पाऊस, भूमी आणि मैथिली

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
15 Sep 2017 - 1:22 pm

पाऊस, भूमी आणि मैथिली

विस्कळीतपणे मांडले आहे गोड मानून घ्या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

कधीपासून पावसाची झड लागलीये, *हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार*..

पावसाची झड अजूनही चालूच आहे, थोडी वाढल्यासारखी वाटत्ते आहे का ? असेल कदाचित. हि कातर संध्याकाळ या धो धो पडणार्या पावसाने अजूनच कातर भासत आहे. आतून कुठूनतरी गझलेचा आवाज येत आहे पण पावसाच्या जोराबरोबर तो आवाजही कमी जास्त होतोय... मेहंदी हसनचे रंजिश हि सही चालू आहे नीटसे ऐकू नाही येते पण हो तेच चालू आहे, त्यातल्या नाजूक जागा त्या दैवी मेहंदी हसनने अशा काही घेतल्या आहेत कि बास. समोर वाफाळता चहा पण गाण्याच्या नादात थोडा गार झालाय का तो ? असेल असेल कदाचित त्या मेहंदी हसनचा आवाज ऐकून तो सुद्धा शांत झाला असावा.
तू मुझसे खफा है तो, जमाने के लिये आ... वाह मजा आला बेहद्द

गाण ऐकतानाच कसलीतरी आठवण आली धावत गेलो आणि आलमारी मधले ‘भूमी’ काढले ‘परत’. कितव्यांदा वाचतोय हे मी ? छे असा कोण हिशोब ठेवतोय होय वाचण्याचा ? पण या पुस्तकाशी आपले काहीतरी नाते आहे हे नक्की.

चेन्नई जवळच्या छोट्या गावातली ती छोटी मैथिली आणि तिचे भावविश्व. पण भावविश्व तरी कसे म्हणू याला ? सामान्य मैथिलीतले असामान्यपण उलगडण्याचा हा खर तर प्रवास आहे असेच मला वाटत्ते पण हे वाटणे पण नेहमी वेगळे-वेगळे असते साला आपले मन आपल्याला हमखास धोका देते अशावेळी.

‘भूमी’ वाचताना नेहमी आत, खोलवर काहीतरी निसटून जातेय असे वाटत राहते, तरीही का वाचतो मी हे साधे, छोटेसे पुस्तक ? कि ते पुन्हा पुन्हा निसटून जात आहे ते पकडण्यातच मला सुकून वाटतो आहे ? माहित नाही...

हि लहानगी मैथिली कधी मोठी होऊच नये असे वाटते कारण जर ती मोठी झाली तर आपल्यासारखीच निरागसपणा हरवून व्यवहारी बनेल असे वाटत राहते.

मैथिली, तिची नर्स असलेली आई, मैथ्युज अंकल, पुट्टू, सेतुपती यांच्याबरोबर मी जगतोय असेच वाटत राहते इतकी ती पात्रे जिवंत आहेत. असे वाटते कि वेड्यासारखा बॉलच्या मागे समुद्रात जाणारा सेतुपतीचा तो वेडा कुत्रा मीच होतो कि काय ? इतके ते मला रिलेट होते.

निरागस पण तितकीच आपल्या मतावर ठाम असणारी मैथिली तिचे ते अवेळी समंजस होत जाणे, आईच्या मोठ्या आजारपणात तिचे जमेल तसे करणारी लहानगी आणि शूर मैथिली. किती आणि काय बोलावे तिच्याबद्दल ?

साला माझी आणि माझ्या बायकोची एक कॉमन मैत्रीण होती (म्हणजे आहे) ती पण मैथिलीच मग ती पण या मैथिली सारखीच असेल काय ? तिच्याही डोळ्यात न बोलता बरेच काही दिसायचे मला, ती पण अशीच अवेळी ‘मोठी’ झाली होती.
तिचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच शाळेत आहे पण गेल्या ४ वर्षात फ़क़्त एकदाच ती आम्हाला दोघांना भेटली आहे.
का टाळत असेल ती आम्हाला ? दोन-तीनदा विचारायचा प्रयत्न देखील केला फोन वर पण समोरून काहीच प्रतिसाद नाही.

अरे ? अचानक उडत असलेल्या पाण्याने विचारांची तंद्री भंगली, रेडियो वर ‘हूर-हूर असते तीच उरी...’ लागले होते बाहेर पावसाचा जोर जास्तच वाढला आहे, नजर जाताच काळीज हलेल असा अगदी बेभान होऊन कोसळत होता तो.
छे ... कोकणातला पाऊसच असा, इथल्या माणसांसारखा, पूर्ण बरसूनच जातो...

उपेक्षित....
----------------------------------------------
टीप:- खरे तर भूमी आणि मैथिलीविषयी खूप काही भरभरून बोलायचे असते मला नेहमी पण साला शब्दच सापडत नाही कधी असो.

जाता जाता – परवा २ तारखेला जन्मलेल्या कन्येचे नाव मिथिला ठेवले आहे, भूमीचा परीणाम दुसरे काय ?

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Sep 2017 - 11:51 am | प्रचेतस

सुंदर लिहिलंय.
'भूमी' आशा बगेंचं ना?

आणि हो, तुमचे अभिनंदन.

उपेक्षित's picture

16 Sep 2017 - 2:23 pm | उपेक्षित

हो आशाताई बगे यांचेच... कमाल पुस्तक आहे अगदी साधे आहे कुठलाही अभिनिवेश नाहीये पुस्तकात कुणाही सामान्य माणसाला पटकन रिलेट करत हे पुस्तक.

बाकी आधीच्या हॉस्पिटल वार्यांमुळे आपला पुणे कट्टा मिसला याची खंत आहे बघू परत कधी भेटायचा योग येतोय सगळ्यांना.

नीलमोहर's picture

16 Sep 2017 - 1:48 pm | नीलमोहर

भूमी वाचलं तेव्हा मनाला भिडलं होतं, हे लेखनही तसेच पण फार लवकर संपवलेत,
आणि अभिनंदन, मिथिला खूप सुंदर नाव आहे :)

उपेक्षित's picture

16 Sep 2017 - 4:50 pm | उपेक्षित

धन्स ताई,

हे लेखनही तसेच पण फार लवकर संपवलेत>>>>>>>>>>>
लिहिणार्याला अजून काय हवे असते ? हीच तर प्रतिक्रिया हवी असते :)

आपलेच लेखन वर आणायचा एक क्षीण प्रयत्न

कुठे होते हे? कसे मिसले काय की.
मस्त लिहिले आहे.

मिथिला काय म्हणतेय?

उपेक्षित's picture

24 Jul 2019 - 12:59 pm | उपेक्षित

धनस ताई,

मिथिला आता चांगलीच गुंड झालीये, आयुष्यात मुलगी का असावी(च) असे वाटावे इतका लळा पोरगी लावते आणि बाईसाहेब दादा वर डाफरायला लागल्या आहेत आणि दादा पण प्रेमाने सहन करतोय हल्ली :)

यशोधरा's picture

24 Jul 2019 - 2:06 pm | यशोधरा

:)

कंजूस's picture

23 Jul 2019 - 9:24 pm | कंजूस

खफवरच कुणी मैथिली ठाकुर युट्युब लिंक दिलेली. मजेदिर सहज गाते, पेटी वाजवते आठवलं.

सतिश गावडे's picture

24 Jul 2019 - 1:59 pm | सतिश गावडे

लेखाचे शिर्षक वाचल्यावर हेच आठवले.

उपेक्षित's picture

24 Jul 2019 - 6:59 pm | उपेक्षित

काय तोतल लागना इस्कातून सांगता का ?