धुल-नुन-अय्युब हे इराकचे एक सुप्रसिद्ध लेखक आहेत. (१९०८) इस्लामच्या परंपरा आणि आधुनिक जगाच्या रितिभाती यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा विषय. इस्लाम धर्मातील स्त्रियांची इज्जत आणि सन्मान राखण्यासाठी स्त्रियांनी उघड्या जगात बुरखा घालण्याची पद्धत सुरु झाली. स्त्रियांना पुरुषांचे दर्शन व्हायचे ते म्हणजे त्यांच्या वडिलांचे, भावंडांचे आणि नंतर नवर्याचे. १९२० साली ही परंपरा हळूहळू मोडीत निघू लागली होती पण आता ती परत मूळ धरू लागली आहे. या बुरख्याकडे पाश्चिमात्य जग स्त्रियांवरील अन्याय, दमन म्हणून पाहतात. पण बर्याच वेळा इस्लामी स्त्रिया बुरख्याआड वेगळ्या नजरेने पाहतात. हे छानपणे सांगितले आहे त्यांच्या ‘‘बुरख्याआडून…’’ या कथेत.
“बुरख्याआडून !”
रस्ता चांगला रुंद असला तरी बेशिस्त चालणार्या मुळे तो अगदी अरुंद भासत होता. सुळ्ळकन जाणार्या गाड्यांना न जुमानता माणसे चालत होती. त्यातच या गाड्यांची भर पडली होती. गाड्यांमधे श्रीमंत माणसे आरामात बाहेर तुच्छतेने पहात बसली होती. त्यातील तरुण सुंदर स्त्रियांच्या चेहर्यावरचे बदलणारे भाव पाहून ते कुठल्या दृष्याकडे पहात आहेत हे सहज उमगत होते.
चालणार्या गर्दीत असंख्य प्रकारचे रंगीबेरंगी कपडे दिसत होते. विविधतेने नटलेले ते रस्ते पाहून बाहेरच्या कुठल्याही परदेशी माणसाला वाटले असते की आज कुठला तरी उत्सव आहे की काय. अर्थात त्यांची त्यात काही चूक नाही कारण त्यांच्याकडे एवढे विविध प्रकारचे कपडे फक्त उत्सवात दिसतात.
गर्दीमधे काही बुरखा घातलेल्या स्त्रिया दिसत होत्या तर काही आपले सौंदर्य उधळत चालत होत्या. गंमत म्हणजे त्या सुंदर स्त्रियांकडे कोणी विशेष लक्ष देत नव्हते. पण त्या बुरख्यांकडे मात्र माणसे वळून वळून पहात होती. कदाचित त्या कमनीय आकाराच्या रेशमी, सुळसुळीत बुरख्यात काय दडले असेल याची ते कल्पना करत असावेत. त्यातच चुकून एखादा बुरखा थोडासा जरी दूर झाला तरी आतील रेखीव भुवया, फडफडणाऱ्या पापण्या जर नजरेस पडल्या तर तेवढाही नजारा ह्रदयात आग पेटवण्यास पुरेसा होई. या बुरख्याआडच्या लाजऱ्या जगासाठी उरलेले आयुष्य वेचण्याची त्याला ओढ न लागली तरच नवल.
घायाळ होण्याची संधी शोधत त्या रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक तरुणांमधे इहसानही एक होता. तरणाबांड, आपल्या देखणेपणाची पूर्ण जाणीव असणारा हा तरुण वाऱ्याने विसकटलेल्या केसामधील एखादी बट आपल्या गोर्यापान कपाळावर ओढून त्या रस्त्यावर, कंटाळा आला की फिरायला येत असे.
या इहसानचे वय असेल अंदाजे अठरा. रुबाबदार, दिसायला देखण्या असलेला इहसान अनेक मुलींना व स्त्रियांना आवडत असणार. त्याच्या या देखणेपणाची जाणीव त्याला असल्यामुळे बघा आजही तो त्या रस्त्यावर भिरभिरत्या नजरेने सावज हेरत फिरतोय.
त्याला बुरखा परिधान न केलेल्या स्त्रियांमधे किंवा मुलींमध्ये मुळीच रस नव्हता. त्या त्यांच्या सौंदर्याचे उघड प्रदर्शन करत होत्या पण त्याला त्याचे बिलकूल आकर्षण वाटत नव्हते आणि शिवाय त्या त्यांच्याकडे पाहणाऱ्यांच्या नजरेला नजरही देत नव्हत्या. कोणाच्या लक्षात आले तर काय घ्या ? असा विचार बहुधा त्या करत असाव्यात. मग इकडे तिकडे कटाक्ष न टाकता त्या चालत. भले कोणी त्यांच्या बद्दल, त्यांच्या सौंदर्याबद्दल शेरेबाजी केली तरी त्यांच्या चेहर्यावर साधी स्मितरेषाही उमटत नसे मग खुदकन हसणे तर लांबच.
याच कारणामुळे इहसान नेहमी लांबसडक रेशमी बुरखे घालणाऱ्या मुलींच्या मागे फिरायचा. त्या बुरख्याआड होणार्या बारीकसारीक हालचाली त्याला जाणवायच्या. उसासे, खुदकन हसण्याचा आवाज, नजरेला नजर देणारे बुरख्यातील डोळे त्याला घायाळ करायचे.
सिहॅमही नेहमीप्रमाणे त्या दिवशी फिरायला त्या रस्त्यावर गेली होती. त्या रस्त्यावर रमतगमत चक्कर मारणे हा तिच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होता. आता तिलाही आठवत नव्हते की तिने हा उपक्रम केव्हा सुरू केला आणि तो तिने का सुरू ठेवलाय हेही तिला उमगत नव्हते. किंवा काही कारण असलेच तर ती ते सांगत नसे. काहीही असो, रस्त्यावर वर्दळ झाली की सिहॅमची पावले आपोआप त्या रस्त्याकडे वळत हे खरे. इकडे तिकडे पहात तिचे डोळे इहसानला तो दिसेपर्यंत शोधत असत. तो दिसला की तिच्या छातीची धडधड उगीचच वाढत असे व रक्त सळसळत असे.
तो एकदाचा दिसला की ती अजाणता त्याच्या दिशेला ओढली जायची. त्याच्या बाजूने चालताना त्याचे डोळे तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत असत व तिच्या अंगावर रोमांच उभे रहात असत. आजही त्याची नजर तिचा बुरखा फाडून तिचा कमनीय बांधा न्याहाळते आहे असे तिला वाटले आणि तिच्या अंगावर शहारा आला. हे आता रोजचेच झाले होते. बुरख्यातून त्याला पाहत आता तिला त्याचा चेहरा चांगलाच लक्षात राहिला होता. आजकाल तर तो नुसता दिसला की ती बुरख्यातच लाजत असे व तिच्या ह्रदयाचे ठोके जलद पडू लागत. ती त्याला मुक्तपणे निरखू शकत होती कारण तिला माहीत होते की बुरखा तिच्या भाव भावना, तिला त्याचे वाटणारे आकर्षण त्याच्यापासून लपवितो आहे. बुरख्यात ती मोकळेपणाने वावरू शकत होती.
आता याला तिचे आकर्षण का वाटते आहे हे आपण सांगू शकत नाही, का त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार त्याने तिला गटवण्यासाठी पावले टाकली होती हेही आपण सांगू शकत नाही. कारण काही असो, त्या दिवशी त्याने सरळच तिला गाठले आणि तिला अभिवादन केले. तिने गर्रकन वळून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या सराईत नजरेने टिपले की ती त्याच्यावर चिडलेली नाही. ते पाहताच त्याचा धीर चेपला व तो तिच्या मागे मागे जाऊ लागला. ती एका बागेत शिरली आणि हाही तिच्या मागे बागेत शिरला. तो तिच्या मागे मागे येतोय हे तिला माहीत होते. भीती, उत्सुकता व आनंद या सर्व भावनांचे मिश्रण त्या बुरख्यात पसरले असावे असा अंदाज आपण बांधू शकतो.
तो तिच्या मागे मागे जात शेवटी थबकला. ती एका झाडामागे बसली. त्यानेही लांब ढांगा टाकत तिला गाठले व हसून तो तिला म्हणाला,
“ मासा-अल-खैर !” ( गुड इव्हिनिंग)
“ मासा-अल-खैर !” असे म्हणून तिने तिच्या चेहर्यावरचा बुरखा बाजूला केला आणि तिच्या लांबसडक, काळ्याभोर पापण्या इहसानच्या डोळ्यात भरल्या. इतक्या लांब सडक की त्यांची सावली तिच्या गोर्यापान गालावर पडली होती. त्याने असे काहीतरी दिसेल अशीच कल्पना केली होती. तिच्या सुंदर चेहरा काळजीने थोडासा आक्रसला होता पण त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. भेदरलेल्या हरिणीसारखी ती इकडे तिकडे पहात होती. तिच्या शरीराला हलकासा कंप सुटला. ती जे काय करत होती तो केवढा घोर, अक्षम्य गुन्हा होता याची तिला पूर्ण कल्पना होती. पण तिच्या मनाला एक दिलासा होता तो म्हणजे या मुलाने तिला याआधी कधीच पाहिले नव्हते व त्याला ती माहीतही नव्हती. तारुण्यसुलभ भावनांनी तिला हे धाडस करण्यास प्रवृत्त केले होते व त्याची तिला मोठी मौजही वाटत होती.
त्याने पुढचे पाऊल काय टाकायचे यावर जरा विचार केला आणि म्हणाला,
“मी बर्याच वेळा तुम्हाला इथे झाडांतून फिरताना पाहतो. मी आजवर तुझ्याशी बोललो नाही कारण असे एकदम कसे बोलणार ना ? तू कुठल्यातरी चांगल्या घरातील मुलगी दिसतेस.”
“पण तू इतर मुलींबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोसच की ! मग त्यांच्याच मागे का नाही लागत ?”
“माफ कर ! मला तुला दुखवायचे नव्हते. पण तू पाहतंच आहेस की मी येथे एकटाच फिरतो. मला मग कंटाळा येतो. पण मी पाहिलंय की तुलाही येथे या झाडात फिरायला आवडते म्हणून मला असे वाटले की आपल्या आवडी निवडी एकच असाव्यात. पण तुला यात जर काही वावगे वाटत असेल तर मी लगेचच निघतो” असे म्हणून तो उठला तेवढ्यात तिने त्याला थांबवले.
“ मी कोण आहे हे तुला माहिती आहे का ?” तिने विचारले.
“ बिलकूल नाही पण मला आपल्या आवडीनिवडी जुळतील असे अजूनही वाटते.” त्याने हळुवार आवाजात उत्तर दिले.
“तुला जर माझ्याबरोबर फिरायला यायला आवडलं तर माझी काही हरकत नाही पण माझी एकच अट आहे. तू चालणे झाल्यावर माझ्या मागे येणार नाहीस आणि दुसरीकडे कुठेही मला ओळख दाखवणार नाहीस. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीस. आहे कबूल ?”
“जशी तुझी इच्छा !” त्याने तिला वचन दिले.
ते दोघे एका दगडी बाकावर शेजारी शेजारी बसले. त्या निरव शांततेत त्यांना एकमेकांच्या ह्रदयाची धडधड ऐकू येत होती. बराच वेळ कोणीच बोलले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:वर ओढवून घेतलेल्या विचित्र परिस्थितीने ते भारावून गेले होते.
इहसानला अशा भानगडींचा अनुभव होता तरी पण यावेळी मात्र त्याच्या लक्षात आले की हे प्रकरण काहीतरी वेगळे आहे. तिने घातलेल्या अटींनी तो गोंधळून गेला. आजवर असे कधीच झाले नव्हते. गोंधळून त्याने या प्रकरणात फार पुढे जायचे नाही हे मनोमन ठरवून टाकले. आता तो यातून सुटका कशी करून घ्यायची याचा विचार करू लागला.
शेवटी त्याने धीर करून विचारले, “ नाव काय तुझे ?”
“तू माझी अट विसरलास की काय ? मी कोण आहे हे जाणून घेण्याचा कसलाही प्रयत्न करणार नाहीस असे तू मला वचन दिले आहेस.”
“नाही ! नाही विसरलो (माझे आई) पण मला वाटले मैत्रीत नाव माहीत असलेले चांगले असते”
“आपण कुठल्या समाजात राहतोय हे तू विसरलास की काय ? आपण जे करतोय हा आपल्या समाजात एक अक्षम्य गुन्हा आहे. माहिती आहे ना? माझ्या माणसांना हे कळले तर ते मला ठार मारतील. जेव्हा समाज असा असतो तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागते. समाजाचा कर्मठपणा वापरूनच आपल्याला त्यांनी घातलेल्या बेड्या तोडाव्या लागतील. त्यासाठी समाजाला फसवण्यात आपल्याला यश आले पाहिजे. कळलं का?”
“ फारच खोलवर विचार करतेस तू” इहसान चमकून म्हणाला.
“चला ! माझी परत जायची वेळ झाली. मी परत दोन एक दिवसांनी भेटते तुला”
ती निरोप घेताना उभी राहिली आणि इहसानने तिच्या कमरेभोवती हात टाकण्याचा प्रयत्न केला पण तिने तो रागाने झिडकारला. त्याच्याकडे रागाने पहात ती म्हणाली,
“तू कोण आहेस मला माहीत नाही..कदाचित तू मुलींना फसवणारा ही असू शकतोस..काम झालं की मला चुरगाळून फेकून देशील.”
ती समाधानाने घरी गेली. तिच्या मनास एक प्रकारची हुरहुर लागून राहिली होती. पण थोडीशी चलबिचल ही उडाली होती. तिने तिच्या समाजाचे सगळे कायदे एका फटक्यात पायदळी तुडवले होते. हे सगळे कसे घडले, का घडले हेच तिला कळत नव्हते. शेवटी ते तिला पडलेले एक स्वप्न होते अशी तिने स्वत:च्या मनाची समजूत घालून घेतली.
घरात आल्यावर तिने तिचा बुरखा तिच्या खोलीत एका खुर्चीवर टाकला व ती आईला सैपाकघरात मदत करायला गेली. आज ती जरा जास्तच बडबड करत होती. आईच्या एवढ्याशा बोलण्यावर खुदकन हसत होती. कामाची टाळाटाळ न करता आईचा प्रत्येक शब्द झेलत तिने आईला अगदी खुष केले. तिचे वडील घरी आल्यावर ती त्यांना हसतमुखाने सामोरी गेली. त्यांच्या हातातील सामान तिने काळजीपूर्वक घरात नेऊन ठेवले. आज तिच्या हालचालीत एक प्रकारचा मृदुपणा आला होता. एवढे करून कोणीही न सांगताच ती स्वत:च्या खोलीत जाऊन अभ्यास करत बसली.
ती कामे यांत्रिकपणे करत होती पण रात्रभर कूस बदलून बदलून तिच्या झोपेचे खोबरे झाले.
त्यांच्या या भेटी सुरूच होत्या. त्यांच्या गप्पांचा विषय आता हळूहळू बदलत स्त्री पुरुषांच्या संबंधांवर येऊन पोहोचला. ते एकमेकात गुंतत गेले. पण तिने डोके थंड ठेवून त्याला तिची ओळख पटणार नाही किंवा ती कोण आहे हे त्याला कळणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. जगापासून ही भानगड लपवून ठेवण्याची किमया तिने अगोदरच साध्य केली होती.
एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर सिहॅम तिच्या वडिलांबरोबर गप्पा मारत बसली होती. वडील आपले वर्तमान पत्र चाळत बसले होते मधून मधून तिच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. तेवढ्यात त्यांचे डोळे एका बातमीवर थबकले. लेख होता बुरखा फेकून देणार्या स्त्रियांवर. त्यांनी तो लेख मोठ्याने वाचायला घेतला. त्यांचे वाचन संपते ना संपते, सिहॅमने त्या लेखिकेवर परंपरा तोडल्या बद्दल तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. बुरखा टाकून देण्याचा निर्लज्जपणा त्या बायका कशा करू शकतात असा तिचा रास्त प्रश्न होता. तिच्या संतापाला वाट देत ती बडबडत होती. तिच्या वडिलांच्या मनात त्यांच्या या बुद्धिमान मुलीबद्दल अभिमान दाटून आला. पारंपारिक रूढींचा आदर शिकवणाऱ्या संस्कारात मुलीला वाढवले याचे त्यांना समाधान वाटले. ‘हिच्यात आणि हिच्या बेजबाबदार, उच्छृंखल मैत्रिणींमधे किती फरक आहे ! दोन पुस्तके वाचली की त्यांना वाटते त्यांना कसेही वागण्यास परवानगी आहे. लाज, शरम काही नाही. ” ते मनाशी म्हणाले. “हिचे नखही कोणाच्या दृष्टीस पडत नाही.”
त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. ते जागेवरून उठले व त्यांनी सिहॅमच्या कपाळाचे मोठ्या ममतेने एक हलकेसे चुंबन घेतले.
“ अल्ला तुला असेच ठेवो !” त्यांनी आशीर्वाद दिला.
सिहॅम तिच्या खोलीत पोहोचली आणि तिला हसू आवरेना. तिने खोलीचा दरवाजा लावून घेतला आणि ती वेड्यासारखी हसत सुटली. तिने बाजूलाच पडलेला बुरखा उचलला व छातीशी कवटाळला. एक गिरकी घेतली. खोलीच्या मध्यभागी थांबून ती त्या बुरख्याशी बोलू लागली,
“ मी तुझा किती द्वेष करते हे तुला माहीत आहे ना !. पण त्याला माझ्यापासून दूर ठेवण्याचे काम मी तुझ्याकडून करून घेते. मला तुझ्याबद्दल काडीचाही आदर नाही ना ममत्व. मला तुझा राग येतो. तू नुसता माझ्या नजरेस पडलास तरी माझी चिडचिड होते. पण मला तू आवडतोस सुद्धा. इतर गरीब बिचार्या मुलींना तू आवडतोस कारण त्यांचे शील, कौमार्य जपण्यासाठी त्या तुझ्यामागे लपतात. पण त्या जर खरंच प्रामाणिक असतील तर त्यांनी तू भानगडी लपवतोस म्हणून तू आवडतोस असे म्हटले पाहिजे.
मला तू आवडतोस कारण मला माझ्या आवडीप्रमाणे आयुष्याची मजा घेण्यास तू मला मदत करतोस. हे फक्त बुरख्याआडच शक्य आहे.
ज्या मुली बुरखा घालत नाहीत त्यांची मला खरोखरीच कीव येते..”
अनुवाद : जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
15 Oct 2017 - 6:09 pm | तुषार काळभोर
सिहॅमचा बुरखा असो वा आताचा स्कार्फ, तरुणींना अजून थोडे धैर्य देतात.
15 Oct 2017 - 6:38 pm | अमरेंद्र बाहुबली
आवडला लेख!
15 Oct 2017 - 10:38 pm | पगला गजोधर
द अदर साईड ऑफ बुरखा.....
बुरखा अल्याडचा, एक वेगळा दृष्टिकोन वाचायला मिळाला...
15 Oct 2017 - 11:02 pm | एस
चित्र आवडले. अनुवादही छान.
16 Oct 2017 - 7:09 am | आनन्दा
अवांतर करत आहे..
वाचून उगीचच पुण्यातल्या, आणि इतरही शहरातल्या आधुनिक बुरखाधारी मुली आठवल्या
16 Oct 2017 - 11:54 pm | पैसा
मस्तच भावानुवाद! बुरख्यावर उगवलेला सूडच हा!