अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
28 Aug 2017 - 10:17 pm

अशक्य (कथा) (काल्पनीक) - भाग १

तपंजय शिक्षण संस्थेची इमारत नेहमी प्रमाणेच गजबजलेली होती . इमारतीसमोरच्या पटांगणात मधल्या सुट्टीमधे विद्यार्थ्यांचा खेळ , दंगा चालु होता . या सगळ्या धामधुमीतही संस्थेचे प्राचार्य , प्राध्यापक नीलकंठ हे आपल्या ऑफीसमधे बसुन कुठल्यातरी महत्वाच्या विषयावरील लेख लक्षपुर्वक वाचत होते .

"सर , आत येउ का ? " या प्रश्नाने प्रा. नीलकंठ यांची समाधी भंग झाली . त्यांनी समोर पाहिले . एक शिक्षक ऑफीसच्या दारापाशी उभे राहुन विचारत होते . त्यांनी आपल्या बरोबर एका विद्यार्थ्याला जवळ जवळ जबरदस्तीने हाताला पकडुन आणले होते . त्या मुलाचा हात काळानीळा पडला होता . मुलाच्या डोळ्यात पाणी आले होते . तरीही तो मुलगा ओठ घट्ट मिटुन शांतपणे उभा होता .

"यस , प्लीज कम इन . बोला सर काय झालं ?" प्रा. नीलकंठ यांनी त्या शिक्षकांना आत बोलावुन विचारलं . शिक्षक त्या मुलाला फरफटत आत घेउन झाले . त्या मुलाकडे रागारागाने बघत ते शिक्षक सांगु लागले .

"सर , हा महिना संपत आला . पण या मुलानं अजुनही या महिन्याची फी भरली नाही . हा नेहमीच फी भरायला उशीर करतो . आज तर यानं वर्गातील इतर मुलांशी मारामारीही केली . म्हणुन शेवटी आज मी याला तुमच्याकडे घेउन आलो आहे . आता तुम्हीच याच्याबाबतीत काय तो निर्णय घ्या आणी याला शिक्षा करा ."

"ठीक आहे . मी बघतो याचं काय करायचं ते . तुम्ही जाउ शकता . " प्रा. नीलकंठ शांतपणे म्हणाले . त्या मुलाकडे तावातावाने बघत ते शिक्षक निघुन गेले .

"काय रे , हे सर म्हणाले ते खरं आहे का ? तु अजुन फी का भरली नाहीस ? आणी आज वर्गात मारामारी का केलीस ? तुम्ही इथं शिकायला येता की भांडणं करायला ?"

प्रा. नीलकंठ यांनी त्या मुलाला चढ्या आवाजात विचारले . इतका वेळ शांत असलेला तो मुलगा आता मात्र मुसमुसत सांगु लागला .

"सर , मला घरचं कुणीही नाही . मी एका अनाथ वसतीगृहात राहतो . मी रोज सकाळ संध्याकाळ पेपर टाकणे , ऑफीसबॉय अशी कामे करुन पैसे मिळवतो . माझे मालक मला कधीच वेळेवर पगार देत नाहीत . यावेळीही , त्यांनी पगार द्यायला खुप उशीर केला . त्यामुळे मी नाईलाजाने अजुनही या महिन्याची फी देउ शकलो नाही . मला आज वर्गातल्या काही मुलांनी पैशांवरुन चिडवले . तेव्हा मलाही राग आला आणी मी त्यांना दोन ठेवुन दिल्या . "

हे ऐकुन प्रा. नीलकंठ थोडा वेळ विचारांत पडले . थोडा विचार करुन ते त्या मुलाला म्हणाले .

"हे बघ . तुला जसे शक्य होईल तशी तु फी भरत जा . मी तुझ्या शिक्षकांशी याबाबत बोलतो . तुला कधी काही पैशांची अडचण असली तर तु मला सांगत जा . आपण काहीतरी व्यवस्था करु . ठिक आहे . तु आता जाउ शकतोस . आणी यापुढे आपल्या वर्गातल्या मित्रांशी कधी भांडु नकोस . "

आपल्याला काहितरी कडक शिक्षा होणार अशी मनाची तयारी झालेला तो मुलगा प्रा. नीलकंठ यांचे बोलणे ऐकुन चकीतच झाला . आपले रडणे विसरुन तो परत नव्या उमेदीने वर्गाकडे जाउ लागला .

---------------------------------------

काही वर्षांनंतर -----

शहरातला तो अत्यंत महत्वाचा मुख्य रस्ता नेहमीप्रमाणेच वर्दळीने भरलेला होता . अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय उद्योगसंस्थांची प्रमुख कार्यालये त्या रस्त्यावर होती . या संस्थांच्या बहुमजली गगनचुंबी इमारती भव्यतेच्या बाबतीत जणु एकमेकांशी स्पर्धा करत होत्या .

या सर्व इमारतींमधे ठळकपणे उठुन दिसत होती ती भागीरथ उद्योगसमुहाची भव्य इमारत . अलिकडेच काहि वर्षांमधे भागीरथ उद्योगसमुहाने अनेक क्षेत्रांमधे आपला चांगलाच जम बसवला होता . बांधकाम , इंपोर्ट एक्स्पोर्ट , हॉस्पिटॅलिटी , टेक्सटाईल्स , माहिती तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमधे भागीरथ उद्योगसमुहाचे नाव गाजत होते . काहि वर्षांपुर्वी भागीरथ उद्योगसमुहाचे प्रमुख जगजीत भागीरथ यांचे आजारपणाने निधन झाल्यावर त्यांची मुलगी आदिती भागीरथ हिने कंपनीची सुत्रे आपल्या हातात घेतली होती . तिच्या कुशल नेतृत्वाखाली भागीरथ उद्योगसमुहाने थोड्याच कालावधीत मोठी प्रगती केली होती .

दुपारची वेळ होती . त्या वर्दळीच्या रस्त्यावर भागीरथ उद्योगसमुहाच्या इमारतीसमोर एक टॅक्सी येउन थांबली . एक वृद्ध गृहस्थ टॅक्सीमधुन सावकाशपणे उतरले . दुपारच्या उन्हाचा त्रास होउ नये म्हणुन त्यांनी कपाळावर आडवा हात ठेवला . कपाळावर आडवा हात तसाच ठेवुन ते भागीरथ उद्योगसमुहाच्या भव्य इमारतीकडे भारावुन पाहु लागले . आपल्या एके काळच्या विद्यार्थीनीचे यश आणी कर्तबगारी पाहुन नकळतपणे त्यांच्या डोळ्यांमधे अभिमान झळकु लागला . सावकाश चालत ते त्या इमारतीमधे शिरले .

"यस सर . हाउ कॅन आय हेल्प यु ? " आत शिरताच त्यांना रीसेप्शनपाशी विचारण्यात आले .

"मी प्राध्यापक नीलकंठ . मला आदिती भागीरथ यांना भेटण्याची तीन वाजताची अपॉइंटमेंट मिळाली आहे . " प्राध्यापक नीलकंठ यांनी सांगीतले .

"ठिक आहे सर . तुम्ही जाउ शकता . इथुन लिफ्ट्ने २० व्या मजल्यावर जाउन तिथल्या मीटींगरुममधे थांबा . " प्रा. नीलकंठ यांना सांगण्यात आले .

२० व्या मजल्यावरील मीटींगरुममधे बसुन प्रा. नीलकंठ हे आदिती भागीरथ यांची वाट पाहु लागले . आज खुप वर्षांनंतर ते आपल्या एका हुशार माजी विद्यार्थीनीला भेटणार होते . आजपर्यंत दोघेही आपापल्या कामामधे व्यस्त असल्याने इच्छा असुनही त्यांच्या फारशा भेटी झाल्या नव्हत्या .

तेवढ्यात मीटींगरुमचा दरवाजा उघडुन एका उग्र दिसत असलेल्या माणसाने आत प्रवेश केला . त्याच्या हातामधे एक पेन आणी एक डायरी होती . पेन आणी डायरी सरसावुन किंचीत हसत त्याने प्रा. नीलकंठ यांना आपली ओळख करुन दिली .

"नमस्कार . माझं नाव धनसुख . मी आदिती मॅडमचा पी.ए. आहे . तुमची थोड्याच वेळात मॅडमबरोबर अपॉइंटमेंट आहे . म्हणुन त्यापुर्वी मला थोडी माहिती द्या की , तुमचं आदिती मॅडम यांच्याकडे काय काम आहे . म्हणजे त्याप्रमाणे मी मॅडमना तुम्हाला भेटण्यापुर्वी ब्रीफींग करु शकेन . "

थोडा विचार करुन प्रा. नीलकंठ त्याला आपल्या भेटीचा उद्देश सांगु लागले .

"मी प्राध्यापक नीलकंठ . शहरातील तपंजय या शिक्षण संस्थेचा मी प्राचार्य आणी संचालक सदस्य आहे . काही वर्षांपुर्वी संस्थेच्या नवीन बांधकामानिमित्त आम्ही शहरातील काही खाजगी वित्तसंस्थांकडुन कर्ज घेतले होते . या वित्तसंस्था आता लवकर कर्ज फेड करावी म्हणुन आमच्यावर दबाव आणत आहेत . या पाठीमागे शहरातील जयपाल या प्रख्यात बिल्डरचा हात आहे . कारण त्याचा तपंजय या शिक्षण संस्थेच्या जागेवर डोळा आहे . संचालक मंडळातील काही सदस्यांनाही त्याने पैसे चारुन आपल्या बाजुने केले आहे . यामुळे तपंजय शिक्षण संस्था सध्या खुप अडचणीत आली आहे . "

प्रा. नीलकंठ यांचे बोलणे मधेच थांबवत धनसुख म्हणाला .

"माफ करा . पण हा तर तुमची शिक्षण संस्था आणी जयपाल बिल्डर यांच्यामधला प्रश्न आहे . यामधे आदिती मॅडम काय करु शकतात ? "

" तपंजय या शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थीनी म्हणुन जर आदिती भागीरथ यांनी ..." प्रा. नीलकंठ बोलत असताना परत त्यांना थांबवत धनसुख म्हणाला .

"हे बघा . तुम्ही तुमचा , माझा , आदिती मॅडम आणी या भगीरथ ग्रुपचा वेळ वाया घालवत आहात . आम्ही याबाबतीत काही करु शकत नाही . हे लक्षात घेउन , आदिती मॅडमचा पी.ए. या अधिकारात मी तुम्हाला हि अपॉइंटमेंट नाकारत आहे . तुम्ही जाउ शकता . सिक्युरिटी ..."

धनसुखने बोलावताच दोन सुजलेल्या अंगाचे आणी माजलेल्या तोंडाचे सिक्युरिटी गार्ड तिथे आले . धनसुखने त्यांना फर्मावले .

"तुम्ही या साहेबांना लक्षपुर्वक जिन्यावरुन खाली घेउन जा . आणी जर यांनी काही गडबड केलीच तर ..तुम्हाला हवे ते करा . "

त्या गार्डसच्या राकट हातांची पकड प्रा. नीलकंठ यांच्या खांद्यांवर पडली . प्रा. नीलकंठ थोडे कळवळले . पण त्याची फिकीर न करता दोनही गार्डसनी त्यांना ढकलतच जिन्यावरुन खाली नेले . त्यांना तशाच थकलेल्या अवस्थेत गेटच्या बाहेर सोडुन दिले .

२० व्या मजल्यावरुन हा सर्व प्रकार बघत असलेल्या धनसुखच्या तोंडावर आता कावेबाजपणा झळकत होता . त्याने मोबाईलवर एक नंबर फिरवला आणी तो बोलु लागला .

"हां जयपालसाब , मी धनसुख बोलतोय . तो म्हातारा आत्ता इथे आला होता आदिती मॅडमना भेटायला . पण मी ती भेट होउ दिली नाही . त्याला तसेच हाकलुन दिले . तुमचे काम झाले आहे . आता ठरल्याप्रमाणे माझी बक्षिसी आजच्या आज पोचली पाहिजे . "

गेटमधुन बाहेर पडलेल्या प्रा. नीलकंठ यांची तब्येत खुपच खराब झाली होती . झालेला अपमान , दमणुक आणी त्यातच दुपारच्या कडक उन्हाच्या झळा यामुळे त्यांना भोवळ येत होती . अचानक त्यांचा मोबाईल वाजु लागला . तो नंबर त्यांच्या चांगल्याच ओळखीचा होता . मोबाईल हातात घेउन कसेबसे क्षीण आवाजात त्यांनी "हॅलो" असे उच्चारले . पलिकडुन कोणीतरी तरुण काळजीच्या आवाजात विचारत होता .

"सर तुम्ही कुठे आहात ? माझ्यासाठी थांबला का नाहित ? असे कसे मला न सांगता गेलात ? "

प्रा. नीलकंठ त्याला उत्तर देणार , तेवढ्यात त्यांच्या छातीत असह्य कळ आली . वेदना सहन न होउन ते तसेच रस्त्यावर कोसळले . त्यांचा हातातला मोबाईल बाजुला फेकला गेला . पलिकडुन तो तरुण परत काळजीच्या आवाजात विचारत होता .

"सर तुम्ही कुठे आहात ? मला सांगा . मी तुम्हाला न्यायला येतो . "

----------------------------- भाग १ समाप्त --------------------------------------- काल्पनीक ---------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

28 Aug 2017 - 11:56 pm | ज्योति अळवणी

चांगली सुरवात. पण थोडी predictable वाटते आहे. पुढचा भाग लवकर टाका