तो.. एक शुद्ध-घन-घट्ट गोळा !!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
25 Oct 2017 - 2:30 pm

"श्रीयुत जोशी श्रेष्ठी आहेत का निवासात?", जरा पुरुषी पण नाजूक आवाजात त्याने विचारले.

"कोण?", मी विचारले.

"मी सुरेश, तसा आपला परिचय नाही. मी श्रीयुत जोशी श्रेष्ठींसोबत एकाच कार्यालयात कार्य करतो."

"अच्छा..या ना आतमध्ये."

"श्रीयुत जोशी श्रेष्ठी नाहीयेत का निवासात?"

"नाही..जोशी साहेब बाहेर गेले आहेत", स्वयंपाकघरातून बाहेर येत माझी काकू म्हणाली.

"रात्रप्रहरी शतपावली करण्यास निर्गमन केले का त्यांनी?"

"नाही हो..जरा कामासाठी बाहेर गेले. तुमचं काही काम होतं का?"

"हो ना..हरकत नाही..तसं कार्यालयीनच होतं. मी प्रभातप्रहरी येईल.",एवढं बोलून तो निघून गेला.

आमच्या काकांचं ऑफिस आणि घर अगदी शेजारीच असल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांची ये-जा नेहमीच सुरु असायची. पण ह्या माणसाला मी पहिल्यांदाच बघितलं होतं.
"काकू, कोण गं हा?"

"अरे हा सुरेश..काकांच्या ऑफिसमध्ये आहे."

"असा काय बोलतो तो?"

"शुद्ध मराठी बोलण्याची सवय आहे त्याला. ते पण अगदी अस्खलित! आता बघ तू त्याची मजा रोज."

हा माणूस जर मला बाहेर कोठे दिसला असता तर साधारण ज्यांच्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो तसंच मी केलं असतं. म्हणजे ओंगळवाणा हा शब्द जेवढा ओंगळवाणा आहे तेव्हढाच तोसुद्धा होता. पण तो काय चीज आहे हे त्याच्या तोंडाचा पट्टा चालू झाल्याशिवाय कळायचं नाही. आता त्याच्या मधुर वाणीला पट्टा म्हणणे योग्य नाही पण तो अक्षरश: पट्ट्यासारखाच एका फटक्यात लोळवायचा.

एकदा मी सायकलचं पंक्चर दुरुस्त करायला गेलो असताना तिथे हा मला भेटला. त्याने बोलायला सुरवात केली.
"अरेरे, स्वकष्टचलित दुचाकी नादुरुस्त आहे वाटते."

"काय??", मी कष्टी मनाने त्याला विचारलं.

"काय बिनसलंय तरी काय दुचाकीचं?", त्याने सायकलकडे बोट दाखवून म्हटलं.

"हो, सायकल पंक्चर झालीये."

"अरेरे, चक्रातील हवेने निर्गमन केले म्हणायचे.उष्ण हवामानात हे व्हायचेच म्हणा."

उष्ण हवामान आणि सायकल पंक्चर होण्याचा काय संबंध आहे हे मला अजूनही कळले नाही.

मी विषय बदलण्यासाठी काहीतरी बोललो,
"काय बरेच दिवसात आले नाही तुम्ही घरी",मी विचारले.

"अहो असे काय वदता? मी कालच संधिप्रकाश प्रहरी भेट दिली आपल्या निवासाला. पण आपण आपल्या जेष्ठ भगिनीसमवेत फळीसुमनाचा आनंद घेत होता. तुमचे चित्त तिकडेच होते."

"फळीसुमन? म्हणजे", मला काहीही कळलं नव्हतं.

"अहो तो एक क्रीडाप्रकार आहे ना?"

माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. काल संध्याकाळी मी बहिणीसोबत बॅडमिंटन खेळत होतो. बॅडमिंटन...म्हणजेच फळीसुमन !!

"अहो मी तुमच्या निवासातून निर्गमन केले आणि अल्प कालावधीत पुनरागमनही केले.माझे नेत्रकवच आपल्या निवासातच विसावले होते. अर्थात तो माझाच प्रमाद म्हणायचा."

"बरं बरं..या पुन्हा", एवढं बोलून मी तिथून सटकलो.

काकांच्या घरी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो. परीक्षांचे निकालही तेंव्हाच लागायचे. एकदा असाच माझ्या शाळेचा निकाल लागला. मला उत्तम मार्क मिळाले. (आता त्या काळात सत्तर-बहात्तर टक्के हे उत्तम श्रेणीत यायचे याला माझा इलाज नाही! यावर अधिक चर्चा नको!)
आम्ही आनंदानी उड्या मारत असताना हे महाशय घरी आले.
"अहो घडलंय तरी काय? हर्षोल्हासात न्हाऊन निघालाय तुम्ही!"

"मी वार्षिक परीक्षेत पास झालोय."

"अरे उत्तमच! हार्दिक अभिनंदन करावयास हवे आपले!"

यानंतर तो जे काही बोलला ते मी आयुष्यात विसरणार नाही.

तो म्हणाला," शुद्धदुग्धशर्करामिश्रितघनघट्ट गोळा वाटपाचा मुहूर्त कधी असणार आता?"

"काय??"

"अहो शुद्धदुग्धशर्करामिश्रितघनघट्ट गोळा!! हलवायाच्या विक्रीकेंद्रात उपलब्ध असेल अगदी ताजातवाना!"

बऱ्याच वेळाने त्याला पेढा म्हणायचे आहे हे कळले. इतका वेळ तर आमचेच थिजून घनघट्ट गोळे झाले होते.

असो...
काका नेहमी सांगायचे, त्याला एखाद्या मीटिंगला घेऊन जाणे म्हणजे डोक्याला ताप असायचा. साहेबाना त्याच्या शब्दाचे अर्थ सांगण्यातच अर्धा वेळ जायचा. एका मीटिंगमध्ये त्याने कहर केला होता. साहेबांनी त्याला विचारले,
"सुरेश, ते मटेरियल रीकंसायलेशनचं काम झालं का?"

"पुर्णत्वानिकट पोहोचलं आहे. अतिशीघ्र आपल्या कक्षात आपल्या निरीक्षण व अभिप्रायासाठी दाखल करतो."

"काय?", साहेबांना काहीच कळलं नाही.

"अहो तेच की, साहित्य पुनर्रसमेट पूर्णत्वास पोहोचली की एकही क्षणाचा विलंब घडू देणार नाही मी."

"बरं बरं..लवकर पूर्ण करा."

त्याच मीटिंगमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर त्याच्या पेमेंटविषयी तक्रार घेऊन आला होता.
"हे सुरेश साहेब माझं बिलचं क्लियर करत नाही साहेब."

"काय प्रॉब्लेम आहे यांचा सुरेश?",साहेबांनी विचारलं.

"अहो मी या सज्जनास अनेक वेळा वदलो आहे. ह्यांच्या हिशोबपत्रिकेत असंख्य दोष आढळले आहेत. तसे असताना मी कसं काय निर्दोष प्रमाणपत्र देऊ त्या हिशोबपत्रिकेला?"

"सुरेश..दोष-निर्दोष ठरवायला कोर्टात बसलोय का आपण? काय बोलताय तुम्ही?"

"तसं नाही श्रेष्ठी. या सज्जनाने नूतन हिशोबपत्रिका दाखल करायला हवी."

शेवटी साहेब कंटाळून त्या काँट्रॅक्टरला म्हणाले,"यांना काय हवाय ते देऊन टाका हो एकदाचं."

मला त्याच्याविषयी बरेच प्रश्न पडायचे. अजूनही पडतात. हा स्वतःच्या बायकोशी कसा बोलत असेल? आता बघा तो चहाला 'कशालपेय' म्हणत असे. सकाळी त्याचा बायकोशी होणार हा एक काल्पनिक संवाद बघा,
"प्रिये/सये/भवाने (जो जास्त शुद्ध वाटतोय तो शब्द घ्यावा) प्रभातप्रहार झालाय बघ."

"मग मी काय करू?"

"असं काय वदतेस? त्या भास्कराची कोवळी किरणे मुखकमलावर आलीत बघ."

"मग खिडकी बंद करा."

"एवढी कठोर होऊ नकोस. मला कशालपेय देतेस का?"

"कशाला पिता कशालपेय?"

"मग अन्य काय ग्रहण करू सये?"

"तुमचा जन्म ग्रहणातला का हो?"

"असं काय वदतेस सखे? तुझ्या कोमल मुखातून शोभत नाही असे शब्दांचे बाण."

"हे बघा..मला नावाने हाक मारा. आणि चहा हवा असेल तर आधी दूध घेऊन या."

"काय वदतेस? भोजनकक्षात दूध नाही!! या प्रहरी कुठे उपलब्ध होणार दूध?"

"म्हशीच्या गोठ्यात जा सरळ."

"म्हशी या प्रहरी दूध देतात का?", त्याला प्रश्न पडला.

"नाही ग्रहणात देतात. तुम्हाला चालेल की ते!!"

"हरकत नाही. मी शीघ्र भेट देतो त्या स्थळाला. सये,परतताना पारलेनिर्मित मैदाशर्करामिश्रित चतुर्भुज तुकडे आणू का?"

"आणा तुम्हाला काय आणायचं ते."

तर या अश्या बोलण्यामुळे त्याची कीर्ती गावात पसरली होतीच. बरेच लोकं तो दिसला की तिथून निघून जायचे. काही मुद्दाम त्याच्याशी बोलायला थांबायचे. त्याच्या तोंडावर त्याची मजा उडवताना मी कित्येक लोकांना बघितले आहे. पण तो बधला नाही. शुद्ध मराठीतच बोलायचे हा निग्रह त्याने कायम ठेवला.अर्थात त्यामागची प्रेरणा काय होती हे आम्हाला कधीच कळलं नाही. कालांतराने काकांनी ते गाव सोडलं. त्यानंतर वीसेक वर्ष त्याच्याशी काहीच संपर्क नव्हता. काही दिवसांपूर्वी बरेच प्रयत्न करून त्याचा नंबर मिळाला. त्याने आता मला ओळखण्याची काहीच शक्यता नव्हती. आणि ओळखलं तरी त्याच्याशी काय बोलणार हा प्रश्न होताच. पण तो अजूनही तसाच असेल का हा प्रश्न मनात होता. हिंमत करून फोन केला. आणि पहिल्याच वाक्यात प्रश्नाचं उत्तर मिळालं.
कारण फोन उचलल्यावर मी हॅलो म्हणायच्या आधी समोरून आवाज आला,

"जय श्रीराम, नमस्कार !!

-- समाप्त

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

25 Oct 2017 - 2:51 pm | बाजीप्रभू

काल्पनिक आहे का?

लिखाण काल्पनिक आहे..पण ह्या माणसाला मी भेटलो आहे. तो असंच बोलायचा.

अत्रन्गि पाउस's picture

25 Oct 2017 - 3:25 pm | अत्रन्गि पाउस

गटण्याप्रभावितअतिमूढावतार वाटतो

शुद्धदुग्धशर्करामिश्रितघनघट्ट गोळा!!

=))
खरंच लोक असं बोलतात का ?

मराठी_माणूस's picture

25 Oct 2017 - 4:05 pm | मराठी_माणूस

मस्त.

त्या नवरा बायको च्या काल्पनीक संवादावरुन , बटाट्याच्या चाळीतला "दादा सांडगेंच्या चाळीला भेट " ह्या प्रकरणातला असाच एक संवाद आठवला.

गामा पैलवान's picture

25 Oct 2017 - 6:19 pm | गामा पैलवान

आयला, मी असतो तर जाम मजा केली असती. मला आवडेल अशी वल्ली गप्पा मारायला.
-गा.पै.

संग्राम's picture

25 Oct 2017 - 9:06 pm | संग्राम

गामाजी,
तुम्हा दोघांची जुगलबंदी .... भारीच !!

ह.घ्या.☺️

माझ्या ओळखीत आहे एक असा नमुना, तो मटण चिकन आणि तत्सम पदार्थांना मांसाचे गोळे असं म्हणतो.

ज्योति अळवणी's picture

25 Oct 2017 - 8:33 pm | ज्योति अळवणी

माझ्या मुलींशी बोलताना गम्मत म्हणून मी foot wears ना पायताण, इंग्रजी भाषेचा उल्लेख आंग्ल भाषा असा करते. ते देखील या इंग्रजी माध्यमाच्या मुलींना जड वाटतं

नाखु's picture

26 Oct 2017 - 11:24 pm | नाखु

"तारसप्तकी,त्रिकाल ज्ञानी, वर्ज्य पुढे पंडित, हृदय स्पंदनी,चित्तभाव तातडीची,कोमलमुखी,कुटवदनी" असं काही बडबडत इकडची स्वारी आली,पण मीही काही कमी नाही.....
बाकी तू सुनबाई बरोबरीने येशील तेंव्हा सांगेन.

चविष्ट​ वक्रांगी कंटवर्तृळी तयार आहेत, स्नुषेस सांग
....
पुन्हा मित्र हा मा

नाखु's picture

27 Oct 2017 - 8:32 am | नाखु

पुन्हा मिपा सार्वकालिन माई

भुजंग पाटील's picture

27 Oct 2017 - 5:51 am | भुजंग पाटील

बॅडमिंटनला झारीसूमन शब्द योग्य वाटतो.

भुजंग पाटील's picture

27 Oct 2017 - 5:53 am | भुजंग पाटील

झारीसुमन आय मिन्ट.

गामा पैलवान's picture

27 Oct 2017 - 12:18 pm | गामा पैलवान

फूलधोपटी कसाय?
-गा.पै.

फूलबडवे, फूलउडवे वैगरे..

नाखु's picture

27 Oct 2017 - 4:51 pm | नाखु

चालेल का ?

तिमा's picture

28 Oct 2017 - 4:43 am | तिमा

हा इसम संडासाला काय म्हणतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

स्वकष्टकुंथनेमलनिस्सारणकुपीका

असते म्हणा कुणा कुणाची आवड.

पगला गजोधर's picture

4 Nov 2017 - 3:45 pm | पगला गजोधर

कारण गजोधरा पाठोपाठ, शौचही लगेचच प्रकटते.....

कारण शौच गजोधराच्या सडक्या मेंदूतच भरलेलं आहे.

बावळटपणा आहे. हे मराठी शुद्ध वगैरेपेक्षा संस्कृतप्रचुर म्हणता येइल.
पेढा हा काय मराठी शब्द नैये का?

अनिंद्य's picture

25 Apr 2018 - 12:17 pm | अनिंद्य

@ चिनार,

हे आजच वाचले.

स्वकष्टचलित दुचाकी काय
फळीसुमन काय
नेत्रकवच / साहित्य पुनर्रसमेट / कशालपेय काय

भयानक, भीषण, भयंकर :-) :-) :-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Apr 2018 - 12:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

अग्निरथगमनागमन दर्शक ताम्रपट्टीका