मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १
"बाबा , आज शाळेच्या गॅदरींगमधे माझा पहिलाच सोलो परफॉर्मन्स आहे . "
"गुड लक बेटा , छान परफॉर्म कर . "
"मला खुप टेन्शन आलं आहे बाबा . माझा डान्स चांगला होईल ना ? "
"डोन्ट वरी बेटा . तुझ्यावर रानीमांचा आशीर्वाद आहे . तुझा डान्स चांगलाच होईल ."
रेल्वेच्या वाढलेल्या खडखडाटाने अचानक मयुराला जाग आली आणी तिचे स्वप्न मधेच तुटले . बहुतेक रेल्वे रुळांवरुन सांधे बदलत होती . तिने खिडकीतुन बाहेर पाहिले . बाहेर थोडे थोडे उजाडु लागले होते . तिचे उतरायचे ठिकाण थोड्याच वेळात येणार होते . तिने गाढ झोपेत असलेल्या आपल्या मैत्रिणींना हलवुन , हाका मारुन उठवले . आपले सामान आवरुन , तयार होउन त्या सगळ्याजणी आपले स्टेशन येण्याची वाट बघु लागल्या .
मयुराचे वडील सैन्यात होते . ठराविक वर्षांनंतर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असे . मयुराचे शिक्षणाचे नुकसान होउ नये म्हणुन त्यांनी तिला लहानपणीच बोर्डींग स्कुलमधे ठेवले होते . मयुराला नॄत्याची आवड असल्याने ती दिल्लीच्या आंतर कलाभारती या प्रसिद्ध संस्थेमधुन नृत्यविशारद पदवीचे शिक्षण घेत होती. या काळात नेहा आणी राधा या तिच्या त्या कॉलेजमधल्या खुप जवळच्या मैत्रिणी बनल्या . नेहा संगीतकलेमधे तर राधा चित्रकलेमधे शिक्षण घेत होती.
नुकतीच शेवटच्या वर्षाची परीक्षा पार पडली होती . आपापल्या घरी परत जाण्यापुर्वी तिघींनी मिळुन तीन , चार दिवसांसाठी कुठे तरी फिरुन यायचे ठरवले होते . तेव्हा मयुराला आपल्या मुळ गावाची , राजस्थानमधील मयुरखेडा या गावाची आठवण झाली . तिचे मोठे काका सैन्यामधुन रिटायर झाल्यावर त्या गावातील शाळेमधे शिकवत होते . त्यांनी तिला यापुर्वी अनेकदा सुट्टीमधे बोलावले होते . तो योग आता जुळुन येईल अशी शक्यता होती . मयुराने आपल्या मयुरखेडा गावाबद्दल नेहा आणी राधा यांना सुचवले . त्यांनाही तो विचार त्वरीत आवडला . मयुराने लगेच आपल्या काकांना आपल्या येण्याबद्दल कळवले . ताबडतोब मिळेल त्या गाडीची तिकीटे बुक करुन तिघी निघाल्या सुद्धा .
मयुरखेडा स्टेशन यायला अजुन थोडा अवकाश असल्याने मयुरा मनातल्या मनात काहि वेळापुर्वी आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा विचार करु लागली . लहानपणापासुन बराच काळ आपल्या आई वडीलांपासुन दुर राहिल्याने , एकतर फोनवर नाहीतर ती जेव्हा सुट्टीमधे घरी येत असे तेव्हाच काय ते तिचे त्यांच्याशी थोडे फार बोलणे होत असे . तिच्या आई वडीलांच्या बोलण्यामधे कधी कधी मयुरखेडा गावाचा आणी रानीमांचा उल्लेख येत असे . पण त्याबद्दल तिचे कधी आई वडीलांशी जास्त बोलणे झाले नाही .
"आजच आपल्याला स्वप्नामधे इतका जुना प्रसंग का आठवला ? ही रानीमां कोण ? तिचा मयुरखेडा गावाशी काय संबंध ? आणी आपले मयुरा हे नाव मयुरखेडा गावावरुन तर ठेवले नसेल ना ? " असे प्रश्न तिला पडले . "कदाचित आपण आपल्या मुळ गावी खुप वर्षांनंतर चाललो आहोत , म्हणुन आपल्याला स्वप्नामधे हि जुनी आठवण आली असेल ." असा विचार करुन तिने आपले समाधान केले .
थोड्याच वेळात मयुरखेडा स्टेशन आले . हे गाव खुप छोटे असल्याने तिघी उतरल्यावर रेल्वे लगेच शिट्टी वाजवत आणी धुर सोडत पुढे निघाली . आपापले सामान घेउन तिघी एक दोन मिनीटे तशाच उभ्या राहिल्या . काकांच्या घरी कसे जायचे हे तिला समजेना . तेवढ्यात तिथले स्टेशनमास्तर हसतमुखाने त्यांच्यापाशी आले .
"आप प्रकाशजीके यहां मेहमान आये हो ना ? " त्यांनी आपुलकीने चौकशी केली . मयुरीने होकारार्थी मान डोलावली . प्रकाशजी हे तिच्या मोठ्या काकांचे नाव होते .
"प्रकाशजीने आपके आनेके बारेमें फोनपे बताया था . वेलकम टु मयुरखेडा . आईये मै आपको ऑटोतक छोडता हुं . हरीराम ये सामान ले लो ." मास्तरांनी पोर्टरला सुचना केली . पोर्टरने त्यांचे सामान घेतले . मास्तरांनी तिघींना गावातल्या एकुलत्या एक ऑटोमधे बसवले .
" सुखी , ये प्रकाशजीके यहां मेहमान है . इनको संभालके ले जाना ." मास्तरांनी ऑटोवाल्याला सुचना केली . त्यानेही मान हलवली . प्रकाशजींना या गावामधे एकुण सगळेच ओळखत होते . थोड्याच वेळात ऑटोने त्या तिघींना काकांच्या घरी आणुन सोडले .
काका आणी काकु या तिघींची वाटच पाहात होते . त्यांनी मयुरा , राधा आणी नेहा यांचा छान पाहुणचार केला . खुप गप्पा झाल्या . मयुरखेडा गावामधे आणी गावाच्या आसपास काय काय पाहण्यासारखी स्थळे आहेत याची त्यांना काकांनी चांगली माहिती दिली . एवढेच नाही तर , सुखी ऑटोवाल्याशी बोलुन या तीन मुलींना पुढचे तीन चार दिवस हि ठिकाणे फिरवुन आणण्याचेही ठरवुन टाकले .
ठरवलेल्या बेताप्रमाणे तिघींचे पुढचे तीन दिवस मजेत पार पडले . गावाजवळील किल्ला , शेजारच्या गावातील धरण , छोटेखानी वस्तुसंग्रहालय , काकांची शाळा पाहणे , तिथल्या मुलांशी गप्पा मारणे , काकांच्या काहि जवळच्या मित्रांनी घरी बोलावुन त्यांचा केलेला पाहुणचार यांमधे हे दिवस भराभरा संपले .
शेवटच्या दिवशी तिघीजणी गावाबाहेरील शिवमंदीरामधे दर्शनासाठी गेल्या . दर्शन झाल्यावर मंदीराच्या बाजुने वाहणारी नदी त्या सहजपणे बघत होत्या . अचानक त्यांच्या कानांवर बासरीचे सुमधुर स्वर पडले . त्यांनी चकीत होउन पाहिले तर एक पोरगेलासा तरुण तिथल्या एका झाडाला टेकुन डोळे मिटुन बासरी वाजवत होता . त्याच्या अंगावर पारंपारीक राजस्थानी पोशाख होता. त्या पोशाखात तो भलताच रुबाबदार दिसत होता . कसल्याशा आवाजाने त्याची समाधी भंग झाली . त्याने समोर बघितले तर या तीन शहरी मुली त्याच्याचकडे बघत होत्या . तो थोडा भांबावला आणी घाईघाइने तिथुन निघुन गेला . जाताना त्याने एकदा दोनदा मयुराकडे चमकुन बघितले . तेवढ्यात सुखी ऑटोवाल्याने वाजवलेल्या हॉर्नचा आवाज ऐकु आला आणी या तिघी परत काकांच्या घरी निघाल्या .
आज त्यांची परतीची रेल्वे रात्री साडेनऊला होती . काका काकु त्यांना सोडायला स्टेशनला येतो म्हणत होते . पण त्यांची रात्री धावपळ नको , म्हणुन या तिघींनी त्यांना घरीच थांबवले . काका काकुंचा निरोप घेउन सुखीच्या ऑटोमधुन त्या तिघी रात्री नऊ वाजता मयुरखेडा स्टेशनवर पोचल्या .
फलाटावरच त्यांना स्टेशनमास्तर भेटले . आधीच्या स्टेशनवर काहि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तुमची ट्रेन थांबलेली आहे . ती इथे पोचायला किमान दोन अडीच तास म्हणजे रात्रीचे साडे अकरा तरी वाजतील असा त्यांनी निरोप देला . मास्तरांनाही हा निरोप काहि वेळापुर्वीच मिळाला होता .
या बातमीमुळे तिघींचाही चेहरा पडला . इतक्या उशीरा घरी परत जाउन काका काकुंना त्रास देणेही त्यांना ठिक वाटत नव्हते . त्याच बरोबर इथे स्टेशनवर दोन तास थांबुन तरी काय करायचे असा त्यांना प्रश्न पडला . त्यांची हि निराशा मास्तरांच्या लक्षात आली . त्यांचा ताण थोडा हलका करावा म्हणुन मास्तरांनी तिघींशी थोडा वेळ गप्पा मारायला सुरुवात केली .
" कैसा लगा आपको यह मयुरखेडा गांव ? क्या क्या देखा आप लोगोंने ?" मास्तरांनी विचारले . तिघींनी मग एकामागे एक आपण पाहिलेल्या ठिकांणांची नावे सांगीतली . ती नावे ऐकुन मास्तरांचे तसे समाधान झाले . तरीही त्यांनी विचारले .
"क्या आपने रानी शरावतीका महल नही देखा ? शायद आपको वक्त नहि मिला होगा . "
हे ऐकुन तिघींचाही चेहरा प्रश्नार्थक झाला . गडबडीत हे ठिकाण बघणे राहुन गेले कि काय असे त्यांना वाटु लागले . मास्तरांच्याही ते लक्षात आले . मनाशी काहितरी विचार करुन ते बोलु लागले .
"देखो . अभी तो बस नऊ ही बजे है . जादा देर नही है . आणी तसेही मयुरखेडा गांव सुरक्षीत आहे . मी सुखीला सांगुन तुमच्यासाठी ऑटो बोलावतो . तुम्ही एक दीड तासामधे रानी शरावतीका महल पाहुन परत या . सुखी तुमच्या बरोबर असला की काही काळजी नाही . "
----------- क्रमशः---------------------------------------------------- भाग १ समाप्त ------------ काल्पनीक --------------------
प्रतिक्रिया
20 Jun 2017 - 10:32 pm | भिंगरी
मागच्या जन्मासंबंधी आहे वाटतं कथा.
20 Jun 2017 - 11:13 pm | एस
पुभाप्र.
21 Jun 2017 - 1:24 pm | राजाभाउ
छान सुरुवात. पु.भा.प्र
21 Jun 2017 - 1:39 pm | हर्मायनी
सुरुवात इंटरेस्टिंग! :)
पण राजस्थान वगैरे असल्यामुळे कि कोण जाणे, एक पहेली लीला चित्रपटाची आठवण झाली .. :p
पु . भा .प्र !
21 Jun 2017 - 1:54 pm | पद्मावति
वाह! पु.भा.प्र.
21 Jun 2017 - 7:41 pm | ज्योति अळवणी
मस्त. लवकर टाका पुढचा भाग. राजस्थान!, खेड... बासरी वाजवणारा मुलगा.. मयुरा नाव मुलीचं आणि गावच..., मजा येते आहे. अशा कथा खूपच आवडतात.,
22 Jun 2017 - 6:00 pm | सिरुसेरि
आपल्या सर्वांच्या प्रतीक्रियांबद्दल खुप आभारी आहे . धन्यवाद .
24 Jun 2017 - 5:29 am | रुपी
रोचक!
पुढचा भाग लवकर येऊ द्या :)
26 Jun 2017 - 5:32 pm | सिरुसेरि
भाग २ ची लिंक -- http://www.misalpav.com/node/40076