आठवणींच्या हिंदोळ्यावर! अर्थात, ये है मुंबई मेरी जान!

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
18 Jun 2017 - 12:53 pm

माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती.

जसे सायन मागे पडले आणि माझ्या ओळखीची मुंबईतली जुनी ठिकाणे जसजशी दृष्टीस पडू लागली, तसतशा माझ्या त्यासंबंधीच्या सर्व जुन्या आठवणी उचंबळून येऊ लागल्या. रस्त्याकडेच्या पूर्वीच्या जुन्या बिल्डींगी, दुकाने, बागा, पूल, चौक, हॉटेल, थिएटर पाहून जीव थोडा थोडा होऊ लागला. बस ट्राफिकमध्ये हळूहळू चालत होती आणि मी मान वळवून वळवून बाहेरील दृश्य पहात होतो. सारखं मनातून वाटायचं, अरे! इथे तर ते होतं, कुठे गेलं!!!? आणि इथे हे काय नवीन झालंय. पूर्वीचं ते शोधायला माझी नजर सारखी भिरभिरत होती.

मी उजवी डावीकडे दिसणाऱ्या जुन्या गल्ल्या डोळे भरून पहात होतो. त्या गल्ल्यांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर दाखवले जाणारे सिनेमे पहायला रात्र रात्र मी उंडारलेलो आठवत होतो. काही बसस्टॉप तर वर्षानुवर्षे त्याच जागेवर अगदी तस्सेच ठाण मांडून होते. तर काहींचा सुंदर चकचकीत कायापालट झालेला होता. आता वाहतुकीच्या इतर पुष्कळ साधनसुविधा झाल्याने बसस्टॉपवर मात्र तुरळक गर्दी दिसत होती. मला बसस्टॉपवर असणारी पूर्वीची गर्दी आठवली. बस आली की तिच्यावर गुळाला मुंगळे चिटकावेत तसे माणसे तुटून पडत. काही हॉटेलं तर अजूनही एवढी वर्षे झाली तरी तिथल्या तिथेच होती. त्यातल्या एका हॉटेलात जाऊन मला मालकाला सांगावेसे वाटले, की "तुम्हाला माहितेय का? त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे." मला एवढी फुकटची चटणी खाताना पाहून एक वेटर बिचारा मी हाक मारली तर मला अजून द्यावी लागेल म्हणून तोंड फिरवून उभा रहायचा. मी मुद्दाम इराण्यांची हॉटेलं कुठे दिसतात का ते बघत होतो. पण ती काही दिसली नाहीत. त्या हॉटेलांमध्ये असलेली पैसे टाकून गाण्यांची रेकॉर्ड ऐकायची मशीन मला आठवली. जुनी थिएटरं पाहून तिथे तिथे अवघ्या तीन रुपये तिकिटात पाहिलेले पिक्चर मला आठवत होते. पिक्चरची तिकिटे काढायला मी तिथे लावलेल्या रांगा आणि दबलेल्या आवाजात तीन का चार म्हणत फिरणारे ब्लॅकवाले आठवत होते. काही थिएटर गायब झालेले पाहून वाईट वाटत होतं.

रस्त्याच्या बाजूला दिसणाऱ्या पूर्वीच्या काही सरकारी इमारती आणि पोलीसस्टेशन्स अजूनही तिथल्या तिथेच आणि त्याच ऐतिहासिक अवस्थेत दिसले. ते पाहून त्यांच्याशी माझी जुनीच ओळख असल्यासारखे वाटले. तिथे कामानिमित्त मी मारलेले हेलपाटे मला आठवले. पूर्वीच्या दोनतीन मजली इमारतींऐवजी आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या टोलेजंग रहिवासी इमारतींची संख्या भरमसाठ वाढलेली दिसली. चौकातल्या काही बागा मोठ्या कंपन्यांनी प्रायोजित केल्याने अजूनही सुशोभित केलेल्या दिसल्या. पूर्वी त्या बागा शुष्क आणि चुकार, समाजकंटक मंडळींचा अड्डा असत. म्युनिसिपल इस्पितळं मात्र पूर्वी होती तशीच बकाल दिसली. गिरणकाळापासून असलेल्या लाकडाच्या चाळी एक दोनच दिसल्या. बाकीच्या सर्व नामशेष होऊन त्याठिकाणी बिल्डिंगची खुराडी उभी राहिली होती.

एक मैदान अजूनही तसंच टिकून होतं. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती. रस्त्यावरच्या सिग्नलची संख्या बरीच वाढलेली होती. एका सिग्नलवर तर तीन वेळा सिग्नल हिरवा होऊन पुन्हा लाल झाला, पण माझी बस काही तो पार करू शकली नाही, एवढी ट्राफिक जाम होती. पण रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांची शिस्त वाखाणण्याजोगी वाटली. पूर्वी सगळीकडे लोकांची अनिर्बंध गर्दी जाणवे. मुंबईत उड्डाणपूलांची संख्या वाढलेली दिसली. बस उड्डाणपूलावरून जाताना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षित कठडे लावल्याचे दिसले. पूर्वी हे कठडे उंचीला फारच छोटे होते. बऱ्याचदा वाहने त्या बुटक्या कठड्यांना धडकत. त्यावरून मला मुंबईतला जे. जे. चा पहिला उड्डाणपूल आठवला, जो बांधकाम चालू असतेवेळीच कोसळला होता. खडापारशीचा पुतळा पाहून गहिवरलो. रस्त्यावर अजून काही पूर्वीचे पुतळे दिसले नाहीत. राजकीय पार्ट्यांचे एखाददुसरे फलक दिसले. पूर्वी रस्त्याच्या दोन्हीकडील इमारतींच्या भिंती राजकीय घोषणांनी रंगवून बरबटलेल्या असत. एक मात्र खरे! रस्त्यावर कचऱ्याचे ढीग काही दिसले नाहीत. पूर्वीच्यापेक्षा आता रस्ते फारच स्वच्छ आणि सुंदर होते.

पेट्रोलपंप तर अजूनही पूर्वी होते तेवढेच आणि त्याच ठिकाणी कार्यरत होते. ह्या पंपांवर मी स्कुटरमध्ये पेट्रोल भरायला जायचो तेव्हा आसमंतात भरून राहिलेल्या पेट्रोलच्या वासाच्या आठवणीने आज मला पुन्हा धुंद करून सोडले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडांची संख्या पूर्वी होती तेवढीच आजही दिसली. काही मोजक्या ठिकाणी अजूनही टिकून असलेल्या पूर्वीच्या नावाजलेल्या कंपन्यांच्या आणि वर्कशॉपच्या प्रवेशद्वारांच्या पुन्हा दर्शनानेच माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. एवढी वर्षे खोदादादसर्कल जमिनीवरून पहात आलो, आज उड्डाणपुलावरून बर्ड व्हीव्युने पहायला मिळाले. पूर्वी दरवर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने तुंबणारी तीच ती ठिकाणे पुन्हा पाहून त्या पाण्यात मी अडकलेल्या दिवसांची आठवण आली.

असाच मजल दरमजल करीत मी तब्बल दोन तासांनी कफपरेड येथे पोहोचलो. पण खरं सांगू!? मला ह्या प्रवासात अवघे दोन मिनीटेही कंटाळा आला नाही. हा प्रवास मी अनुभवलेल्या माझ्या जुन्या मुंबईची आठवण माझ्या मनात पुन्हा जिवंत करून गेला. बसमधून उतरताना मी मनातल्या मनात समाधानाने गुणगुणत होतो. "जरा हटके, जरा बचके, ये है मुंबई मेरी जान!!!"

माझा ब्लॉग  :  http://sachinkale763.blogspot.in

प्रवासलेख

प्रतिक्रिया

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Jun 2017 - 8:05 am | योगेश लक्ष्मण बोरोले

व्वा! मस्त लिहीलेय. मी १९९२ ला शिक्षणानिमीत्त मुंबईत आलो. मधली ६ वर्षे पुण्यात घालवल्यानंतर परत पोटापाठी मुंबईतच परतलो. दक्षिण मुंबईच्या फेर्‍या नेहेमीच आनंद देतात. पावसाळ्यात तर मुद्दाम कुटुम्बाला एक पुर्ण दिवस जीवाची मुम्बई करण्यासाठी घेउन जातो. आपला लेख वाचुन Nostalgic व्हायला झाले. असेच परत मुम्बईतील जुन्या - नव्या उपाहारगृहांबद्दल लिहा (अनलिमीटेड चटणी .... व्वा!).

ज्योति अळवणी's picture

19 Jun 2017 - 10:37 am | ज्योति अळवणी

खरच मुंबई मेरी जान! माझा जन्म उपनगरातला असला तरी आजोळ गिरगावात सिक्कानगर मध्ये. त्यामुळे मे महिन्यात, दिवाळीतच नाही तर दोन-चार दिवसांच्या सुट्टीत देखील जायचो. साहित्य संघात बघितलेली बाल नाट्य, गायवाडी आणि इतर गल्यांमधून उगाच केलेली धावपळ, झावबाची वाडी... एकूणच सगळं आठवलं तुमचा लेख वाचून... लहानपणच्या आठवणी म्हणजे सोन्याचा ठेवा असतो

मी १९९५ ते २००२ पर्यंत मुंबईत होतो...त्यातही पहिली ३-३.५ वर्षे वरळीत चाळीत राहिलो...१०/१२ मित्रांचा ग्रुप होता आमचा...दार रविवारी मुंबई दर्शन करत फिरायचो आम्ही..मुंबईत पहिल्यांदाच आल्याने खूप आकर्षण होते मुंबई चे.....तिथे खूप मित्रही मिळाले...आईझxx...सारख्या शिव्या ही आयुष्यात पहिल्यांदा ऐकल्या ...भाईगिरी..डान्सबार ...टपोरीगिरी...इत्यादी गोष्टी खूप जवळून पाहता/ अनुभवता आल्या...शोले/मुगलेआझम सारखे पिक्चर जिथे रेकॉर्डब्रेक चालले होते तिथे जाऊन परत पहिले...वारली नाक्यावरची गीता व डिलाईल रोडची दीपक टॉकीज तर आमची फेवरीट होती...१०-१५ रुपये तिकीट असे तेव्हा...बरेच काही लिहिण्यासारखे आहे ...माहित नाही आता २०/२२ वर्षानंतर कसा बदल झाला असेल तिथे...एकदा ३/४ दिवस सुट्टी घेऊन ते सगळे एरिया परत फिरवायची खूप इच्छा आहे....बघू..

आदूबाळ's picture

19 Jun 2017 - 7:32 pm | आदूबाळ

वारली नाक्यावरची गीता व डिलाईल रोडची दीपक टॉकीज

बेक्कार बदलला आहे तो भाग. दीपक टॉकीज आहे तसंच आहे, आसपासचं सगळं पालटलंय.

IT hamal's picture

20 Jun 2017 - 10:35 am | IT hamal

गूगल इमेजेस बघितल्या त्या एरिया च्या ....त्याकाळी दिसणाऱ्या सगळ्या बंद गिरण्यांच्या जागेवर काच वाल्या बिल्डींगी व टॉवर दिसत आहेत...काही दिवसात BDD चाळीही जातील ...

सचिन काळे's picture

19 Jun 2017 - 6:53 pm | सचिन काळे

मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.

हे सांगण्याकरिता मी ह्या धाग्यावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला त्याचा पुरवणी धागा काढण्याचा विचार करावा लागला.

पुरवणी धागा वाचण्याकरिता कृपया पुढील लिंकवर टिचकी मारावी.

http://www.misalpav.com/node/40036

गामा पैलवान's picture

19 Jun 2017 - 7:23 pm | गामा पैलवान

कुर्ला ते कफ परेड म्हणजे ८४ नंबरची बस का?
-गा.पै.

सचिन काळे's picture

19 Jun 2017 - 8:13 pm | सचिन काळे

नाही, ७ नंबर बेस्टची बस.