आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
9 Jul 2017 - 9:53 am

Disclaimer : खालील लेख मिपावरील 'डू आयडी' विषयी नाही.

मी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.

आणि अचानक एक गृहस्थ माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. मला म्हणाले "नमस्कार! कसे आहात तुम्ही?" त्यांच्याकडे मी पाहिले पण माझ्या काही लक्ष्यात येईना की मी पूर्वी त्यांना कुठे भेटलोय ते! बरं त्यांना त्यांची ओळख विचारायला मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. न जाणो खरंच ते माझ्या ओळखीचे असतील आणि मी त्यांना विसरून गेलो असेल, तर उगाच त्या बिचार्यांना वाईट वाटायचं.

मीसुद्धा नमस्कार केला "नमस्कार! काय म्हणताय?" पुढे दोन चार मिनिटे आमच्यात त्या कार्यालयातील असणाऱ्या आमच्या कामाबद्दल सर्वसाधारण बोलणे चालले. पण अजूनही माझी ट्यूब काही पेटेना की मी त्यांना अगोदर कुठे भेटलोय ते! मीसुद्धा भिडेखातर ते गृहस्थ जसे बोलतील तसे त्याला अनुसरून माझे संभाषण सुरू ठेवले.

आणि अचानक त्या गृहस्थांनी मला विचारले "तुमच्या ऑफिसमधले ते अमुक अमुक रिटायर झाले का हो?" मी विचारले "कोण हो?"  गृहस्थ "ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे?" मी "छे हो! अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही?" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले "तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना?" मी "नाही हो! मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय." गृहस्थ "तुम्ही जोशी ना?" मी "नाही हो! मी काळे." गृहस्थ "माफ करा हं! मी तुम्हाला जोशीच समजलो. पण तुम्ही अगदी डिट्टो त्या जोश्यांसारखेच दिसता हो, म्हणून माझा गैरसमज झाला. माफ करा." असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला आणि मी अवाक् होऊन  त्यांना जाताना पहात बसलो.

बऱ्याचदा असे होते की एखादी व्यक्ती आपल्याला कोणीतरी दुसराच समजून आपली त्याच्याशी घनिष्ठ ओळख असल्यासारखी आपल्याशी बोलू लागते. आपली चौकशी करू लागते. आणि आपल्याला जेव्हा समजते की समोरच्याला अपेक्षित असणारी व्यक्ती आपण नाही आहोत, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की त्या व्यक्तीचा आपल्याविषयी गैरसमज कसा काय झाला? आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल? कोण असेल ती? काय करत असेल? असा अनुभव आपल्या सर्वांनाच बहुतेक वेळा आला असेल याची मला खात्री आहे.

असे का होते? याचे उत्तर मी बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते. तेव्हा केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले होते की संपूर्ण जगभरात एकसारखी दिसणारी, एकाच वयाची, एकाच रंगरूपाची आणि अंगकाठीची किमान सात व्यक्ती एकाचवेळी जगत असतात. फक्त त्या सात व्यक्ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्याने आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ न शकल्याने त्यांना समजतच नाही की आपल्यासारखीच दिसणारी जगभरात एकूण सात माणसं फिरताहेत. माझ्या मनात कधी कधी एक गमतीदार विचार येतो, की कदाचित विधाता वेगवेगळे मॉडेल बनवून बनवून आता थकला असेल. त्याची कल्पनाशक्तीसुद्धा आता बोथट झाली असेल. कदाचित कंटाळलाही असेल. म्हणूनच विधाता आता मनुष्यप्राणी बनवायला पुन्हा पुन्हा तोच तो साचा तर वापरत तर नसेल!?

अहो, पूर्वीतर माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की माझ्या भावाने तुला मुंबईत इथे पाहिला, माझ्या बाबांनी तुला मुंबईत तिथे पाहिला. आणि मी तर तिथे तेव्हा गेलेलोच नसायचो. मला फार आश्चर्य वाटायचे. मुंबईत फिरणाऱ्या माझ्या डुप्लिकेटला भेटण्याची तेव्हा मला फार उत्सुकता असायची. पण मला तो कधी भेटला नाही.

हो! माझ्या तरुणपणी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला एक चित्रपट कलावंत मात्र होता. जो अगदी शेम टू शेम माझ्यासारखाच दिसायचा. मी जिथे जाईल तिथे लोकं मला त्याच्या नावाने बोलवायचे. अगदी माझं लग्न ठरलं तेव्हाही माझ्या सासुरवाडीची लोकं एकमेकांना म्हणायची. "आपला होणारा जावई ना, अगदी डिट्टो त्या हिरोसारखा दिसतो हो!!!" हे ऐकले की माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. खी: खी: खी:

असो. आपण नेहमीच वर्तमानपत्र आणि मासिकांत वेगवेगळ्या हिरो हिरोईनच्या डुप्लिकेटचे फोटो पहात असतो. चित्रपटावरून एक आठवलं. १९७८ साली 'नसबंदी' नावाचा आई. एस. जोहर यांचा एक चित्रपट आला होता. ज्यामध्ये पाच नायक होते. पण ते सर्वच्या सर्व त्या काळातील प्रसिद्ध हिरोंचे डुप्लिकेट होते. चित्रपट निर्माते असे डुप्लिकेट कुठून शोधून आणतात कोण जाणे? आमचेच डुप्लिकेट आम्हाला कसे भेटत नाहीत ते!!!

चित्रपटाप्रमाणे राजकारणातसुद्धा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर केला जात होता. मी तर कुठेतरी वाचलं होतं की 'हिटलर'नेसुद्धा आपल्यासारखेच दिसणारे सात आठ हिटलर जमवले होते. अतिमहत्वाच्या व्यक्ती ऐतिहासिक (की पुराण?) काळापासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना फसवण्याकरिता आणि त्यांना नामोहरम करण्याकरिता आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर करीत असत.

पुन्हा असो. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की ह्या भूतलावर आपल्या प्रत्येकाचे सात सात डुप्लिकेट अस्तित्वात आहेत. ना जाणो कधी ते आपल्यासमोर येऊन उभे ठाकतील ह्याचा काय भरवसा? त्यामुळे, जागे रहा. रात्र वैऱ्याची आहे. नाहीतर त्या 'अंगुर' चित्रपटातील संजीवकुमारसारखं आपणसुद्धा इकडचा त्या घरात आणि तिकडचा ह्या घरात अदलाबदली व्हायचो.

माझा ब्लॉग  :  http://sachinkale763.blogspot.in

समाजलेख

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

9 Jul 2017 - 11:35 am | गामा पैलवान

सचिन काळे,

मला ठाण्यातल्या एका हॉटेलातल्या एका पोऱ्याने परळमध्ये तुमच्यासारखा एक माणूस राहतो म्हणून सांगितलं होतं. मी ते ऐकून सोडून दिलं. पण पोऱ्या आग्रही होता. आज वाटतं की पत्ता घेऊन माझ्या प्रतिरुपास भेटायला हवं होतं.

आ.न.,
-गा.पै.

सचिन काळे's picture

9 Jul 2017 - 12:13 pm | सचिन काळे

@ गामा पैलवान, आज वाटतं की पत्ता घेऊन माझ्या प्रतिरुपास भेटायला हवं होतं. >>> हो ना!!!!

लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2017 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

अगदी डिट्टो त्या हिरोसारखा दिसतो हो!!!" हे ऐकले की माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. खी: खी: खी:

मला असं कोणी म्हटले की माझे उत्तर तयार असते... "छे, छे, तोच माझ्यासारखा दिसत असेल." ;) :)

सचिन काळे's picture

9 Jul 2017 - 10:10 pm | सचिन काळे

@ डॉ. सुहास म्हात्रे, मला असं कोणी म्हटले की माझे उत्तर तयार असते... "छे, छे, तोच माझ्यासारखा दिसत असेल. >>> मस्तं उत्तर!!!

लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

कपिलमुनी's picture

10 Jul 2017 - 12:04 am | कपिलमुनी

लेख लिहिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

रुपी's picture

10 Jul 2017 - 2:20 am | रुपी

:)

बाकी ते, जगात एकसारख्या सात व्यक्ती असतात हे 'जानेमन' नावाचा एक महान सिनेमा बघून समजले होते ;)

जुइ's picture

10 Jul 2017 - 2:42 am | जुइ

;-) लेख आवडला!

योगी९००'s picture

10 Jul 2017 - 10:05 am | योगी९००

लेख आवडला!!

फार पुर्वी एका लग्नाला गेलो असता काही छोट्या मुली(७-८ वर्षाच्या) मला बघून काहीतरी कुजबुजत होत्या. मी त्यांना विचारले तर त्यांनी विचारले की तुम्ही कुठल्यातरी सिरीयल मध्ये शंकराचा रोल करत आहात ना....खरे म्हणजे मला ती सिरीयल माहित नव्हती. नंतर खास त्या सिरीयलचा एक एपिसोड पाहिला पण मला स्वत:ला त्या शंकराच्या रोल करणार्‍या अभिनेत्यामध्ये आणि माझ्यामध्ये अजिबात साम्य वाटले नाही (रंग सोडून....). याचा अर्थ तुमचे रुप हे बघणार्‍याच्या द्रुष्टीमध्ये जास्त असते.

हो! माझ्या तरुणपणी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला एक चित्रपट कलावंत मात्र होता. जो अगदी शेम टू शेम माझ्यासारखाच दिसायचा.
कोण वो तो चित्रपट कलावंत...

सचिन काळे's picture

10 Jul 2017 - 6:52 pm | सचिन काळे

@ कपिलमुनी, रुपी, जुइ, योगी९००, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

कोण वो तो चित्रपट कलावंत... >>>> मोहन गोखले.

आणि हा माझ्या तरुणपणीचा फोटो.

अभ्या..'s picture

10 Jul 2017 - 7:00 pm | अभ्या..

अरे वा, शेम टू शेम मिस्टर योगीच की.
जर्रा नाकात फरक आहे पण ते मोट्ठे तपकीरी डोळे, जिवणी, गालाची हाडे, सडपातळ बांधा अन केस १०० परसेंट मोहन गोखले.

सचिन काळे's picture

10 Jul 2017 - 7:26 pm | सचिन काळे

@ अभ्या, धन्यवाद! *pleasantry*

mayu4u's picture

11 Jul 2017 - 10:01 am | mayu4u

माझ्याच सारखा दिसणारा एकजण आमच्या दहिसरातच राहतो, असं एकमेकांना अजिबात न ओळखणाऱ्या माझया दोन परिचितांनी मला सांगितलंय. ख खो दे जा!