(माझा हा पुढील लेख ’ऐसीअक्षरे’मध्ये पूर्वी प्रकाशित झाला आहे.)
पंडितकवि मोरोपंत हे व्यवसायाने पुराणिक. बारामतीतील प्रसिद्ध सावकार आणि पेशव्यांचे संबंधी बाबूजी नाईक ह्यांच्या आश्रयाने ते बारामतीला आले आणि तेथेच प्रवचने-कीर्तने करून त्यांची उपजीविका झाली. रामभक्त असलेल्या मोरोपंतांचे शब्दसंपदेवर कमालीचे प्रभुत्व होते. हत्तीने शुंडादंडावर पुष्पमाला खेळवावी तितक्या सहजतेने मोरोपंत भाषेशी खेळतात असे त्यांच्या बाबतीत म्हणले गेले आहे. त्याचप्रमाणे कविता रचण्याचेहि मोठे कसब त्यांच्यामध्ये होते. फार गहन तत्त्वज्ञान न सांगता स्वत:ला आणि अन्य पुराणिकांना पुराणात वापरता येईल अशी काव्यरचना फार मोठया प्रमाणात त्यांनी केली. ज्या काळात मराठीमध्ये लिहिणे हे कमी विद्वत्तेचे दर्शक आहे, जे काही लिहायचे ते संस्कृतातच असले पाहिजे अशी धारणा विद्वद्वर्गामध्ये होती त्या काळात फार विपुल प्रमाणात मराठीमधून कसदार काव्यरचना करून त्यांनी मराठी वाङ्मयाची मोठी सेवा बजावली आहे ह्यात संशय नाही.
जवळजवळ पूर्ण १९वे शतक आणि २०व्याचा अर्धा भाग मोरोपंत थोडेफार मुखोद्गत असणे हा मराठी सुशिक्षितपणाचा एक निकष होता. तो आता निश्चित उताराला लागलेला आहे. ह्याचे कारण त्यांच्या काव्यातील संस्कृत शब्दांचा अतोनात वापर आणि तज्जन्य दुर्बोधता. तरीहि मोरोपंतांची कैक वचने ती त्यांची आहेत हे माहीत नसलेल्यांच्याहि मुखात आज असतात. शाळेतील प्रार्थनेमध्ये ’सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानी पडो’ ही केका अनेकांनी म्हटलेली असते. ’देवि दयावति दवडसि दासांची दु:खदुर्दशा दूर। पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर’ हे अनुप्रास अलंकाराचे उदाहरण म्हणून पुष्कळांनी वाचलेले असते. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ हा कृष्णाने विचारलेला खोचक प्रश्न अनेक वृत्तपत्रीय अग्रलेखांमधून भेटतो.
जुन्या पद्धतीने संस्कृतमधून शिकलेले विद्वान् आणि सर्वसामान्य जन ह्या दोन विरुद्ध बाजूंकडून होणार्या टीकेची मोरोपंतांना जाणीव नव्हती असे नाही. त्यांनीच ह्या दोन्ही प्रकारच्या टीकाकारांना देऊन ठेवली आहेत ती अशी:
गीर्वाणशब्द पुष्कळ जनपदभाषाचि देखतां थोडी
यास्तव गुणज्ञ लोकीं याची घ्यावी हळूहळू गोडी.
(येथे संस्कृत शब्द खूप आणि सर्वसामान्यांची भाषा थोडीच आहे. गुणज्ञ लोकांनी समजून हळूहळू ते वाचावे.)
प्राकृतसंस्कृतमिश्रित यास्तव कोणी म्हणोत ही कंथा,
भवशीतभीतिभीतस्वान्ताला दाविला बरा पंथा.
(संस्कृत आणि देशी भाषा ह्यांच्या ह्या मिश्रणाला कोणी घोंगडी म्हणोत पण सांसारिक दु:खांच्या थंडीला घाबरलेल्यांना योग्य मार्ग हिने दाखविला जातो.)
कोठे दूरान्वित पद कोठे चुकली असेल यतिमात्र,
अतिमात्र दोष ऐसे न वदोत कवी समस्तगुणपात्र.
(कोठे दोन पदांमध्ये बरेच अन्तर असेल, कोठे यति किंवा मात्रा चुकली असेल, तरीहि असे दोष फार आहेत असे सर्वगुणमंडित विद्वानांनी म्हणू नये.) मन्त्ररामायण प्रस्तावना.
प्राकृत म्हणोनि निर्भर हासोत अंतज्ञ नीच मत्कृतिला,
परि जाणशील बा तू रसिककविवरा मनी चमत्कृतिला.
(दुष्ट पंडित प्राकृत म्हणून माझ्या कृतीला अवश्य हसोत. पण हे रसिक कविश्रेष्ठा, तू मनाने माझ्या चमत्कृतीला जाणशील.) नामरसायन.
मोरोपंत हे मोठे रामभक्त होते आणि त्या भक्तीपोटी त्यांनी ’अष्टोत्तरशत’ म्हणजे १०८ रामायणे लिहिली आहेत हे बहुश्रुत आहे. ही सर्व रामायणे एकत्रित पाहण्याचा योग कधी आला नव्हता. पंतांचे वंशज आणि मराठी वाङ्मयाचे जुन्या काळातील एक प्रसिद्ध अभ्यासक रामचंद्र दत्तात्रेय पराडकर ह्यांनी ही रामायणे त्यांच्याजवळ असलेल्या मोरोपंतांच्या कागदपत्रांचा वापर करून १९१६ साली दोन भागांमध्ये प्रसिद्ध केली. ही सर्व रामायणे प्रत्येकी काहीशे श्लोकांची आहेत, यद्यपि एकदोन आकाराने त्याहून बरीच मोठी आहेत. त्याचप्रमाणे १८९० च्या दशकामध्ये छापलेल्या काव्येतिहाससंग्रहामध्ये ५ भागांत ह्यातील पुष्कळशी रामायणे तत्पूर्वीच छापली गेली होती. ह्या पुस्तकांच्या आधारे हा लेख लिहिला आहे. दादोबा पांडुरंगकृत ’यशोदापांडुरंग’ ह्या मोरोपंतांच्या ’केकावलि’ काव्याच्या मराठी टीकेमध्ये, तसेच वि.ल.भावेकृत ’महाराष्ट्र सारस्वत’ ह्या ग्रंथामध्ये १०८ रामायणांवर काही वर्णनात्मक मजकूर आहे त्याचाहि उपयोग झाला आहे.
वरचा १०८ हा आकडा कितपत बिनचूक आहे ह्याविषयी शंका आहेत कारण १०८ वेगवेगळी रामायणे आजमितीस आपल्यापुढे नाहीत.. ह्यांपैकी काही कायमची गहाळ झाली असावीत असे वाटते. एका रामायणाचे केवळ काही श्लोकच स्मृतिरूपाने उरले आहेत. काहींच्या नावांबद्दल संभ्रम असून एकच रामायण दोनदा मोजले गेले असेहि वाटू शकते. तरीपण पराडकरांच्या पुस्तकांमध्ये ८७ रामायणे प्रत्यक्ष छापली गेली आहेत.
ह्या रामायणांचे तीन प्रमुख गट पडतात. एका गटामध्ये रचनेतील शाब्दिक रचनाचातुर्यामुळे लक्षात येणारी रामायणे, दुसर्यामध्ये ’श्रीराम जयराम जय जय राम’ ह्या त्रयोदशाक्षरी मन्त्रास वेगवेगळ्या मार्गांनी गुंफवून लिहिलेली रामायणे तसेच स्तोत्राधारित रामायणे आणि तिसर्यामध्ये निरनिराळ्या प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अनवट वृत्तांमध्ये रचलेली रामायणे. पहिला गट साहजिकच सर्वाधिक कुतूहल निर्माण करतो. प्रथम त्याच्याकडे वळू.
रचनाचातुर्यदर्शक.
१) दिव्यरामायण. गीति ह्या वृत्ताच्या पहिल्या पादामध्ये १२ आणि दुसर्यामध्ये १८ अशा एकूण ३० मात्रा प्रतिचरणी असतात. त्याचबरोबर प्रतिचरण १६ हून कमी अक्षरात ते वृत्त साधत नाही. दिव्यरामायणातील सर्व श्लोकांमध्ये अशी प्रतिचरणी १६ अक्षरे आहेत आणि ती सर्व प्रत्येकी दोन मात्रांची आहेत - ११वे आणि १३वे सोडून. ही अक्षरे दोन्ही प्रत्येक चरणात एका मात्रेची आहेत. अशा रीतीने १६ अक्षरे, जवळजवळ सर्व दीर्घ आणि ३० मात्रा ह्यांचा मेळ प्रत्येक चरणामध्ये साधला आहे. उदाहरण:
कल्याणाच्या मूळा श्रीकान्ता भक्तवत्सला ताता।
प्रार्थी अत्युन्मत्ता दिक्कंठाते वधावया धाता॥
अतिउन्मत्त झालेल्या रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेव कल्याणाचे मूळ असलेल्या, श्रीकान्त, भक्तवत्सल अशा पित्याला (विष्णु) प्रार्थिता झाला. (दिक् म्हणजे दिशा. ह्या दहा असतात. म्हणून दहा ही संख्या ’दिक्’ ह्या संज्ञेने दाखविण्याची प्रथा संस्कृत काव्यांमध्ये असते. त्यावरून ’दिक्कंठ’ म्हणजे दशकंठ म्हणजे दहा तोंडांचा रावण.)
भास्वद्वंशोत्तंस ज्ञातात्मा दिग्रथ क्षमाभर्ता।
त्याची स्त्री कौसल्या तीच्या पोटासि ये जगत्कर्ता॥
सूर्यवंशाचा तुरा, ज्ञातात्मा. क्षमाशील असा जो दशरथ (दिक् म्हणजे दहा) त्याची पत्नी कौसल्या हिच्या पोटी विश्वनिर्माता जन्मला.
२) सुखरामायण. ह्या रामायणामध्ये प्रतिचरणी ३० मात्रा दिव्यरामायणाच्या उलट साधल्या आहेत. प्रत्येक चरणातील पहिली २८ अक्षरे सर्व एका मात्रेची म्हणजे ह्रस्व आणि शेवटचे २९ वे २ मात्रांचे म्हणजे दीर्घ अशा प्रतिचरणी २९ अक्षरांचा तोल शेवटापर्यंत साधला आहे. उदाहरण:
दशमुखवधमति विधिसुरनुतपद जगदधिप अजित वरद हरी।
परम करुण म्हणवुनि दशरथ नरवर तनुज मनुजपण हि धरि॥
दशमुख रावणाच्या वधासाठी ज्याच्यापुढे ब्रह्मदेव आणि अन्य देव नत झाले असा अजित आणि वरदायक हरि नरश्रेष्ठ दशरथ राजा परमकारुणिक असल्याने त्याचे पुत्रत्व आणि मनुष्यपण धारण करता झाला.
३) कविप्रिय रामायण. ह्यामध्ये प्रतिचरणी एका अक्षराची पुनरावृत्ति दुसर्या, नवव्या आणि १६व्या अक्षराच्या जागी होते. (हे रामायण तभयजसरनग असे गण आणि प्रतिचरणी २२ अक्षरे असलेल्या ज्या वृत्तामध्ये आहे त्याला ’अश्वधाटी’, तसेच ’अमृतध्वनि’ अशी दोन नावे मी पाहिली आहेत.)
झाला द्विजत्वपद, आला अशांत मुनि, त्याला सहानुज दिला।
व्याला यश, स्वरिपुकालाहितार्क्ष्य, गुरु धाला, निवे बहु इला॥
(अशान्त मुनि आला, त्याला द्विजत्वपद प्राप्त झालेला पुत्र त्याच्या बंधूसह दिला. शत्रुरूपी कालसर्पाचा गरुड अशा त्याला यश मिळाले आणि पृथ्वी तृप्त झाली.)
हा लावि पादरज, बाला शिलेसि करि, भालाक्षचापहि चुरी।
याला समर्पि मति, माला वरी, अवनिजा लाभली रति पुरी॥
(ह्याने पायाच्या धुळीने शिळेची स्त्री केली, ह्याने कपाळावर नेत्र असलेल्या शंकराचे धनुष्य तोडले. रतीसम सुंदर भूकन्या आपले मन वाहून त्याला वरमाला समर्पित करती झाली.)
४) सौम्यारामायण. हे रामायण ’सौम्या’ नावाच्या गीत्यार्या छंदाचा पोटभेद असलेल्या मात्रावृत्तामध्ये केलेले आहे. ह्या वृत्तात प्रतिचरणी ३२ मात्रा, तसेच प्रथम चरणात १६ गुरु अक्षरे आणि द्वितीय चरणात ३२ लघु अक्षरे असतात. ह्याच वृत्तास ’अनंगक्रीडा’ असेहि नाव दिलेले पाहिले आहे. दर आठ मात्रांवर यति असतो.
श्रीभर्ता ब्रह्म्याचा कर्ता झाला भक्ताविद्याहर्ता।
द्रुहिणगिरिशसुरमुनिवरशतनुत सकळवरदवर दशरथनृपसुत॥
स्थापी राजा प्रेमे नाम श्रीकौसल्यापुत्रा राम।
प्रमुदित करि मन कविजनशिखिघन यतिपतिमतिधन सुभजकझषवन॥
५) निरोष्ठरामायण. ह्या रामायणात कोणताहि ओष्ठय वर्ण - प,फ,ब,भ,म - न वापरता ६५ गीतींमध्ये रामायण सांगितले आहे. ६६वा समारोपाचा श्लोक अनुष्टुप् छंदात असून त्यामध्ये ’प’ भेटतो.
६) दामरामायण. ह्यामध्ये प्रत्येक चरणातील अखेरची तीन अक्षरे पुढच्या चरणाच्या आरंभी आणून ’दाम’ म्हणजे दोरा निर्माण केला आहे. उदा. पहिल्या दोन गीती:
श्रीपति झाला दशरथसुत राम दशाननासि माराया।
मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया॥
सारा या प्रभुची हे लीला गाती सदैव ही सुकवी।
सुकवी भवजलनिधिते निरुपमसुख रसिकजनमनी पिकवी॥
७) सन्नामगर्भ. ह्या रामायणातील प्रत्येक गीतीमध्ये कोणीएक साधु, संत, भक्त, कवि, पुराणातील स्मरणीय राजा अशांची नावे गुंफली आहेत. उदाहरण:
श्रीगलविधिशक्रांही नारायण रावणासि माराया।
परमदयालु विनविला अतितर गोविप्रताप वाराया॥ (श्रीपति)
(नीलकण्ठ महादेव, ब्रह्मदेव आणि इंद्र ह्यांनी रावणाचा वध करण्यासाठी आणि गोवंशाचा होणारा आत्यंतिक छळ दूर करण्यासाठी परमदयाळू प्रभूची विनवणी केली.)
सुखपुंज पुत्र दे असुदानाहुनि जड पडे तथापि कवी।
रघुकुलरीति निरुपमा रसिकजनमनोहरा कथा पिकवी॥ (पुंडरीक)
(’सुखाचा ठेवा असा पुत्र मला दे’ ही प्राणाहून जड मागणी मागून रघुकुलरीतीची निरुपम आणि रसिक जनांचे मन जिंकणारी कथा ऋषि - विश्वामित्र - निर्माण करता झाला.)
८) सद्गर्भरामायण. ’श्रीगजवदन सरस्वती कुलदेव माता पिता विद्याप्रद गुरु सांब विधि नारद प्राचेतस सदाशिवनंदन जयदेव साग्रजानुज ज्ञानदेव एकोपंत रामदास दासोपंत वामनस्वामी केशव जयराम विठोबा दामाजी तुलसीदास रामानंद कबीर पीपाजी नरसिंह महता (नरसी मेहता) माधवदास नामदेव तुकोबा अनंतोपाध्याय मीराबाई रोहिदास विसोबा खेचर चांगदेव भानुदास अमृतराय’ - देव, पूज्य व्यक्ति आणि संत ह्यांच्या नावांच्या ह्या यादीत एकूण १५२ अक्षरे आहेत. ह्या प्रत्येक अक्षराने सुरू होणारी एक गीति एकूण १५२ गीती ह्या रामायणामध्ये आहेत.
९) मात्रारामायण. छन्द:शास्त्रात अ ते ज्ञ ह्या अक्षरांना मात्रा म्हणतात. ह्यातील अ ते ज्ञ अशा अक्षरांच्या क्रमाने सुरू होणार्या ४६ गीतींचा संग्रह. दीर्घ ॠ, ऌ, ङ, ञ आणि ळ ह्यांचे श्लोक नाहीत कारण त्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द नाहीत. ’ण’ चीहि तीच अडचण आहे पण ’ण पुढे मागे ना ज्या राया तो कपिस भेटला, वानी’ (’ज्या रायामागे ना आणि पुढे ण आहे, तो - पक्षी नारायण - वानराला भेटला आणि त्याने त्याची प्रशंसा केली) असे लिहून पंतांनी ’ण’ चा प्रश्न सोडवला आहे.
१०) उमारामायण. प्रत्येक गीतीच्या पहिल्या चरणाची सुरुवात ’उ’ने आणि दुसर्याची ’मा’ने असे अखेरपर्यंत योजिलेल्या १२१ गीती ह्या रामायणामध्ये आहेत.
११) शिवरामायण. ह्या मध्ये प्रत्येक श्लोकात पहिल्या आणि दुसर्या चरणांमध्ये एकदा आणि एकदाच अनुक्रमे ’शि’ आणि ’व’ ही अक्षरे योजून ’शिव’ हे नाव गुंफले आहे.
विधिशशिशेखरशतमख यांही संप्रार्थिला दयालु हरी।
दशमुखवधार्थ दशरथसदनी अतिरम्य मूर्ति च्यार धरी॥
ते राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न शिशु स्वमूर्तिकान्तिभरे।
करिति नृपाचे भवनहि हृदयहि वितमस्क हर्षपूर्ण बरे॥
१२) गंगारामायण. ह्या रामायणामध्ये मध्ये प्रत्येक गीतीच्या पहिल्या आणि दुसर्या चरणांमध्ये एकदा आणि एकदाच अनुक्रमे ’गं’ आणि ’गा’ ही अक्षरे योजून ’गंगा’ हे नाव गुंफले आहे. अशा ६३ गीतींचा हा संग्रह आहे. उदा. रावणवधानंतर
गगनी दुंदुभि वाजे पुष्पांची वृष्टि होय, गंधर्व।
गाती नाचति देवी प्रभुची स्तुति करिति देव मुनि सर्व॥
१३) काशीरामायण. वरीलप्रमाणेच प्रत्येक गीतीच्या पहिल्या आणि दुसर्या चरणांमध्ये एकदा आणि एकदाच अनुक्रमे ’का’ आणि ’शी’ ही अक्षरे योजून ’काशी’ हे नाव गुंफले आहे. अशा ५५ गीतींचा हा संग्रह आहे.
१४) प्रयागरामायण. ह्यामध्ये प्रत्येक गीतीच्या दोन चरणांमध्ये एकदा आणि एकदाच अनुक्रमे ’प्र’, ’या’ आणि ’ग’ ही अक्षरे योजून ’प्रयाग’ हे नाव गुंफले आहे.
१५) तीर्थरामायण. ह्यामध्ये प्रत्येक गीतीमध्ये एकेका पवित्र नदीचे नाव गुंफले आहे. अशा ५९ गीती ह्या रामायणामध्ये आहेत. उदाहरण:
सत्यव्रतदशरथनृप जो अर्थिद्विजमयूरघन यास।
स्वगुरुत्व दे जगद्गुरु सुमतिशतमखसखा ससंन्यास॥ (सरयू)
(याचक द्विज हेच मयूर, त्यांचा घन - मेघ जो सत्यव्रत दशरथ राजा त्याला सुबुद्धि आणि शंभर यज्ञांचा ऋत्विक् - वसिष्ठ - हा जगद्गुरु संन्यासदीक्षेसह स्वगुरुत्व देता झाला.)
त्वत्तनय राम वल्की जटिलक्रमु काननात मनु वर्षे।
नरनाथा मत्पुत्रा भरता दे यौवराज्यपद हर्षे॥ (यमुना)
(तुझा पुत्र राम वल्कले धारण करून आणि जटा वाढवून अरण्यात मनूंच्या इतकी म्हणजे चौदा - वर्षे क्रमो. तसेच हे नरपति, माझा पुत्र भरत ह्याला आनंदाने युवराजाचे स्थान दे.)
१६) ऋषिरामायण ह्यामध्ये प्रत्येक गीतीमध्ये एकेका प्राचीन ऋषीचे नाव गुंफले आहे. अशा ८९ गीती ह्या रामायणामध्ये आहेत. उदाहरण:
भृत्य जयाचे सुरवर तो सानुज गुरु करी तया ऋषिते।
शिष्यत्व वरी सुयशोमृत हे सेविति सुधी मने तृषिते॥ (भृगु)
(सुरश्रेष्ठ ज्याचे सेवक आहेत असा तो लक्ष्मणसहित राम त्या ऋषीला आपला गुरु करता झाला. त्याने हे शिष्यत्व धारण केले हे सुयशोमृत सर्व सुबुद्ध जनांनी तृषित मनाने सेवन केले.)
परमेष्ट मुनींद्र बुधा जनका रामानुजा तिघी कन्या।
दे ऐसे उपदेशुनि जाय रुचे फार मैथिला धन्या॥ (मेधातिथि)
(सर्वश्रेष्ठ असा मुनि ’राम आणि भावांना तिन्ही कन्या दे’ असा उपदेश जनकास करून गेला. धन्य मिथिलेशाला हा उपदेश फार आवड्ला.
१७) राजरामायण. ह्यामध्ये प्रत्येक गीतीमध्ये एका प्राचीन राजाचे नाव गोवले आहे. अशा ८६ गीती ह्या रामयणामध्ये आहेत. उदाहरण:
ससुमित्रा कौसल्या कैकेयी तनय या तिघी आर्या।
श्रीराम भरत लक्ष्मण शत्रुघ्न प्रसवल्या नृपतिभार्या॥ (ययाति)
(कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा ह्या तीन राजपत्नी श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ह्यांना प्रसवत्या झाल्या.)
नरपति बहु तोष धरी, स्वच्छात्रत्वे वसिष्ठ गाधिजही।
गौतम दारोद्धारे जामातृत्वे विदेहराजमही॥ (नहुष)
(रामाने राजा दशरथाला त्याचा पुत्र होऊन, वसिष्ठ आणि गाधिज विश्वामित्र ह्यांना शिष्य होऊन, गौतमाला त्याच्या पत्नीचा उद्धार करून आणि विदेहराज जनक ह्याच्या देशाला जावई होऊन संतोष दिला.)
(विश्वामित्र हा मूळचा क्षत्रिय. त्याचा पिता ’गाधिन्’ हा कान्यकुब्ज देशाचा राजा. त्यावरून विश्वामित्र हा गाधिज.)
१८) पर्ंतु रामायण. ह्या रामायणामध्ये प्रत्येक गीतीमध्ये ’परंतु’ हा शब्द एकदा वापरला आहे.
ते राम भरत लक्ष्मण शत्रुघ्नकुमार सारसाक्ष जना।
दिसती बाळ, परंतु स्वगुणाहीं हरिति गुरुमुनींद्रमना॥
चालति मुनिच्या मागे सुकुमार परंतु ते कुमारमणी।
पाहुनि बहुधा वदली ’हंत’ श्रीशंभुची उमा रमणी॥
मन्त्र आणि स्तोत्रांवर आधारित.
१) मन्त्ररामायण. ’श्रीराम जयराम जय जय राम’ ह्या त्रयोदशाक्षर मन्त्रातील प्रत्येक अक्षराने प्रारंभ केलेल्या १३ गीतींचा गट, अशा ६ गटांचे बालकांड. त्रयोदशाक्षर मन्त्रातील प्रत्येक अक्षर द्वितीय स्थानी अशा १३ गीतींचा गट, अशा ९ गटांचे अयोध्याकांड. त्रयोदशाक्षर मन्त्रातील प्रत्येक अक्षर तृतीय स्थानी अशा १३ गीतींचा गट, अशा ८ गटांचे अरण्यकांड. ह्याच पद्धतीने पुढे जात जात आणि कांडातील गटांची संख्या कमीजास्त करत किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि अखेरीस उत्तर अशी कांडे ह्या रामायणामध्ये रचली आहेत. उत्तरकांडामध्ये मंत्राची अक्षरे सातव्या जागी आहेत.
२) बालमन्त्ररामायण. ह्याची रचना मन्त्ररामायणाप्रमाणेच आहे. मात्र प्रत्येक कांडात मंत्र तीनदा फिरवला आहे आणि गीती ३९ आहेत. अशी ७ कांडे. मन्त्ररामायणाहून छोटे असल्याने ह्याला बालमन्त्ररामायण असे नाव दिले आहे.
३) सप्तमंत्ररामायण. ह्याचीहि रचना मन्त्ररामायणाप्रमाणेच आहे. मात्र प्रत्येक कांडात मंत्र एकदाच फिरवला आहे आणि हे रामायण अनुष्टुभ् छन्दामध्ये आहे.
४) मन्त्रिरामायण. ह्याचीहि रचना मन्त्ररामायणाप्रमाणेच आहे. मात्र प्रत्येक कांडात मंत्र एकदाच फिरवला आहे आणि हे रामायण अनुष्टुभ् छन्दामध्ये आहे.
५) मंत्रगर्भरामायण. ह्याची रचना मंत्ररामायणाप्रमाणेच आहे. फरक दोन - पहिला म्हणजे हे रामायण साकी वृत्तामध्ये आहे आणि दुसरा म्हणजे त्रयोदशाक्षर मन्त्र येथे प्रत्येक कांडात एकदाच फिरविला हे आणि प्रतिकांड १३ साक्या आहेत.
६) रम्यमंत्ररामायण. ह्याची रचना मन्त्रगर्भरामायणाप्रमाणेच पण वेगवेगळ्या कांडांमध्ये शार्दूलविक्रीडित, स्रग्धरा आणि शिखरिणी अशा वृत्तांचा उपयोग केला आहे. प्रत्येक कांडात १३ श्लोक आहेत.
७) मंत्रमयरामायण. त्रयोदशाक्षर मन्त्र प्रत्येक गीतीमध्ये गुंफलेला आहे. उदाहरण पहिलीच गीति:
श्रीमान् राजशिरोमणि दशरथ, जो निज यशें बरा महित,
द्विजसेवक, यज्ञनिरत, जनभयहर्ता, धरानिकामहित.
ह्या रामायणामध्ये केवळ २४ गीती आहेत.
८) त्रि:सप्तमन्त्रमय रामायण १८ ह्या रामायणाचे वृत्त शार्दूलविक्रीडित असून प्रत्येक श्लोकात त्रयोदशाक्षर मन्त्र गुंफलेला आहे. त्रि:सप्त म्हणजे २१ श्लोक ह्यामध्ये आहेत. उदाहरण:
श्रीसी शूर्पणखा वरा मज म्हणे, दंडी तिला, जो खर
जन्या ये करि तत्क्षय प्रभु, रुचे दिक्कंधरा मत्सर,
चोरी तो जनकात्मजेसि, नय न प्रेक्षी, जटायुव्यय
क्रूरात्मा समजे स्वइष्ट, न धरी काही अधर्मे भय.
(शूर्पणखा रामाला म्हणाली, ’माझ्याशी विवाह कर’. रामाने तिला दंड दिला. खर जो युद्धासाठी आला त्याला रामाने मारले. रावणाला मत्सर निर्माण झाला आणि त्याने न्याय-अन्यायाचा विचार न करता सीतेला पळवून नेले. आपल्या स्वार्थासाठी त्याने जटायूचा वध केला. त्याने अधर्माची कसलीहि भीति धरली नाही.
जन्य = युद्ध, दिक्कंधर म्हणजे दशग्रीव रावण. ’दिक्’ म्हणजे दिशा दहा असतात, तसेच कंधर म्हणजे मान.)
९) नामांकरामायण. पहिल्या चरणाच्या प्रारंभी ’रा’ आणि दुसर्याच्या ’म’ अशा प्रकारच्या १३० गीती.
१०) शिवरामायण. ’शिवाष्टरोत्तरशतनामावलि’ ह्या स्तोत्रातील शंकराची १०८ नावे ह्या रामायणामध्ये क्रमाने श्लोकांमधून गुंफली आहेत. १०९व्या श्लोकामध्ये हे सांगितले आहे:
यात श्रीशिवनामे अष्टोत्तरशत म्हणूनिया याचे।
शिवरामायण ऐसे नाम शिवप्रदचि होय हो साचे॥
११ ते २०) प्रथम, द्वितीय...दशम स्तोत्ररामायण ३१० ह्या दहा स्तोत्ररामायणांमध्ये विष्णुसहस्रनामाच्या एक सहस्र नामांमधून शंभराचे १० गट पाडून प्रत्येक गटातील शंभर नामे गुंफलेले एक अशी दहा रामायणे रचिली आहेत. उदा. प्रथमस्तोत्ररामायणातील पहिल्या दोन गीती:
विश्वस्रष्टा विष्णुप्रति विनवी दशमुखक्षयार्थ तया।
वर वेदशास्त्रषट्का रक्षाया दे जगी करुनि दया॥
भूपस्तुतभव्ययशा रविकुलभव सत्प्रभु प्रथित भारी।
जो दशरथप्रभूत द्विजहित असकृत् सुरव्यसन वारी॥
ह्या दोन गीतींमध्ये विष्णुसहस्रनामातील ’विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यत्प्रभु:। भूतकृत्...’ इतके शब्द आलेले आहेत.
वृत्तांवरून ओळखली जाणारी.
१) आद्यार्यारामायण. मोरोपंतांची बहुतेक रचना १२-१८-१२-१८ अशा चार पादांच्या गीतिवृत्तामध्ये आहे, यद्यपि स्वत: मोरोपंत आणि अन्यहि त्या वृत्ताला सरसकट आर्यावृत्त म्हणतात. खरी आर्या १२-१८-१२-१५ अशी असते आणि मात्रावृत्तातील ते पहिले वृत्त मानले जाते. हे रामायण मोरोपंतांनी खर्या आर्यावृत्तामध्ये केले असल्याने त्याला आद्यार्या असे नाव दिले आहे.
२) आर्यागीति. आर्यागीति वृत्त (१२-२०-१२-२० असे चार पाद)
३) दोहारामायण. दोहावृत्त.
४) घनाक्षररामायण. घनाक्षरी वृत्त.
५) विबुधप्रियरामायण. विबुधप्रिय (हरिनर्तन) छन्द.
६) सवायारामायण. मदिरा वृत्त.
७) अभंगरामायण.
८) मत्तमयूररामायण. मत्तमयूर वृत्त
९) पंचचामररामायण. पंचचामर वृत्त.
१०) पुष्पिताग्रारामायण. पुष्पिताग्रा वृत्त.
११) श्रीप्रियरामायण. वैतालीय वृत्त.
१२) रमणीयरामायण. सारंग वृत्त.
१३) हररमणीयरामायण. तोटक वृत्त.
१४) सुरामायण. भुजंगप्रयात वृत्त.
१५) श्रीरामायण. शिखरिणी वृत्त.
१६) विचित्ररामायण. जलोद्धतगति वृत्त.
१७) सद्भक्तसर्वस्वरामायण. वसंततिलका वृत्त.
१८) प्रहर्षिणीरामायण. प्रहर्षिणी वृत्त.
१९) श्रीगुरुरामायण. विविध वृत्ते
२०) रामायणपंचशती. ५०० साक्या.
२१) अनुष्टुप् रामायण. अनुष्टुभ् छंद.
२२) कन्यारत्न रामायण. स्रग्धरा वृत्त.
२३) कल्याण रामायण. पज्झटिका वृत्त.
२४) श्रवणामृत रामायण. नर्कुटक वृत्त.
२५) वरद रामायण. प्रमिताक्षरा वृत्त.
२६) रामायणकथासुधा रामायण. विद्युन्माला वृत्त
२७) दोहासोरठा रामायण.
२८) सद्रत्नरामायण. अश्वघाटी अथवा अमृतध्वनि छंद.
२९) पृथ्वीरामायण. पृथ्वी वृत्त.
३०) स्रग्विणीरामायण. स्रग्विणी वृत्त.
३१) सद्वित्तरामायण. इंद्रवज्रा, उपेन्द्रवज्रा आणि उपजाति वृत्ते.
३२) रामायणपीयूष. मालिनी वृत्त.
३३) भावरामायण. मन्दाक्रान्ता वृत्त.
३४) सच्छ्राव्यरामायण. हरिणी वृत्त.
३५) एकश्लोकीरामायण. एकच श्लोक जलोद्धतगति वृत्तामध्ये.
रमापति दयानिधि प्रभु हरी, पिता दशरथ क्षमापति करी॥
दशाननवधा नराकृति वरी, यशास्तव धरी, जगद्भय हरी॥
३६) गदघ्नरामायण. रथोद्धता वृत्त.
३७) सूरारामायण/सुरामायण. सूरावृत्त
३८) सत्स्वरामायण. शार्दूलविक्रीडित वृत्त.
३९) पूतरामायण. (अपूर्ण) शार्दूलविक्रीडित वृत्त
४०) तन्वीरामायण. तन्वी वृत्त. उदाहरण:
श्रीपति झाला दशरथतनय क्रूरदशास्यदुरितमदनाशा।
पूर्ण कराया त्रिदशमुनिधृता मत्तनिशाचरकुलकदनाशा॥
क्रूर दशानन रावणाच्या मदाचा नाश करण्यासाठी आणि देव तसेच ऋषि ह्यांनी धरलेली मत्तनिशाचरकुलाच्या विनाशाची आशा पूर्ण करण्यासाठी श्रीपतीने दशरथपुत्राचे रूप घेतले.
४१) मंचरामायण. क्रौंचपदा वृत्त.
४२) मंजुरामायण. शुद्धकामदा वृत्त. उदाहरण:
विधिमुखामरप्रार्थनावश
त्रिभुवनी बरे व्हावया यश।
दशरथात्मभू जाहला हरी
प्रभु शुभा चतुर्मूर्तिता धरी॥
४३) दंडकरामायण. दंडक वृत्त.
४४) त्रुटितरामायण. अपूर्ण. अनेक वृत्ते.
४५) साररामायण. अपूर्ण अनेक वृत्ते.
४६) धन्यरामायण. अपूर्ण. प्रत्येक गीतीमध्ये ’धन्य’ हा शब्द कमीअधिक वेळा वापरला आहे.
काही अन्य.
१) सीतारामायण. सीतेच्या मुखातून सांगितलेले रामायण. विविध वृत्ते
२) हनुमद्रामायण. हनुमान माता अंजनीला सांगत आहे असे रामायण. गीतिवृत्त.
३) श्रीरामचरितभरितश्रीरामचंद्रप्रार्थना
४) अद्भुत रामायण. ह्या गहाळ झालेल्या रामायणाच्या केवळ चार गीति उपलब्ध आहेत. त्यांमध्ये प्रत्येकीच्या दुसर्या चरणामध्ये ’अद्भुत’ ह्या शब्दाचा उपयोग केला आहे.
प्रतिक्रिया
16 Oct 2017 - 11:29 pm | एस
इतकी वृत्ते माहीतही नव्हती. अभ्यासपूर्ण लेख.
16 Oct 2017 - 11:40 pm | पैसा
अतिशय उत्तम लेख! मोरोपंतांच्या भाषेवरील प्रभुत्वाची कल्पना सहज येते आहे. संत पंत आणि तंत कवींच्या रचनांबद्दल तुमच्याकडून अजून बरेच वाचायला आवडेल!
17 Oct 2017 - 12:39 am | मारवा
अप्रतिम अभ्यासपुर्ण लेख !
कितीतरी वृत्तांची नावे आज पहील्यांदा कळाली.
या लेखासाठी मनापासुन धन्यवाद
आपला जुना फॅन
मारवा
17 Oct 2017 - 5:14 am | रुपी
उत्तम लेख!
शक्य झाल्यास यातल्या काही महत्त्वाच्या रामायणांबद्दल आणखी माहिती देणारे लेखही लिहा.
17 Oct 2017 - 10:53 am | आनन्दा
पुभाप्र
17 Oct 2017 - 12:28 pm | तिरकीट
हि सगळी वाचायला कुठे/कशी मिळतील?
17 Oct 2017 - 12:36 pm | सस्नेह
अभ्यासपूर्ण लेख. वृत्तांची नावे रोचक आहेत.
18 Oct 2017 - 11:33 am | अत्रन्गि पाउस
हल्ली एक मतप्रवाह असा आहे कि संस्कृत ही क्रूर भाषा असून मराठीवर बलात्कार केले त्या भाषेने ...
असो
पण लेख अतिशय अभ्यास पूर्ण ...ह्याविषयी काही अजून माहिती आणि मुख्य म्हणजे ह्या १०८ रामायणाच्या छापील/डिजिटल प्रती कुठे मिळतील का ?
18 Oct 2017 - 5:47 pm | अरविंद कोल्हटकर
ह्यावर काय बोलू?
ही भाषा वि. ती भाषा असल्या क्षुद्र आणि भिंती उभारणार्या राजकारणात मी पडत नाही - आणि तुम्हीहि पडू नये असा मैत्रीचा सल्ला.
18 Oct 2017 - 6:24 pm | आदूबाळ
वामन दाजी ओक नावाच्या गृहस्थांनी याचा संग्रह काढला होता. त्याचा भाग ३ इथे आहे:
http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/5732
18 Oct 2017 - 8:00 pm | अरविंद कोल्हटकर
<पंतांचे वंशज आणि मराठी वाङ्मयाचे जुन्या काळातील एक प्रसिद्ध अभ्यासक रामचंद्र दत्तात्रेय पराडकर ह्यांनी ही रामायणे त्यांच्याजवळ असलेल्या मोरोपंतांच्या कागदपत्रांचा वापर करून १९१६ साली दोन भागांमध्ये प्रसिद्ध केली. ही सर्व रामायणे प्रत्येकी काहीशे श्लोकांची आहेत, यद्यपि एकदोन आकाराने त्याहून बरीच मोठी आहेत. त्याचप्रमाणे १८९० च्या दशकामध्ये छापलेल्या काव्येतिहाससंग्रहामध्ये ५ भागांत ह्यातील पुष्कळशी रामायणे तत्पूर्वीच छापली गेली होती. ह्या पुस्तकांच्या आधारे हा लेख लिहिला आहे. दादोबा पांडुरंगकृत ’यशोदापांडुरंग’ ह्या मोरोपंतांच्या ’केकावलि’ काव्याच्या मराठी टीकेमध्ये, तसेच वि.ल.भावेकृत ’महाराष्ट्र सारस्वत’ ह्या ग्रंथामध्ये १०८ रामायणांवर काही वर्णनात्मक मजकूर आहे त्याचाहि उपयोग झाला आहे.>
हे मी वर मूळ लेखात लिहिलेच आहे. ज्यांना हे ग्रन्थ प्रत्यक्ष पाहायचे असतील त्यांना ते archive.org अथवा DLI मध्ये मिळू शकतील. DLI चा mirror देखील archive.org वर आहे.
18 Oct 2017 - 9:12 pm | श्रीगुरुजी
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे. खूप माहिती पहिल्यांदाच समजली.
रामायण व महाभारत हे भारताचे मानबिंदू आहेत.
19 Oct 2017 - 12:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंडिती वाड;मय प्रवाहातले शेवटचे पंडित कवी. आर्यावृत्त म्हटले की मोरोपंतांचेच नाव समोर येते. आपण उत्तम ओळख त्यांच्या रचनेची आणि वृत्तांची करुन दिली आहे.
पाऊण लाखापेक्षा जास्त रचना नावावर असणारा आणि पंचेचाळीस वर्ष अव्याहतपणे रचना करणारा आणि वाचन, लेखन, आणि पुराणकथन या पलिकडे ते कशाच्या भानगडीत पडले नाहीत. मोठा पंडित कवी.
लेखनाबद्दल आभार. अजून या विषयावर लेखन करावे असे सुचवतो.
-दिलीप बिरुटे
19 Oct 2017 - 6:18 pm | सचिन७३८
स्व स्त्री घरात नसता, कंडू शमनार्थ रंडीरा खावी |
ती हि नसता, स्वहस्ते चीबुल्ली दाबावी ||
मशारनिल्हेचे जनक ते हेच मोरोपंत आहेत का?
बादवे, आर्या म्हणजे नेमके काय?
19 Oct 2017 - 7:19 pm | अरविंद कोल्हटकर
आर्येचे लक्षण परशुरामपंततात्यांनी वृत्तदर्पणात असे दिले आहे:
आर्येच्या प्रथमपदी द्वादश मात्रा तशाच तिसर्याला |
अष्टादश दुसर्याला आणिक चवथ्यास पंचदश||
अर्थ - आर्येच्या (चार पदांपैकी) पहिल्यामध्ये आणि तिसर्यामध्ये १२ मात्रा असतात, दुसर्यामध्ये अठरा आणि चौथ्यामध्ये १५ मात्रा असतात.
ह्यातच थोडा बदल करून चारहि पदे १२-१८-१२-१८ अशी केल्यास ती गीति होते. आर्येचे अजूनहि काही उपप्रकार आहेत आणि अन्य नियम आहेत पण विस्तारभयास्तव ते बाजूस ठेवू.
मोरोपंत गीतीलाच आर्या म्हणतात पण ते शास्त्रशुद्ध नाही. आर्येचे मोरोपंत-रचित वर्णन असे आहे:
आर्या आर्यासि रुचे ईच्या पायी जशी असे गोडी |
आहे इतरां छन्दी गोडी परि यापरीस ती थोडी ||
(आर्या आर्यासि रुचे १२
ईच्या पायी जशी असे गोडी |१८
आहे इतरां छन्दी १२
गोडी परि यापरीस ती थोडी ||१८)
शुद्ध आर्येचे संस्कृतमध्ये उदाहरण पहा:
साकूतमधुरकोमलविलासिनीकण्ठकूजितप्राये |
शिक्षासमयेऽपि मुदे रतलीला कालिदासोक्ति: ||
साकूतमधुरकोमल १२
विलासिनीकण्ठकूजितप्राये |१८
शिक्षासमयेऽपि मुदे १२
रतलीला कालिदासोक्ति: ||१५
(अर्थ - विलासिनीच्या अर्थवाही,मधुतर आणि कोमल अशा शब्दांनी युक्त असे कालिदासाचे वचन आणि सुरतक्रिया शिकतांनाहि आनंद देतात.)
(तुम्ही दाखविलेला श्लोक कोठल्याच वृत्तात न बसणारा आहे.)
27 Jul 2022 - 9:29 am | योगविवेक
मराठी भाषा इतक्या सुगम गीत रचनेला पूरक आहे ते मोरोपंत यांनी काव्य निर्मिती करून प्रमाणित केले.
`रामायण अक्षर ज्वेलर्स' या ब्रांडनेम मधून त्यांनी' मराठी वाग्देवी' ला १०८ गीत हार अर्पण करण्यासाठी लघु, गुरू, मात्रा, छंद गण यांच्या साच्यातून जडवलेले शब्द रत्न भांडार पाहून, वाचून मन मयूर पिसारतो...
24 Sep 2023 - 12:15 am | चित्रगुप्त
मोरोपंतासारखी थोर विभूती ज्या महाराष्ट्रात जन्माला आली ते राष्ट्र आणि त्यांनी आपली अद्वितीय रचना ज्या मराठी भाषेत केली ती मराठी भाषा धन्य होय. आधुनिकतेच्या महापुरात अशी दिव्य रत्ने वाहून जाऊन कायमची नामशेष ना होवोत म्हणून मराठी भाषिकांनी प्रयत्न करत राहिले पाहिजे.
हा लेख म्हणजे त्यापैकीच एक मोलाचा प्रयत्न. लेखकास शिरसाष्टांग दंडवत. असेच विद्वत्तापूर्ण, माहितीपूर्ण अनेकानेक लेख आपण प्रकाशित करत रहावे ही विनंती.
24 Sep 2023 - 1:25 pm | प्रसाद गोडबोले
सध्या मोरोपंतांचे साहित्य वाचनास घेतले आहे , प्रचंड मोठ्ठा आवाका आहे . त्यांचे द्रोणपर्व हि सापडले अर्काईव्ह वर ! अफाट आहे हे ! त्या व्यतिरिक्त अन्य पर्वही अफाट लिहिली आहेत . महाभारतीय युध्द चालु असताना शल्य राजा कर्णाची कशी तासतो हे मोरोपंतांनी कसलं भारी लिहिले आहे - शब्दांची निवड पहा !
श्वान स्वपोषकाच्या सदनाच्या आश्रये उभा राहे | जिकडे वनात गर्जे शार्दुल तया दिशेकडे पाहे ||
भुंके बळे यथेष्ठ , व्यथित करी निकटवर्तीजन"कर्णा" | अर्जुन दृष्टी न पडली तोंचि तसा भुंकतोस तू कर्णा || (इथे पहिल्या भागात कर्णा अर्थात् कान असा जो श्लेष केला आहे तो भारी आहे ना !)
शश मंडळीत कोल्हा म्हणतो मी सिंह, वल्गना करतो | जोवरि न पाहिला गज गंड पल्ल कवळ भक्षिता हरि तो ||
वधशील जिष्णुला तरि कर्णा होशील आमुचा राजा | परि हे दुर्घट इंद्रा जरि काय सहाय आणिला आजा ||
(अर्जुनाला मारलेस तर तु आमचा राजा होशील पण हे अवघड आहे, अर्जुनाला मारणे इंद्रालाही अवघड आहे मग त्याने स्वतःच्या बापाला सोड , आज्जा अर्थात ब्रह्मदेवाला आणले तरी शक्य नाही !)
बाकी नंतरचे कृष्णमुखी चे वचन तर आपल्याला पाठच आहे -
ह्यातही धर्म ह्या श्ब्दावर केलेला श्लेष अर्थात धर्म आणि धर्मराज युधिष्ठीर असे दोन्ही अर्थ नितांत सुंदर आहेत !
पण ह्या भाषेला मराठी म्हणावे का हा एक प्रश्नच आहे . कारण नुसत्या वाचनाने काहीच उमगत नाही , तरी हे त्यातया त्यात सुगम आहे म्हणुन मी क्वोट केले अन्य बरेच तर अर्थ पाहिल्याशिवाय कळतच नाही , अगदी मोजक्या काही केकावली आहेत ज्यांच्या अर्थ कळतो बाकी सर्वच संस्कृतप्रचुर रादर अल्मोस्ट संस्कृतच आहे.
आणि हो अति अवांतर म्हणजे हे आपले मोरोपंत चक्क चक्क बारामती मध्ये राहिले आहेत त्यांचे बहुतांश आयुष्य ! विश्वास बसत नाही !
24 Sep 2023 - 1:46 pm | चित्रगुप्त
मराठी भाषेत असलेले (आणि दृढमूल होऊन बसलेले) शेकडो फारसी, अरबी, ऊर्दू, इंग्रजी, कन्नड, तेलगू वगैरे शब्द हल्लीच्या वाचकांस सहज कळावेत, परंतु संस्कृतातील शब्द मात्र कळू नयेत, यास काय म्हणावे ?
25 Sep 2023 - 6:33 am | निमी
लेख खूपच अभ्यासपूर्ण तर आहेच पण अनेक माहीत नसलेल्या वृत्तांच्या नावासह मोरोपंतांची थोरवी सांगणारा आहे.. उदाहरणासह मस्त लेख. आपल्या आगामी लेखांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि प्रतीक्षा आहे.
26 Sep 2023 - 11:24 am | राजेंद्र मेहेंदळे
एका दमात लेख वाचणे अंमळ कठीणच, तेव्हा सावकाशीने वाचतो.
सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची!
ओवी ज्ञानेशाची, किंवा आर्या मयूरपंतांची!!
असे कुठेतरी वाचले होते, पण या मोरोपंतांनी ईतके करुन ठेवले आहे ते माहीतच नव्हते.