अशी हि उजाड अप्सरा मी कधीच पाह्यली नव्हती. जसजसा तिला पाहत आलो दिवसेंदिवस ती खुलतच होती.अगदी शेवटच्या भेटीपर्यंत !!! आम्हाला जे हवे, जेंव्हा हवं आणि जितके हवे ती देत होती भलेही मोबदला मोजून घेत होती. मी एकटाच नव्हतो तिथला भक्त, मजा लुटणारे अनेक होते. अप्सरेच्या सानिध्यात आकंठ बुडणार्याची झुंबड जरी असली तरी तिची शालीनता कधी तसूभर कमी नाही झाली. त्यामुळेच बहुदा येणारा कधीच बेधुंद पहिला नाही. होईल कसं? धुंद हरवायची ती बेधुंदीसाठीच ना? पण इथे बेधुंद होण्यासाठी धुंद धरावी लागायची, नाही तर अप्सरेची मजा नाही घेता यायची.
अपयश आणि धोके या दोन सोबत्यांनी "एकलकोंडेपणा" नावाच्या गजबजलेल्या विश्वात आणून सोडलं. अप्सरेचा नाद याच गिचमिडीत लागला. हिच्याकडे आणणारा माझा एकमेव मित्र, जो नंतर तुटला पण हि अप्सरेची सोबत जोडून गेला. मित्राच्या आठवणीत मी हेच नात तेवढ जपून ठेवलं बाकी सगळ फुकून टाकलं. काही मित्र हे परत न आठवण्यासारखे असतात. हिच्या संगतीत भकास वाटणारी संध्याकाळ रम्य वाटायला लागली. सारखी हिचीच ओढ लागायची. जत्रे सारखी रोज काहीतरी करमणूक असायचीच हिच्या पुढ्यात. अनेक येणारे जाणारे आणि तेही सगळ्या वयाचे. कुणी यशाच्या शिखरावर चढणारे तर कुणी शिखर उतरणारे, कुणी धडपडत शोध घेणारे तर कुणी यापुढे काहीच न करण्याचा बोध घेणारे, अशे अनेक लोक सर्व आपला सर्वार्थ अप्सरेत शोधायचे. सर्वांना ती पुरून उरायची. लवकरच माझी पण जान-पैचान झाली.तिची खासियत हीच कि ती कमजोरी बनायची. मला खूप जपलं नव्हे जगण सुसह्य केलं. तीच्याकडून उठल तरी बाजूच्या चौकात टपरीवर धूर उडवीत मंथन चालायचं ते पण हिच्याच पुढ्यात. दिवस रात्री जागवल्या आणि गाजवल्या इथे. असो आठवणी रम्य फार पण आठवता जहर येत मनात.....नको ती तिच्याकडे नेणारी वाट अन नको ती गल्ली. सगळ विसरून टाकावं एका घोटात.
त्यादिवशी ती अशी माझ्या समोर होती. खाडा पडला होता, तिला भेटायला गेलो. नेहमीप्रमाणे रात्रीचं. रात्री ती जास्त बहरायची. पण तीची हालत पाहून थबकलो. भादरलेल डोकं आणि भयाण चेहेरा, फाटके तुटके कपडे, सारे लक्तरे लटकलेले, भरकटलेली नजर अन अंगावर दुर्गंधीचा पूर, एकलकोंडी कोपर्यात अन केविलवाणा सूर, स्वतःशीच पुटपुटत होती....”दुर्दैवी तो निर्णय अन दुर्दैवी ती घटिका, सारी स्वप्न चुरचुर, जिव्हारी बसला फटका”.
अशी हि भादरलेली अप्सरा पाहून गरगरायला लागलं, सुन्न झालो. कुणी केली हिची ही अवस्था. किती निर्दयी असावा तो? जिकडे जाण्यासाठी तडफडायचो आज तिला बघवत नाहीये. गच्च भरलेलं ते सौंदर्य कुठे वाहून गेलं? परमेश्वरा एक होती सोबती ती हि का अशी उद्ध्वस्त केली? साली सगळी आयुष्याची कैफियतच कैफियत. एकटपण सहन करू कसं ? ह्या अवस्थेत तिला सोडून जावं की नको ? मनाची घालमेल झाली पण शेवटी नाद वाईटच..एकदा लागला कि लागला. आव्हंडा गिळला, मनात म्हणालो “अप्सरे आता गेली तुझी ती मजा. मी चाललो दुसरीकडे. मोबदला घेऊन तु आणि तुझे सोबती सुख वाटीत होते पण तुझ्या आडून कोणीतरी पापे साठवीत होते. भरला तो घडा करून तुला अडवा तिडवा. तु माझ्यासाठी संपलीस आता. कुणी कुणासाठी नसतं ह्या जगात, मी त्याला अपवाद नाही”. तिच्या अदृश्य विनवण्या मी नजरेआड केल्या. जायचं होतं खूप दूर तिच्यापासून, कारण अंतर नाही ठेवलं तर माझं सुख मला मिळणार कसं ?
तिला विसरणं महाकठीण. डोक्यात एकच विचार “काय झालं असलं तिच्या सोबत”?. डोळ्यात आठवणी घेऊन नवीन अप्सरेच्या शोधात निघालो. त्याच त्या वाटेची आता घीण बसली होती, म्हणून शोधासाठी अनोळखी परिसरात शिरलो. फर्लांगभर दूर होते जेमतेम अंतर पण इथे सगळ उजाड होतं. थोडी वाट बदलली आयुष्यात तर अनेक नवीन चेहेरे आणि त्यांच्या भूमिका दिसायला लागल्या. एकटाच भटकत होतो, विचारांचे काहूर डोक्यात माजायला लागले. एक एक जुन्या कुजलेल्या घटना अन प्रसंग आठवायला लागले.थोडी हुशारीची गरज होती, जवळच परमिट रूमची हॉटेल गाठली. सगळे विचार गाडीसोबत रस्त्यावर सोडून हॉटेलात गेलो.
सर्वदूर गर्दी. महापूर वाहत होता मद्याचा तिथे, पण त्या वाहण्याला पात्र नव्हते. कुणी कसे तर कुणी कसे, सारे बिथरलेले बसलेले. श्या !!!!! जिथे तबियतवाले जमावे तिथे जमान्याची अपूर्ण पात्रे भरली होती. एक हसरा चेहेरा जरा परिचयाचा दिसला, तो पण एकटाच होता. जरा अबोल्या असला तरी पिण्याला प्रामाणिक होता. त्यांनी त्याची साधना सोडून अगत्याने विचारपूस केली अन ग्लासही पुढे केला. तिथं पिण्यात मजा नव्हती पण गप्पागोष्टी रंगल्या अन तो जिवाभावाचा वाटू लागला. त्याला अप्सरेची व्यथा विचारावं असा विचार येत होता. अशी सज्जन मंडळी इथे भेटावी हा योगायोग असावा. त्याची इथली साधना नित्याची समजल्यावर गडबडलो. त्या उजाड जागी कसा तो रमतो त्याची कथा तो सांगत गेला आणि त्याच्या परिचयाचा खुळा वेटर ग्लासावर ग्लास भरत गेला. हळूहळू आजूबाजूचा कल्लोळ शमल्यासारखा वाटायला लागला. समोरचा मित्र देखील दूरवर दिसायला लागला. अंगावर गुलाबपाणी शिंपडल्यासारख वाटत होतं. थोडं फिरायला लागलं म्हणून टेबलावर डोकं ठेऊन डोळे मिटले. जरा शांत झालो, स्वतःला सांभाळून परत मैफलीत सामील झालो. कर्ण आणि अश्वथामाचा विषय मी न रहावून अप्सरेवर आणला. मित्राची नजर कावरीबावरी झाली कारण तो पण तिथलाच गिर्हाईक होता. अस्वस्थ होऊन तो उठून गेला. मी एकटाच बसलो आणि न राहून अप्सरेच्या विश्वात जाणार तेव्हड्यात मित्र आला आणि म्हणाला “विसर रे आता त्या जागेला, चल दाखवतो तुला दुसरी अप्सरा”.
आम्ही दोघे चालायला लागलो. माझ्या डोळ्यांना शोध होता अप्सरेचा. रस्त्या मागून रस्ते गेले, अनेक वळण घेत चालणे सुरु होते. अप्सरेविना मी अनाथ आहे हे मित्राला सांगितलं, त्यांनी काही न बोलता पुढचं वळण घेतलं. जिकड पाहावं तिकडे माझ्यासारखे पोरके भटकताना दिसत होते. एका सुनसान इलाख्यात अंधारात पुढे जात होतो, दूरवरची रोषणाई नजरेत भरली. इमारत पण भली मोठी काचेची. पोहोचेपर्यंत एकूण डामडौल पाहून हि गर्दीवाल्यांची नसून दर्दींवाल्यांची इमारत असावी असा अंदाज आला. आत मंद आवाजात सुंदर संगीत सुरु होते,गजल असावी. डोळ्याला सुसह्य प्रकाश आणि पांढर्याशुभ्र कपड्यातील सेवक देखण्या आकाराचे ग्लास भरीत होते. चालून घामाघूम झालेलो आम्ही त्या थंडगार ग्लासातील बिअरच्या घोटा सरशी प्रसन्न झालो. आहाहा !!! काय ती चव आणि काय हे वातावरण. वाफाळलेले दाणे अन गरमागरम चकल्या. ग्लासातले बुडबुडे शरीरातले श्रम मोकळे करीत होते. अशीच होती त्या अप्सरेची माया नगरी. परत जुन्या अप्सरेची आठवण झाली, "काय झाले असेल तिच्या सोबत "? तेव्हड्यात एक लावण्य सुंदरी पुढे आली अन हात धरून उठवायला लागली, पण मला हेच पुरे होते. दुर्लक्ष केलं तरी ती मात्र हात ओढून विनवू लागली. म्हणून रागाने उठून उभा झालो.
अप्सरा तर गायब पण भले मोठे बील घेऊन खुळा वेटर उठवीत होता. आजूबाजूला कोणीच उरले नव्हते. मित्र पण दिसेनासा झाला. जरा दमदाटी ऐकली मग दोघांचा हिशोब चुकता केला आणि हातात नोट देत त्या वेटरलाच विचारले “ तू तरी सांग माझ्या अप्सरेचे झाले तरी काय? कुणी केले तिचे हे हाल ?”
तो म्हणाला
“एकटीच नव्हती हॉटेल अप्सरा... वंदना, उर्वशी, रंभा अश्या अनेक गेल्या भादरल्या.या बोळकांडात सगळ्या जमल्या होत्या पण अचानक समजलं कि हे बोळकांड नसून राष्ट्रीय महामार्ग आहे......... आणि त्यादिवसापासून इथून ५०० मीटरवरील सर्व बार आता बंद आहेत”!!!!!!.
प्रतिक्रिया
7 Aug 2017 - 5:28 pm | जव्हेरगंज
:)
7 Aug 2017 - 6:53 pm | पैसा
:)
8 Aug 2017 - 6:30 am | संजय पाटिल
दिसतात खर्या अशा अनेक अप्सरा महामार्गालगत ....
8 Aug 2017 - 10:27 am | हृषीकेश पालोदकर
हो ना, शहरातील हमरस्ते पण महामार्ग आहेत हे पण या निम्मिताने कळाले. जसा पुण्यातील टिळकरोड वगैरे वगैरे .
8 Aug 2017 - 8:39 am | गुल्लू दादा
छान झालंय..☺
8 Aug 2017 - 10:30 am | हृषीकेश पालोदकर
आभारी आहे !
8 Aug 2017 - 8:39 am | गुल्लू दादा
छान झालंय..☺
8 Aug 2017 - 11:23 am | पुंबा
मस्त!!
8 Aug 2017 - 4:47 pm | ज्याक ऑफ ऑल
हे सगळं असं असेल असं वाटलंच नव्हत .
एकदम शेवटी वेगळीच कलाटणी. वा ...
12 Aug 2017 - 9:16 am | हृषीकेश पालोदकर
धन्यवाद ज्याक
8 Aug 2017 - 5:17 pm | ज्योति अळवणी
मस्त
8 Aug 2017 - 6:08 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
मस्तच लिहीलय की. पार दुसर्यांदा वाचुनसुध्धा शेवटी दिलेल्या कलाटणीला धक्का लागेल असे काही आढळले नाही. मजा आली.
12 Aug 2017 - 9:17 am | हृषीकेश पालोदकर
धन्यवाद !
9 Aug 2017 - 9:22 pm | गामा पैलवान
हृषीकेश पालोदकर,
लेख खुसखुशीत आहे. अप्सरा, भादरलेली, कलमी वगैरे शब्द पाहून पेन्सिल असावीसं वाटलं. पण ही वेगळीच अप्सरा निघाली आणि कपाळावर हात मारून घेतला. पण लेख आवडला.
आ.न.,
-गा.पै.
12 Aug 2017 - 9:22 am | हृषीकेश पालोदकर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद गामा....