मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी
लोकसत्ताच्या दि. २३ सप्टेंबरच्या "चतुरंग"च्या पुरवणीत विन्दा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी" असा विषय घेऊन अनेक साहित्यिकांनी निरनिराळ्या कवींवर लेख लिहले होते.त्यांची यादी पाहिली तरी हा आढावा किती विस्तृत होता त्याचा अंदाज येईल.
(१) मधुवंती सप्रे --विन्दा करंदीकर -- माझ्या घरी मी पाहुणी
(२) नीरजा -- कुसुमाग्रज -- चिराच होईन इथे चिर्यातील
(३) संगीता जोशी -- सुरेश भट --चंदन आणि चांदणेही
(४) डॉ. नीलिमा गुंडी --मंगेश पाडगावकर --जय जय हे पार्थिवते
(५) डॉ. अरुणा ढेरे -- बा. भ. बोरकर -- मयसभेतून अवतरलेली स्त्री
(६) नारायण कुलकर्णी कवठेकर -- ग्रेस -- ग्रेसच्या कवितेतील आयाबाया
(७) डॉ. प्रज्ञा दया पवार -- नारायण सुर्वे -- नाही थरकणार
(८) वसंत आबाजी डहाके -- अरुण कोलटकर -- अठ्ठावीस युगांचं एकटेपण
(९) डॉ. नंदना बोलील-कुलकर्णी -- पु.शि. रेगे -- पुष्कळातील पुश्कळ तू
(१०) प्रभा गणोरकर --नामदेव ढसाळ -- समस्त बाई जातीचे दुखणे
या सर्व कवींनी लिहावयास सुरवात केली याला ५०-६० वर्षे तरी होऊन गेली. म्हणजे मी कविता वाचावयास सुरवात केली तो काळ. त्यामुळे या सुंदर लेखांमध्ये माझे एक आवडते कवी "वसंत बापट" यांचे नाव नाही याचे मला अतिशय वाईट वाटले. वसंत बापट यांनी "स्त्री" कडे अनेक पैलूतून पाहून सुंदर कविता लिहल्या आहेत. मग ते कां वगळले गेले ? आता मी सहित्यिकही नाही व प्रा.डॉ. ही नाही. त्यामुळे वरील दर्जाचा एखादा लेख लिहणे तर शक्य नाही. पण तरीही मनाला हुरहुर लागून राहू नये म्हणून त्यांची एक कविता देत आहे. फुंकर फुंकर
हीच कां ? तसे पाहिले तर मी पूर्वीही वसंत बापटांच्या कविता दिल्या आहेत. तर विन्दाची कविता वाचावयाच्या आधी ही कविता सुस्थळी वाटते म्हणून
एके काळी विन्दा-वसंत-मंगेश एकत्र आपल्या कविता वाचनाचा कार्यक्रम करीत. त्यामुळे बापटांची एक कविता व त्यापुढे वरील लेखामधील विन्दांची कविता एकाखाली एक देत आहे. आम्ही किती भाग्यवान होतो याची तुम्हाला कल्पना येईल.
फुंकर
बसा म्हणालीस.. मी बसलो
हसलीस म्हणून हसलो
बस्स इतकेच... बाकी मन नव्हते थार्यावर
दारावरचा पडदा दडपीत तू लगबग निघुन गेलीस माजघरात
माझ्यासोबत ठेवून तुझ्या शुष्क संसाराच्या निशाण्या ...
या जाळीच्या पडद्याआड कशाला कोरले आहेस
हे हृदय..उलटे.. उत्तान ? ...
काचेच्या कपाटात कशाला ठेवल्या आहेस भुश्श्याच्या राघुमैना ?..
उडताहेत लाकडी फळांवर कचकड्याची फुलपाखरे
भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने
काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा
त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो
तू विचारलेस .काय घेणार ?
काय पण साधा प्रश्न .. काय घेणार ?
देणार आहेस ते सारे पूर्वीचे ?
मला हवे आहेत चिंचेचे आकडे .. ते अधाशी ओठ, ती कुजबुज, त्या शपथा
दे झालं कसलंही साखरपाणी
तुझं आणि तुझ्या पतीचे हे छायाचित्र्र छान आहे
तुझ्यावरची सारी साय ह्या फुगीर गालांवर ओसंडते आहे
बळकट बाहु, रुंद खांदे, डोळ्यात कर्तेपणाची चमक छान आहे
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस की जसे काही कधी झालेच नाही
मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने निदान एक वाक्य.. एक जहरी बाण
ते मला जमले नाही
आणि तू तर नुसती हसत होतीस
आता एकच सांग..
उंबर्यावर तुझ्या डोळ्यांत पाणी आले
इतकी का तुला सुपारी लागली ?
पण नकोच सांगूस
तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर.
वसंत बापट
माझ्या घरी मी पाहुणी
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगु कसे सारे तुला सांगु कसे रे याहुनी
घरदार येते खावया नसते स्मृतींना कां दया ?
अंधार होतो बोलका वेड्यापिश्या स्वप्नातुनी
माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंत मी,
ठरते परी ती काच रे दिसतोस जेव्हा त्यातूनी
माझे जगी जे मानले, माझे न आता राहिले
मी "मी"च का मग राहिले हे घाव सारे साहुनी
संसार मी करते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी
वहिवाटलेली वाट ही मी काटते दररोज रे
अन् प्राक्तनावर रेलते,छाती तुझी ती मानुनी
विन्दा करंदीकर जातक (१९६८)
शरद
प्रतिक्रिया
4 Oct 2017 - 1:16 pm | एस
फार छान विषय आहे. वेळ नसल्याने तूर्तास फक्त वाचल्याची पोच देत आहे.
4 Oct 2017 - 8:14 pm | प्रचेतस
सुंदर लेख.
ह्याच विषयावर मध्ययुगीन कालखंडातील संत, पंडिती अशा विविध परपरांतून आलेले लिखाणही वाचावयास आवडेल.
4 Oct 2017 - 8:31 pm | यशोधरा
मस्त. दिवाळी अंकासाठी लिहिले आहेत ना?