आळशांची कहाणी (अंतिम भाग )

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जनातलं, मनातलं
7 Jul 2017 - 2:25 pm

उद्घाटनाच्या दिवशीचा कार्यक्रम खालील प्रमाणे होता. :-

१) दरवाजावरची फीत कापणे.

२)राजेसाहेबांचे स्वागत व सत्कार

३)राजेसाहेबांचे भाषण

४)पदवीदान समारंभ

प्रथम मुख्य शृंगारलेल्या दरवाजाला लावलेली फीत राजेसाहेबांनी कात्रीने कापून विद्यालयाचे उद्घाटन झाल्याचे स्वतः जाहीर केले. मग राजेसाहेबांचा थोडक्यात परिचय प्राचार्यांनी करून दिला. तेच कसे योग्य राजे आहेत हेही विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवले. इतर विद्यार्थी व पदवीची अपेक्षा करणारे विद्यार्थी आपापल्या बिछान्यांना व्हील चेअर सारखी चाके बसवून , ते ढकलत तिथे आलेले होते. पदवी दान समारंभ साधारणपणे दोन तीन वर्षांपूर्वी जे उत्तीर्ण झाले होते त्यांचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गळ्यात पदवीचा पट्टा व डोक्यावर टोपी घातली गेली. परंतू, राजेसाहेब, प्राध्यापक व प्राचार्य मात्र उभे राहून पदवी दांकरीत असल्यामुळे त्यांची छायाचित्रे बाजूच्या राज्यातील वर्तमान पत्रात "चुकून उद्योगात गढलेले राजे " अशा मथळ्या खाली आले होते. या सर्व कार्यक्रमांना वेळेचे बंधन नसल्यामुळे दुसऱ्या राज्यातून चोरून आलेलया छायाचित्रकारांची मोठीच सोय झाली होती. ते छायाचित्र काढल्यावर राज्याच्या सीमेवर जाऊन बसत. राजधानीमध्ये कित्येक दिवसापासून रोषणाई होती. वीजही बाजूच्या राज्यातून चोरून घेतली होती.

मग राजेसाहेब भाषणास उभे राहिले. ते उभे राहताच विद्यार्थ्यांसहित सगळ्यांनी झोपेत असले तरी एकेक डोळा उघडून टाळ्यांचा कडकडाट केला व पुन्हा झोपण्यासाठी सिद्ध झाले. (म्हणजे निद्राधीन झाले. ) काही झोपणारे एवढे प्रविण होते की , त्यांचे घोरणे एका लयीत होत होतं आणि एखाद्या पार्श्वसंगितासारखा त्याचा "इफेक्ट " (परिणाम नाही) होत होता. तो ऐकून राजेसाहेबांचा ऊर अगदी भरून आला. आळसाबद्दलची एवढी आस्था आणि त्यावर मिळवलेलं प्राविण्य (म्हणजे कमांड , इंग्रजी अर्थ लवकर कळतो. ) पाहून त्यांना पुढिल पिढ्यांची काळजीच वाटेनाशी झाली. राजेसाहेबांनी आपला वंश कसा शुद्ध आळशांचा आहे याचे पाल्हाळ लावले. घोरण्याच्या पार्श्वसंगिताची जोड असल्याने भाषण फारच रंगू लागले. त्यांचे भाषण त्यांच्याच शब्दात ऐका.

"प्रजाजनहो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अजून कितीतरी पिढ्या हा आळशीपणाचा गूण आपल्याकडे टिकेल व उत्तरोत्तर तो वृद्धिंगत होत जाईल अशी खात्री मला वाटते. आपल्या राज्यात जातियता नाही. आपल्याकडे दोनच जाती आहेत. एक "आळशी " आणि दुसरी "उद्योगी". परंतु उद्योगी जमात पुर्णपणे कारागृहात असल्याने आपल्या शुद्ध वंशीय आळशी माणसांना घाबरण्याचे कारण नाही. या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा पारंपारिक धंदा विचारला जात नाही. ज्ञानमार्ग सर्वांसाठी खुला आहे. येथे राखीव जागा नाहीत. तसेच जे उद्योगी पुरुष कारागृहात आहेत त्यांच्या बायका मुलांसाठी स्वप्रशिक्षित करणारी केंद्रे उभारली आहेत. त्यात ते स्वतः जाऊन स्वतःच आळशीपणाची दिक्षा घेऊ शकतात. मागच्या वर्षीच्या खानेसुमारी प्रमाणे राज्यात आता कोणीही उद्योगी माणूस नाही हे मी आज अभिमानाने सांगू शकतो. आळशी पणाच्या वाईट सवयीना इतर राज्यातील हरामखोर उद्योगी लोक नाव का ठेवतात काही कळत नाही. चांगल्या सवयी लावून घ्यायला फार वेळ लागतो . वेळेचा अपव्यय होतो. अर्थातच वेळ ही चौथी मितीच आपण काढून टाकलेली आहे. म्हणुनच माझ्या नजरेला काही वयस्क विद्यार्थीही (वृद्ध , नाही. त्याने वयाचा अंदाज येतो. व गणना होते. ) दिसतायत. ज्ञानार्जनाला वयाची अट नसते असं कोणी तरी म्हंटलच आहे. असो.

येथे , भोळ्या , सरळमार्गी माणसांची मुले जितकी सहज शिकतात, तितकीच , चोर दरोडेख्रोर स्मग्लरांचीही शिकतात. सर्वजण समान आहेत. स्त्री पुरुष हा भेदही आम्ही नष्ट केला आहे. भेद फक्त एकच आहे , "आळशी किंवा कमी आळशी. कृपा करून उद्योगी हा शब्द वापरू नका. सर्व प्रकारच्या धंद्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे अर्हता प्राप्त (त्याच्या धंद्यातली) विद्यार्थ्याला परदेशी जाऊन नोकरी अथवा धंदा करण्याची गरज पडणार नाही . आपण घेतलेल्या सर्व पदव्या नावापुढे लावता येतील. अशी कायदेशीर तरतूद आहे. सगळ्या धंद्यांमधल्या पदव्या उपलब्ध आहेत. समजा, एखाद्या चोराच्या मुलाने , "अट्टल चोर" ही नवीन पदवी आपल्या विद्यापिठातून मिळवली तर तो मुलगा " चौर्यकर्म प्रविण "अशी पदवी त्याच्या नावापुढे लावू शकतो. "अट एकच आहे, आळशीपणा वृद्धिंगत व्हावा. पदव्या संक्षिप्त स्वरूपात लिहिताना काळजी घ्या. एखाद्या जुन्या जातियता वादी माणसाच्या भावना दुखावतील. अर्थातच , आम्हाला त्याची काळजी नाही. कारण आपण आळशी आहोत. आळस ही आपली पूर्वापार जपत आणलेली संस्कृती आहे.

इतर राज्यांत मंदीच्या लाटा आल्या पण आपल्या राज्याला त्याची झळ पोचली नाही. पोचणारही नाही. (वाक्य चांगले असल्याने टाळ्या हव्या होत्या. पण बहुतेक जण झोपल्याने त्या वाजवणार कोण ? जे जागे होते ते आळशी होते. म्हणून प्रशासनाने टाळ्यांची ध्वनिमुद्रिका लावली ) नवीन पदवी "चौर्यकर्म प्रवीण " हिला बाजूच्या राज्यात मागणी जास्त असल्याने व आपल्याकडे चोरी नियमित करणे हा उद्योगी पणा असल्याने शिक्षेस पात्र आहे व त्याने आळशी कायद्यांच्या तरतुदी पराभूत होतात असे दिसल्याने आपल्या राज्यातील चोरांना शेजारील राज्यात चोरी व अन्य पूरक उद्योग (म्हणजे अलाईड उद्योग) करण्याची अट घातली आहे. त्याने आपल्या राज्याला परकीय चलन आपोआप मिळते व त्याचा साठा वाढतो. आपल्या राज्याला आज मितीस एका पैशाचेही कर्ज नाही. मंदी तर नाहीच नाही. अशा या धंदेवाईक चोरांना पारितोषिकेही ठेवलेली आहेत. ती त्यांना घरी पोचवली जातील. त्यात काही खास शस्त्रे आहेत. तर काही रोकड बक्षिसेही आहेत.

असो. आता शेवटी एकच सांगतो. सर्वांनी मिळून माझ्या बरोबर म्हणायच आहे . "आळस हाच आमचा खरा मित्र आहे. आळशी संस्कृतीचा विजय असो. मला तिचा अभिमान वाटतो. " नगररक्षक काही सेकंदांसाठी आळसाने झोपलेल्यांना उठवण्याचा प्रमाद करतील, जो त्यांना क्षम्य आहे. मग वरील घोषणा झाल्यावर आळसा वर केलेले दोन ओळींचे काव्य माझ्या सोबत म्हणतील व पुन्हा झोपतील.

"आळसदेवा, आळसदेवा टाक झाकुनी दृष्टी तुझी ही "
जागा होण्या नको तडफडू, निजुनची सगळे साध्य करी

नंतर समारंभ संपल्याचे घोषित झाले. भोजन व्यवस्था होती. पण सगळेच झोपेत असल्याने त्यांची भोजनपात्रे घरपोच करण्यात आली. अर्थातच, जेव्हा जमलं तेव्हा. मग राजेसाहेब व इतर प्रजाजन व उपस्थित प्राध्यापक विद्यार्थी आपापल्या घरी प्रस्थान करते झाले.

अशी ही आळसाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

आभार, मित्रांनो, आभार. ही कहाणी वाचण्याची घाई करू नका.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

सोमनाथ खांदवे's picture

8 Jul 2017 - 10:31 pm | सोमनाथ खांदवे

यव्हढा अवघड BA चे प्यपर नै गेले

सोमनाथ खांदवे's picture

8 Jul 2017 - 10:32 pm | सोमनाथ खांदवे

यव्हढा अवघड BA चे प्यपर नै गेले

अरूण गंगाधर कोर्डे's picture

9 Jul 2017 - 12:44 pm | अरूण गंगाधर कोर्डे

महाराजांच्या काळात शिक्षणाचा दर्जा चांगला असावा, आळशी होते तरी. चुकून दोन वेळा तोच प्रतिसाद दिला गेला आहे का ? तरीही प्रतिसादाबद्दल आभारी आहे.