आज 'सांजाव' चा उत्सव गोव्यात साजरा होतोय. एक वेगळाच खास गोवन ख्रिस्ती उत्सव. 'सेंट जॉन' चा अपभ्रंश सांजाव. घरोघर सांजाव सांजाव ओरडत पैसे/दारू मागायची, डोक्यावर पावसाळी वनस्पतींचे मुकुट घालून माडाचे 'पिराडे' (झावळीला माडाशी जोडणारा भाग) ठोकत फिरायचं, आणि शेवटी विहिरीत, तळ्यात नाहीतर चिखलात उड्या घेऊन मनसोक्त भिजून/बरबटून. घ्यायचं. असा हा पावसाळी उत्सव.
आमच्या घरी एकदाच एक माणूस सांजाव ओरडत आला होता. खास गोवन काळी तुकतुकीत त्वचा, डोक्यावर चक्क काटेरी शतावरी गुंडाळलेली, असं ते ध्यान आलं. मुळात तर्र होऊन आला होता. पिराडा ठोकत ठोकत त्याने गाणी म्हटली, पैसे घेऊन निघून गेला.
त्यानंतर त्या मधेच उगवणाऱ्या माणसाचं नावच सांजाव पडून गेलं. कायम नशेत यायचा. काही काम आहे का म्हणायचा. पावसाळ्यातली काहीबाही कामं असायचीच, तो निमूटपणे करायचा. पैसे घेऊन निघून जायचा. पैसे घेऊन हा दारूवर उधळणार म्हणून आई वैतागायची. त्याला खायला द्यायची. आमचं ब्राह्मणी जेवण त्याला जात नसेल, पण खायचा बापडा.
बाकी तो फुल करमणूक वाटायचा मला. त्या सांजावच्या दिवशी त्याने गाणी म्हटलेली असल्याने तीच प्रतिमा डोळ्यात बसली होती.
एकदा असाच आला, आणि चहा पीत गप्पा ठोकत बसला होता. मला बघून बाबांना म्हणाला, 'येदेच आशिल्ले म्हजे चली, देवान व्हेले, बायल व्हेली'(एवढीच होती माझी मुलगी, देवाने नेली. बायकोलाही नेलं).
पुढे काही दिवस सांजाव आला. आणि नंतर कधीच दिसला नाही. दारू पिऊन पिऊन गेला असेल बिचारा. पण त्याचं ते वाक्य मला अजून आठवतं. कायम दारूच्या नशेत असणारा सांजाव आठवतो. आता कळतं दारूच्या नशेत का असायचा..
आज सांजावचा उत्सव आहे. फेसबुकवर फोटो बघून आमचा सांजाव आठवला, आणि त्याचं ते वाक्य-देवान व्हेले..
प्रतिक्रिया
24 Jun 2017 - 4:08 pm | विनिता००२
वाईट वाट्लं सांजावबद्दल!
24 Jun 2017 - 4:35 pm | संजय पाटिल
अरेरे... :(
24 Jun 2017 - 4:57 pm | जेम्स वांड
एकदा असाच आला, आणि चहा पीत गप्पा ठोकत बसला होता. मला बघून बाबांना म्हणाला, 'येदेच आशिल्ले म्हजे चली, देवान व्हेले, बायल व्हेली'(एवढीच होती माझी मुलगी, देवाने नेली. बायकोलाही नेलं).
तुमच्या सांजाव बद्दल होत असलेली धारणा ह्या एका वाक्याने खळकन्न फुटली बघा. त्याच्या दारुडेपणाचा राग म्हणता म्हणता एकदम करुणा दाटून आली.
तुमच्या आयुष्यात सांजाव आला तेव्हा तुम्ही फार नाही तर अल्लड छोट्या वयाच्या होतात असे लेखावरून जाणवले (चुकही असेल ही धारणा पण मुद्दा तो नाही) अन एकदम मालगुडी डेज मधला 'लिलाज फ्रेंड' हा एपिसोड आठवला बघा. सांजावचं पात्र वाटलं एकदम त्या भागातल्या 'सिद्धा' पात्रासारखं
24 Jun 2017 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा
हे थोडसं शिमग्याला शंकासूर आणी खेळीये येतात कोकणात. तसं वाटलं.
24 Jun 2017 - 6:46 pm | ज्योति अळवणी
मनाला स्पर्शून गेला सांजाव
24 Jun 2017 - 6:48 pm | प्रीत-मोहर
तुझ्या सांजावबद्दल तुटलं काहीतरी उरात.।
पण त्या सोबत गावातल्या सांजावाच्या आठवणीही आल्या. जंगलात जाऊन वेगवेगळ्या पानाफुलांचे टियारा करायची शर्यत असायची मुलींची. कुणाचा छान दिसतो. छान छान विस्तिज घालुन त्यावर ते टियारा घालुन मिरवायचं. मज्जाच.
यंदा म्हणावा तसा पाऊस नसल्याने कसा साजरा केला असेल सांजाव?
24 Jun 2017 - 9:34 pm | नंदन
स्फुट आवडलं.
(अवांतरः जॉनच्या हुआन, जीन, इव्हान, जॅक अशा अनेक आवृत्त्या आहेत. सांजावची खुमारी मात्र निराळीच - काव्यात्म क्रियापदासारखी.)
25 Jun 2017 - 1:29 am | पद्मावति
एवढीच होती माझी मुलगी, देवाने नेली. बायकोलाही नेलं
वाईट वाटले :(25 Jun 2017 - 1:42 am | डॉ सुहास म्हात्रे
पहिल्यांदा "गोव्याची गटारी" असा विचार मनात आला, पण लेखाच्या शेवटाला एकदम हृद्य वळण आले नी मूड १८० अंशांनी बदलला !
25 Jun 2017 - 4:54 pm | पिशी अबोली
प्रतिसादकांचे धन्यवाद.
26 Jun 2017 - 4:02 am | एस
आजूबाजूचे काही असेच 'सांजाव' आठवले!
खूप छान लिहिलेलं स्फुट.
5 Jul 2017 - 10:40 am | amolbirar
मिनी आणी काबुलीवाला आठवण झाली
5 Jul 2017 - 11:37 am | पिशी अबोली
धन्यवाद!
5 Jul 2017 - 11:49 am | गामा पैलवान
पिशी अबोली,
सांजाव सांजवेळेसारखी उदास करून गेली. :-(
वारकऱ्यांत दारू का पीत नाहीत ते लक्षात येतं.
आ.न.,
-गा.पै.
5 Jul 2017 - 12:31 pm | सूड
.
7 Jul 2017 - 11:07 am | पैसा
छान लिहिलंय.