माचू पिक्चू - भाग ५

उदय's picture
उदय in भटकंती
28 Nov 2017 - 9:17 am

भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६

दिवस ४

आज आम्ही पहाटे ३ वाजताच उठलो आणि ३:३० ला चेकपोस्टला जाऊन बसलो आणि तिथेच सकाळचा नाश्ता केला. आमच्या ग्रुपचाच नंबर पहिला होता. चेकपोस्ट ५:३० उघडतात आणि तेव्हाच इंका ट्रेलचा शेवटचा टप्पा सुरू होतो. पण इतक्या लवकर जायचे कारण म्हणजे रांगेत नंबर लावायचा होता. रोज ५०० जण हा ट्रेल करतात, त्यामुळे अगदी पुढे राहून लवकरात लवकर सनगेटवर पोचायचे होते जिथून सर्वप्रथम माचू पिक्चूचे दर्शन होते. चेकपोस्टच्या थोड्याशा भागातच शेड आहे, त्यामुळे पाऊस पडला तर शेडमध्ये थांबता येईल हा मुख्य उद्देश होता.

फोटो: रांगेत उभे
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

चेकपोस्टपासून सनगेटला जायला साधारण १ तास लागतो. आज मी पहिला अर्धा तास तर पहिल्या १० जणांमध्ये होतो. माचू पिक्चू बघायची उत्सुकता होती, पण मुख्य कारण होते की ५०० लोकांच्या गराड्यात मी मागे राहीन याची भिती. सनगेटला फारच थोड्या लोकांना उभे राहायला जागा आहे आणि लोक पुढे गेल्याशिवाय मागच्याना तिथे येता येत नाही. पण साधारण अर्धा तास झाला की वाटेत किलर स्टेप्स लागतात. या साधारण ५० पायऱ्या आहेत जिथे चढ जवळपास ६५-७० डिग्री आहे आणि प्रत्येक पायरी साधारण २ फुटाची आहे, म्हणजे अक्षरश: हाताने पकडून माकडासारखे वर चढावे लागते. खरं सांगतो, उंचीची भीती वाटत असेल तर इंका ट्रेल करणे अशक्य आहे. तुम्ही विचार पण करू नका.

फोटो: आज पावसाची लक्षणे दिसत होती, त्यामुळे सनगेट वरून माचू पिक्चू नीट दिसला नाही. सनगेटवरील धुके.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: सनगेट वरील धुके अजून एकदा.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

सनगेटवर १०-१५ मिनिटे थांबलो. एकदा धुके कमी होणार असे वाटत होते, पण नाहीच. मग किती वेळ थांबणार म्हणून पुढे निघालो. सनगेटपासून प्रत्यक्ष माचू पिक्चू अजून १ तासावर आहे.

फोटो: नेमका पाऊस सुरू झाला, मग काय करणार? पॉंचो घालून निघालो पुढे.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो:शेवटी एकदाचे माचू पिक्चूचे पहिले दर्शन झाले. पण तरीही अजून धुके होतेच.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

शेवटी मग माचू पिक्चू साईटवर पोचलो आणि इंका ट्रेल संपला. मग गाईडने माहिती द्यायला सुरुवात केली. प्रत्यक्ष साईटवर, साधारण अडीच तासाची ही गायडेड टूर आहे.

फोटो: गाईड माहिती सांगताना
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

आणि काय आश्चर्य!! हवा एकदम बदलली, धुके निघून गेले आणि माचू पिक्चूचे हे खरेखुरे दर्शन झाले. ते बघून डोळ्यांचे पारणे फिटले अक्षरश:
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

साधारण १४३२ ते १५२८ या कालखंडात माचू पिक्चू बांधले गेले. पाचाकुटेक या राजाने हे बांधण्यास सुरुवात केली आणि इंका लोकांनी ते साधारण ३० ते ४० वर्षे व्यवस्थित वापरले. १५२८ मध्ये स्पॅनिश लोकांनी आक्रमण केले तेव्हा इंका लोक माचू पिक्चू सोडून निघून गेले. जाताना ते बहुधा सर्व किमती गोष्टी घेऊन गेले आणि काही ठिकाणी झाडे लावून त्यांनी स्पॅनिश लोकांची दिशाभूल केली. म्हणून माचू पिक्चूची नासधूस झाली नाही. पण तसेच त्यामुळे तिथे काहीही मौल्यवान मिळाले नाही, फक्त १ सोन्याचे लॉकेट एका झाडाखाली मिळाले आहे तेव्हडेच. १९११ साली हिराम बिंगहॅम याने ही जागा शोधून काढली म्हणून जवळपास ४०० वर्षांनी आपल्याला ही जागा सुस्थितीत मिळाली.

माचू पिक्चू हे इंका राजाचे निवासस्थान होते आणि कुस्को या इंका राजधानीतून रॉयल फॅमिली इथे येत असे. इथे सुमारे १७२ घरे होती ज्यात ७०० लोक राहायचे. रॉयल फॅमिलीच्या निवासाव्यतिरीक्त इथे पुजारी आणि इतर लोक पण राहायचे. मुख्य म्हणजे इथे सन टेम्पल (सूर्यमंदिर) होते. इंका लोकांचे देव म्हणजे सूर्य, आकाशातले तारे, पर्जन्य वगैरे (म्हणजे थोडक्यात निसर्ग). माचू पिक्चूवर धान्य ठेवायला कोठारेपण होती, ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करण्यासाठी वेधशाळा होती, सनडायल होती, शिवाय टेरेसवर (चित्र पुढे आहे) ते वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळी पिके घेण्याचा अभ्यासही करत असत. पर्वतावरून इथे पाणी आणले जात असे. ते पिण्यासाठी तसेच टेरेसवर शेतीसाठी वापरले जात असे आणि मातीची धूप होऊ नये म्हणून टेरेसच्या कडेने कालवेपण बनवले होते.(टेरेसचा खरा उद्देश शेती न्हवता, ते सुरक्षेसाठी बांधले होते, असे गाईडने सांगितले). या टेरेस अनेक लेयर्सच्या बनवल्या होत्या. प्रत्येक लेयरला, सर्वात तळात मोठे दगड होते, त्याच्यावर लहान दगड, मग त्याच्यावर धूप थांबवण्यासाठी वाळू आणि वर सुपीक माती. ही वाळू कोस्टल एरियातून आणली होती आणि माती पण डोंगराच्या पायथ्याच्या भागातून आणली. एकंदरीत हे फार कष्टाचे काम होते आणि मजूर लोक टॅक्सच्या रूपात म्हणून अशी मजुरी/अंगमेहनत करत असत.

फोटो: टेरेस
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: पर्वतावरून आणलेले पाणी, अजूनही उपलब्ध आहे. या दगडात जे गोलाकार मार्ग दिसतात त्याचा वापर करून पाण्याचा वेग कमी केला जात असे आणि फ्लो-कंट्रोल केला जात असे, असे तंत्र इंका लोकांना माहीत होते.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: सन टेम्पल (सूर्याचे मंदिर) याला सर्वोत्तम दर्जाचा दगड वापरला आहे आणि दोन दगडांच्या मध्ये mortar अजिबात वापरला नाही. ७ महत्वाच्या ठिकाणी दरवाजे दुहेरी बंद करायची सोय होती (सिक्युरिटी सिस्टीम). सन टेम्पलच्या खिडक्यांतून २१ जून आणि २१ डिसेंबरला सूर्यप्रकाश थेट आत येतो कारण या दिवशी सूर्य पृथ्वीपासून सर्वात कमी/जास्त अंतरावर असतो आणि म्हणून हे दोन्ही दिवस इंका कॅलेंडरनुसार फार महत्वाचे आहेत.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: सन टेम्पल (सूर्याचे मंदिर) २
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: सन टेम्पल जवळचे दगड
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: ग्रेड १ दगड इंपिरियल स्टाईलचे आहेत, जे मंदिरांसाठी वापरले जात. त्यांना ७ डिग्री इनक्लीनेशन होते, ज्यामुळे भूकंपापासून त्याचे रक्षण होईल कारण इथे २ fault line आहेत ज्यातली १ थेट माचू पिक्चू मधून जाते. याशिवाय हे दगड convex + concave असे आहेत ज्यामुळे ते एकमेकांवर एकदम घट्ट बसतात आणि अजिबात हालत नाहीत. म्हणूनच ५०० वर्षांनंतरपण सन टेम्पल हे मंदिर एकदम सुस्थितीत आहे.
पुढील फोटोतले मंदिर सन टेम्पल नाही, हे अपूर्ण आहे. पण दगड इंपिरियल स्टाईलचे आहेत.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: ग्रेड २ दगड, हे रॉयल फॅमिली आणि प्रीस्ट यांच्या घरांसाठी वापरले जात. यात पण mortar वापरला जात नसे. यांना ३ डिग्री इनक्लीनेशन होते आणि सगळ्या खिडक्या trapezoid आकाराच्या होत्या. ते सुद्धा भूकंपापासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून. मुळात या खिडक्या वाटत असल्या तरी त्यांचा उपयोग शेल्फ म्हणून केला जात असे, त्या उघडत नाहीत. हा फोटो रॉयल फॅमिलीच्या घराचा आहे. याचा दरवाजा थोडा उंच आहे कारण मुकुट घालून राजाला जाता यावे म्हणून.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: ग्रेड ३ दगड कोलोनियल स्टाईलचे आहेत, हे इतर सामान्य बांधकामासाठी वापरले जात.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: राजाची कबर (Royal Tomb) ही बरोबर सन टेम्पलच्या खाली आहे. इंका लोकांच्या प्रथेनुसार कुणीही मरण पावला की त्याला fetal position मध्ये ठेवून अंगावर बरेचसे किमती कापड गुंडाळून ममी बनवत असत आणि त्या व्यक्तीच्या सर्व खासगी वस्तू पुढील जन्मात उपयोगी येतील म्हणून सोबत ठेवत असत. इंका लोकांसाठी ३ आकडा महत्वाचा होता, म्हणून बहुतेक ठिकाणी ३ स्टेप्स असतात. १ पूर्वजन्मासाठी (represented by Snake), १ या जन्मासाठी (represented by Puma) आणि १ पुढील जन्मासाठी (represented by Condor). Condor (दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड) हा इंका लोकांचा देव आहे. पुढे त्याच्या मंदिराचा फोटो आहे.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: माचू पिक्चूमध्येच दगडाची खाण होती, त्यामुळे दगड बाहेरून आणले नाहीत. (सन टेम्पलचे दगड मात्र विशेष आहेत, ज्वालामुखीपासून बनलेल्या ग्रॅनाईटचे, जे इथे आणले गेले).
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: दगडाची खाण २
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

(क्रमश:)

प्रतिक्रिया

शलभ's picture

28 Nov 2017 - 9:28 am | शलभ

मस्त आहे हा भाग पण..

यमगर्निकर's picture

28 Nov 2017 - 12:16 pm | यमगर्निकर

चांगली माहिती आहे.

रुस्तम's picture

28 Nov 2017 - 2:04 pm | रुस्तम

क्रमश: वाचून बरे वाटलं.

रुस्तम's picture

28 Nov 2017 - 2:04 pm | रुस्तम

क्रमश: वाचून बरे वाटलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Nov 2017 - 3:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन व फोटो ! "माचू पिक्चूचे हे खरेखुरे दर्शन झाले" या वर्णनाखालचा फोटो विशेष आवडला. पुभाप्र.

पद्मावति's picture

28 Nov 2017 - 4:04 pm | पद्मावति

अतिशय सुरेख चाललीय ही प्रवासमालीका. वाचतेय.

प्रचेतस's picture

28 Nov 2017 - 4:18 pm | प्रचेतस

जबरदस्त.
'मस्ट सी बीफोर यु डाय'.

समर्पक's picture

29 Nov 2017 - 10:32 am | समर्पक

सगळे भाग आज वाचले. मस्त चित्रे व वर्णन. आधीच गूढ वाटणारी ही जागा धुक्यात अजुनच गंभीर वाटते...

सुबोध खरे's picture

29 Nov 2017 - 10:58 am | सुबोध खरे

आज पाचही भाग एका दमात वाचून काढले.
सुंदर वर्णन आहे. एका नव्या जागेबद्दल ( ज्याबद्दल बरंच केवळ ऐकलं होतं) बरीच माहिती मिळत आहे. फोटो सुंदर आहेत. अजून भरपूर फोटो टाका.
मिपा घरचंच आहे. आणि पुढचा भाग लवकर येऊ द्या.

उदय's picture

29 Nov 2017 - 8:08 pm | उदय

कृपया ६ वा अंतिम भाग पण वरील अनुक्रमणिकेत जोडावा, ही विनंती.

सूड's picture

30 Nov 2017 - 1:53 pm | सूड

जबरदस्त!!

विचित्रा's picture

30 Nov 2017 - 6:36 pm | विचित्रा

काय अप्रतिम रचना आहेत या. इतक्या दुष्कर जागी ही सुंदर नगररचना.

एमी's picture

1 Dec 2017 - 7:11 am | एमी

मस्त!