किस्से गोवा ट्रिपचे- भाग १

पी. के.'s picture
पी. के. in जनातलं, मनातलं
3 Jul 2017 - 3:40 pm

कॉलेजचे दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील असा सुवर्ण काळ असतो कि कितीही काळ निगुन गेला तरी एकादी पुसटशी आठवण देखील आपल्या चेहेरयावर स्मित आणते. आज इतक्या वर्षा नंतर देखील कॉलेज च्या दिवसात मित्रानं बरोबर घालवलेला क्षण अन क्षण जसाच्या तसा आठवतोय आणी आठवतंय ती गोव्याला केलेली भन्नाट ट्रिप.

तर प्लॅन असा होता कि कुणीही घरी गोव्याला जातोय म्हणून सांगायचे नाही (कारण परवानगी मिळालीच नसती) त्या ऐवजी दोन दिवस भैरवगडला ट्रेकिंगला जातोय म्हणून परवानगी घ्यायची. आम्या, पप्प्या, नाना, दिप्या, मह्या, पी. जे. आन्या आणि मी ( पी.के.) आशा आठ जणांना आपापल्या घरून ट्रेकिंगला जायची परवानगी मिळाली. प्रवासासाठी ट्रॅक्स ठरवली. वीस वर्षाचा असणारा आमचा ड्राइवर पण एक नमुनाच होता ( कसा ते पुढे कळलचं). ट्रॅकिंगला जाणार त्यामुळे घरी ज्यादा पैसे पण मागू शकत नव्हतो त्यामुळे जे गरजेचे सामान आहे ते घरातून बरोबर घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

पहाटे सहाला आम्ही आठजण, ड्राइवर नऊ, दोन जिवंत कोंबड्या आकरा असे अकरा जिव सोबत तीन डझन अंडी, पोहे, तांदूळ, कांदे, लसूण, मीठ, मसाला,.......रॉकेलचा स्टोव्, पातेले, पळी,चमचा ...... चहा पावडर, दूध पावडर, मिरची पावडर..... अंथरून, पांघरून, टॉवेल, लुंगी.....असा संसार सेट घेऊन आम्ही आम्हच माहेर सोडलं.

फास्ट फॉरवर्ड... दुपारी बाराच्या दरम्यान गोव्याच्या भूमीत प्रवेश केला. पोटशांती करण्यासाठी दोन पैकी एका कोंबडीचा बळी नऊ मतांनी एकमत झाला. कोंबड्यांच मत विचारात घेतला नाही नाहीतर तर त्यांनी पण आमचा कोच्या मोच्या करा म्हणून ना हरकत प्रमाणपत्र दिलं असतं. (कोच्या मोच्या= ठार मारा पण हाल नको). पाण्याची आणी जळणाची व्यवस्था बघून आम्ही चूल मांडली उद्देश एकच रॉकेल वाचवून कॉस्ट कटिंग करायचे. पोटभर जेवण करून पुढचा प्रवास सुरु.

फास्ट फॉरवर्ड... गोवा फिरून कंटाळलेलो आम्ही अंधार होतच राह्यच्या सोयीची आरेंगमेंट कमी पैशात काय होतंय का ते पाहायला लागलो.एका लॉज वाल्यानी टेरिसवर जेवण करायची आणी झोपायची परवानगी दिली.
एका बाजूला जेवण बनवायचं चालू होता आणी दुसऱ्या बाजूला आम्ही बसलो होतो. गावाकडे घरापासून पाच किलोमीटर दूर जाऊन, एक बिअर चार जणात घेऊन, वास येऊ नये म्हणून पुदिना हरा गोळी तोंड़त फोडणारे बिचारे आम्ही त्या दिवशी सर्व लिमिट क्रॉस करायच्या तयारीनी बसलो. सोबतीला चकणा म्हणून अंडी होतीच.
चिल्ड बिअर घेणाऱ्या आम्हला हॉट व्हिस्की ने तिचे प्रताप दाखवायला सुरवात केली. तिनं पाच इंद्रिया पैकी जिभेवर ताबा घेऊन बाकीच्या चार इंद्रियाना वाऱ्यावर सोडलं. व्हिस्की बोलायला लागली, व्हिस्की नाचायला लागली आणी नंतर लोळायला पण लागली. कसंबसं जेवण करून आडवं झालो. लिमिट क्रॉस झाली होती. पायाला धरून कोणी तरी गरगर फिरवतंय असा भास होतं होता. स्वतःला व्हिस्कीच्या स्वाधीन करून झोपी गेलों. रात्री १२ पर्यंत सर्व ठीक चालू होतं आणी.......
किस्सा पहिला...
सर्व जण झोपेतून जागे झालो ते ड्राइवरच्या ठो ठो बोंबलण्यामुळे. त्याला काय चावलं कुणालाच समजेना.
दिप्या:- काय झालाय रं बोंबलायला.
ड्राइवर:- हात निसटलाय.
दिप्या:- पिक्या हात निसटलाय मंजी रं काय झालीय याला.
मी :- आरं खेळताना वगैरे हाताला झटका बसला तर हाताचं हाड खांद्याच्या जॉईंट मधून डिसलोकेट होतं त्याला हात निसटणे असं म्हणतात. ( अशी व्याख्या सांगून टाकली)
दिप्या:- ह्यो, एवढ्या रात्री हाताला झटका बसण्यासारकं काय खेळात होता.

ड्राइवर ची थोडी विचारपूस केल्यावर त्यानं सांगितलं कि हा त्याचा नेहमीच प्रॉब्लेम हाय. निसटलेला हात पहिलवान लोक बसवतात अशी आमच्या ज्ञानातं त्यानं भर पण घातली.

फास्ट फॉरवर्ड... त्याला उचलून गाडीत घटला. एकानं ड्राइवर सीट घेतली. निसटलेला हात एका ठरविक अँगल मध्ये पकडून ठेवायची महत्वाची जबाबदारी माझाकडे दिले कि जेणेकरून त्याला कमीत कमी वेदना होतील. आधीच माझा माझ्या हातावर ताबा नव्हता. आधी मी माझे हात सांभाळायचे आणि नंतर त्याचा हात सांभाळायचा अशी डबल कसरत मला करायला लागायची. हरकुलसला पृथ्वी उचलायला एवढा त्रास झाला नसेल एवढा त्रास मला एक हात उचलताना होत होता. मी माझा सगळा जिव माझ्या हातात एकवटून त्याचा हात पकडला होता. पण त्यामुळे माझ्या मानेतून जिव निगुन जायचा आणि माझेच डोकं त्याच्या हाड डिसलोकेट झालेल्या खांद्याच्या जॉईंट वर आपटायचं. परत हा बाबा दुसऱ्या हातानी ठो ठो. वाटायचं दोन्ही हात एकदम निसटले असते तर बरं झाले असतं.
अशा आवस्तेत आमची वरात निघाली. रस्त्यात कुणी माणूस दिसला कि आमचा एकच ठरलेला प्रश्न " काका, पहिलवान किदर मिलेगा" आणि समोरच्याचा ठरलेला प्रतिप्रश्न " इतनी रात को पहिलवान क्यू चाहिये तुमको'.

फास्ट फॉरवर्ड... सरकारी दवाखान्यात एक्स रे कडून डॉक्टरांनी हात बसवला हे मला दुसऱ्या दिवशी समजले. माझी आवस्था आणि माझ्यामुळे होणारी ड्रायव्हरची आवस्था या मुळे रिटायर्ड हर्ट घोषित करून मित्रांनी मला मागच्या सीट वर झोपायची परवानगी दिली होती.

एकाच ट्रिप मध्ये असे चार किस्से झाले. पुढचे तीन किस्से पुढच्या भागात...

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

गोव्यात काय करायचं ठरवलं होतं आणि ते झालं का याची उत्सुकता वाढली.

सुमीत's picture

3 Jul 2017 - 7:25 pm | सुमीत

बापरे, उत्सुक वाचायला

स्वच्छंदी_मनोज's picture

3 Jul 2017 - 7:54 pm | स्वच्छंदी_मनोज

भारी किस्से घडलेत..पण

त्याला उचलून गाडीत घटला. एकानं ड्राइवर सीट घेतली >> सगळेच असे तरंगत असताना रात्री गाडी चालवणेपण केवढे रिस्की होते त्याचा विचार करा :)

आत्ता जाणवतंय, मूर्खपणा होता तो.

घरी न सांगता गोव्याला गेलात. परत असे करु नका. रस्त्यात काय प्रसंग सांगून येतात का. घरच्यांना कसे कळेल कुठे आहात ते.

ज्योति अळवणी's picture

5 Jul 2017 - 11:28 am | ज्योति अळवणी

झक्कास. पुढचा भाग लवकर टाका. बाकी कॉलेज मध्ये असताना न सांगता सिनेमा बघणं, मिड टर्म बंक करणं वगैरे प्रकार केलेत. पण मुलींना बाहेरगावी जाण्याची परवानगी नव्हती. ट्रेक असला तर तो बंधुराजांबरोबरच अशी अट होती.

नूतन सावंत's picture

5 Jul 2017 - 10:32 pm | नूतन सावंत

पुढचे किस्से वाचायला आवडतील,लवकर टाका,आणि घरी न सांगता कुठंही जाऊ नका,खी घडलंच तर जाणाऱ्याला एक वाट आणि शोधणार्याला हजार वाटा अशी गत होते.