निर्गमन केल्यानंतर नव्या भूप्रदेशात जर व्यक्तीच्या इच्छा आकांक्षांना हवे तसे वातावरण मिळाले तर व्यक्ती तिथेच स्थायिक होणे स्वाभाविक असते. मातृभू / पितृभू यांची ओढ असली तरी बसलेले बस्तान मोडून अश्या व्यक्तींनी केवळ मातृभूमीप्रती प्रेमापोटी किंवा कर्तव्यापोटी परत यावे अशी अपेक्षा धरणे म्हणजे त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखे आहे. इजिप्त सोडून इझराईलला गेलेले ज्यू लोक, अरबस्थान आणि मध्य आशियाचा वाळवंटी प्रदेश सोडून भारतात आलेले मुस्लिम लोक, युरोप सोडून अमेरिकेला गेलेले ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीझ आणि स्पॅनिश लोक, फाळणीनंतर ब्रिटन आणि अमेरिकेत गेलेले पंजाबी आणि गुजराथी लोक, फाळणीनंतर भारतात आलेले सिंधी लोक, सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आशियात स्थायिक झालेले तामिळ आणि मल्याळी लोक, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय विद्यापीठातून उच्चविद्याविभूषित होऊन परदेशात स्थायिक झालेलया डॉक्टर, इंजिनियर लोकांचा भारताने अनुभवलेला ब्रेनड्रेन किंवा मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नईसारख्या मायावी महानगरात स्थायिक होणारी खेडेगावातील असंख्य लोकांची गर्दी ही सर्व यशस्वी निर्गमित लोकांची उदाहरणे आहेत. हे लोक नव्या जगात आपल्या काही जुन्या चालीरीती जिवंत ठेवतील, आपला गाव किती छान याबद्दल चार टिपे गाळतील, आपल्या गावाला वर्षातून एखाददोन भेटीदेखील देतील. पण नवे जग सोडून पुन्हा जुन्या गावी परतण्याचा विचार त्यांच्या मनातही येणार नाही. आपल्या यशात स्वकर्तुत्वापेक्षा नव्या जगाने दिलेल्या संधींचा वाटा अधिक आहे आणि आपण उपलब्ध संधींचा पुरेपूर वापर करून घेऊ शकत असलो तरी स्वतः संधी तयार करणे आपल्याला शक्य होणार नाही, याची जाणीव त्यांना सोडून आलेल्या जगाकडे परतण्यापासून रोखत असते.
याउलट निर्गमन करून जिथे गेलो तिथे जुन्या चालीरीती आणि जीवनपद्धती सोडून नव्याचा स्वीकार केला तरीही जर यश मिळाले नाही तर मातृभूमीला परतण्यापेक्षा अजून कुठल्या नवीन भूप्रदेशात निर्गमन करणेच अनेकांना श्रेयस्कर वाटू शकते. कारण मागे फिरणे म्हणजे आपल्याबरोबर न आलेल्या आप्तस्वकीयांना तोंड देणे पराभूतांसाठी नरकयातनेसमान असते. चालीरीती, परंपरा आणि प्रथा सोडून यशस्वी होऊन एखाददोन दिवसांसाठी परत आलेल्या व्यक्तीला कुणी जाब विचारत नाही पण जर ती व्यक्ती अयशस्वी ठरली असेल तर मात्र, आपल्या वाडवडिलांच्या परंपरा नाकारणे हेच त्याच्या पराभवाचे आणि स्वप्नभंगाचे सर्वात महत्वाचे कारण मानले जाते. पराभवाचे प्रतीक म्हणून आपल्या समाजात राहण्यापेक्षा अश्या अयशस्वी निर्गमित व्यक्ती, निर्गमित समाजात जिवंत प्रेते बनून दुय्यम जीवन स्वीकारतात किंवा मग निर्गमनासाठी अजून कुठलातरी नवा भूप्रदेश शोधतात. चित्रपट व्यवसायाच्या झगमगाटाला भुलून घर सोडून आलेले आणि त्या मायानगरीत बिनचेहऱ्याने राहून आपल्या स्वप्नांना रोज जळताना पाहणारे लोक; अभिनय, मॉडेलिंग किंवा फॅशन व्यवसायातील 'घी देखा मगर बडगा नाही देखा' अश्या स्थितीमुळे शेवटी शरीरविक्रयाकडे वळलेले लोक; नोकरी सोडून धंद्यात पडलेले पण धंदा म्हणजे काय ते कळले नसल्याने बुडीत खाती जाऊन थातुर मातुर कामे करून उपजीविका करणारे लोक; परदेशात किंवा परधर्मात दुय्यम स्थान घेऊन गप्प राहणारे लोक ही सर्व अयशस्वी निर्गमित व्यक्तींची उदाहरणे आहेत.
म्हणजे यशस्वी असोत किंवा अयशस्वी, पण निर्गमित व्यक्तींचे स्वगृही पुनरागमन जवळपास अशक्यप्राय असते किंवा झालेच तर ते त्यांच्या आयुष्याच्या बहराचा काळ ओसरल्यानंतर होते. आपल्या कारकिर्दीच्या ऐन बहरात निर्गमित व्यक्तींचे स्वगृही पुनरागमन ही केवळ कवी कल्पना आहे. असे असूनही भारतीय इतिहासात ब्रिटिश राज्याच्या काळात अनेक व्यक्तींनी पुनरागमन केल्याचे दिसते. किंबहुना भारतीय स्वातंत्र्यलढ्याने जोर पकडण्याच्या आणि हा लढा यशस्वी होण्याच्या कालखंडात; राजकीय, आर्थिक, लष्करी आणि सामाजिक या सर्व आघाड्यांवर भारतीयांचे नेतृत्व करणारे जवळपास सर्व लोक हे पुनरागमित व्यक्ती होते. मग हे झाले कसे? इतके सारे लोक आपल्या आयुष्याच्या बहराच्या काळात निर्गमित प्रदेश सोडून भारतभूमीत परत आले कसे? देश आणि देशबांधवांबद्दल असलेले त्यांचे प्रेम त्यांना परत खेचून आणण्यास कारणीभूत ठरले असे मानण्यासाठी माझे भाबडे मन एका पायावर तयार असले तरी त्या मान्यतेमुळे अनेक नवीन प्रश्न तयार होतात. देशबांधवांबद्दल आणि देशाबद्दल इतके उत्कट प्रेम असलेले नेते ज्या देशात जन्मू शकतात तो देश इतकी वर्षे परकीयांच्या अमलाखाली कसा राहिला? इतक्या उत्तुंग नेत्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या, त्यांच्या आदेशासरशी तुरुंगवास पत्करणाऱ्या जनतेने, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्वार्थलोलुप नेत्यांना कसे काय निवडून दिले? स्वातंत्र्य चळवळीत एकत्र झालेला हा भारतीय समाज, स्वातंत्र्यानंतर महापुरुषांचीदेखील जातीधर्माच्या आधारावर विभागणी करून घेण्याइतपत कसा काय विभागला गेला? आणि स्वातंत्र्यपूर्व काळात दिसून येणारे हे प्रेरणादायी देशप्रेम लगेच पुढच्या पिढीत लोप पावून भारताला ब्रेनड्रेनला सामोरे का जावे लागले? स्वदेस चित्रपटाच्या नायकाप्रमाणे कितीजण भारतात परतले? आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाने अश्या किती पुनरागमित व्यक्तींचे नेतृत्व मान्य केले? या सगळ्या प्रश्नचिन्हांचा गुंता सोडवत बसल्यावर निघणारे निष्कर्ष अंतिम नसले तरी माझ्यासाठी धक्कादायक ठरतात.
हे निष्कर्ष मांडण्याआधी भारतीय समाजाची मला जाणवलेली वैशिष्ट्ये आणि पश्चिमी देशांच्या इतिहासाशी त्याची थोडक्यात तुलनात्मक मांडणी पुढच्या भागात करतो.
प्रतिक्रिया
23 Jun 2017 - 6:35 pm | मुक्त विहारि
देशबांधवांबद्दल आणि देशाबद्दल इतके उत्कट प्रेम असलेले नेते ज्या देशात जन्मू शकतात तो देश इतकी वर्षे परकीयांच्या अमलाखाली कसा राहिला?
१००० वर्षाची गुलामगिरीची सवय आणि हिंदू कधीच एकाच व्यासपीठावर एकत्र येवू शकत नाहीत. "पाकिस्तानच्या स्वातंत्र्यामुळे भारत स्वतंत्र झाला. " (हे वाक्य जरा धाडसाचे आहे पण..... हिंदूंपेक्षाही मुस्लिमांना वेगळ्या राष्ट्राची आंस जास्त होती, आहे आणि राहील. जिना आणि ओवेसी व्हाया दाऊद, असा अभ्यास केल्यास हेच डोळ्यासमोर राहते. शिवाय फाळणीपुर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, लोकसंख्येच्या प्रमाणांत, घटणारी हिंदूंची संख्या हा मूद्दा पण लक्षांत घेतल्यास उत्तम )
इतक्या उत्तुंग नेत्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या, त्यांच्या आदेशासरशी तुरुंगवास पत्करणाऱ्या जनतेने, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्वार्थलोलुप नेत्यांना कसे काय निवडून दिले?
मध्यमवर्गीय आणि सुसंस्कारीत मनुष्य उमेदवारीपासून पासून २ हात दूरच राहतो, झुंडीचे राजकारण,
स्वातंत्र्य चळवळीत एकत्र झालेला हा भारतीय समाज, स्वातंत्र्यानंतर महापुरुषांचीदेखील जातीधर्माच्या आधारावर विभागणी करून घेण्याइतपत कसा काय विभागला गेला?
जात नाही ती जात. आणि फोडा-झोडा ही नीती ब्रिटिशांपेक्षाही आपलेच नेते जास्त वापरतात.शिवाय झुंदीत राहिलो की आपला बचाव होतोच, निदान मार तरी कमी लागतो. सध्या गोंदवलेकर महाराजांच्या झुंडीच्या अनुभव घेत आहे.
आणि स्वातंत्र्यपूर्व काळात दिसून येणारे हे प्रेरणादायी देशप्रेम लगेच पुढच्या पिढीत लोप पावून भारताला ब्रेनड्रेनला सामोरे का जावे लागले?
ह्यासाठी एक उत्तम पुस्तक आहे, ते जरूर वाचा. कौटिल्याचे अर्थशास्त्र. आणि हा प्रश्र्न सध्या बर्याच देशांना भेडसावत आहे.
स्वदेस चित्रपटाच्या नायकाप्रमाणे कितीजण भारतात परतले? आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाने अश्या किती पुनरागमित व्यक्तींचे नेतृत्व मान्य केले?
कशाला परत यायचे? सॅम पित्रोदांचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच की. राजीव गांधीनी पाठीवर हात ठेवला म्हणून भारतात टेलिकॉम क्रांती झाली.राजीव गांधी जर त्यावेळी सॅम पित्रोदांच्या मागे उभे नसते तर टेलिकॉम क्रांती इतक्या लवकर झाली नसती. १९८२-८३ मध्ये डोंबोली ते पुणे फोन करण्यापेक्षा माणूस निरोप घेवून आणि परतीचा निरोप घेवून परत येत असे. ८-९ तास ट्रंक कॉलसाठी लागायचे.अर्थात त्या काळी घरी फोन असणे हे पण श्रीमंतीचे लक्षण असायचे.
http://indiatoday.intoday.in/story/exclusive-the-story-of-sam-pitroda-an...
(माझ्या माहितीनुसार पुढे त्यांना परत अमेरिकेला जावे लागले, कुणी त्यांची सध्याचे वास्तव्य साभारतातच आहे असे सांगीतल्यास वरील विधान बिनशर्त मागे घेतल्या जाईल.)