मंडळी, मी जेव्हापासून मराठी आंतरजालावर फिरू लागलो तेव्हापासून बरीचशी संकेतस्थळं आणि ब्लॉग्ज नजरेस पडले. या सगळ्याठिकाणी निरनिराळ्या व्यक्तिंनी हाताळलेले विषय खरोखर खूपच वैविध्यपूर्ण आहेत. काही म्हणता काही बाकी ठेवलं नाहिये पब्लिकने. पण एक विषय मात्र असा आहे की जो खुपदा हाताळला जातो. आणि त्या विषयावरच्या चर्चा खरोखर प्राणपणाने लढवल्या जातात (एक मुंबई-पुणे वादच या वादाला मागे टाकू शकेल :) ) तो विषय म्हणजे.... बरोबर ओळखलंत, भाषा आणि भाषेशी संबंधित शुद्धलेखन वगैरे उपविषय. या सगळ्या चर्चा अतिशय रंगतातच. सध्या मिपावर चालू असलेली 'संस्कृत' बद्दलची चर्चा घ्या किंवा शुध्दलेखनावरच्या विविध चर्चा घ्या. बरीच नविन माहिती कळली आणि विचारांच्या विविध दिशा कळल्या. पण एका गोष्टीची गंमत वाटली... लोकांची मतं सहसा 'इस पार या उस पार' अशीच असतात, बहुतांशी. असो.
सर्व चर्चा या आपण तोंडाने बोलतो त्या भाषेबद्दलच आहेत. पण तात्यांसारख्या काही लोकांनी अजूनही काही भाषांचा उल्लेख केला आहे. जसे की, संगित ही एक भाषा आहे आणि ती युनिव्हर्सल आहे. खरंच आहे ते. बर्याचदा संगित हे शब्दांच्या आधाराने सुरू होतं पण पार पलिकडे पोचवतं.
तशीच अजून एक भाषा आहे आणि ती सुध्दा वैश्विकच आहे. तिचे प्राथमिक रुप जरी सगळीकडे सारखेच असले तरी व्यक्त स्वरुप स्थळकाळाप्रमाणे बदलते. ती आहे देहबोली... इंग्लिश मधे तिला 'बॉडी लँग्वेज' म्हणतात. माणूस कितीही अशिक्षित (रुढार्थाने) असला तरी ही भाषा त्याला येतेच येते आणि दुसर्याने या भाषेत बोललेलं कळतंच कळतं. ही भाषा इतकी परिणामकारक आहे की बर्याचवेळा संबंध वाढवायला किंवा बिघडवायला ती एकटी कारणीभूत ठरू शकते. या जगात वावरताना ती एक अतिशय उपयुक्त आणि म्हणूनच दुधारी असं शस्त्र आहे.
देहबोलीची ढोबळ व्याख्या करायची झाली तर अशी करता येईल... शरिराच्या साहाय्याने आपलं म्हणणं पोचवायचा प्रयत्न. या मधे मुख्य प्रकार म्हणजे हाताच्या हालचाली ज्याला आपण हातवारे म्हणतो, चेहर्याच्या हालचाली, शब्दांच्या उच्चारांवरील आघात, आवाजाची पातळी वर-खाली करणे वगैरे. आपली भाषा जशी आपल्या विचारांचा मागोवा घेत जाते तशीच आपली देहबोली सुध्दा आपल्या विचारांशी / भावनांशी घट्ट निगडित असते, किंबहुना आपल्या शाब्दिक भाषेपेक्षा कांकणभर जास्तच लगटून असते विचारांना.
माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो की ज्यामुळे मला ही गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवली. मी एकदा सकाळी गोरेगावला लोकलमधे चढलो आणि मला अंधेरीला उतरायचे होते. गोरेगाव एका बाजूला येते आणि अंधेरी दुसर्या बाजूला. म्हणजे काय प्रकार ते मुंबईत राहणार्या लोकांना सांगायला नकोच. मी गाडीत चढल्यावर लोकांना विनंति करत करत दुसर्या बाजूच्या दरवाजाकडे मुसंडी मारत होतो. लोक शिव्या घालत होते. साहजिकच मी खूपच वैतागलो होतो. पण चिडून सांगतो कुणाला? (आज हा लेख वाचायचे भाग्य तुम्हाला मिळाले नसते ;) ). अंधेरी यायच्या आधी थोडावेळ एका दाराजवळ उभ्या असलेल्या आडमुठ्या माणसाबरोबर थोडा लडिवाळपणा झाला पण मी प्रसंग पाहून थोडा मवाळपणा पत्करला पण उतरताना मात्र थोडी धक्काधक्की झालीच. मी बोललो काहिच नाही पण माझा चेहराच सगळं काही बोलला असणार. आमचा एक सहकारी नेमका त्याच गाडीच्या मागच्या डब्यातून उतरला आणि मी उतरल्या उतरल्या माझ्या समोरच आला. त्याने पहिला प्रश्न केला मला, 'क्या हुवा? उसको मारेगा क्या?' मी थक्कच झालो. मी त्याला विचारलं 'तेरे को कैसे पता?' तो फक्त एवढंच म्हणाला, 'तेरा चेहरा सब कुछ बोल रहा था. तू उसको इतना गुस्सेसे देख रहा था की मालूम पड रहा था.' मतितार्थ असा की आपण कितीही उत्तेजित झालो तरी आपले संस्कार बर्याच वेळा आपल्याला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला लावतात. पण आपला देह काय बोलत असतो ते आपल्याला कळत सुध्दा नसते. आणि म्हणूनच ही भाषा लै डेंजरस.
ज्याला या भाषेची जाण आली आणि नीट वापरायची अक्कल आली त्याने जगात वावरायची अर्ध्याहून अधिक लढाई जिंकली असं म्हणायला हरकत नाही.
शब्दांची भाषा आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी शिकत जातो, पण देहबोली मात्र माणूस उपजतच घेऊन येतो. जन्म झाल्यावर रडून, 'मी जिवंत आहे होऽऽऽ!!! माझ्या कडे लक्ष द्या' अशी भावना ते नवजात पिल्लू कोणत्या अनाम प्रेरणेने देत असतं? भूक लागली की रडायचं हे कसं कळतं? थोडं मोठं झालं की पाळण्यावर टांगलेला खुळखुळा गोल फिरला की जिवणी आपोआप रूंदावते ती कशी? आपण जन्माला येतानाच हे देहबोलीचं ज्ञान घेऊन येत असतो. पण जसजसे आपण मोठे होते तसतसे या देहबोलीवर निरनिराळे संस्कार व्हायला लागतात. आपले आई-वडिल आणि इतर 'मोठे' लोक आपल्याला 'डूज' आणि 'डोन्ट्ज' शिकवायला लागतात. आणि यातून जन्माला येते ती 'संस्कारित' देहबोली.
आपली उपजत देहबोली मात्र खर्या अर्थाने वैश्विक आहे. रडण्याचा अथवा हसण्याचा सगळीकडे बहुधा सारखाच अर्थ लावला जाईल. पण हाताच्या एखाद्या हालचालीचा मात्र बरेच वेळा स्थळकाळसापेक्ष अर्थ लावला जाईल. म्हणजे आपल्याकडे एखाद्या माणसाकडे 'बोट' दाखवणं अतिशय असभ्य समजतात पण काही ठिकाणी लोकांना त्याचे काहीच वाटत नसेल. संस्कारित देहबोली ही एखाद्या वांशिक अथवा भाषिक गटापुरती बर्यापैकी सिमित असते. उदाहरणार्थ, आपण एखाद्याचे बोलणे ऐकताना 'मला तुमचे बोलणे कळते आहे' या अर्थी मान उभी (वर-खाली) हलवतो. पण दक्षिण भारतात बर्याच ठिकाणी विशेषतः केरळ मधे त्याच अर्थाने मान आडवी (डावी-उजवी) हलवतात. आपल्याकडे त्याचा अर्थ नेमका उलटा होतो.
देहबोलीची अजून एक गंमत आहे. जरी ती शब्दांवाचून भाषा असली तरी भाषेतले बरेच वाक्प्रचार देहबोलीशी खूपच जवळून निगडित असतात. बर्याच अरब देशांमधे 'मला काही देणं घेणं नाही' या अर्थी हाताची एक विशिष्ट हालचाल करतात. आपण जेवल्यावर नळाखाली हात धुतो ना तशी काहिशी ती हालचाल असते. मंडळी, लक्षात येतंय का? इंग्लिश मधे 'वॉश युवर हँड्स ऑफ समथिंग' हा वाक्प्रचार वापरतोच ना? पुरातन काळापासून विविध संस्कृतिचे लोक व्यापारानिमित्त एकमेकांच्या संपर्कात येत होते आणि भाषेची, संकल्पनांची, ज्ञानाची देवाणघेवाण होत होती, त्याचंच हे एक उदाहरण असू शकेल का? असेलही. शक्यता नाकारता येत नाही.
आपण आपल्या सांस्कृतिक परिघाच्या बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा शब्दांपेक्षा देहबोलीचंच भान जास्त ठेवावं लागतं. तसेही शब्द आपल्याला कळत नाहीत, देहबोली मात्र त्या मानाने जास्त उपयोगी ठरते. मी भारताबाहेर आलो तेव्हां मला सुरुवातीलाच या गोष्टीचं भान आलं. मी अरबस्तानात नविनच होतो. एके दिवशी संध्याकाळी आमच्या कंपनीच्या गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला बसून घरी चाललो होतो. उजवा पाय डाव्या पायावर ठेवला होता, पायाचा तळवा ड्रायव्हरच्या दिशेने झाला होता. ड्रायव्हर पण भारतियच होता आमचा. त्याला काहीच वाटले नसावे. पण गाडी एका सिग्नलला थांबली आणि ड्रायव्हर साईडला एक भलं मोठं जिएमसीचं (एक अति प्रचंड गाडी) धूड उभं राहिलं. काच खाली झाली आणि आम्हाला काच खाली करायची खूण झाली. आम्ही तसे करताच तो दुसरा माणूस, स्थानिक होता तो, अरबी भाषेत खूप चिडल्यासारखा बोलला. मला कुठं काय कळायला. पण आमचा ड्रायव्हर मात्र विंचू चावल्यासारखा पटकन् माझ्या कडे वळला आणि म्हणाला, 'आधी पाय खाली कर'. मी पण जरा घाबरलोच होतो. चूपचाप हुकमाची अंमलबजावणी केली. पण देहबोलीचा एक महत्वाचा धडा शिकलो. अरबी संस्कृतित पायाचा तळवा दाखवणे म्हणजे समोरच्याचा घोर अपमान समजला जातो. समोरच्याची देहबोली शिकून तिचा आपल्यासाठी कसा उपयोग करायचा हे भान आले.
प्रत्येकाचा एक वैयक्तिक परिघ (पर्सनल स्पेस) असतो. जसा आपला परिघ आपल्याला प्यारा असतो तसेच व्यक्त होताना समोरच्याचा परिघ आपण उल्लंघत तर नाही ना याचेही भान आपल्याला असले पाहिजे. या परिघाची आपली जाणिव आपल्या जडणघडणीवर अवलंबून असते. पण आपण समोरच्या व्यक्तिची या बाबत काय जाणिव आहे याचे भान ठेवले पाहिजे. बर्याच पाश्चात्य संस्कृतिंमधे स्त्री -पुरूष हे खूप सहजतेने शारिरीकदृष्ट्या निकटतेने वावरतात. पण एखादा पुरूष जर भारतात येऊन तितक्याच जवळ येऊन बोलायला लागला तर तो मार खाईल याचीच शक्यता जास्त आणि गंमत म्हणजे आपण का मार खातोय हे त्या बिचार्याला कळणार पण नाही. आम्ही खोबारला असताना, एक शुध्द महाराष्ट्रिय कुटुंब आमच्या ओळखीचे होते. साहेब जरा उच्चविद्याविभूषित आणि आंग्लाळलेले होते. त्यांच्या घरी पार्टीला जायचे असले तर बहुतेक सगळ्या बायकांना घाम फुटायचा. एकतर त्या नवराबायकोतला लडिवाळपणा बघावा लागायचा आणि निरोप घेताना साहेब त्यांच्या सवयी प्रमाणे सगळ्यांच्या गालाला गाल लावून निरोप घ्यायचे. (वहिनी मात्र जरा त्यामाने चतुर होत्या. त्या आपल्या भारतिय बाणा त्यामानाने बराच जपून होत्या :( ) तर मुद्दा हा की 'डिफरंट स्ट्रोक्स फॉर डिफरंट फोक्स' हे व्यवधान ठेवलंच पाहिजे.
देहबोली, त्याच व्यक्तिची, पण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या रितीने वापरली जाते. आपण जेव्हा समोरसमोर एकाच व्यक्तिशी बोलतो तेव्हा साधारणपणे हातवारे कमी करतो. चेहर्याच्या हालचाली जास्त होतात. पण जर का आपण एखाद्या समूहाशी बोलत असू तर हाताच्याच नव्हे तर संपूर्ण देहाच्याच हालचाली जास्त होतात. मला माझ्या करिअर मधे विविध लोकांशी बोलण्याचा आणि एखादी गोष्ट त्यांच्यासमोर प्रभावीपणे मांडून ती पटवण्याचे प्रसंग खूपच येतात. मला या देहबोलीच्या जाणिवेचा खूपच फायदा झाला. जर का समोरच्या व्यक्तिची अथवा समूहाची देहबोली अगदी आत्मसात नाही पण नुसती समजून घेता आली आणी थोडीशी वापरता आली तरी एक प्रकारची आपुलकी प्रस्थापित करता येते आणि संवादचं सुसंवादात रुपांतर आपोआप होतं. आणि सुसंवाद स्थापित करणं हेच भाषेचं मुख्य काम नाही का?
तर मंडळी देहबोली बद्दल जागरूक व्हा, निरीक्षण शक्ति वाढवा आणि प्रभावी संवादक (इफेक्टिव कम्युनिकेटर ला हाच प्रतिशब्द आहे का हो?) व्हा.
प्रतिक्रिया
18 Oct 2008 - 6:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही काही मजेशीर किस्से ऐकायला मिळाले किंवा अनुभवताही आले.
आमचा एक पूर्वीचा शेजारी (ह्याचा मुलगा माझ्या वर्गात होता) जपानला गेला होता. ही गोष्ट असेल वीसेक वर्षांपूर्वीची! त्याच्याबरोबर एक जपानी माणूस होता, भाषांतरात मदत करायला. राजनदादाला थोड्या वेळानी नैसर्गिक हाकेला ओ देण्याची वेळ आली, याने आपल्या सवयीप्रमाणे करंगळी वर केली. हा जपानी माणूस भलताच गोंधळला. शेवटी अथक प्रयत्नांनंतर राजनदादा इष्ट स्थळी पोहोचला. काही दिवस गेले आणि एक दिवस हा दुभाष्या धावतधावत आला आणि राजनदादाला ओढतच एका ठिकाणी नेलं. तिथे लग्नविधी सुरू होते आणि याने दादाला नववधू दाखवली आणि मोडक्यातोडक्या ईंग्रजीत म्हणाला, "तुला बघायची होती ना नववधू?" आणि करंगळी वर करून दाखवली. बिच्चारा राजनदादा लाजून लाल झाला होता, नववधूच्या ऐवजी!
पण दक्षिण भारतात बर्याच ठिकाणी विशेषतः केरळ मधे त्याच अर्थाने मान आडवी (डावी-उजवी) हलवतात. आपल्याकडे त्याचा अर्थ नेमका उलटा होतो.
आत्ता मला समजलं, इंग्लंडात असताना भारतीय लोकं असंच करतात हे (जवळजवळ) जबरदस्तीनी माझ्याकडून का मान्य करुन घेतलं ते! मी किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांनी असं केल्याचं मला आठवतच नाही असं मी शपथेवर सांगूनसुद्धा! ;-)
अतिअवांतरः बिपीनभौ, तुम्ही मस्त लिहिता हे वेगळं सांगायला नको, नाही का?
18 Oct 2008 - 6:57 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिअवांतरः बिपीनभौ, तुम्ही मस्त लिहिता हे वेगळं सांगायला नको, नाही का?
नाही म्हणजे सांगितलं तर आवडेलच मला ;) स्तुति कोणाला आवडत नाही? आणि समोरचा खूष झाला तर सुसंवाद प्रस्थापित व्हायला काय वेळ हो? खरं की नाही? तर मतितार्थ असा की स्तुति करा. माझीच नाही तर सगळ्यांचीच..... ;) (मला इथे परत एकदा संस्कृत मधे स्तुति बद्दल काही तरी भयंकर फाडायची इच्छा होते आहे पण काल तुझ्या खरडवहीत घातला तेवढा गोंधळ पुरे ;) )
गंमत बरं का....
बिपिन.
18 Oct 2008 - 8:27 pm | टारझन
शरिराची भाषा (देहबोली) उत्तम प्रकारे शब्दांत मांडलेली आहे . हाबिणंदण !!
आमच्या रांगड्या देहबोलीने विनामारामारीच प्रश्न सुटतात , क्लायंटशी बोलताना देहबोली + देहयष्टी यांच मिश्रण टाकून बर्याचदा गोळ्या देऊन कामं पोस्टपोन करता येताय ... :)
अतिअतिअतिअवांतर : हा धडा इयत्ता सहावी मधे कुमारभारतीच्या पुस्तकात शामिल व्हावा असं शिक्षणमंत्र्यांना मी अवाहन करतो
४_२० रांगडा टिर्पीन
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
18 Oct 2008 - 6:54 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
एकदम डीफरन्ट स्ट्रोक ४-२० बिपीन
18 Oct 2008 - 7:14 pm | अवलिया
मस्त लेख
बिपिनभौ, लेख आवडला..
18 Oct 2008 - 8:31 pm | प्राजु
देहबोली व्यवहारात अतिशय महत्वाची असतेच.
माझ्या सोबत घडलेला किस्सा.. मी स्कूटीवरून पौडरोड ला लागणार होते आणि एकदम समोर एक रिक्षावाला आला. ट्रॅफिक तसं जरा जास्तीच होतं. त्याला मी नजरेनेच "तू जा आधी" अशी खूण केली. तर त्यानेही मला तशीच खूण केली. म्हणजे "तू आधी जा" अशी. पण त्या रिक्षाच्या पलिकडे एक मोठी बस असल्याने मला रिक्षाला क्रॉस करून जाणे शक्य नव्हते.. मी लगेच त्याला "पलिकडे बस आहे ... तेव्हा तूच आधी जा" अशा अर्थाची पुन्हा नजरेनेच खूण केली. रिक्षावाल्याने वळून एकदा बस कडे पाहिले आणि मग "ठीक आहे" अशा अर्थी मला पुन्हा नजरेनेच सांगितले. तिथून बाहेर पडल्यावर मात्र माझं विचार चक्र सुरू झालं. की केवळ देहबोलीच्या माध्यमातून एकही संवाद न करता आपण किती सहजपणे अनेक गोष्टी बोलून जातो..
प्रसंग छोटासाच होता . पण कायमचा लक्षात राहिला.
तेव्हा माझ्या मनांत जे विचार आले तेच विचार बिपिनदा तू इथे मांडले आहेस. मस्तच लेख एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Oct 2008 - 8:38 pm | नंदन
आवडला. इकडच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतील डिबेटनंतर दोन्ही उमेदवारांची देहबोली कशी होती, याचेही विश्लेषण बातमी देणार्या वाहिन्या करतात.
बाकी गोरेगाव-अंधेरी अगदी पटले हो. विरारमध्ये बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचे असले की असेच शिव्याशाप खावे लागतात :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Oct 2008 - 9:59 pm | बिपिन कार्यकर्ते
नंदनशेठ, बोरिवलीला चढून दहिसरला उतरताना नुसते शिव्याशाप खावे लागले तरी उत्तम... चक्क मारतात लोक. आणि जबरदस्तीने भाइंदर पर्यंत नेतात. जीवाशी खेळ आहे तो. :)
बिपिन कार्यकर्ते
19 Oct 2008 - 12:04 am | ऋषिकेश
नंदन,
बोरीवलीला चढून दहिसरला उतरायचास तु?
मानलं रे बाबा तुला.. मी एकदा हा प्रयोग केला नी शिव्या शाप-भंडाभांड करून एकदाचं उतरल्यावर कळलं की हे भायंदर आहे ;) त्यानंतर बोरीवली दहिसर म्हटलं की २०७ बरी ;)
बाकी बिपीन, उ त्त म!!!!! सध्या येकदम फार्मात की राव तुमी ! अजून लिवा :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
18 Oct 2008 - 9:25 pm | रेवती
माझ्या नवर्याच्या म्यानेजरच्या घरी जेवायला बोलावले होते (म्यानेजर भारतीय पण त्याची सौ. झेक आहे.). मी अमेरीकेत अतिनविन होते. आम्ही गेल्यागेल्या तीने माझ्या नवर्याला स्वागतपर मीठी मारली आणि मी मनातल्यामनात आधी भयंकर आश्चर्यचकीत व नंतर रागावले. घरी आल्यावर मला समजावताना नवर्याच्या नाकी नऊ आले. आता सौ. झेकच्या अश्या वागण्याची मला सवय झालीये ( नवर्याला तसाही काही प्रॉब्लेम नव्हता);). त्यांनंतर तिचे वडील अमेरीकावारीला आले होते, त्यांना भारतीय फूड चाखायचे होते म्हणून घरी जेवायला बोलावले. घरी परत जाताना त्यांनी थँक्यूपूर्वक माझ्या गालाला किस् केले. मी मनातल्यामनात येत असलेले सगळे पवित्र शब्द म्हणून घेतले. नंतर दर दहा मिनिटंनी गाल धुण्याचा कार्यक्रम चालला होता.
रेवती
18 Oct 2008 - 10:48 pm | कलंत्री
देहबोली - हावभाव यावरचा लेख उत्तमच झाला आहे. सध्या हे एक शास्त्र म्हणूनच अभ्यासले जाते.
मुख्य म्हणजे आपल्या मनाचा आणि शरिराच्या बोलीचा सहजासहजी कोणाला थांगपत्ता लागला नाही पाहिजे.
बर्याच वेळेस कोणाचे प्रमोशन ( पदोन्नती झाली नाही) तर त्याच्या शरीरबोली वरुन ते लक्षात येतेच येते. माझ्या मते सुखद भावना लपविणे सोपे असते पण दुखद / निराशेचे विचार लपविणे अवघड असते.
आपण ही याचा अभ्यास थोड्यशा सरावाने साधू शकतो.
19 Oct 2008 - 5:07 am | शितल
लेख आवडला,
देहबोली आणि योग्य ठिकाणी मौन बरेच काही बोलुन जाते. :)
19 Oct 2008 - 6:46 am | फटू
बिपिनदा एकदम फॉर्मात आहात राव... काय भन्नाट लिहलंय... मस्तच...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
19 Oct 2008 - 7:40 am | बेसनलाडू
सहज सोप्या भाषेत महत्त्वाचा विषय मांडणारा लेख आवडला.
(वाचक)बेसनलाडू
19 Oct 2008 - 8:17 am | सहज
बिपिनभौ खोबारचे पाणी स्पेशल दिसते आहे. भलतेच फॉर्मात आहात.
देहबोलीचे महत्व अगदी चपखल उदाहरणासहीत विशद केले आहे.
अजुन उत्तमोत्तम लेखन येउ दे.
19 Oct 2008 - 8:29 am | तात्या टारझन
देह्बोलि लेक अव्द्लुअ. देह्लोतुन आन्किकहि अर्थ मन निगु शक्तो हे म्हि]त्स अहेत क?
19 Oct 2008 - 8:57 am | प्रमोद देव
बिपिनशेठ तुम्ही आता सिद्धहस्त झालात. त्यामुळे जे काही लिहाल ते उत्तमच असेल ह्याबाबत खात्री झालेय. हा लेखही अगदी मस्त झालाय. अनवधानाने देहबोलीचा असाही अनुभव येतो.
19 Oct 2008 - 9:09 am | संदीप चित्रे
बिपिन -- खूप चांगल्या विषयावर लिहिलंयस.
देहबोलीबद्दल वाचायला आवडत असेल तर अंजली पेंडसेंचे 'देहबोली' नावाचे खूप छान पुस्तक आहे. तसे इंग्लिशमधे 'जेस्चर्स' नावाचेही छान पुस्तक आहे .
आजच मॉलमधे गेलो होतो. माझा साडेतीन वर्षांचा मुलगा एका स्पॅनिश (दिसणार्या) साधारण चार वर्षांच्या मुलीबरोबर मस्तपैकी खेळत होता. ती स्पॅनिश (किवा तशाच कुठल्यातरी) भाषेत बोलायची आणि हा पठ्ठ्या मराठी / इंग्लिशमधे .. पण भाषा समजत नाही म्हणून त्यांचे काही एक अडले नव्हते. एकमेकांना फॉलो करत जवळपास अर्धा तास तरी मस्तपैकी खेळले :) मधेच ती मुलगी मलाही काहीतरी सांगायची आणि मी पूर्ण ब्लँक असायचो की ही काय म्हणतेय :(
19 Oct 2008 - 12:36 pm | दत्ता काळे
देहबोली ह्या विषयावरचे लिखाण मी पहिल्यांदाच वाचले.
फार मस्त.
19 Oct 2008 - 10:27 pm | लिखाळ
वा.. छान विषयावरचा छान लेख....
तुम्ही वर मान हलवण्याबद्दल म्हणलात याचा मला सुद्धा इथे आल्यावर अनुभव आला..
देहबोलीवरची तुमची मते सुद्धा योग्यच आहेत.
मनात जे असते देहबोलीतून दिसतेच..
आपल्या मानात आनंदी भावना निर्माण झाल्या की हसू उमटते... तेच जर आपण मुद्दमून हसलो तर मन आनंदित होते.. असे मत काहिंचे आहे.. म्हणजेच देहबोलीचा मनावर परिणाम होतो..
--लिखाळ.
20 Oct 2008 - 10:16 am | विजुभाऊ
देहबोली वर एलन पीज चे ही खूप छान पुस्तक आहे.
20 Oct 2008 - 11:46 am | चतुरंग
बिपिनभौ तुमच्या साहित्यिक प्रतिभेच्या तेलविहिरीला भरपूर तेल लागलेले असून त्यातून उत्तम प्रतीच्या (म्हणजे तैलबुद्धीच्या असे म्हणले तर चालेल नाही?) लेखांची निर्मिती होते आहे हे स्पष्ट आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद!
देहबोली ही बघणार्यावर अतिशय परिणाम करते हे नक्की. मुलाखती, समूह चर्चा, सादरीकरण, बढतीच्या संदर्भातली बोलणी, कामातल्या त्रुटीबद्दल हजेरी घेणे ह्या सारख्या संवादात तर ह्याचे महत्त्व अपरंपार आहे. कित्येकदा एकही वाकडा शब्द न बोलता प्रतिकूल भावना पोचवणे आवश्यक असते त्यावेळी ह्याचा खूप उपयोग होतो.
आमच्या क्लायंट्सपैकी जपानी लोकांबरोबर मीटिंग असेल तर अक्षरशः डोळ्यात तेल घालून प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणे भाग असते. होकार किंवा नकार अशा दोन्हीला जपानी लोक शांत बसतात!
आत्ताची "शांतता" ही कोणत्या प्रकारची शांतता आहे हे त्यांच्या देहबोलीवरुन ओळखावे लागते. तुमच्याकडे बघणारे डोळे आणि हलकेच वरखाली हलणारी मान म्हणजे "हो". नजरेला नजर न देता हलकेच बाजूला बघणे किंवा मान हलवणे म्हणजे "नाही" हे सरावाने समजत जाते.
आणि इथे अमेरिकेत म्हणजे थेट हो आणि नाही शिवाय पान हलत नाही त्यामुळे हे सगळे एकत्र जमायचे म्हणजे तारेवरची कसरत. अमेरिकन माणसाचा मीटिंग दरम्यानचा एक माणूस बोलणे संपवून दुसरा बोलायच्या दरम्यानचा शांततेचा काल हा फक्त ४ सेकंद असतो असे स्टॅटिस्टिकल ऍनालिसिस मधून सिद्ध झालेले आहे. अशा वेळी २०-२५ सेकंदाचे पॉजेस म्हणजे मरण असते. टेलीकॉन्फरन्स असेल तर विचारुच नका! ;)
चिनी किंवा जपानी माणसे थेट "नाही" असे कोणत्याच गोष्टीला म्हणत नाहीत कारण ते असभ्य समजले जाते.
एखादा प्रश्न विचारला आणि ह्या पौर्वात्य देशातल्या माणसाने किंचित डोके खाजवत "बघायला हवे", "मला विचार करावा लागेल", "आताच ही माहीती हवी का" अशी बगल दिली तर समजायचे की हे "नाही" आहे!
चतुरंग
20 Oct 2008 - 12:52 pm | यशोधरा
आवडला लेख. बिपीन भौ, चौकार लगावताय एकसे एक! मस्त!
20 Oct 2008 - 3:07 pm | सुनील
छान लेख.
तुमची निरीक्षण शक्ती आणि लेखनाची शैली आवडली.
वेगवेगळ्या देशांत कामे करणार्या कंपन्या आजकाल आपल्या कर्मचार्यांसाठी क्रॉस कल्चरल ट्रेनींग देतात ते असे गोंघळ होऊ नयेत यासाठीच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Oct 2008 - 3:27 pm | भोचक
बिपीन भौ
लेख क्लास. मजा आली. अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वासोबत त्यांच्या देहबोलीसुद्धा आठवतात. बाळासाहेब किंवा राज यांच्या देहबोली काढून टाकल्या तर कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वात जितकी मजा जाणवते तेवढी वाटणार नाही.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
20 Oct 2008 - 4:47 pm | स्वाती दिनेश
बिपिन, देहबोलीवरचा लेख आवडला.
स्वाती
20 Oct 2008 - 4:53 pm | श्रावण मोडक
लेख. निरिक्षण बारकाईचे.
20 Oct 2008 - 5:18 pm | वल्लरी
गोरेगाव एका बाजूला येते आणि अंधेरी दुसर्या बाजूला. म्हणजे काय प्रकार ते मुंबईत राहणार्या लोकांना सांगायला नकोच.
हो ना....
लेख खुप छान आहे अगदी बारीक निरिक्षण आहे ह.. तुमचे
-जया
20 Oct 2008 - 11:04 pm | धनंजय
वाचायला उशीर झाला - पुढे अधिक लिहिण्यासाठी ५०च्या आदला प्रतिसाद क्रमांक आरक्षित करून ठेवतो आहे.
मोठी मजेदार असते देहबोली. कुठल्या नवीन देशात गेल्यावर त्यांची देहबोली कळायला खूप वेळ लागतो - त्याचा शब्दकोश कुठे भेटत नाही. त्यामुळे चटके खाऊन शिकायचे.
20 Oct 2008 - 11:55 pm | विसोबा खेचर
बिपिनकाका,
देहबोली या महत्वाच्या विषयावरचा लेख मस्तच!
मान गये आपको...
तात्या.
22 Oct 2008 - 8:32 pm | प्रभाकर पेठकर
बिपिनराव,
फार चांगला विषय त्याहून चांगल्यापद्धतीने हाताळला आहे.
देहबोली शिकण्याचे अनेक फायदे असतात.
कुठे ओल्या पार्टीला गेल्यावर बायकोच्या साध्या नजरेतही 'आता बाऽस!' हे वाचता येते. 'आता निघुया' हा निरोप बुबुळांच्या सूक्ष्मदर्शी हालचालीतूनही समजतो. असो.
व्यावसायिक चर्चांमध्ये आपण गिर्हाईक आणि समोरचा विक्रेता असेल तर त्या चर्चेत चुकूनही (किंचितही) होकारार्थी (वर-खाली) मान हलवायची नाही. हे त्याचा मुद्दा मान्य केल्यासारखे होऊन त्याला मानसिक बळ मिळते. आपली बाजू कमकुवत होते.
माणूस नजरेला नजर मिळवून बोलण्याचे टाळत असेल तर तो 'खोटं' बोलत आहे असे समजावे. किमानपक्षी त्याला स्वतःच्याच भूमिकेवर विश्वास नाही, म्हणजेच त्याचे दावे पोकळ आहेत असे समजावे.
शेजारी शेजारी गुडघ्यावर गुडघा ठेवून बसलेल्या दोन व्यक्तींमध्ये त्यांची लटकती पाऊले एकमेकांच्या दिशेने (आतल्या बाजूस) असतील तर त्यांची परस्परांची 'स्वीकृती' आणि पाऊले एकमेकांविरूद्ध (बाहेरच्या बाजूस) असतील तर ती परस्परांची 'अस्वीकृती' समजावी.
खांदे पाडणे, मिळमिळीत हस्तांदोलन, नजर खाली झुकविणे आत्मविश्वासाचा अभाव दर्शविते. तर कधी समोरचे व्यक्तिमत्त्व आपल्यापेक्षा भारी असून आपण त्याच्या 'प्रभावा'खाली आहोत असे संकेत समोरच्याला देते.
सतत असंबद्ध (एकाच प्रकारची) हालचाल मनाची अस्वस्थता दर्शवते. (राज ठाकरे सारखा स्वतःच्या नाकाला स्पर्श करतो.)
वादावादीत कमरेवर हात ठेवून भांडणारी माणसं 'आक्रमक' असतात तर हाताची घडी घालून बोलणारी माणंसं 'जोखिम' उचलू इच्छित नसतात. (डिफेंसिव्ह असतात.)
आजचाच माझा अनुभव सांगतो.
मी एकाला माझ्या उपहारगृहाच्या कामासाठी एक लाख रुपये आगाऊ रक्कम दिली होती. त्याची रितसर पावती होती माझ्याजवळ. पण आमचे काम डिझाईनिंग पातळीवर असतानाच काही कारणाने मला ते पूर्ण कामच रद्द करावे लागले. त्यामुळे त्या आगाऊ रकमेतला काही भाग तो कापून घेणार हे मला ठावून होते. तो होता पंजाबी. अंगयष्टी माझ्या दिडपट. माझ्या कामा मुळे त्याने १-२ इतर व्यवहार रद्द केले असे तो मला सांगत होता. तेंव्हा ते जे काही नुकसान झाले ते माझ्यामुळे झाले आणि त्याचा (त्या कामातला) फायदा तो माझ्या आगावू रकमेतून कापू इच्छित होता. ती रक्कम होत होती ५८०००/- रुपये. मी ह्या रकमेला अजिबात तयार नव्हतो. इथे वादविवाद सुरू झाला. त्याची पहिली चाल होती की चर्चा त्याच्या विभागात व्हावी. मी तयार झालो. त्याने पूना क्लब हे उच्चभ्रूंचे ठीकाण निवडले होते. मी गेलो तिथे. तिथल्या थाटमाटाचा माझ्यावर काय परिणाम होतो आहे हे पाहात तो तिथला 'आजन्म सदस्य आहे' हे त्याने ऐकविले. तसेच मुंबई-पुण्यातली इतरही अशीच उच्चभ्रू क्लबांचे आजन्म सदस्यत्व त्याच्याकडे आहे, असे त्याने मला ऐकवले. माझ्या चेहर्यावर 'कुत्ता जाने, चमडा जाने' असे भाव. त्याने नाश्त्याच्या आग्रह केला. मी फक्त चहा (बिनसाखरेचा) मागवला. माझ्या निर्विकार चेहर्याला कंटाळून त्याने विषयाला हात घातला. माझा पहिला विजय.
बर्याच वादावादीत तो नजरेला नजर मिळवत नव्हता. दूर पाहायचा. योग्य शब्द सापडत नव्हते. माझी नजर त्याच्या चेहर्यावर, भाव निर्विकार. तो ५८०००/- मागत होता मी १००% परतावा हक्काने मागत होतो. शेवटी आम्ही दोघेही अडून बसल्यावर मी उठलो. (तो पर्यंत बिनसाखरेचा चहा संपवला होता). म्हंटले, 'ह्यावर तोडगा निघणार नाही, मी निघतो'. मी माझ्या एक लाखाचे काय असा प्रश्न चुकूनही विचारला नाही. तो गोंधळला. मला म्हणाला,' तुझी इच्छा काय आहे?' मी म्हणालो, 'जास्तीत जास्त ५०००/- रुपये देईन, त्याहून एक रुपया जास्त देणार नाही.' हे वाक्य बोलताना मी मुद्दाम उठून उभा राहीलो होतो. तो बसलेलाच होता. पातळीत फरक करून जास्त प्रभावाच्या माणसावरही नियंत्रण आणु शकतो. तो म्हणाला,' नाही. हे मी स्वीकारू शकत नाही.' पण हे वाक्य माझ्या डोळ्यात बघून तो बोलू शकला नाही. मी बाजी मारली होती. मी म्हणालो, 'ठीक आहे.मी माझ्या वकिलाचा सल्ला घेतो आणि उद्या फोन करतो' आणि त्याला 'गुड डे', 'गुड नाईट' न म्हणता शांतपणे (माझ्या मनातला राग न दर्शविता) निघून गेलो. जाता-जाता वेटरला हात हलवून अभिवादन केले. संपूर्ण छन्न विभाग (कॉरीडोर) ओलांडून जाईपर्यंत काही झाले नाही. आता मी अगदी दरवाज्यातून बाहेर पडणार तेवढ्यात त्याने हाक मारली. आम्ही एकमेकांना दिसत नव्हतो पण हाक ऐकू आली. मी थांबून वळलो. पण जागीच उभा राहीलो. तो त्याची जागा सोडून उठून धावत आला मला बोलवायला. तो हरला होता. चर्चा पुढे सुरू झाली. त्याचे पहिले वाक्य, 'कायद्याची भाषा करायची झाली तर तुला काहीही मिळणार नाही. आगावू रकमेवर माझा १०० टक्के अधिकार आहे.' मी काही बोललो नाही. पुन्हा उठून उभा राहिलो. दोन हात जोडून नमस्कार केला आणि निघालो. परत त्याने स्वतः उठून मला बसविले. मी त्याला म्हणालो, '५०००/-. हो किंवा नाही.' तो म्हणाला, 'ठीक आहे. देतो उद्या.' मी जिंकलो.
ह्या संपूर्ण वादात देहबोलीचा वापर मी अनेकदा केला आणि त्याची देहबोली सतत वाचत राहिलो. त्यामुळेच त्याच्या धमक्यांना न घाबरता बाजी मारू शकलो.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
22 Oct 2008 - 8:46 pm | लिखाळ
:)
सर्व पवित्रे आपण जाणिवपूर्वक घेतलेत आणि बाजी मारलीत. आपण अनुभवी आणि चाणक्ष गृहस्थ आहात हेच यातून दिसते. तुम्ही फारच छान उदाहरण येथे दिलेत.
देहबोली ही अनुभवातूनच वाचता येते, पुस्तकात वाचून फारसे कळत नाही याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. मिळमिळित हस्तांदोलन करणारे अनेक लोक मी पाहिले आहेत. ते आत्मविश्वास नसलेले असतील असे सुरुवातीला वाटायचे. पण त्यातले अनेक जण हुशार-धडाडिने कामे करणारे निघाले. मिळमिळीत हस्तांदोलन शारिरीक जवळीकीबद्दल अनास्था, ज्याच्याशी हस्तांदोलन करत आहोत त्याच्या स्वारस्य नसणे, अनेकदा स्त्रीया पुरुषांशी ओळख नसताना हलकेच हस्तांदोलन करतात. तसेच घट्ट हस्तांदोलन करणारे जास्त स्वप्नाळू, स्वतःविषयी भ्रम असणारे असे पाहिले आहेत. त्यामुळे अनुभवातूनच योग्य काय ते समजते हे नक्की ! देहबोली 'थंब रुल्स' सारखी वापरता येत नाही. मार्गदर्शक म्हणून वापरत आपले निश्कर्ष काढावेत हेच खरे.
--लिखाळ.
22 Oct 2008 - 9:00 pm | प्रभाकर पेठकर
त्यातले अनेक जण हुशार-धडाडिने कामे करणारे निघाले. मिळमिळीत हस्तांदोलन शारिरीक जवळीकीबद्दल अनास्था, ज्याच्याशी हस्तांदोलन करत आहोत त्याच्या स्वारस्य नसणे, अनेकदा स्त्रीया पुरुषांशी ओळख नसताना हलकेच हस्तांदोलन करतात.
आत्मविश्वासाचा कस पराकोटीच्या विरुद्ध परिस्थितीत लागतो. अनुकूल किंवा समतोल परिस्थितीत अशी माणसे जरूर धडाडीने कामे करतात असे वाटते. हा नियम स्त्री-पुरूष हस्तांदोलनात लागू नसावा.
देहबोली 'थंब रुल्स' सारखी वापरता येत नाही
मान्य आहे. देहबोली समोरच्याला समजण्यासाठी आणि आपल्याकडून नकळत जाणारे संकेत टाळण्यासाठी उपयोगी ठरते. त्याची मदत घेता येते पण त्यावर १०० टक्के अवलंबून राहू नये.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
22 Oct 2008 - 9:59 pm | चतुरंग
चुकीची भूमिका आणि अयोग्य धोरण दडपून नेत केवळ 'बुलिईंग' च्या जोरावर समोरच्याला ठोकरणार्या व्यक्तीचा योग्य पद्धतीने काटा काढलात! अनुभव हाच गुरु हे खरे.
चतुरंग
22 Oct 2008 - 11:50 pm | बिपिन कार्यकर्ते
काका, तुमचं 'नजरेच्या धाकाचं' उदाहरण मस्तच. अहो, ती दहशत तर आंधळ्यालापण दिसेल एवढी प्रखर असते. :)
तुमचा किस्सापण मस्तच. तुम्ही त्या 'मानसिक युद्धात' देहबोलीचा खूपच छान वापर केला.
पण तुम्ही जे काही (तथाकथित) सर्वमान्य आडाख्यांचा वर उल्लेख केला आहे, मला तरी बर्याच वेळा त्याच्या विपरीत अनुभव आलेत. लिखाळगुरुजींशी पूर्ण सहमत. अश्यासाठी की आपण बर्याचदा बर्याचश्या गोष्टींचे जे सामान्यीकरण करतो ते पाश्चात्य चष्म्यातून असतं. (आठवा: काही महिन्यांपूर्वी मुंबईला एक 'असभ्य' शहर म्हणून घोषित केलं होतं. का? तर आपण प्रत्येक गोष्टीत थँक्यू वगैरे म्हणत नाही म्हणून. आता नाही आमच्या कडे उठसूट तोंडदेखलं हसायची आणि खोटं खोटं थँक्यू म्हणायची, काय करता बोला? :) )
पण ज्या काही लकबी त्या त्या स्थानिक प्रभावामुळे येतात त्यांची दखल घ्यावीच लागते. उदाहरणार्थ, चतुरंगनी दिलेल्या जपान्यांचं उदाहरण. आणि देहबोली बद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समोरच्याची देहबोलीबद्दल जी काही अपेक्षा / धारणा आहे त्याप्रमाणे वागणे. एकवेळ आपण थोडी मॅच्युरिटी दाखवू हो त्याचे हावभाव काही चुकले वगैरे तर पण तो तेवढीच परिपक्वता दाखवेलच असे नाही.
बिपिन कार्यकर्ते
23 Oct 2008 - 8:25 am | प्रभाकर पेठकर
पण तुम्ही जे काही (तथाकथित) सर्वमान्य आडाख्यांचा वर उल्लेख केला आहे, मला तरी बर्याच वेळा त्याच्या विपरीत अनुभव आलेत.
शक्य आहे बिपिनराव. वरील सर्व आडाखे माझ्या वाचनात आलेले आहेत. ती थिअरी आहे (तीही १००% विसंबून राहण्यासाठी नाही) प्रॅक्टीकलमध्ये वेगळे अनुभव येऊ शकतात. पण एक अंधूक मार्गदर्शक रेषा म्हणून ही थिअरी मुळात समजून घेतली आणि आपल्या अनुभवांच्या आधारे त्यात बदल घडवून आणले तर प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रात त्याचा उपयोग होतो. प्रत्येक वर्ग समुहाची एक मानसिकता असते तशीच शहरांचीही असते. भारतात, आखाती प्रदेशात, अमेरिकेत जसे मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे अनुभव येऊ शकतात, एकाच घटनेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ शकतात, तसेच एकाच देशात दोन शहरात (जसे पुणे-मुंबई) माणसे वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात.
त्यामुळे 'थंब रूल' नाही, मार्गदर्शक रेषा म्हणावयास हरकत नसावी.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
22 Oct 2008 - 11:09 pm | शशिधर केळकर
बिपिन शेठ
तुम्ही मागे एका अनुभव कथनात एका वाघिणीच्या डोळ्यात हिरवेगार काही पाहिल्याचे म्ह्टले होते. त्यावेळी तुमची देहबोली कशी होती आठवते का? त्या बद्द्ल काही टिप्पणी वाचायला जरूर आवडेल!
मागे robinson crusoe च्या कादम्बरीत एक मजेशीर अनुभव विदित होता. लेखकाने म्ह्टले होते की क्रूसो ला एक दिवस एक बकरा गावला. त्याला त्याने साखळीला अडकवून ठेवले. मात्र सन्ध्याकाळी त्याच्याकडे त्याला पाहावेना अशी त्या बक्र्याची भयानक नजर होती. क्रूसोने घाबरून म्हणे त्याला सोडून दिले. पुढे अनुभवाने त्याला कळले की बक्र्याला दोन दिवस उपाशी ठेवला असता की तो आपोआप शरण आला असता! असो.
(तर मुद्दा काय, की तुमचा लेख तर उत्तमच आहे!) याच विषयाच्या सन्दर्भात प्राण्यान्विषयी ही तुम्हाला जे काही अनुभव आहेत ते ही जरा विशद करावेत!
23 Oct 2008 - 12:08 am | बिपिन कार्यकर्ते
केळकर साहेब, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. त्या चीत्त्याच्या धाग्याच्या एका प्रतिसादात उल्लेख केला आहे मी. त्यावेळी पण आमचा देह बोलला होता. फक्त ते जमलेलं थारोळं त्या चित्रीकरणात आलं नव्हतं. ;)
पण खरंच, तो अनुभव माझ्यासाठी तरी देहातीत होता. काही क्षण आपल्या 'फोटोग्राफिक' स्मृति मधे साठवले जातात त्यातला तो एक क्षण. लै मज्जा झाली होती.
बिपिन कार्यकर्ते