फ्यूज -२

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
24 Aug 2017 - 1:26 am

फ्यूज १
-------------

सकाळ झालेली असते. सुर्य उगवलेला असतो. नदी वाहत असते. मग मी त्यात आंघोळ करून घेतो. मला चांगलं वाटतं. मग मी आंडरवेअर पिळून घेतो. मग घरी जाऊन तारेवर टाकतो.
मग चौक असतो. चौकात लोकं आसतात. गाड्या रिक्षा टेम्पो भरपूर प्रमाणात पळत आसतात. मी गणपतीच्या देवळात जाऊन तिथला भात खातो. मला चांगलं वाटतं.
मग दुपार झालेली असते. ऊन पडलेलं असतं. चौथऱ्यावर सावली असते. सावलीत झोप चांगली येते. माणसाने कायम सावलीत झोपावे.
मग त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होत असते. संध्याकाळी माणसं सावलीतून उठून आपल्या आपल्या घरी जातात. कोणी मागे थांबतात. कोणी कामधंदा बघतात. कोणी परत येऊन तिथेच झोपतात.

थोडी रात्र झाल्यावर मी चित्रपट बघायला गेलो. 'रत्ना' नावाचे चित्रपटगृह इथे खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यात बाल्कनी सुद्धा आहे. आठ रूपयाचं तिकीट घेतल्यावरंच ते आत सोडतात.
चित्रपट खूप सुंदर होता. केरळचं निसर्गसौंदर्य त्यात होतं. अभिनेत्री थोडीशी जाडी होती. कोयते घेतलेली माणसं त्यात भरपूर होती.
"निव्वळ बंडल पिच्चर. येकबी शॉट नाय" बबन मला मला गुरकावत म्हणाला. बबनचं बरोबर होतं. इछ्छीबाबा पोस्टर बाहेर लावून आतमध्ये कामाचं काहीच नव्हतं. प्रेक्षकही वैतागले होते. "झौनीच्या आमचं पैशं परत दी" असं काही रसिकांनी म्हटल्यावर रिळ बदलला गेला. मग केरळच्या सिनेमात दहा मिनिटाकरता का होईना अमेरिकेच्या अभिनेत्रींनी येऊन डोळ्यांचे पारणे फेडले. पण पुन्हा कोयते घेतलेली माणसे जिकडे तिकडे दिसू लागली.

मग माझं आणि बबनचं ठरलं. आणि आम्ही त्या चित्रपटगृहातून बाहेर आलो. असं मधूनपण ते सोडतात. पण आत जाऊ देत नाहीत.
बबन मला म्हणाला, "तू थेटराम्हागं थांब. मी आलोच"
मग मी त्याच्या भाषेत 'थेटराम्हागं' गेलो. तिथे भरपूर अंधार होता. काही दिसतही नव्हतं. मला व्यसन नसलं तरी केवळ छंद म्हणून मी बीडी नावाचा प्रकार ओढतो. अद्भुत असतो. माचीस सारखे जवळ ठेवावे लागते. जे की ठेवलेच पाहिजे.

थोड्या वेळाने बबन तिथे एका बाईला घेऊन आला. ती खूप सुंदर होती. तिच्याकडे बघतच मी बीडी विझवली.

***
दिवस रिकामाच असतो. रिकामी तर मनंसुद्धा असतात. खोली रिकामी असून उपयोग नाही. माणूस रिकामा पाहिजे. असं रिकामं रिकामं असताना मला खूप चांगलं वाटतं.

सकाळ झालेली असते. सुर्य उगवलेला असतो. दारात स्कूटर थांबलेली असते. फारूक नावाच इसम माझ्या खोलीवर आलेला असतो.
"पण बबन्या गेला कुठं?" हा एकच प्रश्न त्याने चौथ्यांदा विचारलेला असतो.
"दोन दिवस झालं. साल्याचा पत्त्या नाही." असेही म्हणून तो डोके खाजवत असतो.

शेवटी त्या माणसाने ओढतंच बाहेर आणून मला त्या स्कूटरवर बसविले. स्कूटर तशी चांगली होती. थोडा खर्च केला तर हादरेही कमी बसतील. आम्ही हायवेला आलो तेव्हा तिथे एक ट्रकसुद्धा उलटा पडलेला दिसला.
"रूक्सानाला पळवली का त्यानं?" फारूक भरपूर प्रश्न विचारत होता. प्रश्न विचारनं काही वाईट नाही. वाईट असतात ती उत्तरं.

आम्ही या गल्लीतून त्या गल्लीत नुसते भटकत होतो. बबन्याचं घर आम्हांला काही केल्या सापडेचना. "खरंच म्हायीत नाही बबन्याचं घर तुला. च्युत्या बनवतो का मला?" फारूकच्या तोंडी असे शब्द खरेतर शोभत नाहीत.

शेवटी रत्ना चित्रपटगृहाच्या जवळ स्कूटर थांबली. तिथे एक पानपट्टीवाला होता.त्याची दाढी पांढरीशुभ्र होती. डोक्यावर दाढीच्याच रंगाची टोपी होती. हा एवढा उजळ चेहऱ्याचा माणूस पानपट्टीवाला झाला. असतं एकेकाचं नशीब.
"च्याच्या, बबन्या का घर किधर है मालूम क्या?"
त्या बिच्याऱ्याला ऐकायला बहुदा कमी येत असावे. कारण फारूक उतरून त्याच्याकडे चौकशीला गेला. बरीच चर्चा झाली. तो शुभ्र दाढीवाला एकाकी "या खुदा, रूक्साना लापता है. दो दिनसे?"असे कुरबुरायला लागला. मग माझ्याकडे बघून "यहीच लौढा था बबन्या के साथ उस दिन" म्हणत झेपावत आला. "बोल साले किधर है रूक्साना?" म्हणत माझ्या शर्टाची कॉलर पकडून मला दोन वेळा उचलून जमीनीवर आपटले. एवढ्या उजळ चेहऱ्याचा माणूस किती निर्दयी निघाला.
"ऐसे नही बतायेगा, स्टेशन लेके चल इसको. गाडी चालू कर" म्हणत मला स्कूटरवर बसवून आम्ही टिबलशीट पोलीस स्टेशनकडे निघालो.

दुपार झालेली असते. ऊन पडलेलं असतं. माझ्या नाकातून रक्त येत असतं. नदीच्या पलिकडे पोलिस स्टेशन आहे. पुल ओलांडला की लगेच फर्लांगभर दाट हिरवळ आहे. हिरवळ बघितली आणि मला चांगलं वाटलं.

***

दाट धुकं पडावं तशी रात्र आहे. ही रात्र किती सुंदर आहे. खोलीच्या मागे स्कूटर आहे. मी लाकडं टाकून तिला लपवली आहे. खरतंर आता मला झोप येते आहे. पण मी उगाचच जागणार आहे. ही रात्र किती सुंदर आहे.

रात्री माझे दार टकटक वाजत असते. मी उठून दार उघडत असतो. बघतो तर काय समोर माझा मित्र बबन उभा होता. "मॅटर झाला" अशी चिंता प्रकट करून तो आत आला. आणि बघतो तर काय त्याच्या मागोमाग रूक्सानाही आत आली. "छिनाल हू. छिनाल ही रहूंगी" असे ती पुटपुटली. तो तिचा राग असावा. मग मी दरवाजा लावून घेतला.

"आपल्या गावात मर्डर झाला. आपल्या गावात?" बबन आश्चर्याने म्हणाला. त्याला आपल्याच गावात का मर्डर झाला असे म्हणायचे असावे. दुसऱ्या गावात का नाही? शेवटी कुठेही झाला तरी तो मर्डरच असतो.
"खरंच की काय? कुणाचा रं" मीही तेवढ्यात आश्चर्याने म्हणालो.
"अरे फारूक्या हिचा च्याच्या. आन तो हमीदभय. साला डबल मर्डर" एव्हाना रूक्साना माझ्या खाटेवर चादर पांघरून झोपायच्या तयारीत होती.
मी म्हणालो, "हे काय?"
"अरे आसू दे. हिच्या कोठ्यावर पोलिस बंदोबस्त हाय. सगळ्या रांडा आत टाकल्यात. हिलाबी टाकतील."
बबन आपला मित्र आहे म्हणून. तो म्हणाला. आपण त्याचा शब्द पाळणार.

त्या रात्री बबन रेल्वेने मुंबईला निघून गेला. स्टेशनवर सोडायला गेलो होतो त्याला. पोलिसांना तो फार घाबरतो. आपणही मुंबईला कधी ना कधी गेलं पाहिजे. एखादा दिवस तरी तिथे रिकामा रिकामा घालवला पाहिजे. रिकामी तर मनंसुद्धा असतात. नुसतीच खोली रिकामी असून चालत नाही. खोलीत रूक्साना असेल तर तिला रिकामं म्हणता येणार नाही. आज आहे उद्या नाही. दाट धुकं पडावं तशी ही रात्र आहे. ही रात्र किती सुंदर आहे.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

24 Aug 2017 - 5:49 am | प्रमोद देर्देकर

हा हा खास जवेरगंज टच कथा. आवडली.

लिहा अजुन , आमी रिकामी आहोत की वाचायला.

एस's picture

24 Aug 2017 - 6:07 am | एस

गुड गुड गुड!

प्रचेतस's picture

24 Aug 2017 - 6:48 am | प्रचेतस

भन्नाट एकदम.

भित्रा ससा's picture

24 Aug 2017 - 12:18 pm | भित्रा ससा

लागणं झालाय

पुंबा's picture

24 Aug 2017 - 12:43 pm | पुंबा

जबरदस्त...
नवाजूद्दीन सिद्दिकी डोळ्यासमोर उभा राहिला कथानायक म्हणून.

वरुण मोहिते's picture

24 Aug 2017 - 12:58 pm | वरुण मोहिते

भाग दुसरा ठरवलेला का :))
जमलीये मस्त विथ स्पेशल टच

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2017 - 2:01 pm | अमरेंद्र बाहुबली

मला "कोसला" वाचतं असल्याचा भासं झाला.

Ranapratap's picture

24 Aug 2017 - 6:14 pm | Ranapratap

झकास

एमी's picture

24 Aug 2017 - 6:20 pm | एमी

मस्त!!

एमी's picture

24 Aug 2017 - 6:21 pm | एमी

लय भारी!

गामा पैलवान's picture

24 Aug 2017 - 7:19 pm | गामा पैलवान

कथा मस्तंच आहे पण डोक्यावरनं गेली. कोणी उलगडून सांगेल काय! बबन्या मर्डरर आहे ते उघड आहे. पण कसा काय ते ज्याम घुसलं नाय डोसक्यात.

-गा.पै.

संजय पाटिल's picture

24 Aug 2017 - 10:21 pm | संजय पाटिल

आ. न. र्‍हायलं काय?

गामा पैलवान's picture

25 Aug 2017 - 1:25 am | गामा पैलवान

संजय पाटिल,

एखाद्यास उद्देशून प्रतिसाद असेल तर आ.न. लिहितो. अन्यथा नाही.

आ.न.,
-गा.पै.

चष्मेबद्दूर's picture

24 Aug 2017 - 10:19 pm | चष्मेबद्दूर

खूप दिवसांनी कथा पूर्ण वाचली. छान जमलीये. अजून लिहा.