जोशी मास्तर हे गावातले एक बुजुर्ग आणि सदा हसतमुख व्यक्तीमत्व.
आता मास्तर म्हणायाला ते काही शाळेवर शिक्षक नव्हते काही. ते होते गावातल्या पोस्टात पोस्टमास्तर. हजार बाराशे वस्तीचं ते छोटसं गाव त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाशी मास्तरांचा नित्यनेमाने संबंध येत असे. कोणालाही चटकन मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यामुळे गावात त्यांना खूप मान होता.
मास्तर नोकरीला लागले ते याच गावात. पत्नी आणि दोन मुले हा त्यांचा संसार. मुले गावातच लहानाची मोठी झाली आणि उत्तम पदवीधर होऊन बाहेर मोठ्या शहरात नोकरीला गेली. दोन चांगल्या सुस्वरुप आणि मुख्य म्हणजे सुस्वभावी मुली बघून मास्तरांनी दोघाही मुलांची लग्ने लावून दिली.
आता खर्या अर्थाने मास्तर संसाराच्या जबाबदार्यांमधून मोकळे झाले. सुमारे तीस वर्षे पोस्टात नोकरी करुन मास्तर गेल्याच वर्षी निवृत्त झाले.
मास्तरांना संगीताच थोडाफार नाद होता. ते स्वता: पेटी वाजवत असत.
आणि मुख्य म्हणजे ब्रिज खेळणे हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय. त्यांचा सात-आठ जणांचा एक कंपू होता. कोणाच्या तरी एकाच्या घरी सगळे आठवड्यातून एकदा सगळे रात्री जेऊन झाल्यावर जमत असत. सुमारे तीन चार तास ब्रिज खेळायचा आणि आपापल्या घरी जायचे असा त्यांचा कार्यक्रम असे. बरं एक चहाचा थर्मास भरुन ठेवलेला असला म्हणजे त्यांना आणाखी काही लागत नसे.
असेच एकदा ते सगळे अण्णांच्या घरी जमले होते. अण्णा म्हणजे पट्टीचे ब्रिज खेळणारे. त्या दिवशी डाव जरा जास्तीच रंगला आणि हां हां म्हणता एक वाजून गेला.
डाव संपल्यावर सगळे जण पान सुपारी खाऊन जायला निघाले. मास्तरांचे घर बर्यापैकी लांब होते. म्हणून अण्णा म्हणाले, "मास्तर, आता इतक्या रात्री कुठे जाताय? आज इथेच झोपा. सकाळी पहिला चहा घेऊनच निघा". बाकीचे पण म्हणाले की इतक्या रात्री जाऊ नका. पण मास्तर म्हणाले, "नको. मी जातो. सुनंदा (मास्तरांची पत्नी) घरी एकटीच आहे. आणि दोन-तीन मैल तर अंतर आहे. झपाझप चालत निघालो की लगेच पोहोचेन. तुम्ही काळाजी करु नका". असे म्हणून शेवटी मास्तर निघाले. त्यांनी आपला कंदील उचलला आणि ते रस्त्याला लागले. सुरुवातीला दोघे तिघे त्यांच्याबरोबर होते पण जवळच त्यांची घरे असल्यामुळे एक एक जण आपआपल्या घरी गेला. आणि मास्तर आपले एकटेच कुठलीतरी भैरवी गुणगुणत चालू लागले.
सर्वत्र छान चांदणे पसरले होते. आजूबाजूला सुनसान शांतता होती.
वाटेत एक मोठे चिंचे झाड होते. झाडाखाली मास्तर अंमळ थांबले. खांद्यावरच्या पिशवीतला फिरकीचा तांब्या काढून थोडे पाणी प्यायले. जराशी सुपारी कातरुन तोंडात टाकली आणि ते पुढे निघाले. थोडे अंतर गेले असतील नसतील एवढ्यात त्यांना मागून हाक ऐकू आली, "मास्तर, अहो मास्तर, मी तुमच्या बरोबर येऊ का?". मास्तर चटकन मागे वळून बघणार इतक्यात त्यांच्या कानात कोणीतरी स्पष्टपणे कुजबुजले, "थांब!!! मागे अजिबात बघू नकोस. सरळ चालत रहा. धावण्याचा अजिबात प्रयत्न करु नकोस. काहीही उपयोग होणार नाही". इतके बोलून तो आवाज पुन्हा बंद झाला. एव्हाना मास्तर भानावर आले होते. आपण कोणत्या संकटात सापडलो आहोत याची त्यांना कल्पना आली.
मास्तर मागे न बघता सरळ पुढे चालू लागले. मागून तो आवाज येतच होता. "मास्तर, अहो मास्तर, मी येऊ का?".
पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली, अजून घर कसे येत नाही म्हणून मास्तर गोंधळात पडले. थोड्या वेळाने समोर निरखून पाहतात तर समोर तेच चिंचेचे झाड!!!
आता मात्र मास्तरांचा धीर सुटला. ते तिथेच मटकन् खाली बसले. काय करावे ते त्यांना सुचेना. आपण चकव्यात सापडलो आहोत याची त्यांना जाणीव झाली. अण्णांचे ऐकले असते तर बरे झाले असते असे त्यांना आता वाटू लागले. मागच्या हाका क्षणाक्षणाला जवळ येत होत्या. आणि पुन्हा त्यांच्या कानात तो मगाचचा आवाज ऐकू आला, "अरे मुर्खा, मी तुला काय सांगितले? अजिबात थांबू नकोस. ताबडतोब चालायला लाग. रामरक्षा म्हणत रहा. रस्ता आपोआप सापडत जाईल".
उरलासुरला धीर गोळा करुन मास्तर कसेबसे उठले आणि रामरक्षा म्हणत चालू लागले. त्याबरोबर मागचा आवाज थोडा लांब गेलासा वाटला. मास्तरांच्या डोळ्यांवरची धुंदी उतरली. समोरचा रस्ता स्पष्ट दिसू लागला. आणि पाचच मिनिटात मास्तर घराजवळ आले. मास्तरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मनातल्या मनात त्यांनी त्या अनामिक आवाजाचे आभार मानले. एव्हाना त्या हाका थांबल्या होत्या. मास्तर दाराजवळ पोहोचले, पण त्यांना त्यांची उत्सुकता स्वस्थ बसू देईना. शेवटी त्यांनी हळूच मागे बघितले.
त्याबरोबर मागून एक प्रदीर्घ किंचाळी ऐकू आली, आणि त्यापाठोपाठ आवाज आला, "सुटलास रे सुटलास". आणि एक बर्फाळ वार्याचा झोत त्यांच्या अंगावरुन गेला. मास्तरांना हुडहुडी भरली, दात थडथड वाजू लागले. कसेबसे दार ढकलून ते आत गेले. त्यांना सणसणून ताप भरला..
तब्बल एका महिन्याने ते पुर्ववत हिंडूफिरू लागले. त्या घटनेनंतर मात्र त्या रस्त्याने अपरात्री कोणी येईनासे झाले.
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 7:56 pm | लिखाळ
छान भयकथा..
तुमचे या आधीचे लेख-कथा सुद्धा वाचल्या..आवडल्या.
अजून वाचायला आवडेल.. भयकथा विशेष करुन :)
--लिखाळ.
15 Oct 2008 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भयकथा आवडली.
15 Oct 2008 - 8:05 pm | अवलिया
छान भयकथा
15 Oct 2008 - 8:29 pm | मंदार
कथा फारच आवडली,
पण तुम्हाला असे कधी अनुभव आलेत का हो? :W