नवजात मुलाबद्दलच्या आईच्या अपेक्षा.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
17 Oct 2008 - 10:18 pm

आज नंदा पेठे आणि तिची मैत्रीण कविता भिडे दोघी तळ्यावर फिरायला आलेल्या दिसल्या.मला पाहिल्यावर नंदा म्हणाली की,
" भाऊसाहेबांना आज बरं नसल्याने ते येऊ शकणार नाहित."
तसा त्यानी तिच्या जवळ मला निरोप दिला होता.
नंदा ही प्रो.देसायांची मधली मुलगी.कविता एका कम्युनीकेशन सेंटरवर काम करते.माझी तिच्याशी ओळख करून दिल्यावर नंदा मला म्हणाली,
"कविताला एक लहान मुलगा आहे.ती त्याला आपल्या सासूकडे ठेऊन आली आहे.सहज पाय मोकळे करायला आम्ही तळ्यावर आलो.तुमच्या विषयी हिला भाऊसाहेब नेहमीच सांगत असतात.प्रत्यक्षच तुम्ही दिसला तेव्हा मी तिला म्हणाले मी तुमची ओळख करून देते."

मी नंदाला म्हणालो,
" तुम्ही दोघं तावातावाने काही तरी बोलत होता हे मी पाहिलं.असा कोणता विषय चालला होता?"
नंदा म्हणाली,
"जनरल विषय चालला होता.जन्माला येणार्‍या मुलाला कोणत्या मुलभूत गुणवत्ता असाव्या ह्या विषयावर तिच्या पहिल्या मुलाच्या वेळी तिच्या नवर्‍याबरोबर चर्चा झाली होती त्याची थोडक्यात ती माहिती देत होती."
हे ऐकून मी कविताला म्हणालो,
"वा! छानच विषय आहे.मला पण त्यातलं थोडं फार समजलं तर बरं वाटेल"
कविता नंदाकडे हंसत हंसत बघायला लागली.नंदाच्या चेहर्‍यावरून तिला दिसलं की ती तिला सांग म्हणून सांगत होती.तिने सुरवातच केली,

"तुम्ही जेव्हा दुसर्‍याची कदर करता,तेव्हा प्रेम कसं करावं हे जास्त कळतं.आणि प्रेम कसं करून घ्यावं हे पण कळतं"
"मी जेव्हा पहिल्यांदा गरोदर होते,तेव्हा बाथरूम आणि स्वयंपाकघरातल्या फ्रिजकडे आकस्मिक होणारी माझी धांवपळ, ह्यांच्या मधल्या क्षणात मी ही कसली "व्यक्ति" ह्या जगात आणीत आहे ह्याचं चिंतन करण्यासाठी थोडी उसंत घेऊन बसत असे.

"जर का व्यक्तिमत्वाच्या विशेषताची फोड करायची ठरवली तर तीन गुणवत्तेचा विचार करावा लागेल."
मी माझ्या पतिला म्हणाले,
"तर त्या कोणकोणत्या गुणवत्ता होतील? "
मी मनात म्हणाले जर का मला त्या तीन गुणवत्ता सांगता आल्या तर त्याचं तादात्म्य स्थापित करायचं झाल्यास माझा ज्याच्यावर जास्त दृढविश्वास आहे अशी ती तीन मुल्य असावीत. फक्त तीनच कारण मला वाटतं तेव्हड्या तीन जरी मिळवू शकले तरी नशिब समजायला हवं.कारण "येणार्‍यावर" आपलं अगदी मर्यादीत नियंत्रण असतं.

"सत्यनिष्ठा" ही एक गुणवत्ता असं माझे पति न कचरता मला म्हणाले.माझ्या यादीत ही गोष्ट पहिल्या नंबरावर होती. मला वाटतं जी व्यक्ति सत्यनिष्ठा ठेवून असते ती शक्यतो कसलाही प्रसंग ओढवून घेत नाही.आणि असं प्रामाणिक वृत्ती ठेवून असल्यावर कुठलाही कठीण मार्ग घ्यायला कुचराई होत नाही आणि त्यामुळे आपण आपली उर्जितावस्था करून घेण्याचा मार्ग पत्करतो.आपण प्रामाणिक असल्यावर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. आणि तत्क्षणी आपण ही आपल्यावर विश्वास ठेवतो.आणि असं झाल्यावर मला वाटतं उरलेल्या दोन गुणवत्ते करता पायाभरणी झाली आहे असं समजारला हरकत नाही.

थोडा उश्वास टाकून मी म्हणाले दुसरी गुणवत्ता म्हणजे,
"दुसर्‍याची कदर करणं"
फक्त सत्यनिष्ठा कधी थोडी कटू असू शकते. परंतु,अशी व्यक्ति ज्यावेळी दुसर्‍याची कदर करते त्यावेळी हे संमिश्रण त्या व्यक्तिला प्रभावी करू शकतं.जेव्हा तुम्ही दुसर्‍याची कदर करू लागता तेव्हा-आशापूर्वक- तुम्ही कसलाही प्रसंग अंगावर ओढून घेण्याऐवजी एक चांगले नागरीक बनण्याकडे तुमचा कल असतो. मित्रत्व अंगिकारू शकता,आणि तुम्ही हलक्यावृत्तीचे दिसत नाहीत.दुसर्‍याची कदर केल्यावर ते आपली कदर करतात आणि तत्काळ आपण आपलीही कदर करायला लागतो.

हो! आणि हे विसरले,
"तुम्ही जेव्हा दुसर्‍याची कदर करता,तेव्हा प्रेम कसं करावं हे जास्त कळतं.आणि प्रेम कसं करून घ्यावं हे पण कळतं" आणि आता तिसरी गुणवत्ता.ह्याचा विचार करायला थोडं कठीण गेलं.कारण त्या मुलात सत्यनिष्टा आणि दुसर्‍याची कदर करणं असावंच परंतु, आणखी काय असावं ह्याचा लोभ वाढत चालला. आम्ही जास्त लोभी होऊन विचार करायला लागलो. मुळातच मुल असण्याचा लोभ,आणि नंतर ते सुदृढ असावं,आणि ते सत्यनिष्ठ आणि कदर करणार असावं हे जणू यथैष्ट नव्हतं. एक मोठाली गुणवत्तेची यादी आमच्या सम्मतिची जणू प्रतिस्पर्धा करित होती.जशी,
मेहनती,सहासी,सृजनशिल,बुद्धिमान,दयाशील,आनंदीत वगैरे,वगैरे गुण मनात येवू लागले परंतु,जादा करून ह्या गुणवत्ता आमच्या पहिल्या दोन गुणवत्ते इतक्या काहीश्या मूलभूत वाटत नव्हत्या.

ह्या सर्व विचाराच्या ओघात आम्ही दोघं पतीपत्नी इतकी भरकटत गेलो की त्या नंतर मला आठवलं की हे सगळं आपलं विश-फूल-थिंकींग झालं असं वाटायला लागलं.कारण आपण विचार करतो तसं झालं नाही तर?आणि आम्ही मानतो त्या मुलभूत गुणवत्ता मुलात नाही आल्या तर? असं मी माझ्या नवर्‍याला म्हणाली.

नंतर मला माझ्या आजीची आठवण येऊन एक किस्सा डोक्यात आला. माझी आजी माझ्या वडीलांना सांगायची,आणि वडील मला सांगायचे की,
"स्वतःचं स्वतः हंसं करून घ्यायला तयार असावं."
मला वाटतं आपण आपलं हसं करून घ्यायला लागलो की आपण स्वतःवर प्रेम करू लागतो.त्यामुळे आपण कुणापेक्षा वरचढ ही नाही आणि कमकूवत पण नाही असं वाटू लागतं. त्यामुळे आयुष्यात आनंदी आनंद मिळतो.आणि मुख्यत्वेकरून जर का आपण नेहमीच प्रामाणिक राहू शकलो नाही किंवा नेहमीच कदर करू शकलो नाही तरी कमीत कमी आपण आपल्याला माफ करू शकतो.

आणि शेवटी आम्ही असा विचार केला की सत्यनिष्टा आणि कदर करण्याची वृत्ति एखाद्दात नसली आणि एखादा प्रसंग ओढवून घेण्याचा मुर्खपणा जरी झाला तरी निदान झालेल्या त्या मुर्खपणाकडे पाहून स्वतःचं हंसं करून घेऊन स्वतःला माफ करू शकतो."

हे सगळं ऐकून झाल्यावर मी कविताला म्हणालो,
"तुमची अलीकडची जनरेशन किती खोलात जाऊन विचार करते.पूर्वी पसाभर मुलं व्हायची त्यामुळे म्हणा किंवा तेव्हडा विचार करायची ट्रिगर मिळत नसावी म्हणा एव्हडं खोलात कोण जात नसावं.त्यामुळे प्रसंग एव्हडे यायचे की मुर्खपणा केव्हा झाला ह्याची समजच नसायची."
असं म्हणून आम्ही सर्व खो खो हंसलो.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख