अण्णा,आबा,दादा,कमाआते आणि आप्पा ह्या पांच भावंडांची एक गुप्त भाषा होती.लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक "चकारी" भाषा आहे.ही चकारी भाषा बहुतेक सर्वांना माहित असावी.
उदा.
तुला माहीत आहे का?
हे वरील "चकारी"भाषेत म्हटलं जाणार
"चलातू चहीतमा चहेआ चका?"
मला तू सांगू नकोस
"चलाम चतू चंगूसा चकोसन"
काल त्याच्या आईला पाहिलं
"चलका चच्यात्या चईलाआ चहिलंपा"
अशाच प्रकारची पण थोडी वेगळी भाषा होती.आणि ही भाषा त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल- नानांना- कळू नये आणि आप आपसात खाजगीत बोलायला मिळावं, म्हणून तयार केली होती.
एकदा काय झालं अण्णा आणि दादा सावंतवाडीहून वेंगुर्ल्याला आप्पांच्याच"सावंतवाडी ते बेळगांव " ह्या बस सर्वीस मधून जात होते.अप्पा स्वतःच बस चालवीत होते.
बस मधले दोन पॅसींजर एकमेकात बोलत होते.तिच गुप्त भाषा त्यांनाही येत होती.
त्या भाषेत एक दुसऱ्याला सांगत होता,
"हे चार मुलगे आणि एक मुलगी नांनांची."
आणि पूढे तो सांगू लागला,
"माझा मोठा मुलगा एक्साईझ सुपरीन्टेंडन्ट,दुसरा स्टेशन मास्तर,तिसरा बॅंक मॅनेजर, आणि चवथा, स्वतःची बस सर्वीस चालवतो"
असं यांचे वडिल- नाना- सर्वांना फूशारकीने सांगत असतात."
हे त्याचे गुप्त भाषेतलं भाषण ऐकल्यावर अण्णानी त्याच भाषेत त्याला सांगीतलं,
"फूशारकी म्हणता काय ?थांबा घरी गेल्यावर मी नानानांच सांगतो तुम्ही अमुक अमुक ना?"
असे हंसत हंसत म्हणाले.खरं तर ते दोघे कमाआतेचा नवर्याकडचे नातेवाईक होते आणि नंतर कळलं कमाआतेनेच त्याना ही गुप्त भाषा शिकवली होती.
ते दोघेही खूप घाबरले त्यावर अण्णा म्हणाले,
" अरे, तुमची मी गम्मत केली नानांना आम्ही सांगणार नाही घाबरू नका गुप्त भाषेचं असंच असतं.आमच्यातला एक पार्टनर फुटलेला दिसतो."
ही गोष्ट अण्णानी आम्हाला सांगितली आणि ते पुढे म्हणायचे,
"आमचे वडील नाना खूप शिकलेले नव्हते,पण त्यांना आम्ही त्यांची मुलं शिकलेली आहोत याचा खूप अभिमान होता.म्हणून ते आल्या गेलेल्या असं सांगायचे एव्हडंच."
हे सांगताना अण्णांच्या डोळ्यात पाणी यायचं.
श्रीकृष्ण सामंत