अपघाताचे कारण असल्याचे स्पष्ट झाले.

कॉन्कॉर्ड ने उड्डाण करण्याच्या पाच मिनिटे आधी नेवार्क ला जाणा-या कॉटीनेंटल एअर लाईन्स च्या डीसी-१० विमानाने हीच धावपट्टी वापरली होती. त्यावेळी विमानाच्या इंजिनामध्ये बांधणीचा भाग असलेली असलेली धातुची पट्टी निखळून (क्रमांक तीन इंजीन) पडली. ही पट्टी ११ जुनला म्हणजे अपघाताच्या फक्त १४ दिवस आधी तेल अवीव इस्त्राईल येथे बदलण्यात आली होती. त्यानंतर ह्युस्टन येथे देखील विमानाच्या देखभालीचे काम केले गेले होते.

त्यानंतर पाचच मिनिटांनी धावपट्टीवरून कॉन्कॉर्ड जात असतांना उड्डाण करण्याच्या वेगापर्यंत पोहोचल्यावर दोन क्रमांकाचा टायर या धातूच्या पट्टीवरून जात असतांना फुटला या टायर मध्ये काही टन वजन असलेल्या कॉन्कॉर्ड चे वजन सहन करण्याच्या दृष्टीने प्रचंड दाबाने हायड्रोजन भरलेला होता अतिशय वेगाने बाहेर पडलेल्या हवेच्या दाबामुळे टायरच्या वर असलेली इंधनाची टाकी फुटली त्यात असलेल्या इंधनाने पेट घेतला. त्यातच विमानाच्या दोन ईंजिनांचे नुकसान होऊन एक इंजीन बंद पडले. विमानाने ओलांडलेली धावपट्टीची आणि वेगाची मर्यादा यामुळे वैमानिकांपुढे उड्डाण रद्द करण्याचा पर्याय उपलब्धच नव्हता त्याना उड्डाण करणे भागच होते. मात्र तीन पैकी दोन इंजिन काम करीत नसल्यामुळे आणि टायर फुटल्याने विमानाला पोहोचलेल्या नुकसानामुळे आता अपघात होणे अटळ झाले होते.
co
अपघाताला कारणीभूत ठरलेली धातूची पट्टी

एकंदरीत फ्रेंच तपास यंत्रणाच्या मते संपूर्ण जबाबदारी कॉटीनेंटल एअर लाईन्सची होती. त्यामुळे या एअर लाइन विरुध्द २००५ मध्ये मनुष्यवधाचा गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल केला. त्यानंतर २००८ मध्ये या एकर लाइंस चा कर्मचारी जॉन टेलर ज्याने DC - १० विमानाची दुरुस्ती केली होती आणि कंपनी चे व्यवस्थापक स्टेनली फोर्ड यांच्या विरुध्द देखील मनुष्यवध आणि कामामध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कॉन्कॉर्ड प्रकल्पाच्या अनेक अधिका-यांच्या विरोधात देखील या खटल्यात गुन्हा दाखल केला होता.

मात्र कॉटीनेंटल एअर लाईन्सने मात्र हे आरोप पूर्णत: फेटाळून आपल्याला बळीचा बकरा बनवला जात असल्याचे सुनावणी दरम्यान सांगीतले. त्यांच्या मते टिटानियमच्या त्या तुकड्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच कॉन्कॉर्डला आग लागली होती. या घटनेचे अनेक साक्षिदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या खटल्यात कॉटीनेंटल एअर लाईन्स दोषी असल्याचा म्हणून कॉटीनेंटल एअर लाईन्सने २,७१,६२८ डॉलरचा दंड आणि १० लाख डॉलर नुकसान भरपाई एअर फ्रान्सला द्यावी तसेच जॉन टेलरला १५ महिन्याची कैद, इतर सर्व व्यक्ति निर्दोष असा निकाल फ्रेंच कनिष्ठ कोर्टाने दिला. त्याशिवाय या निकाला प्रमाणे फ्रेंच एअरलाइंस ने प्रवाशांच्या नातेवाईकांना नुसान भरपाई पोटी दिल्या जाना-या १०० मिलियन युरोच्या ७०% रक्कम फ्रांस एअऱलाइंसला द्यावी असाही आदेश दिला.

मात्र उच्च न्यायालयाने कॉटीनेंटल एअर लाईन्सला गुन्हेगारी खटल्यातून मुक्त केले मात्र सीव्हील स्वरूपाच्या आरोपात दोषी आढळल्याने नुकसानभरपाई संदर्भातील निकाल कायम ठेवला.

मात्र या अपघाताने कॉन्कॉर्ड च्या स्वर्णिम प्रवासाच्या शेवटाची सुरुवात झाली. अपघाता नंतर काही काळ थांबवलेली वाहतूक नोव्हेंबर २००१ पुन्हा सुरु झाली. मात्र दरम्यानच्या काळात ९-११ घडून गेले होते. त्याचा विपरीत परिणाम विमान वाहतूक क्षेत्रा वर झाला होता. ही प्रवासी वाहतूक किफायरशिर ठरत नव्हती. त्यामुळे फ्रांस आणि ब्रिटेन यांनी २००३ मध्ये आपापल्या सेवेतून कॉन्कॉर्ड निवृत्त केले.

कॉन्कॉर्ड च्या अपघाची वर उल्लेखलेली कारण मिमांसा फ्रेंच तपास यंत्रणानी केली असली तरी सर्वमान्य नाही. त्या विरोधातही अनेकांनी लिहिले आहे त्यासंबंधी पुढील भागात...

क्रमश:

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

बापरे! अतिशय दुर्दैवी :(

चौकटराजा's picture

29 Nov 2017 - 6:30 pm | चौकटराजा

एक प्रकार असाच रेल्वे चा आठवतो. संदर्भ डिस्कव्हरी चानल . गाडीचा आवाज जरा कमी करा अशी मागणी लोकांकडून झाल्याने गाडीची चाके कांपोझीट मटेरिअल वापरून करण्यात आली व या बदलानेच गाडीचा भीषण असा अपघात घडवून आणला.

मला हे कारण सयुक्तिक वाटत नाही. एका छोट्याशा पट्टीने विमानाचा टायर फुटेल हे अतर्क्य वाटतं. पुढील भागात दुसऱ्या कारणांवर होणाऱ्या ऊहापोहाच्या प्रतीक्षेत.