मला आलेला अनुभव -२

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
2 Oct 2017 - 2:04 pm

मला आलेला अनुभव -२

ह्यात मी छोटे छोटे दोन अनुभव एकत्र केले आहेत. कारण प्रत्येकासाठी ऐक ऐक वेगळा धागा काढणे शक्य नाही व ते व्यवहार्यदेखील नाही.
आपण कधी पूर्णपणे आपल्यावरील ताबा गमावला आहे का ? म्हणजे कधी पूर्णपणे वेळेस्वाधीन झाला आहेत का ? ' वेळ आली पण काळ आला नाही' या उक्तीचा तुम्हाला अनुभव आला आहे का ? मला दोन वेळेस आला आहे.
१. नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. माझी 'पोहायला शिकण्याची' तयारी चालू झाली होती. तसे बघायला गेलो तर हे पोहायला शिकण्याचे वय उशीराच झाले. मात्र त्याचा एक फायदा (कि 'तोटा' ?) म्हणजे आई वडिलांचे आपल्यावर वाढलेला विश्वास. काळजी करण्याचे प्रमाण कमी.
तर त्यावेळेस अहमदनगर मधील एकमेव सार्वजनिक तलाव नवशिक्यांसाठीच प्रसिद्ध होता ,तो म्हणजे सिद्धिबागेजवळील नगरपालिकेचा तलाव. आता चित्र बरेच बदलेले आहे. आता महानगरपालिका झाली आहे. आता अजून दुसरे तलाव आहेत.त्यात खाजगी पण तलाव आहेत. सर्वत्र पाण्याची स्वच्छता राखली जाते.. सुरक्षारक्षक आहेत. त्यावेळी मात्र पाण्याची स्वच्छता काही केली जात नसे. एक गेटवरील 'सिक्युरिटी' म्हणजेच 'सुरक्षारक्षक'. यामुळे तिथे शक्यतो हौशी व नवशिके यायचे. पट्टीचे पोहणारे तेथील खराब पाण्यामुळे ' विहिरींमध्ये' पोहणे पसंत करायचे.
तर माझा 'पट्टीचा मित्र' व अजून २-३ जण आम्ही एकत्रित पोहायला निघत असू. ' पट्टीचा' विश्वासू मित्र दाखवून घरून परवानगी काढून आम्ही निघत असू.
तर मी मित्राकडून पोहणे शिकत होतो. मला वाटते सातेक दिवस झाले असतील. जरी पूर्वी मला पोहता येत नसले तरी पाण्याची भीती मला कधीच वाटत नव्हती. तर ह्या ७ दिवसांनी भीड पूर्णपणे चेपली गेली होती. ३-४ फुटापासून , कडेकडेने थोडे पुढे जायचा प्रयत्न करू लागलो. असेच ऐक दिवस थोडे पुढे गेलो. आतापर्यंत हातपाय मारून तरंगता येऊ लागेल होते. तर मी असाच पोहत असतांना काय झाले ते माहित नाही, पण मी अचानक पाण्यात खाली गेलो. फार खोलीवर जरी मी नसलो तरी ७-८ फुटांमध्ये होतो. माझ्या नाकातोंडात पाणी आले होते.त्यावेळेस मला काहीच समजत नव्हते कि असा मी खाली कसा आलो. मी मनातून फार घाबरलो. कारण माझा माझ्यावर काहीच ताबा नव्हता.मी जसे हातपाय मारणे विसरून गेलो होतो. प्रचंड अगतिकता आली होती. जसा मी खाली गेलो तसाच थोडासा उचलेला गेलो (कदाचित पाय मारत असावो. ) मात्र माझे हात पूर्ण काटकोनात वर होते. हाताला वरील एक भिंतीजवळील पाईप लागला. व माझा 'होष' परत आला. त्या पाईपला पूर्णपणे शक्तीनिशी पकडले व त्याला धरून वर आलो. हुश्श .... आता मला कळू लागले काय चालू आहे,. नेह्मीसार्खे हातपाय मारून मी त्या तलावातून बाहेर आलो व नंतर मला हायसे वाटू लागले. हे सर्व इतके झटपट घडले कि माझ्या' पट्टीच्या' मित्राला सुद्धा समजले नाही. 'सिक्युरिटी' ला समजणे लांबची गोष्ट राहिली.
ह्या घटनेने केवळ २-३ दिवसच मला भीती वाटली. मात्र नंतर मी पूर्ण काळजी घेतली. व पोहणे पूर्ण शिकून घेतले व नंतर पुढे कॉलेजमध्ये असताना तलावाबरोबर,शांत माहितीतील नदी, विहिरी, व समुद्रदेखील मनसोक्त पोहोलो.नंतर त्या पट्टीच्या मित्रासारखे पण पोहायला शिकलो. मात्र त्यावेळी जो प्रसंग घडला तो त्यावेळी फक्त मित्रांना माहिती होता. घरी मी सांगितला नव्हता. नंतर खूप कालानंतर मी तो घरी सांगितला. जर त्यावेळीस , जर तो पाईप हाती लागला नसता , तर ......
२. हा दुसरा प्रसंग बाईक वरचा आहे. मी नेहमी , बाईक वरून नगर पुणे जात असे. तसेच पुणे सोलापूर पण मी बाइक वरून मी ट्रिप करत असे. लग्न झाल्यावर अर्थात बाईक ने फिरणे बंद झाले. आता तुझे लग्न झाले आहे ,ते बाईक वरून सोडून फिरणे सोडून दे , तुझी जबाबदारी वाढली आहे आता आरामात बायकोबरोबर , आरामदायी बसने जात जावे .... असे सांगणे चहुबाजुंनी आल्यावर २ वर्ष बाइक पासून दूर राहिलो. नंतर एक दिवस, बायको, सासरे, आईवडील सर्वाना पटवून मी व बायको दोघे जण बाईक वरून नगरहून पुण्याला निघालो. गाडी आरामात चालवत होतो. एक मोठा ट्रेलर पुढे होता ३० ते ४० फूट लांब. त्याला ओव्हरटेक करण्यासाठी मी काळजी घेऊनच गाडी घातली. बाईक मध्यभागी होती. अचानक पुढे एक ट्रक खूप जवळ आला ( तो वळण घेऊन आला होता त्यामुळे अगोदर दिसला नव्हता.) ट्रक वेगात समोरून येत होता. मला काहीच करता येत नव्हते. . केवळ डिप्पर व हॉर्न वाजवणे एवढेच माझ्या हातात होते. जवळपास १०-१५ फुटाचांचे अंतर राहिले होते. प्रचंड अगतिकता आली होती. तेवढयात त्या ट्रक ड्रायव्हरला माझी बिकट अवस्था जाणवली व त्याने प्रसंगावधानेने त्याच्या ट्रकला थोडे डावीकडे वळवले. व वेग कमी केला. मला केवळ एक कशीबशी बाईक जाईल एवढी जागा मिळाली. व ... मी पलीकडे त्या ट्रेलरला एकदाचे पास केले. हि घटना पण एवढया कमी वेळेत घडली कि ट्रक ड्राइवर व मला अशी दोघांनाच कळली. बायकोला पण समजली नाही व ...अजून सांगितली नाही. जर त्या ट्रक ड्रायव्हरचे लक्ष नसते , वा त्याला काही सुचले नसते तर ?......

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

2 Oct 2017 - 8:05 pm | दुर्गविहारी

थरारक ! पाण्यामधे आसरा देवी असतात म्हणे, तीने तुम्हाला ओढून नेले का ते बघा;-)
असाच अनुभव माझ्या पोहायला न येणार्‍या मित्राला कास तलावात आला. सुदैवाने बरोबर असलेल्या ईतर मित्रांना वेळीच लक्षात आले म्हणून अक्षरशः पाण्याच्या तळाशी गेलेल्या मित्राला ओढून वर काढले.
बाईक चालवताना खुप काळजी घ्यायलाच हवी. वळणावर मोठे ट्रेलर कोणत्याही परिस्थितीत ओलांडू नये.

दुर्गविहारी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आसरा देवीची महती समजली. हाहाहा ( स्माईली कशी चिकटावी हे न समजल्याने , शब्दरूपात हसणारा ओरायन..)