सदू आणि दादू जानी दोस्त. कळायला लागलं, तेव्हापासून एका ग्लासातले. गावातले लोक तर त्यांना ढवळ्या-पवळ्याच म्हणायचे. सदू सातवीपर्यंत शिकला होता, तर दादूनं पहिलीनंतर शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, एवढाच काय तो दोघांमधला फरक. सदू ग्रामपंचायतीत चिकटला, तर दादू मोलमजुरी करून रात्रीच्या दारूची सोय बघू लागला. घरदार वगैरे काही प्रश्न नव्हता; कारण दारूवर पैसे उडवल्यानंतर हाताशी फार काही राहत नव्हतं. सदूची नोकरी बऱ्यापैकी चालली होती. तो आणि त्याच्या चार भिंती, एवढाच संसार. खरं तर चार भिंतीसुद्धा नाहीत. एक ढासळलीच होती. पुढच्या पावसाळ्यात राहील की नाही, याची खात्री नव्हती.
रोज संध्याकाळी कामं उरकली, की दोघांचं भेटण्याचं ठिकाण म्हणजे हणम्या पावलेचा गुत्ता. दोघांना रोज तिथे स्वर्गप्राप्ती व्हायची. रात्री गुत्ता बंद होईपर्यंत, किंबहुना हणम्यानं लाथा घालून हाकलून देईपर्यंत दोघांची तिथेच ब्रह्मानंदी टाळी लागलेली असायची. घरी विचारायलाही कुणी नव्हतं. तशी दादूची म्हातारी होती घरी; पण ती बिचारी स्वतःपुरती भाकरी करून जे काही असेल, त्याच्याबरोबर खाऊन झोपून जायची. तिला दिसायचंही नाही नीटसं. त्यामुळं दादू घरी कधी येतो, यावर कुणी लक्ष ठेवणार नव्हतं.
एकदा गावात पाइपलाइन योजनेचं मोठं काम निघालं होतं. स्वतः आमदारसाहेब छगनराव जमदाडेंनी त्यात लक्ष घातलं होतं. त्यामुळे गावात आनंदाचं भरतं आलं होतं. तुमच्या घरात, दारात नळ येणार, असं आश्वासन छगनरावांनी दिलं होतं. छगनराव दिल्या शब्दाला जागले. महिनाभरात घराघरांत नळ आले. या गोष्टीलाही आता वर्ष उलटलं होतं. पाण्याचा मात्र अजून पत्ता नव्हता!
दादूची परिस्थिती त्या वेळी वाईट होती. हातात काम नव्हतं. दिवसाची खायची आणि रात्री प्यायची पंचाईत झाली होती. कसेबसे दिवस ढकलत होता. पाइपलाइनच्या कामाचं त्याला कुणीतरी सांगितलं, तेव्हा त्याला हुरूप आला. तालुक्याला जाऊन आमदारसाहेबांना भेट, असं कुणीतरी सुचवलं. त्याला आपला जिगरी दोस्त सदूची आठवण झाली. सदूच्या ओळखीनं, मध्यस्थीनं दादू छगनरावांच्या दरबारात पोचला. तिथं त्यानं आपली कैफियत मांडली. छगनरावांनीही उदार मनानं त्याला काम देण्याचं आश्वासन दिलं. सदू-दादूची जोडी खूष झाली.
दोघं निघायला लागले, तेव्हा छगनरावांच्या दिमतीला असलेला जिल्हा परिषदेचा एक अधिकारी कदम यानं दोघांना अडवलं.
"काय राव, तसंच निघालात? "
"मग? तसंच म्हंजे? " सदूच्या चेहऱ्यावर प्रश्नांची जळमटं पसरली.
"अहो, तसंच जाऊन तुमचं काम होणारंय होय? "
"मग? आमदारसायेब सोता म्हणालेत! " दादूनं मध्ये तोंड घातलं.
"अहो, ते म्हणाले, तरी तसं काम होत नसतं! सदू, तू तर सरकारी हापिसात काम करतोस ना? तुला कळायला पायजे, " कदमनं खुलासा केला.
तेव्हा कुठे सदूच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्याला अशा कामांची कल्पना असली, तरी या कामात सुद्धा ते द्यायला लागेल, याची कल्पना नव्हती. शेवटी हो-नाही करता करता हजार रुपयांवर सौदा ठरला. दोन महिन्यांच्या कामाचे दादूला सहा-सात हजार रुपये मिळणार होते. त्यातले हजार तर इथेच गेले म्हणून त्यानं जरा तोंड वेंगाडलं; पण पर्याय नव्हता. हे हजार रुपये आमदारांच्या नव्हे, तर कदमच्याच खिशात गेल्याचं त्यांना नंतर कळलं. त्या वेळी कुण्या आमदारांच्या कुण्या विरोधकानं या प्रकाराचा बभ्रा केला आणि आमदारांवर आरोप झाले. मग दादूलाच लाचखोरीची तक्रार द्यायला लावून कदमला कामावरून कमी करण्यात आलं.
पेपरमधली एक बातमी वाचून सदूला अचानक या प्रकरणाची आठवण झाली. सरकारी कामात घेण्यात आलेली लाच त्या त्या माणसांना परत मिळणार होती. महिनाभरात ही कारवाई करण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता.
सदूनं उत्साहानं दादूला ही बातमी सांगितली. या लाच प्रकरणापासून दादूचा सरकारी यंत्रणेवर विश्वासच राहिला नव्हता, तरीही सदूनं त्याला पटवलं. आपण सरकारी नोकरीत असल्याचा त्याला विलक्षण अभिमान होता. आपण ही रक्कम परत मिळवून देऊच, अशी खात्री त्यानं दादूला दिली. दादूही त्याच्या आग्रहाला बळी पडला.
सदूला ग्रामपंचायतीचं काही काम होतं. त्यामुळं लाचेचे पैसे परत मिळवण्यासाठी दादूलाच तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत होत्या. दोन-चार चकरा झाल्यावर तो वैतागून गेला. त्याची गावातली मजुरीही बुडत होती आणि हेलपाट्यांतून हाती काही लागत नव्हतं. शेवटी दादूनं सदूच्याच गळ्यात हे काम घातलं. पुढच्या आठवड्यात सदू तालुक्याला जाऊन आला, तो येताना पैसे घेऊनच.
रात्री ठरलेल्या ठिकाणी- अर्थात गुत्त्यावर भेटल्यानंतर दादूला अगदी भरून आलं होतं. लाच हजार रुपयांची दिली, पण सातशेच रुपये परत मिळाले होते, तरी पैसे मिळाले यावरच तो खूष होता. आपल्याला जे काम अनेक खेपांत जमलं नाही, ते सदूनं एकाच दमात कसं काय केलं, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्यानं सदूला खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला; पण सदू फार काही बोलत नव्हता. आपण काम गळ्यात घातल्यामुळे सदू रागावला की काय, असं दादूला वाटलं; पण तसं काही नव्हतं.
"अरे गड्या, झालंय तरी काय तुला? हे अवघड काम एका दमात केलंस तरी कसं ते सांग! " दादूनं शेवटी न राहवून विचारलं.
"अरे काय सांगायचं? सरकारी नोकरीवर जो इस्वास होता, तोच उडालाय लेका! "
"का? काय झालं? "
"अरे काय होनारंय? तुला तीनशे रुपये कमी का मिळाले समजलं नाही का गड्या? "
"नाही...! " दादूच्या डोक्यात काही शिरत नव्हतं.
"लाच म्हणून दिलेले हजार रुपये परत देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच घेतली हरामखोरांनी! " सदू वैतागल्या स्वरात म्हणाला.
दादूनं कपाळावर हात मारून घेतला...
प्रतिक्रिया
20 Oct 2008 - 3:11 pm | घाशीराम कोतवाल १.२
१०० में ८० बेईमान फिर भी मेरा भारत महान
मी आता तसा कोतवाल नाही बरं?