"रांव रे, आपा येतां साईट दी" (थांब रे,आपा येतोय साईडला रहा)
असले उद्दगार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगांव किंवा वेंगुर्ले-बेळगांव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत.
त्याचं असं झालं,आपांना-माझ्या काकाना- धंद्या मधे जास्त दिलचस्पी होती.आजोबांच्या लक्ष्यांत आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.अण्णा म्हणाले मुंबईवरून मी त्यांच्यासाठी एक नवीन बस -प्यासींजर व्हीएकल- विकत घेतो.त्यावेळी साधारण
२०० रुपयाना -म्हणजे आताचे ४० हजार रुपये झाले अर्थात त्यावेळी गाड्या इंपोर्ट होत असत म्हणा-विकत घेतली.अण्णाचं लग्न झालं तेव्हां आपा एक वर्ष्याचे होते.आणि त्यांची आई,म्हणजे आमची आजी निर्वतली होती. माझ्या आईनेच त्यांना वाढवलं.अण्णांना ते मुलासारखे होते.
ही बस सर्व्हीस आपा चालवीत असत.सुरवातीला ते आठवड्यातून २,३ वेळा मग रोज, मग दिवसातून दोनदां सर्वीस सावंतवाडी ते बेळगांव अशी चालवत असत.त्याशिवाय आणखी बर्याच लोकांच्या अशा सर्वीसीस होत्या.
पण एक आपांची खासीयत होती,की नियमीतपणा, सर्वांच्या अगोदर पोहचणं,कुणालाही नाखूष न करणं,आणि हंसत,हंसत सर्वांना खूष करणं.
सफेद लांब बाह्यांचा शर्ट,डोक्यावर काळी टोपी,ती पण अर्धी मागे गेलेली,कोट बरोबर असायचा पण कधीच अंगावर नाही,तर खांद्यावर आणि तो पण अर्धा लटकवलेला, तोंडात पानाचा ठेचा,रंगदार पानाचा तांबडा रंग तो पण दांतावर ठाम बसलेला. ओळखीचा माणूस लांबून दिसल्यावर सुमधूर हास्याचा त्यांचा चेहरा माझ्या अजून मेंदुत छाप ठेवून बसलेला आहे.
३०,३५ वयावर तारुण्याची बेदरकारी,आणि नवी करकरीत इंपोरटेड गाडी चालवताना वेगावर लक्ष्य कसं राहिल?.तशातच, धूळीने माखलेले रस्ते,प्रवाश्याना वेळेवर पोहचवण्याची हमी,त्यामुळे इतर रस्त्यावरून चालत जाणारे पाद्चारी आणि गाडी
चालवणारे,प्रचंड धुळीचा लोट मागे टाकत जाणारया आपांच्या गाडीला पाहून,
" रांव रे,आपा येतां साईट दी"
किंवा आपा पुढे निघून गेलेले पाहून
"आपा,गेलो दिसतां?"
असं धूरळा उडाल्यामुळे तोंडावर रुमाल धरून ओरडून बोलणारे लोक आजुबाजूला बघून,
"अहो,ते माझे काका समाजलानां?"
असं छाती पुढे करून सांगणारे माझे मोठे भाऊ आणि चुलत भाऊ आम्हाला सांगायचे ते ऐकून आमची पण छाती फूगत असे.
आता तेच आपा वार्धक्याने वाकलेले,क्षीण प्रकृतीचे,रसत्यावरून जपून चालताना बघून,वाटतं
"गेले ते दिवस"
श्रीकृष्ण सामंत