अंदाज अपना अपना....

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
22 Jul 2017 - 8:32 am

पावसाळ्याच्या काळात हवामान खात्यातील कर्मचारी दिवसभर पावसाचे अंदाज वर्तवून कामकाज आटोपून घराकडे निघतात. निघताना कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांना बजावतात,‘रात्री दारं खिडक्या नीट लावून घ्या. पावसाचं काही खरं नाही, कधीही येऊ शकतो!’.
सतत चुकणाऱ्या अंदाजांमुळे हवामान विभाग हा एक विनोदाचा विषय बनून राहिलाय. हवामानाच्या अंदाजाची सतत थट्टा होऊ नये म्हणून आता हवामान खातं वाऱ्यानुसार दिशा बदलतं. अधून-मधून जरा सावध पवित्रा घेतात. दर वर्षी ‘१० जून ला पावसाचे आगमन होण्याची शक्यता’ म्हणायचं. नाही आला तर ‘उशीरा चालू होईल’ सांगायचं. एकदा पाऊस चालू झाल्यावर 'पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता'. 'हवामान' ऐवजी 'दोलायमान' विभाग म्हणणे जास्त बरोबर वाटते.

मध्यंतरी एक जोक वाचला - "मला हवामान खात्यातल्या नोकरीचं खुप अप्रूप वाटतं, कुठलं टारगेट नसतं, अंदाज खोटे ठरले तरी कोणतीही कारवाई नाही". असंच 'अप्रूप वाटावं' असा अजून एक व्यवसाय आहे. तो म्हणजे CNBC, ET Now, Zee Business वगैरे ‘बिजनेस वृत्त वाहिन्या वरील ‘शेअर मार्केट चे तज्ज्ञ विश्लेषक’. पूर्वीपासून स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात गुजराती-मारवाडी लोकांसाठी ९०% आरक्षण असावे. ह्यांची पोरं CA अथवा MBA करून आपल्या ब्रोकिंग फर्म ची जाहिरात करण्यासाठी ह्या बिजनेस चॅनेल्स वर विश्लेषकांच्या भूमिकेत दिसतात. उरलेल्या १० टक्क्यात तामिळ, बंगाली, पंजाबी, मराठी लोकं सापडतात.

मार्केट खाली जायला लागलं कि 'अजून पडेल' आणि वर जायला लागलं कि 'अजून वर जाईल' इतका साधा हिशोब असतो ह्या तज्ज्ञ विश्लेषकांचा. मध्यंतरी शेअर मार्केट आपटलं तेव्हा "GST मुळे पडलं" असं हे म्हणाले. दुसऱ्या दिवशी वर उसळी मारल्यावर "GST मुळे वर गेलं" असं हेच लोकं म्हणत होते. आता बोला!!! पाऊस जसा 'कमी दाबाच्या पट्ट्यामुळे' कधी कमी तर कधी जास्त पडू शकतो, तसंच हे असावं. टाटा मोटर्सने इंग्लंडची JLR कंपनी जेव्हा विकत घेतली तेव्हा सर्व तज्ज्ञांनी सडकून टीका केली होती. तेच लोकं आज 'टाटांचा निर्णय कसा बरोबर होता' हे पटवून देताना दिसतात.

हवामानाचे अंदाज एवीतेवी चुकणारंच असतील तर हा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा एखादा ज्योतिषी का नाही ठेवत; असं अनेकांना वाटतं. ज्योतिषी आणि शेअर मार्केटच्या तज्ज्ञांमध्ये देखील बरेच साम्य आहे. ज्योतिषी लोकांत जसे कुंडली बघणारे आणि हात बघणारे हस्तसामुद्रिक असे मुख्य २ प्रकार आहेत; तसे इथे देखील २ प्रकार आहेत. पहिले 'फंडामेंटल अनॅलिस्ट’ आणि दुसरे ‘टेक्निकल अनॅलिस्ट'. कुंडली बघणाऱ्यांना जसा ग्रहस्थिती, नक्षत्र वगैरेचा अभ्यास करावा लागतो तसा फंडामेंटल वाल्यांना कंपनीची कुंडली म्हणजेच नफा-तोटा, मॅनेजमेंट टीम, आगामी काळातील आव्हाने, एकंदर इकॉनॉमी बद्दलची माहिती असावी लागते. हस्तसामुद्रिक हातावरच्या रेषा पाहून भवितव्य सांगतात आणि 'टेक्निकल वाले 'चार्ट' वरच्या रेषा बघून. चार्ट्स पाहणाऱ्यांचं काम तुलनेने सोपं आहे. Candlestick, Doji pattern, Hammer, Shooting Star, Hanging Man वगैरे अगम्य शब्द वापरून आपण 'लय भारी' असल्याचा आव सहज आणू शकतात.

उर्दू शायर जसे 'शेर सुनावतात' तितक्याच सहजतेने ही तज्ज्ञ मंडळी दिवसभर अनेक 'शेअर्स' सुचवतात'. कार्यक्रमाच्या शेवटी मात्र 'ह्यांनी स्वतः किंवा ह्यांच्या नातेवाईकांनी' १ रुपया देखील ह्यातील एकाही कंपनीत गुंतवला नसल्याचे (निर्लज्जपणे!) सांगतात. 'पुराणातली वांगी पुराणात'! पैसा कमवायची एवढी सुवर्णसंधी असताना स्वतः त्या कंपनीचे शेअर्स का घेत नाहीत? इतका 'परोपकार' कुठून आला ह्यांच्यात? तुकोबांनी धंद्याचं वाटोळं झाल्यावर 'उरलो उपकारापुरता' म्हटलं. मला वाटतं हे विश्लेषक देखील शेअर मार्केट मध्ये स्वतः सपाटून मार खाल्ल्यामुळे 'स्वतः चा बाजार उठल्यावर इतरांना शेअर बाजारात’ येण्याचा आग्रह करत असावेत.
हा प्रकार वरवर जरी सोपा वाटत असला तरी हे करायला थोडंफार चातुर्य लागतं. कायम जर अंदाज चुकले तर लोकं आपल्याला सिरिअसली घेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागते. अश्या वेळी मोघम स्वरूपाचे अंदाज व्यक्त करणं 'सेफ' असतं. हवामान विभाग जुलै महिन्यात ठोकून देतो कि 'मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल'. मध्य महाराष्ट्राचा नंदुरबार ते कोल्हापूर पर्यंतचा विस्तार बघता कुठेतरी थोडा-फार पाऊस पडतोच! स्टॉक मार्केट मध्ये 'बँकिंग, ऊर्जा, फार्मा आणि IT' मध्ये तेजी संभवते असं शेअर मार्केट बद्दल सांगून मोकळं व्हायचं. ह्या सेक्टर मधील शेकडो शेअर्सपैकी दोन-पाच शेअर्स वर जातातंच. त्यामुळे काळजी नसावी.
काही विश्लेषक फार चातुर्याने बोलतात. नुसतं Buy आणि Sell म्हणण्यापेक्षा Overweight आणि Underweight शब्द वापरून आपलं 'वजन' वाढवतात. 'तेजी आणि मंदी' पेक्षा 'Bullish & Bearish' म्हणतात. शेतकऱ्यांच्या मदतीला जसा 'बैल' येतो तसा तेजीवाल्यांच्या मदतीला देखील Bull असतो.
मार्केट मध्ये तेजीचा जोर असताना 'Valuations look stretched but some more upside likely in coming weeks' असं म्हणायचं. "I am CAUTIOUSLY OPTIMISTIC" हे देखील असलंच एक स्मार्ट विधान. एखादया श्रोत्याने अमुक एक शेअर कधी घेऊ? असे विचारल्यास "BUY ON WEAKNESS" असे बोलावे. इतकं भराभर मार्केट का वर जातंय? असा प्रश्न आल्यास (आणि आपल्याला कुठलीच माहिती नसल्यास) "More Buyers than Sellers " असे उत्तर द्यावे. परवा तर एका महाभागाने कहर केला. 'फार्मा कंपन्यांचे शेअर्स चे भाव आगामी काळात वर जातील का" ह्या प्रश्नाला "भाव वर जाण्याची ५०% टक्के शक्यता आहे" असे म्हणून 'भाव' खाल्ला. असं बोलता आलं म्हणजे मार्केट कुठल्याही दिशेनं गेलं तरी आपलं बोलणं खरं ठरतं. ‘चीत मै जीता, पट तुम हारे’!
क्वचित इतकं मोघम बोलूनही हे देखील अंदाज चुकू शकतात. अशा वेळी 'अल निनो' हवामान खात्याच्या मदतीला धावून येतो. (किती वेळा 'अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा' आवळणार!). त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रम्प पासून ब्रेक्झिट पर्यंत आणि GST, नोटाबंदी पासून Liquidity पर्यंत खापर फोडायला अनेक गिऱ्हाईके आहेत.

शेतकऱ्यांचा विचार केल्यास पावसाबद्दल मोघम अनुमान करून उपयोग काहीच नाही. पाऊस जसा जिल्हावार कसा पडेल हे सांगितलं तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी जरा तरी उपयोग होऊ शकतो. अंदाज चुकण्यामागे हवामान खात्याकडील अंदाज वर्तवण्याचे जुनाट तंत्रज्ञान देखील बऱ्याच अंशी कारणीभूत असावे. अनेकदा राजकीय दवाबामुळे देखील उपलब्ध माहितीनुसार दुष्काळाची शक्यता वाटत असेल; तरी राज्य सरकारच्या दवाबामुळे 'सरासरीच्या ८०-८५% पावसाची शक्यता' असे जाहीर केले जाते. राजकीय दबावाचा अपवाद वगळल्यास इतर वेळी हवामान विभाग उपलब्ध साधन-सामुग्री नुसार जे हवामानाचे अंदाज दिसतात ते जाहीर करतात. स्टॉक मार्केट चे तज्ज्ञ विश्लेषक इतके साधे-सरळ नसावेत. शाळेत ज्यांची गणितं कायम चुकायची ते हवामानखात्यात नोकरी करत असावेत. जी हुशार मुलं स्वतः बरोबर गणितं सोडवून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना मुद्दाम चुकीची उत्तरं सांगतात ते 'स्टॉक मार्केट चे तज्ज्ञ विश्लेषक' झाले असणार. मला वाटतं कि SEBI ने 'ह्या लोकांनी कुठले शेअर्स स्वतः च्या आणि नातेवाईकांच्या पोर्टफोलिओ मध्ये घेतले आहेत' हे सांगणं देखील बंधनकारक केलं पाहिजे!

इंटरनेट च्या विकासामुळे शेअर मार्केट मध्ये उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आहे. माउसच्या एका क्लिक वर प्रचंड माहितीचा खजिना आहे. अंदाज वर्तवण्याची विविध tools उपलब्ध आहेत. तरीसुद्धा बऱ्याच वेळा न्यूज चॅनेल च्या दबावामुळे जाणून-बुजून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात येते. न्यूज चॅनेल ला देखील जाहिरातींच्या पैशावर धंदा चालवायचा असल्याने त्यांचा देखील थोडाफार नाईलाज असावा.
अशा वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं हा 'कळीचा मुद्दा' आहे. अतिशय हट्टी मुलं पालक जे सांगतील त्याच्या मुद्दाम उलटं करतात. ह्यात बऱ्याचदा त्यांच्या मनासारखं होतं. हेच धोरण कधी-कधी कामाला येतं. मी देखील घराबाहेर पडण्यापूर्वी "आजचा हवामानाचा अंदाज" वाचतो. "येत्या २४ तासांत पावसाची शक्यता" म्हटल्यावर गॉगल आणि टोपी (कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी!) बरोबर घेतली आहे ना ह्याची खात्री करून मगच बाहेर पडतो.
शेअर मार्केट मध्ये देखील हे धोरण बऱ्याचदा फायदा देऊन जातं. २००६ साली बर्ड फ्लू मुळे ‘वेंकीज’ चा शेअर जेव्हा जबरदस्त आपटला तेव्हा सगळीकडे 'असतील-नसतील तेवढे शेअर्स विकून मोकळे व्हा' अश्या बोंबा मारत होते. त्याचप्रमाणे २००० साली टाटा मोटर्स ने ५०० कोटीचा तोटा जाहीर केला तेव्हा देखील अतिशय नकारात्मक बातम्या येत होत्या. ह्यावेळी ज्या लोकांनी बिजनेस वृत्त वाहिन्यांचे न ऐकता शेअर्स विकत घेतले त्यांच्या आयुष्याची चांदी झाली. अर्थात हा 'प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा फॉर्मुला' देखील प्रत्येक वेळी चालेल असं नाही. 'सत्यम' चा शेअर गैरव्यवहारामुळे आपटला आणि नंतर त्याने भरघोस फायदा मिळवून दिला. मात्र हाच प्रकार किंगफिशर एअरलाईन्सच्या बाबतीत चालला नाही. स्टॉक मार्केट मध्ये देखील असा ‘Contrarian View’ असणारी तज्ज्ञ मंडळी आहेत. त्यांचं देखील अनुमान बऱ्याचदा चुकत असल्याने 'लांडगा आला रे आला' हा प्रकार घडतो. त्यामुळे ही मंडळी जास्त लोकप्रिय नाहीत.
परवा बीड जिल्हातील शेतकऱ्यांनी चक्क हवामान खात्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पावसाचा अंदाज (अर्थातच!) चुकला आणि केलेल्या पेरण्या वाया गेल्यामुळे तक्रार केली म्हणे. शेतकऱ्यांना निदान राजकीय दबावामुळे का होईना पण अधून-मधून कर्जमाफी मिळते. आमच्यासारख्या भोळ्या इन्वेस्टर्सचं काय हो? अनेक वर्षांपूर्वी टेलिकॉम आणि ऊर्जा क्षेत्राला किती उज्ज्वल भविष्य आहे आकडेवारीसहित सांगितलं. तेव्हा 'रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स पॉवर" Strong Buy म्हणून Recommend केलं. ज्यांनी ह्या कंपन्यांचे शेअर्स घेतले त्यांना आज कुत्रं देखील विचारत नाही. Mid-Cap, Small-Cap वगैरे सांगून लोकांना Large-Caps (टोप्या!) घालण्याचे काम हि मंडळी गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या करीत आहेत.

लहान पोरं पाऊस पडेल का हे हवामान खात्याला न विचारता 'भोलानाथ' ला विचारतात. तसा एक 'भोलानाथ' सामान्य गुंतवणूकदारांसाठी हवाय.

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

22 Jul 2017 - 10:48 am | तुषार काळभोर

>>>Mid-Cap, Small-Cap वगैरे सांगून लोकांना Large-Caps (टोप्या!) घालण्याचे काम हि मंडळी गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या करीत आहेत.

हे सगळ्यात जास्त आवडलं!

कपिलमुनी's picture

22 Jul 2017 - 10:51 am | कपिलमुनी

मस्त खुसखुशीत लेख

अनिंद्य's picture

22 Jul 2017 - 11:09 am | अनिंद्य

CAUTIOUSLY OPTIMISTIC,
Large-Caps (टोप्या!) घालण्याचे काम
मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस

काय ते निरीक्षण :-)
लेख जमून आलाय साहेब.

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 11:55 am | सुबोध खरे

.
असे आपले टेक्निकल अनॅलिस्ट आहेत.
१ एप्रिलला म्हणतात
इंडिया सिमेंट खात्यात जमा ठेवा
६ एप्रिल ला म्हणतात
इंडिया सिमेंट विकून टाका
आणि ८ एप्रिल ला म्हणतात
इंडिया सिमेंट विकत घ्या.

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 11:58 am | सुबोध खरे

.
.
.

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 12:14 pm | सुबोध खरे

३० मार्च २०१५ ते ३० मार्च २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत हा समभाग काही रुपये १११ च्या वर गेला नाही

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 12:01 pm | सुबोध खरे

हे लोक असे कोलांट्या मारतात यावर मी मनी कंट्रोलला लिहिले होते त्याचे काहीच झाले नाही
आणि त्यांनी त्यानंतर हे तांत्रिक विश्लेषक पूर्वी काय म्हणाले होते ते आठवड्याभरातच जालावरून काढून टाकायला सुरुवात केली.
तेंव्हा समभाग आणि बाजार यातील सर्वात महत्त्वाचा सल्ला
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

पैसा's picture

22 Jul 2017 - 12:06 pm | पैसा

खुसखुशीत!! लघुनिबंध या विस्मृतीत गेलेल्या प्रकाराचे पुनरुज्जीवन करता आहात. आवडलं.

अभ्या..'s picture

22 Jul 2017 - 12:13 pm | अभ्या..

बेस्टच की,
एक लंबर ऑब्झरवेशन.
एकेकाळी मिपावर चक्क असल्या अंदाजासाठी सेपरेट विभाग मागत होते हो,
म्या म्हणलं " कल्याण मुंबई पण चार्ट ठेवावेत काय"
;)

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 12:48 pm | ज्ञानव

माझीच मागणी हो ती... आणि ती आजन्म राहणारच. फक्त मिपाच्या जडणघडणीत आणि ते सतत उपलब्ध राहावे म्हणून माझा आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हातभार नसल्याने मी तिचा आग्रह धरू शकत नाही. अर्थ साक्षरता नसल्याने होणारे नुकसान टाळायला असा स्वतंत्र विभाग कामास येऊ शकतो हा त्या मागचा हेतू होता. आणि मी ते ह्या आधी सुद्धा उधृत केले होते. असो..

पैसा's picture

22 Jul 2017 - 2:05 pm | पैसा

स्वतंत्र विभाग शक्य असल्यास होईल मात्र सर्व लिखाण विषयानुरूप टॅग करण्याचा प्रस्ताव नक्कीच नजीकच्या काळात प्रत्यक्षात येईल. तेवढेसुद्धा पुरेसे आहे.

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 2:33 pm | ज्ञानव

अर्थ विषयक चर्चा आणि अर्थ साक्षरता ह्याबबत विचार व्हावा आणि वेगळी तसेच कडक नियमावली असावी. असो

पण मनःपूर्वक धन्यवाद.

Nitin Palkar's picture

22 Jul 2017 - 9:23 pm | Nitin Palkar

अंदाज पंचे!
असं नाव ठेवता येईल का?

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2017 - 12:25 pm | अभिजीत अवलिया

स्टॉक मार्केटचे तज्ज्ञ विश्लेषक जे काही सांगतात ते १००% खरे होत नसले तरी १००% खोटे देखील नसते. हे विश्लेषक जे काही सांगतात तेव्हढेच ऐकून जर कुणी शेअर मार्केट मधून प्रचंड पैसा कमावण्याची स्वप्ने बघत असतील तर चूक अशी स्वप्ने बघणाऱ्यांची आहे. विश्लेषक जे काही सांगतात ते निश्चित ऐकावे. त्यातून आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टी समजतात. पण त्याचबरोबर थोडा अभ्यास स्वत: पण करावा. 'असेल माझा हरी तर देईल विश्लेषक खाटल्यावरी' असा बाणा ठेवू नये. 'दुसरी गोष्ट प्रत्येक कंपनीच्या बाबतीत एका दिवसभरात देखील इतक्या घडामोडी होत असतात की त्यामुळे आज सकाळी ९ वाजता अमुक कंपनीचा शेअर विकत घ्यायला संगितले तर तोच विश्लेषक मधल्या काळात त्याच कंपनीच्या बाबतीत आलेल्या काही बातम्यांमुळे त्याच दिवशी 3 वाजता शेअर विकायचा सल्ला देऊ शकतो. त्यात चुकीचे किंवा फसवले असे म्हणण्यासारखे काहीच नाही.

तसेच बऱ्याचदा प्रत्येक शेअरला एक upside resistance असतो. म्हणजे उदा - अ कंपनीच्या शेअरला १००रू. हा upside resistance आहे असे समजू. जेव्हा अ चा शेअर १००रू. च्या आसपास पोचतो तेव्हा भले मार्केट कितीही वर जाऊ दे अ चा शेअर खालीच येतो. कारण ट्रेडर्स लोक प्रॉफिट बुकिंग करत असतात.

upside resistance प्रमाणे downside resistance देखेल असतो.
उदा- गेल्या आठवड्यात सरकारने सिगारेट वर अतिरिक्त टॅक्स लावणार असे जाहीर केले आणि दुसर्या दिवशी ITC चा शेअर १५% कोसळला. पण तो लगेच रिकव्हर होऊन परत वर गेला. त्यामुळे ज्यांनी ITC १५% कोसळल्यावर लगेच खरेदी केला त्यांना दुसऱ्या दिवशी प्रत्येक शेअरवर १०-१२ रु. सहज प्रॉफिट मिळाले असते.
त्यामुळे थोडा अभ्यास आणि थोडे धाडस तुमच्या अंगी हवेच.

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 1:06 pm | ज्ञानव

अप साईड रेझिस्टन्स आणि डाऊन साईड रेझिस्टन्स हे शब्द वापरून तुम्ही स्वतःचे वजन वाढवू पहाताय का ?

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2017 - 1:14 pm | अभिजीत अवलिया

नाही हो. माझं कसलं आलय डोंबलाच वजन. :)

सरनौबत's picture

22 Jul 2017 - 1:16 pm | सरनौबत

बारकाईने लेख वाचलाय तुम्ही :-)

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 1:22 pm | ज्ञानव

मार्केट विश्लेषक असे शब्द आले कि आपसूकच ते होते.

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 1:36 pm | ज्ञानव

काही तज्ञ आमच्या "अर्थक्षेत्र" गृप वर आहेत. ते इथे लिहित नाहीत. तुम्ही काही काळासाठी आमच्या गृप वर आपली पायधूळ झाडावी हि विनंती. आवडले नाही तर सोडून जाऊ शकताच. फक्त आपले संपूर्ण नाव आणि नंबर आणि आपली संपूर्ण ओळख करून दयावी लागेल कारण तिथे मिपा आय डी चालत नाही. तिथले विश्लेषक अनपेड आहेत त्यामुळे योग्य तेच विश्लेषण करतात.

व्यक्तिगत मेसेज पाठवतो. नक्की आवडेल त्या ग्रुप वर सहभागी व्हायला.

सरनौबत's picture

22 Jul 2017 - 1:39 pm | सरनौबत

तुमचे म्हणणे पटले. शेअर च्या किंमती कोणीही अचूक सांगू शकलं असतं तर तो जगातला सर्वात श्रीमंत होऊ शकला असता. घडामोडींनुसार भाव वर-खाली होतात. ह्याव्यतिरिक्त देखील ऑपरेटर आणि इतर मार्केट फोर्सेस असतात. माझा न्यूज पोचवणे आणि त्याचा अनॅलिसिस ह्यावर माझा आक्षेप नाही. आक्षेप आहे तो लोकांना टिप्स देऊन 'डेली ट्रेडिंग' करायला उद्युक्त करतात त्यावर.

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 1:51 pm | ज्ञानव

कामच ते असते. आपण आपली गरज ओळखावी ऐपत जाणावी आणि काम करावे किंवा दुकानातच जाऊ नये.

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 1:52 pm | ज्ञानव

कामच ते असते. आपण आपली गरज ओळखावी ऐपत जाणावी आणि काम करावे किंवा दुकानातच जाऊ नये.

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 7:13 pm | सुबोध खरे

@अभिजीत अवलिया
आपण सहसा "तज्ज्ञ" म्हणतो. त्यात डॉक्टर असतात, वकील असतात इंजिनियर, संगणक तज्ज्ञ असतात. या लोकांनी दिलेला सल्ला ७० ते ८० टक्के( बहुधा अधीक जास्त) वेळेस अचूक असतो. तशी स्थिती या तांत्रिक विश्लेषकांची नाही. यामुळेच श्री सरनोबत यांनी केलेली हवामान खात्याची तुलना योग्य ठरते. फरक एवढाच आहे कि हवामान खात्याचे तज्ज्ञ ठोकताळा वर्तवताना उपलब्ध शास्त्रीय माहितीनुसार वर्तवत असतात त्यात वैयक्तिक असा फायदा नसतो. याउलट समभागात कित्येक वेळा समभाग "चालविले जातात किंवा पाडले जातात" (OPERATOR DRIVEN STOCKS).
कंपनीच्या प्रवर्तकाला आपला काही नफा करून घ्यायचा असेल तर असा समभाग "चालवला' जातो. जो तो विश्लेषक चार दिवस त्या समभागाबद्दल भरभरून बोलताना आढळतो तो समभाग दुप्पट तिप्पट चढत जातो. मग सामान्य निवेशक जो इतका वेळ कुंपणावर बसलेला असतो तो हि जत्रा पाहून त्यात उतरतो तिप्पट भावाने घेतलेला समभाग यानंतर डब्यात जातो आणि मग काही वर्षे हा समभाग गाळात पडलेला पाहून सामान्य निवेशक येईल त्या किमतीला फुकून टाकतो आणि नुकसान सोसून बाजारातून कायमचा बाहेर पडतो. एक उदाहरण म्हणून बेडमुथा इंडस्ट्रीजचे उदाहरण घ्या १०० रुपया च्या आसपास याचा आय पी ओ आला चार दिवसात याचा समभाग २८७ पर्यंत गेला. हा सुळका फक्त एक दिवस होता आणि त्यानंतर गेली ७वर्षे हा समभाग ७ रुपये ते ५० रुपये यात हेलकावे खात पडला आहे.
http://www.moneycontrol.com/india/stockpricequote/steel-medium-small/bed...
या चार्ट वर मॅक्स वर टिचकी मारून पहा.
एखादा चांगला समभाग एकदम पडत असतो त्याचे कारण बाजार संपेपर्यंत ताज्या बातमित येत नाही. कारण सामान्य माणसाला हा समभाग काढून टाकायचा असेल तर त्यकला समजेपर्यंत हा समभाग बराच खाली पडलेला असतो. किंवा एखादा समभाग एकदम चढतो तेही का ते समजत नाही. या आतल्या बातम्या केवळ अशा तांत्रिक विश्लेषकांनाच कशा माहिती होतात हे कोडे आहे ( किंवा नाही).
उदा. रॅनबॅक्सिच्या सर्वच्या सर्व कारखान्यांवर अमेरिकेच्या एफ डी ए ने बंदी घातली हे तो समभाग गाळात जाऊन दोन दिवस झाल्यावर सर्व अर्थ विषयक मासिकांनी त्यावर भरभरून लिहिले. पुढे हि भाकड गाय त्यांनी (परविंदर आणि मलवींदर सिंह यांनी) जपानी कंपनी डाय इची च्या गळ्यात घातली आणि ते बिचारे नुकसान सोसून रॅनबॅक्सि सन फार्मा कंपनीला विकून भारतीय बाजारातून बाहेर कसे पडले हि एक सुरस आणि चमत्कारिक कथा आहे.
नवे नवे बकरे येत राहतात आणि कापले जातात. गेली दहा वर्षे मी हा प्रकार पाहत आलो आहे. तुम्ही मला एखादा प्रथितयश तांत्रिक विश्लेषक सांगा त्याने कोणता समभाग कसा चढवला आहे हे मी तुम्हाला थोडे शोधून सांगू शकेन. (आजकाल मनीकंट्रोल सारख्या साईट्स नि जुने सल्ले काढून टाकायचे धोरण ठेवलेले आहे).
तात्पर्य काय? तर कोणत्याही बाजारातील तांत्रिक विश्लेषक यावर जिबात भरवसा ठेवू नका. आपल्या जवळचा आणि भरवशाचा वित्त सल्लागार हाच खरा कारण ज्याला तुम्हाला रोज तोंड द्यायचे आहे तो असे सल्ले देणार नाही.
आपला पैसा जर जपायचा आणि वाढवायचा असेल तर स्वतः अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. माणसे आपल्या सायकल मोटर सायकल किंवा कर साठी जेवढा वेळ देतात महिन्याला तेवढा वेळ जरी या अभ्यासाला दिला तरीही खूप आहे.

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2017 - 7:55 pm | अभिजीत अवलिया

डॉक,
मान्य आहे. मला पण हेच म्हणायचे आहे की केवळ हे तज्ज्ञ जे काही सांगतात तेव्हढेच ऐकून शेअर मार्केट मधून प्रचंड पैसा कमावण्याची स्वप्ने बघे नयेत. पण त्याचबरोबर ह्या लोकांचा अभ्यास आपल्यापेक्षा निश्चित जास्त असतो हे ही मान्य करायला हवे.

कंपनीच्या प्रवर्तकाला आपला काही नफा करून घ्यायचा असेल तर असा समभाग "चालवला' जातो.

हो. हे होते. त्यासाठीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण दोघे म्हणतोय तसे थोडा तरी अभ्यास करणे गरजेचे आहे. आता हा थोडा अभ्यास म्हणजे माझ्या मते आपण ज्या कंपनीत गुंतवणूक करणार आहोत ती कंपनी नक्की काय करते, तिचे प्रवर्तक कोण आहेत, कंपनीची गेल्या वर्षातील कामगिरी एवढे तरी किमान माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळेच ज्या कंपनीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही त्यात शक्यतो गुंतवणूक करू नये.

एखादा चांगला समभाग एकदम पडत असतो त्याचे कारण बाजार संपेपर्यंत ताज्या बातमित येत नाही. कारण सामान्य माणसाला हा समभाग काढून टाकायचा असेल तर त्यकला समजेपर्यंत हा समभाग बराच खाली पडलेला असतो. किंवा एखादा समभाग एकदम चढतो तेही का ते समजत नाही. या आतल्या बातम्या केवळ अशा तांत्रिक विश्लेषकांनाच कशा माहिती होतात हे कोडे आहे ( किंवा नाही).

ह्याबाबतीत मला वाटते मार्केट speculation वर चालते. मी वर प्रतिसादात दिलेले ITC चे उदाहरण घ्या. सरकारने सोमवारी संध्याकाळी सिगारेटवर टॅक्स वाढवल्याची घोषणा केली. त्यामुळे मंगळवारी बाजारात ITC बद्दल एक पॅनिक निर्माण होऊन ITC चा शेअर पडणार हे किमान मला तरी वाटत होते आणि तसेच झाले. (मी तज्ज्ञ नाही पण एक कॉमन सेन्स वापरून मी अंदाज बांधला). वास्तविक असे होण्याचे काही कारण देखील न्हवते. टॅक्स वाढवल्याने ITC सिगारेटच्या किमती वाढवून शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच तो वसूल करणार हे काही वेगळे सांगायला नको. आणि सिगारेटच्या किमती वाढल्या म्हणून सिगारेट ओढणे कमी केलेली व्यक्ती मला अजूनपर्यंत भेटलेली नाही.
अगदी कुठल्याही कारणाने मार्केट मध्ये पॅनिक निर्माण होते. ब्रिटन ने ब्रेक्सिटचा निर्णय घेतला, उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली, अमेरिकेने युद्धनौका उत्तर कोरियाच्या जवळ नेली, फेड ने व्याजदर वाढवले. कोणतेही कारण पुरते मार्केट पडायला. त्यामुळे आपल्या कुवतीनुसार मार्केट मध्ये पडावे हेच उत्तम.

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 8:31 pm | सुबोध खरे

आयटी सी चे मी पण थोडेसेच समभाग घेतले आहेत कारण सिगारेटवर जी एस टी कमी झाला म्हणून चढलेला समभाग सेस वाढवला कि पडणार हे माहित आहे.
( या कंपनीचे समभाग घेणे मला पटत नाही कारण तुम्ही धुम्रपानाला प्रोत्साहन देता असे वाटते. या कंपनीचा ८० % नफा हा सिगरेट विक्रीतून येतो.म्हणून मी थोडेसेच घेतले आहेत ते पण विकून टाकेन अस विचार करतो आहे)
हि बातमी फारच ढोबळ आणि लोकांना सहज उपलब्ध असलेली होती. एक उदाहरण देतो आहे.
ल्युपिन कंपनीचे एफ डी ए २४ जुलै पासून निरीक्षण करणार आहे हि बातमी काल २१ जुलै ला दुपारी सव्वातीनला जाहीर झाली पण तो समभाग सकाळी ९.१६ लाच ३३ रुपयांनी पडलेला होता. आता हि बातमी समभाग पडल्यावर बाजार बंद यायच्या वेळेअगोदर १५ मिनिटे कशी जाहीर होते? एफ डी ए चे निरीक्षण काही चार दिवसात ठरणारी बातमी नाही.आणि हा समभाग का पडला? आतली काहीतरी कुणकुण असेल अशी शंका येते.
ज्यांना ट्रेडिंग करायचे आहे त्यांनी आपली पोळी भाजून घेतलेली दिसते.
http://www.moneycontrol.com/news/business/stocks-business/lupin-slips-3-...
http://www.moneycontrol.com/india/stockpricequote/pharmaceuticals/lupin/L
ल्युपिनच्या चार्ट वर पाच दिवसाच्या चार्ट वर टिचकी मारून पहा.
अशा तर्हेच्या गोष्टी असंख्य दाखवता येतील म्हणून सामान्य माणसाने ट्रेडिंगचा वाट्यास जाऊ नये विनंती मी करीत असतो.
चांगले समभाग पडत्या बाजारात घ्या आणि थंड बसून रहा अशीच अनुभवाची सूचना मी करेन. (सल्ला देण्याइतका माझा अभ्यास आणि हुशारी नाही)
चार दिवसात १५ % नफा मिळावा या हेतूने ट्रेडिंग करणारा एकही माणूस मी श्रीमंत झालेला आजतागायत पाहिलेला नाही. बाजारातील तांत्रिक विश्लेषक आणि सटोडिये हे मात्र आपली पोळी भाजून घेताना रोज दिसतात.

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2017 - 8:49 pm | अभिजीत अवलिया

या कंपनीचे समभाग घेणे मला पटत नाही कारण तुम्ही धुम्रपानाला प्रोत्साहन देता असे वाटते. या कंपनीचा ८० % नफा हा सिगरेट विक्रीतून येतो.म्हणून मी थोडेसेच घेतले आहेत ते पण विकून टाकेन अस विचार करतो आहे

तुमच्या मताचा आदर आहे. पण कसे आहे ITC हा ब्लूचीप शेअर आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक लार्ज कॅप किंवा मल्टि कॅप म्युच्युअल फंडाची, तसेच LIC सारख्या सरकारी संस्थांची ITC मध्ये मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे जर आपण ITC मध्ये गुंतवणूक असलेल्या कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली किंवा LIC ची पॉलिसी घेतली तर एक प्रकारे आपण ITC चा शेअर घेऊन धुम्रपानाला प्रोत्साहन दिल्यासारखेच आहे.

एखाद्या कंपनीचा IPO येणार असल्यास अनेक महिने आधीपासून 'तयारी' सुरु होते. चढा भाव मिळावा म्हणून ऑडिटर पासून अगदी बिझिनेस चॅनेल पर्यंत सर्वांना 'मॅनेज' करण्यात येते. त्या सेक्टर आणि कंपनी बद्दल सकारात्मक बातम्या आणण्यात ह्यांचा खूप वाटा असतो.

ज्ञानव's picture

22 Jul 2017 - 1:03 pm | ज्ञानव

कारण फारच वरवरचे लेखन आहे. लेखकाला काय संदेश द्यायचा आहे सामान्य जनतेस कि शेअर मार्केट पासून दूर राहा ? का कारण लेखकाला विश्लेषक काय म्हणतात ते कळत नाही म्हणून ?
आणि तुम्ही विश्लेषकांचे फारच बारकाईने निरीक्षणं केलेले दिसते आहे मात्र त्यासाठी सतत टीव्हीला डोळे लावून बसावे लागत असेल....बरीच मेहनत घेऊन तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहिले.....पण मग आतातरी मार्केट सोडलेत कि नाही.....

सरनौबत's picture

22 Jul 2017 - 3:28 pm | सरनौबत

प्रयोजन म्हणाल तर हवामानखाते आणि ह्या विश्लेषकांत समान धागे आढळले ते (जमेल तेवढ्या) गमतीदार पद्धतीने मांडणे.

एस's picture

22 Jul 2017 - 1:51 pm | एस

छान लिहिलंय.

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2017 - 2:49 pm | श्रीगुरुजी

भांडवली बाजारात पैसे गुंतविताना 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' हे धोरण असावे. वाहिन्यांवरील तज्ज्ञांच्या चर्चा व टीप्स या आपल्या निर्णयाला पूरक म्हणून वापराव्यात. माझे स्वतःचे काही आडाखे आहेत व त्यानुसार मी गुंतवणूक करतो. काहीवेळा तोटा झाला आहे, पण बहुतेकवेळा फायदा झाला आहे. मी अशा चर्चा बघतो, लेख वाचतो परंतु त्यावर पूर्ण विसंबून न राहता स्वतःचे ठोकताळे वापरून निर्णय घेतो.

अमेरिकन त्रिशंकू's picture

22 Jul 2017 - 3:25 pm | अमेरिकन त्रिशंकू

Nobody knows nothing - Jack Bogle - Founder of Vanguard.
It is very hard to make predictions. Especially about the future. - Yogi Berra.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jul 2017 - 5:45 pm | अमरेंद्र बाहुबली

गेल्या जुलैत मि डीमँट खाते उघडून पहिल्यांदाच शेअर्स घेतले. पण घेतांना एकच विचार केला. भाव वाढले तर फायदा होईल. पडले तर अनूभव येईल. नुकसान फक्त अशोक लेलँड मध्ये खाल्ले.पण बाकी शेअर्स कध्ये चांगलाच फायदा झाला. उदा. डीएचएफेल. पण एक मोठा सल्ला मी माझ्या एक वर्षा च्या अनुभवातून प्रत्येक नव्या व्यक्तीला देऊ इच्छितो. पैसे कमावन्याच टार्गेट ईतकच ठेवा. जितकी तुम्ही नुकसान उचलन्याची तयारी ठेवतात..उगाच एखादा शेअर वाढतोय म्हणून घे भरपुर अस नको.
मी नवा आलेला सीडीएसएल त्याच्या 300 ते 400 भावा दरम्यान तीन दा घेतला नी विकला. प्राँफीट झाले.
पण आज त्याच्या पडण्याने मला काही फरक नाही पडला