निव्वळ गर्दी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
9 Jun 2017 - 12:46 pm

स्थळ : पुण्यातील रेसकोर्स
काळ : १९७१-७२ दरम्यानचा एक दिवस
प्रसंग : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची जाहीर सभा

त्यावेळी मी शालेय विद्यार्थी होतो. १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपण विजयी झाल्यानंतर काही काळाने इंदिराजींची जाहीर सभा तेथे आयोजित केली होती. आपल्या पंतप्रधानांना पाहणे हे एक जनतेचे जबरदस्त आकर्षण असते. त्यामुळे सभेला तोबा गर्दी झालेली. एवढी प्रचंड गर्दी अनुभवण्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग होता. त्या गर्दीत आम्ही लहान भावंडे एकमेकांची बोटे घट्ट धरून आमच्या पालकांसमवेत तेथे वावरत होतो. सुमारे तीन तास आम्ही तेथे घालवले असावेत. त्या प्रसंगाची आठवण आता पुसट झालेली आहे. तुटक तुटक काही आठवते आहे.

सभेचे व्यासपीठ आणि सामान्य जनता यांच्यामध्ये खूप अंतर ठेवलेले होते. सर्वत्र प्रचंड धूळ उडत होती. आमच्या पालकांनी आम्हाला उंच उचलून घेऊन व्यासपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्हाला तरी इंदिराजी काही दिसल्या नाहीत. एकीकडे त्यांचे भाषण ध्वनिवर्धकातून ऐकू येत होते. तेव्हा त्या बोलताहेत म्हणजे व्यासपीठावर कुठेतरी असणार असे आम्ही समजून घेतले.
नंतर त्यांचे भाषण संपल्यावर नागरिकांनी शिस्तीत हळूहळू कसे बाहेर पडावे याच्या सूचना दिल्या जात होत्या. परंतु, आपले नागरिक मात्र अत्यंत बेशिस्तीत वागत होते. सर्वत्र कमालीचा गोंधळ होता. त्यात उडणाऱ्या धुळीने सर्वांनाच हैराण केले होते. माणसांचे लोंढे एकमेकांवर आदळत होते. सर्वात चीड आणणारा प्रकार म्हणजे काही जण आपल्यापुढे लांब अंतरावर असणाऱ्याना चक्क दगड फेकून मारत होते. आमच्याही अगदी जवळून काही दगड गेले. त्यामुळे आता जीव मुठीत धरून एकमेकाला सांभाळून सुखरूप बाहेर पडणे एवढेच ध्येय आमच्यापुढे होते.

ज्या लोकांना त्या दगडांचा प्रसाद मिळाला, त्यांनी संतापून त्या मारणाऱ्याना शिव्या घातल्या. त्यापैकी कोणाच्या तोंडून तरी मी ‘bastard’ हा शब्द आयुष्यात प्रथम ऐकला, जेव्हा त्याचा अर्थही कळत नव्हता.
सुमारे तासाभराने कसेबसे तिथून बाहेर पडल्यावर अगदी हायसे वाटले. आमचे पालक तसेच इतर काही सुबुद्ध नागरिक आता एका मतावर ठाम झाले होते, ते म्हणजे आता पुढच्या आयुष्यात कधीही आपल्या कुठल्याही पंतप्रधानांच्या सभेला जायचे नाही. मी स्वतःही मोठे झाल्यावर हा निर्णय आजपावेतो अमलात आणला आहे व यापुढेही तो कायम ठेवणार आहे. किंबहुना त्या सभेच्या संदर्भात आपला पाकवरील विजय, त्या तडफदार पंतप्रधान वगैरे आठवणी माझ्या विस्मरणात गेल्या. पण, कायमचे चांगले लक्षात काय राहिले तर त्या दिवशीची प्रचंड गर्दी, नागरिकांची कमालीची बेशिस्त, चेंगराचेंगरी, ती अमानुष दगडफेक आणि दगड वर्मी लागलेले व तळतळून शिव्या देणारे लोक.

... आज इतक्या वर्षांनी तो कटू प्रसंग का आठवतोय? विन्स्टन चर्चिल या माजी ब्रिटीश पंतप्रधानांनी भारताबाबत अनेक विधाने केलेली आहेत. जरी ती उपरोधिक वगैरे असली, तरी त्यातली काही अतिशय विचारपूर्वक केली आहेत यात शंका नाही. अधूनमधून आपल्यातले काही विचारवंत त्या विधानांचा दाखला देत असतात. ती विधाने अगदी मार्मिक आहेत. जरी त्या अहंगंड व्यक्तीबद्दल आपल्याला आदर नसला तरीही त्याची ती विधाने आपण आत्मपरीक्षण करावीत अशी आहेत.

परवा असा एक लेख वाचताना चर्चिलच्या ‘त्या’ विधानाची उजळणी झाली आणि ते म्हणजे, “India is not a nation, it is only population”. अर्थात, ‘’भारत हा समाज नाही, ही निव्वळ गर्दी आहे!’’ अशा या ‘गर्दी’चा वरील अनुभव मी शालेय वयात घेतला. संस्कारक्षम वयात झालेला हा एक मोठ्ठा भारतीय संस्कार !
अशा या गर्दी व चेंगराचेंगरीचे संस्कार आपण भारतीय एकमेकांवर पदोपदी करत असतो. तर बघूया आपल्याकडील काही ठरलेल्या गर्दींची झलक.

हे आहे एखादे सरकारी कार्यालय. इथे ठराविक नमुन्यातील अर्ज घेणे, मग तो भरणे, त्यावर अधिकाऱ्याची सही घेणे आणि त्यानंतर पैसे भरणे अशा क्रमाने आपल्याला कामे करायची असतात. हे कार्यालय उघडल्यानंतर तासाभरातच तिथल्या सर्व खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगा दिसू लागतात. अजून थोड्या वेळाने एखाद्या रांगेतले दृश्य पाहूयात. कुठलीही रांग ही पूर्णपणे सरळ कधीच राहत नाही. खिडकीपाशी त्या रांगेला दोन्ही बाजूंनी फाटे फुटतात. मग या फाट्यावर वाढणाऱ्या उपरांगा मूळ रांगेतील शिस्तप्रिय लोकांना त्रस्त करू लागतात. आता कोलाहल माजतो. खिडकीच्या तोंडाशी धुमश्चक्री चालू होते. त्याचा प्रचंड ताण आतील कर्मचाऱ्यावर पडतो. साहजिकच तोही वैतागतो, उभा राहतो, हातातील एखादी वस्तू टेबलावर आपटतो आणि काम थांबवतो.

कधीकधी तर रांगेत धुडगूस घालणाऱ्याना वठणीवर आणण्यासाठी दंडुकेधारी पोलीसही आणावे लागतात. कार्यालयात ‘’रांगेचा फायदा सर्वांना’’ अशा लावलेल्या पाट्या गंजून गेलेल्या असतात व बेशिस्तांचे वागणे पाहून जणू केविलवाण्या झालेल्या दिसतात. जरा आठवून पाहा. ४ वर्षांपूर्वी जेव्हा ‘आधार’ कार्ड काढायच्या रांगा लागत होत्या तेव्हा अनेकांनी या अनागोन्दीचा पुरेपूर अनुभव घेतला होता आणि त्यांना अगदी ‘निराधार’ झाल्यासारखे वाटले होते !
या सर्व अनागोंदीचे मूळ आपल्या बेशिस्तीत आहे. रांगेचा आदर न करता सतत पुढे घुसण्याची प्रवृत्ती आपल्या हाडीमाशी खिळली आहे. या संदर्भात आठवते ते अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले एक चपखल वाक्य, ‘’ हम जहां खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’’. स्वतःला असे ‘बच्चन’ समजणाऱ्यांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे.

गर्दीचा प्रचंड त्रास होण्याची अजून महत्वाची ठिकाणे म्हणजे रेल्वे व बसस्थानके. आपल्याकडे उन्हाळी व दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान तर या स्थानकांवर गर्दीचा महापूर असतो. रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त व मस्त साधन असल्याने तिच्या स्थानकावरील झुंबड तर गर्दीच्या सर्व मर्यादा ओलांडते. आता बघूयात एखाद्या महानगरी रेल्वेस्थानकावरील या सुट्यांच्या काळातील दृश्य.

ज्या प्रवाशांची गाडी प्लॅटफॉर्म क्र. एकवर येणार असते ते अत्यंत भाग्यवान ! आता बाकीचे कमनशिबी प्रवासी मात्र पुढील हालअपेष्टाना तोंड द्यायला सज्ज होतात. बहुतांश स्थानकांवर प्लॅटफॉर्म क्र. दोन व त्यापुढील सर्व प्लॅटफॉर्मवर जायचे म्हणजे पादचारी पुलावरून जाणे आले. या पुलावरून एका वेळेस शेकडो प्रवासी तरी ये-जा करत असतात. प्रवासास निघालेले आणि प्रवासाहून परतलेले असे दोन्ही प्रकारचे प्रवासी त्यांच्या भरपूर सामानासहित या पुलावर भिडतात. जाणारे व येणारे यांची चालण्याची बाजू (डावी – उजवी) तरी वेगळी असावी, हा मूलभूत नियम आपल्याला नीट समजायला अजून एक शतक तरी जावे लागेल, अशी सध्या स्थिती आहे.
त्यामुळे या पुलावरून जाताना आपल्याला प्रचंड रेटारेटी, गुदमरणे, घुसमटणे, चेंगरणे आणि कधीतरी तुडवले जाणे अशा सर्व यातनांचा अनुभव येतो. या अग्निदिव्यातून बाहेर पडल्यावर प्रवासी एकदाचा आपल्या इच्छित प्लाटफॉर्मवर येतो. आता पुढचा टप्पा असतो तो म्हणजे गाडी आल्यावर त्यात शिरायचा. आपली बहुसंख्य जनता दुसऱ्या वर्गाच्या डब्याने प्रवास करते. आता बघूया अशा प्रवाशाची गाडीत शिरताना होणारी घुसमट.

प्लॅटफॉर्मवर गाडी येते. आता डब्यातून उतरणारे व चढणारे प्रवासी यांची धुमश्चक्री होते. आधी आतील प्रवाशांना पूर्ण उतरू द्यावे, त्यानंतरच आत जागा होईल व मग बाहेरच्यांनी चढावे, ही किमान समज अजूनही आपल्याला नाही. हल्ली काही निर्लज्ज मंडळी तर गाडी यायच्या आधीच रुळांवर उतरून प्लॅटफॉर्म च्या विरुद्ध बाजूला थांबतात आणि गाडीत तिकडून घुसून दादागिरी करतात. अशा झुंडशाहीमुळे आजकाल दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित डब्यांनाही सामान्य अनारक्षित डब्यांचे स्वरूप आलेले आहे.

प्रवासासंबंधी एक संस्कृत वचन असे आहे ,’’किं सुखं प्रवासगमनं”. मला आठवते, की आमच्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षकानी ते आम्हाला सांगताना आपल्याकडील वास्तव जाणवून दिले होते. ते असे, ’’किं सुखं अप्रवासगमनं” ! खरेय, आपल्या देशात प्रवास करणे ही खरोखरीच सुखाची गोष्ट राहिलेली नाही.

निरनिराळ्या सार्वजनिक ठिकाणी विविध प्रसंगी गर्दी करण्याची प्रवृत्ती ही आपल्या समाजात खोलवर मुरलेली आहे. ती इतकी घट्ट मुरलीय की जणू काही ती आपल्या जनुकांचा(genes) भाग होऊन बसली आहे. एक सर्वसाधारण समज असा आहे, की गर्दी करणारी मंडळी ही आपल्या समाजाच्या आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरातील असतात. या (गैर)समजातून उच्च व मध्यमवर्ग कायम त्यांच्यावर टीका करतो आणि मग सरकारी कारभार, लोकसंख्या, नियोजन इत्यादींच्या नावाने बोटे मोडतो. परंतु, या समजाला छेद देणारा अनुभव मला हैदराबादच्या ‘रामोजी फिल्म सिटी’ मध्ये ७ वर्षांपूर्वी आला.
हा प्रकल्प म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणविषयक सर्व बाबींचे एक भव्य सुंदर प्रदर्शन आहे. ते पाहण्याची तेव्हाची प्रवेश फी होती माणशी पाचशे रुपये. याचा अर्थ सरळ आहे. एवढे तिकीट काढणारा माणूस हा आर्थिक सुस्थितीतला असतो. प्रदर्शनाच्या एका टप्प्यात, चित्रपटात निरनिराळी दृश्ये चित्रित झाल्यावर त्यांमध्ये वेगवेगळे आवाज, भासदृश्ये वगैरे कशी घातली जातात याचे सुरेख प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्यासाठी ओळीने तीन खोल्यांची रचना केली आहे.

प्रत्येक खोलीत ५० जणांची बसायची सोय आहे. हे लक्षात घेऊनच संयोजक मोजून ५० प्रेक्षकांना पहिल्या खोलीत सोडतात. तेथील भाग बघून झाल्यावर त्या ५० जणांनी क्रमाने दुसऱ्या व तिसऱ्या खोलीत जायचे असते. आता इतके सगळे व्यवस्थित नियोजन केले असल्यावर तेथे गर्दी व्हायचे काही कारण नाही. पण छे! गर्दी केले नाही तर आपण भारतीय कसले?

आमचा पहिल्या खोलीतील कार्यक्रम उरकल्यावर त्यांनी आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवले. तिथे व्यवस्थित बाके होती. आमच्यातील बरेच जण तिथे शिरताना अत्यंत उतावीळपणे धावत पळत बाकांवरून चप्पलबुटासह पाय देत जागा पकडत होते. तसेच तेथे बसल्यावर आपापले हात पसरून त्यांच्या मित्रांसाठी जागा अडवून ठेवत होते. हाच अनुभव पुन्हा दुसऱ्यावरून तिसऱ्या खोलीत जाताना आला. सर्वांना बसायची व्यवस्थित सोय असतानाही जी झुंडशाही तिथे दिसून आली, ती मन विषण्ण करणारी होती.

निष्कर्ष काय, तर सतत पुढे पुढे घुसणे आणि विनाकारण गर्दी करून सभ्यतेचे सर्व संकेत तुडवणे हे गुण बहुतेक भारतीयांच्या अंगी भिनलेले आहेत. आर्थिक समृद्धी व शिस्त यांचा एकमेकाशी फारसा संबंध दिसत नाही. असाच अनुभव विमानात बसताना ‘बोर्डिंग’ च्या वेळेस येत असतो. तेथे विमानातल्या आसनसंख्येपेक्षा एकाही जादा बोर्डिंग पास दिलेला नसतो. तरीसुद्धा प्रत्यक्ष विमानात चढण्यासाठी जेव्हा रांग करायला सांगतात, तेव्हा घाईने शिरण्यासाठी जी अहमहमिका चालते ती पाहून कीव करावीशी वाटते.

आपल्याकडे निरनिराळे उत्सव, मेळे, मेळावे, यात्रा, जत्रा, मिरवणुका अन निवडणुका अशा अनेक प्रसंगी गर्दीचे महापूर लोटतात. त्यामध्ये प्रचंड गर्दीच्या जोडीला फटाके व कर्कश संगीत कानठळ्या बसवायला असतातच. गर्दीप्रेमींना प्रिय असणाऱ्या या गोष्टी सामान्यजनांना मात्र उपद्रवकारक ठरतात. अशा प्रसंगी सार्वजनिक शांतता व वाहतूक यांचे तीन-तेरा वाजतात. काही वेळा तर महानगरांमधील महत्वाचे रस्ते २४ तासांपेक्षा अधिक काळ सुद्धा अडवून ठेवले जातात. त्यामुळे कित्येक जणांचे काही ना काही नुकसान होत असते हे कळण्याची कुवत गर्दी करणार्‍यांकडे अजिबात नसते. बंद केलेल्या रस्त्यांमुळे एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते, याची तर त्यांना पर्वाच नसते.
गेल्या दोन दशकांमध्ये वाढत्या औद्योगिकरणामुळे आपण माणसांच्या जोडीला वाहनांची गर्दीही बेसुमार वाढवली आहे. त्यात वाहतुकीचे मूलभूत नियम तर आपण केव्हाच धाब्यावर बसवले आहेत. शहरी जीवनातील नेहमीचे दृश्य काय आहे? माणसांच्या झुंडी, वाहनांच्या प्रचंड रांगा, अधूनमधून थेट हमरस्त्यावर आलेले जनावरांचे कळप, पदपथांवर अतिक्रमण केलेले विक्रेते व सर्रास लावून ठेवलेली वाहने आणि जीव मुठीत धरून चालणारे पादचारी. अलीकडे तर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनी उच्छाद मांडला आहे. पदपथ हे अतिक्रमणवाल्यांनी कायमचे बळकावल्याने पादचाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून चालायचीच सवय लागली आहे.

या सगळ्यातून जरा मोकळा श्वास घ्यावा म्हणून पर्यटनास शहराबाहेर पडावे, तर पुढे लगेचच लागतात पथकर नाक्यांवरच्या मोठमोठ्या बेशिस्त वाहनरांगा. महामार्गावरून जाऊन जरा लहान गावात प्रवेश करतोय, तोच आपले स्वागत करतात ‘वसुली’साठी थांबवलेल्या ट्रक्सच्या रांगा. कधीकधी तर अशा रांगांची लांबी किलोमीटर्समध्ये मोजावी लागते. अपघातांच्या निमित्ताने होणारी बघ्यांची गर्दी हा अजून एक कटकटीचा विषय.

हुश्श ! थोडक्यात काय, तर कुठल्या ना कुठल्या गर्दीपासून आपली कधीही सुटका नाही. सतत गर्दी होण्यामागे आपली अवाढव्य लोकसंख्या हे एक कारण असेलही; पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त. आवाक्याबाहेर गेलेल्या या सामाजिक बेशिस्तीचा मूठभर शिस्तप्रिय नागरिकांवर एवढा दबाव पडतो, की वेळप्रसंगी तेही शिस्त मोडायला प्रवृत्त होतात. ढासळती शिस्त पाहून त्यांचा सात्विक संताप वारंवार उफाळून येतो अन हताशपणे तो निवळूनही जातो.

एकंदरीत पाहता ‘ ही निव्वळ गर्दी आहे ’ हे चर्चिलचे विधान आपण शब्दशः आणि लाक्षणिक अशा दोन्ही अर्थांनी खरे केले आहे, असे राहून राहून वाटते. अशा या निव्वळ गर्दीतून भविष्यात कधीतरी शांतता व शिस्तप्रिय समाज निर्माण होऊ शकेल का, यावर जर आपण सखोल विचार करू लागलो तर मग आपल्याही डोक्यात होऊ लागते विचारांची गर्दी !
******************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक)

समाजविचार

प्रतिक्रिया

सतिश पाटील's picture

9 Jun 2017 - 3:49 pm | सतिश पाटील

अगदी अगदी बरोबर....

पी. के.'s picture

9 Jun 2017 - 5:14 pm | पी. के.

+१

पद्मावति's picture

9 Jun 2017 - 5:20 pm | पद्मावति

लेख आवडला.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 5:22 pm | मुक्त विहारि

भारतात जन्म मिळणे म्हणजे मागच्या जन्माच्या पापांची शिक्षा.....

असो,

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2017 - 6:32 pm | टवाळ कार्टा

-१1११11

भारतात जन्म मिळणे म्हणजे मागच्या जन्माच्या पापांची शिक्षा.....

परदेशातल्या पाप्यांना इकडे पाठवले जाते म्हणे ही जन्मांतरीची शिक्षा भोगायला. त्यामुळेच भारताची लोकसंख्या भसाभसा वाढतेय. सद्यजन्मावर जेवढी टिका कराल आत्मवंचना कराल, तेवढी लवकर त्या पाप्यांना मुक्ती असते, असे आमचे डॉक्टर असलेले आध्यात्मिक गुरु म्हणतात.

............. ही जन्मांतरीची शिक्षा भोगायला.त्यामुळेच भारताची लोकसंख्या भसाभसा वाढतेय. सद्यजन्मावर जेवढी टिका कराल आत्मवंचना कराल, तेवढी लवकर त्या पाप्यांना मुक्ती असते, असे आमचे डॉक्टर असलेले आध्यात्मिक गुरु म्हणतात.

प्रचंड सहमत.......

कुमार१'s picture

9 Jun 2017 - 5:34 pm | कुमार१

सर्व प्रतिसादकांचे आभार.
भारतात जन्म मिळणे म्हणजे मागच्या जन्माच्या पापांची शिक्षा..... >>> सही !

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 6:37 pm | मुक्त विहारि

पण असे खूप मुद्दे आहेत की, आपण नक्की कुठे आहोत? शिक्षणाचा आणि संस्काराचा आपण खरोखरच उपयोग करत आहोत का? जर आपण कायदा पाळत असू, तर मग वेळ प्रसंगी दुसर्‍याने कायदा पाळला नाही तर आपण प्रतिकार करतो का?

अफाट लोकसंख्या आणि त्याला आनुषंगिक इतर ९०% अडचणी.. मुलभूत गरजा अन्न्,वस्त्र,पाणी,निवारा,शिक्षण्,दळणवळण्,नौकर्‍या,शून्य पोल्युशन जर भारताला हवे असेल तर लोकसंख्येला आळा घालायला हवा. आणि हे जर येत्या ३०-४० वर्षात नाही झाले तर इथल्या माणसांना रोजचे जगणे हाच एक नरकवास असेल.

असो,

"एक सामान्य नागरीक म्हणून तिथल्या देशाच्या सरकार बाबत अपेक्षा" ह्या विषयावर बरेच लिहू शकतो पण हा धागा त्यासाठी नाही, म्हणून इथेच थांबतो.

अभिजीत अवलिया's picture

9 Jun 2017 - 5:51 pm | अभिजीत अवलिया

भारत हा लष्करी व कदाचित आर्थिक महासत्ता देखील नक्की होईल पण कधीही एक शिस्तबद्घ देश होणार नाही असे माझे ठाम मत आहे.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 6:39 pm | मुक्त विहारि

पण त्याही शिवाय अनावश्यक माजोरडे पणा आणि झुंडी पुढे नेमस्त होणे पण आहे.

भारतातल्या लोकांबद्दल असे बोलायची हिम्मत केलीत तुम्ही, आता काही खरं नाही तुमचं!

कुमार१'s picture

9 Jun 2017 - 7:22 pm | कुमार१

भारत हा लष्करी व कदाचित आर्थिक महासत्ता देखील नक्की होईल पण कधीही एक शिस्तबद्घ देश होणार नाही असे माझे ठाम मत आहे. >>
शिस्तबद्घ देश होणार नाही >>>> + १ लाख पण,
महासत्ता देखील नक्की होईल >>>> आशावादी असावे. पण, आपल्या हयातीत तरी बिल्कूल वाटत नाही.

बदल घडवण्यासाठी तुम्ही काय करत आहात..?

पंतप्रधान / मुख्यमंत्र्यांचे पोर्टल आहे. सूचना कळवा, सहभागाची तयारी दाखवा. सूचना वाजवी असेल तर तुम्हाला प्रतिसाद मिळेल आणि कामासाठी अनुकुल वातावरणही मिळेल.

पुर्वी करायचो.

गो.रा. खैरनार आणि अण्णा हजारे ह्यांची उदाहरणे समोर आहेत.

मी काही त्यांच्या इतका मोठा नाही आणि उगाच ह्या गोष्टीत आता जास्त वेळ पण घालवणार नाही.

तुमच्या मताचा आदर आहे.. पण इतकी वाईट परिस्थिती नक्कीच नाहीये.

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2017 - 7:44 pm | संजय क्षीरसागर

आपल्या देशाला शिव्या घालणं म्हणजे स्वतःच्या पत्नीला चारचौघात शिव्या घालणं आहे. त्यानं परिस्थितीत बदल तर होत नाही पण जगण्यातल्या काँप्लिकेशन्स वाढतात.

सूज्ञ लोक एकतर अडचणीच्या परिस्थितीत पडत नाहीत. कदाचित सापडलेच तर मार्ग शोधतात. आणि कसंही करुन आहे त्या परिस्थितीत जीवनाची मजा घेतात. स्वतः आनंदी होतात आणि दुसरा त्यांच्याकडून शिकून आनंदी होऊ शकतो.

चर्चिल काय म्हणाले हे उराशी धरुन बसलात तर कायमचे दु:खी व्हाल. तुम्ही प्रश्नाची सोडवणूक निदान स्वतःपुरती का होईना कशी करता हे खरं कौशल्य आहे. नाही तर तक्रार करायला शोधायचीच म्हटली तर आयुष्यात सतराशे छपन्न कारणं सापडतील.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 9:02 pm | मुक्त विहारि

"आपल्या देशाला शिव्या घालणं म्हणजे स्वतःच्या पत्नीला चारचौघात शिव्या घालणं आहे. त्यानं परिस्थितीत बदल तर होत नाही पण जगण्यातल्या काँप्लिकेशन्स वाढतात."

ओके...

"सूज्ञ लोक एकतर अडचणीच्या परिस्थितीत पडत नाहीत. कदाचित सापडलेच तर मार्ग शोधतात. आणि कसंही करुन आहे त्या परिस्थितीत जीवनाची मजा घेतात. स्वतः आनंदी होतात आणि दुसरा त्यांच्याकडून शिकून आनंदी होऊ शकतो."

ओके....

"चर्चिल काय म्हणाले हे उराशी धरुन बसलात तर कायमचे दु:खी व्हाल. तुम्ही प्रश्नाची सोडवणूक निदान स्वतःपुरती का होईना कशी करता हे खरं कौशल्य आहे. "

कोण काय म्हणाले? ह्याला मी कधीच जास्त भाव देत नाही. माझ्या पुढील पिढीने भारतात अजून किती काळ रहावे? ह्याची सोडवणूक तर मी माझ्या कुटुंबापुरती करत आहेच.

"तक्रार करायला शोधायचीच म्हटली तर आयुष्यात सतराशे छपन्न कारणं सापडतील....."

तक्रार ही पण एक वस्तूस्थिती आहेच.....माझ्या आयुष्याबद्दल मला काहीच तक्रार नाही (उदा, नौकरी किंवा आरोग्य) पण जिथे जिथे देशाच्या नियोजनामुळे माझ्या दिनचर्येत जर नकारात्मक बदल होत असतील तर मग काय करायचे?

वीज, पाणी आणि योग्य दरात जीवनावश्यक सकस वस्तूंचा पुरवठा करणे किंवा तो व्यवस्थित रित्या होत आहे की नाही हे बघणे, सरकारचेच काम आहे.

ट्रेड मार्क's picture

9 Jun 2017 - 9:12 pm | ट्रेड मार्क

देशाला मातृभूमी मानतात, बायको कुठे आली मधेच!

तसेही बायकोला शिव्या घालण्याचा लग्नसिद्ध अधिकार देशविदेशातले बरेच पुरुष गाजवतात.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 9:15 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद देतांना कधी कधी असा गोंधळ होतो.

वैचारिक क्लॅरिटी असली की चूक असंभव आहे.

तुम्हाला कळेल असं लिहीतो.

जसा देशाशी आपला नित्य संबंध आहे तद्वत पत्नीशी देखिल असतो. जर चारचौघात पत्नीला उणंदुणं बोललो तर संबंध बिघडण्यापलिकडे आणि घरात घुसमट होण्यापलिकडे काही होत नाही.

देशाबद्दल लेखात व्यक्त केल्यासारखे (आणि विशेषतः `भारतात जन्म मिळणे म्हणजे मागच्या जन्माच्या पापांची शिक्षा') असले भेदी विचार असतील तर बाहेर पडल्यावर सगळीकडे नेगटिवीटीच दिसणार आणि जी घरात तीच घुसमट बाहेरही होणार !

आता सामान्यातल्या सामान्यालाही मुद्दा समजेल अशी आशा करतो !

जसा देशाशी आपला नित्य संबंध आहे तद्वत पत्नीशी देखिल असतो. जर चारचौघात पत्नीला उणंदुणं बोललो तर संबंध बिघडण्यापलिकडे आणि घरात घुसमट होण्यापलिकडे काही होत नाही.

फक्त या वाक्याशी बेशर्त सहमत.

संजय क्षीरसागर's picture

10 Jun 2017 - 12:54 am | संजय क्षीरसागर

ज्याप्रमाणे पत्नी हा रोज बदलण्याचा विषय नाही तद्वत देशही वारंवार बदलण्याची गोष्ट नाही. तस्मात, दोन्ही बाबतीत टोकाचे विचार जीवन असह्य करण्यापलिकडे काही करु शकत नाहीत.

ज्याप्रमाणे विवाह हा दोन मॅच्युअर्ड व्यक्तीतला हितसंबंध आहे तद्वत देशाशी नागरिकाचं नातं हे तो कसं निर्माण करतो यावर अवलंबून आहे.

इंडीया इज नॉट अ नेशन बट पॉप्युलेशन किंवा इथला जन्म म्हणजे पूर्वजन्मीचं पाप असले विचार व्यक्तिचं सामाजिक जीवन असह्य करण्यापलिकडे दुसरं काही करु शकत नाहीत.

वरील प्रतिसादाशीही सहमत आहे, फक्त "बाळबोध वचनं मनावर कोरलेल्यांचा गोंधळ होतो !" या वैयक्तीक टिप्पणीशी सहमत नाही.

ट्रेड मार्क's picture

10 Jun 2017 - 1:30 am | ट्रेड मार्क

थोडी वैचारिक क्लॅरिटी कमी पडली. ज्याप्रमाणे जन्म देणारी आई एकच असते त्याप्रमाणे जन्मभूमीपण एकच असते. तुमचे नागरिकत्व जिथे जन्म झाला त्यावर अवलंबून असते. एक भारतीय नंतर कितीही नागरिकत्व बदललं तरीही वंशाने भारतीयच राहतो. अगदी ४ पिढ्या दुसऱ्या देशात जन्मल्या तरीही त्यांना भारतीय वंशाचे म्हणूनच ओळखलं जातं. कारण? आपली जनुकं सतत त्याचा पुरावा देत राहतात.

याउलट बायको, तुम्ही कुठल्याही वंशाच्या मुलीला बायको म्हणून स्वीकारू शकता. पटलं नाही तर घटस्फोट घेऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करू शकता. पत्नीला चारचौघात कशाला, एकांतात बोललात तरी बघा काय काय होतंय.

त्यामुळे आईला वाटेल तसं बोलणारा किंवा त्रास देणारा हा तुलनेने जास्त धिक्कारला जातो.

बाकी मुवींचं "भारतात जन्म मिळणे म्हणजे मागच्या जन्माच्या पापांची शिक्षा" हे वाक्य Sarcastically म्हणले असावे असं मला वाटतं. हा तुम्हाला भेदी विचार वाटतोय म्हणजेच जन्मभूमीला आईची उपमा योग्य आहे. कारण, "कशाला या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो" असं म्हणणाऱ्याला जग भेदी म्हणते.

तर आम्हाला तुमचा विचार कळला नाही म्हणण्यापेक्षा पटला नाही. मग आम्हाला असामान्य म्हणणार का?

मार्मिक गोडसे's picture

9 Jun 2017 - 8:23 pm | मार्मिक गोडसे

लोकल तिकिट खिडकीवर वर कोणी मधेच घुसण्याचा प्रयत्न केल्यास आपण त्याला रांगेत येण्यास भाग पाडतो तेव्हा एका व्यक्तीला शिस्त लावल्याचे समाधान मिळते.

दादा कोंडके's picture

9 Jun 2017 - 8:47 pm | दादा कोंडके

दोन आठवड्यापुर्वी 'फन वर्ल्ड' च्या वाटर वर्ल्ड मध्ये गेलो होतो. माणशी नउशे रुपये फी भरून आलेली मंडळी देखील इतकी हुल्लडबाजी करू शकतात यावर विश्वासच बसेना. तेव्हड्याश्या जागेत प्रचंड मोठ्या आवाजात गाणी लावून बायका आणि पुरुष साड्या, चुडिदार, चड्ड्या, घालून 'रेन डान्स' करत होते. आणि दमलेले तिथे शेजारीच उभ्या उभ्या ओघळत्या अंगाने चिकन बिर्याणी खात होते. गर्दीला आवरायची कुठलिही यंत्रणा तिथे नव्हती. मला तक्रार करायची होती पण कुणीही मॅनेजर भेटला नाही. आणि शेवटी लोकांविषयी त्याच्याकडे तक्रार करण्या काहिही हशील नाही हे ओळखून पधरा-वीस मिनिटात छत्तीसशे रुपये ओवाळून घरी आलो.

पुर्वी करायचो. >> मी सुद्धा. अजूनही करतो. पण, अपेक्षित यश येत नाही. उद्धट उत्तरे मिळतात.
"आपल्यासारखे'' हे मूठभर शिस्तप्रिय मध्ये मोडतात. ०.५ विरुद्ध ९९.५ हा लढा सोपा नाही. कित्येक शतके लढावा लागेल.
मी आशावादी आहे पण, वास्तव नाकारता येत नाही.

रामपुरी's picture

9 Jun 2017 - 9:14 pm | रामपुरी

कायदा / नियम यांचा आदर करायला ज्यावेळी भारतीय शिकतील त्यावेळी तो महासत्ता होईल. आपल्या हयातीत शक्य होईल असे दिसत नाही. आपण नियम मोडायलाच सोकावलेले असतो. कटू आहे पण सत्य आहे.

देशाला मातृभूमी मानतात, बायको कुठे आली मधेच! >>>
खरंय. मलाही ती उपमा पटली नाही.
आपण नियम मोडायलाच सोकावलेले असतो. कटू आहे पण सत्य आहे. >>>>> +१००००००

संजय क्षीरसागर's picture

10 Jun 2017 - 12:11 am | संजय क्षीरसागर

खरंय. मलाही ती उपमा पटली नाही.

बाळबोध विचारसरणीला नवा विचार चटकन समजत नाही. वरचा प्रतिसाद वाचल्यावर मुद्दा लक्षात येईल.

आम्ही सगळे बाळ, तुम्ही एकमेव पणजोबा!
गप्पा की राव! काही विषयात तुमचे ज्ञान मान्य देखील करू पण प्रत्येक गोष्टीत?
लैच अती करता राव!

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2017 - 11:09 pm | संजय क्षीरसागर

आपण स्वतः अजून ही बाटलीनंच दूध पिणारे होतो . या प्रकारच्या बौद्धिक आनाकलनाची जाणीव प्रतिसाद विषयाला धरुन नसण्यानं होते. थोडी फार समज असलेली व्यक्ती, स्वतःकडे मुद्दा नाही म्हटल्यावर उगीच काही तरी खरडून वारंवार स्वतःचा कचरा करुन घेत नाही.

असे तर्कशास्त्राचे साधे नियम आहेत.

दशानन's picture

11 Jun 2017 - 11:15 pm | दशानन

आणि याच प्रकारातील ?

आपल्यासाठी काही कोटेबल कोटस

" गुड थिंग्स इन लाइफ...." अब्राहम लिंकन
"लोग कहते हैं मुंबई बहुत क्राउडेड है..." गीत, जब वी मेट मधली..
"खेड्यांकडे चला..." म. गांधी...

तुम्हा सर्वांच्या मते जगातील सर्वात आदर्श जागा कोणती..?

मोदक's picture

11 Jun 2017 - 8:05 am | मोदक

?

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 10:47 am | मुक्त विहारि

कारण,

१. प्रत्येक जण सैनिक.

२. नागरिकांनी सरकारला दिलेल्या प्रत्येक पैशाचा सुयोग्य रित्या विनियोग.

३. देशा आधारीत निर्णय घेण्याची राजकीय नेत्यांची क्षमता.

४. स्वयंशिस्तीची सुरुवात स्वतः पासूनच करण्याची नेत्यांची मानसीकता.

५. नियम पाळल्याचे उत्तम फलीत हे अंतिमतः सर्वांनाच मिळते, ह्या उक्तीने वागणारा संस्कारीत समाज.

अर्थात ह्याही नियमांना अपवाद असणारच पण ते ५-६%च्या वरती नक्कीच नसणार, असा अंदाज.

(स्वीस चॉकलेट आणि अप्रतिम निसर्ग, हे माझ्या दृष्टीने नगण्य. आजकाल स्वीस चॉकलेट तर पुण्यात पण मिळते आणि आमच्या कोकणात तर निसर्गच निसर्ग.....)

सध्या तरी स्वित्झर्लंड......

यातील "सध्या तरी" वरून पुढे संभाषण करण्याची इच्छा मेली आहे. शुभेच्छा..!

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 10:06 am | मुक्त विहारि

हा शब्द तुम्ही कश्या प्रकारे विचारात घेतला आहे, ह्याला अर्थ आहे.

१. ज्या तर्‍हेने आपण नैसर्गिक साधन संपत्ती लुबाडत आहोत, त्या वेगात मानव तरी पृथ्वीवर टिकेल का?

२. युरोपमध्ये आज-काल आंतकवाद्यांचा धुमाकूळ सुरु आहे, असे वाचनात आहे, आज जरी स्वीत्झर्लंड ह्या पासून दूर असले तरी उद्याचा भरवसा देता येत नाही....म्हणूनच तो सध्या तरी....(जपानी नागरिकत्व मिळणे जवळपास अशक्य, तरी पण तोक्यो मध्ये आतंकवादी हल्ला झालाच की.)

विषय आतंकवाद्यांकडे काढलाच आहे, म्हणून स्वत्झर्लंड विषयीची ही लिंक जरा वाचलीत तर उत्तम....

https://townhall.com/columnists/rachelmarsden/2017/03/22/why-does-terror...

३. पर्यटन आणि बँकिंग, हे सध्या तरी ह्या देशाच्या उत्पनाचे महत्वाचे स्त्रोत. (ह्या देशात अजून कुठले उत्पनाचे स्त्रोत आहेत, ते माहीत नाही. कुणी सांगीतल्यास उत्तम.) आणि हे दोन्ही इतरांच्या पैशावर अवलंबून असलेले असल्याने, सध्या तरी.....

@ मोदक,

तूम्ही मुद्द्या आधारीत चर्चा करता, म्हणून ही वाद-प्रतिवाद.

"सध्या तरी" याचा मी सरळ सरळ असा अर्थ घेतला आहे की आत्ताच्या घडीला किंवा पुढील दोन तीन वर्षांसाठी तुम्हाला (भारत सोडून) अमुक अमुक देश आवडलेला आहे आणि तुम्ही तेथे वास्तव्य करू शकता. याचाच पुढे असाही अर्थ निघतो की समजा त्या देशात कांही गडबड झालीच तर तुम्ही तेथून चंबुगबाळ आवरून नवीन देशाकडे कूच कराल जो त्या घडीला आणखी चांगला वाटेल. यात तुमच्या दृष्टीने काहीच चुकीचे नसेल कदाचित, पण मला हे पचवणे जड जाते आहे.

या परिस्थितीमध्ये तुमची निष्ठा कोण्या एका देशाशी आहे की फक्त स्वत:शी आणि कुटुंबाच्या सोयीशी आहे हा महत्वाचा प्रश्न आहे.

(इथे कोणीही भारताबाहेर कोणत्याही देशात नोकरीसाठी जातात म्हणजे देशाशी प्रतारणा असा अर्थ मला अपेक्षित नाही. तर तुम्ही कोणत्या देशाचे प्रातिनिधित्व करता या अनुषंगाने अर्थ अपेक्षित आहे.)

समजा भारतातल्या अनागोंदीला आणि लोकांच्या बेशिस्त वर्तनाला कंटाळून तुम्ही स्वित्झर्लंडला गेलात तर तेथील नागरिकत्व मिळेपर्यंत तुम्ही भारतीय नागरीकच असाल फक्त तेथे दीर्घकालीन वास्तव्य केलेले असेल. अशा वेळी कोणत्याही प्रकारच्या संकटात तुम्हाला भारतीय वकिलातीचाच आश्रय घ्यावा लागेल. "मी बेशिस्त भारतीयांना कंटाळून देश सोडला आहे आता मी कोणत्याही भारतीयाचे उपकार घेणार नाही" असा रामशास्त्री बाणा दाखवू शकाल का..?

"सध्या तरी" वर आक्षेप या साठी आहे की तुमची निष्ठा नक्की कोणत्या देशाप्रती आहे हे तुम्हाला स्पष्ट करता आले नाहीये.

(मी भारतात राहतो म्हणजे मी लै त्याग करतो असा माझा पवित्रा नाहीये, मला बाहेरच्या देशात चांगली संधी मिळाली किंवा चुकून रा.गा. पंतप्रधान झाला तर मीही भारताबाहेर जाईनच - मात्र भारतात जन्म घेणे म्हणजे मागच्या जन्मीच्या पापाची सजा असा मी स्वप्नातही विचार करू शकणार नाही.)

वरील कोणत्याही वाक्यामुळे गैरसमज होत असल्यास अवश्य प्रतिसादावे, मी पॉझीटिव्ह स्पिरिटमध्येच प्रतिसाद दिला आहे.

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 10:39 pm | मुक्त विहारि

काही गोष्टी फार परखडपणे लिहीता येत नाहीत.

तस्मात क्षमस्व.

ह्या वादात मी तुम्हाला इथे प्रतिवाद करू शकत नाही. ही ती वेळ पण नाही आणि ही ती जागा पण नाही.

तुम्ही तुमच्या जागी सुखी आणि मी माझ्या.

गामा पैलवान's picture

10 Jun 2017 - 12:57 am | गामा पैलवान

अभिजित अवलिया,

भारत हा लष्करी व कदाचित आर्थिक महासत्ता देखील नक्की होईल पण कधीही एक शिस्तबद्घ देश होणार नाही असे माझे ठाम मत आहे.

कोणे एके काळी काही वर्षे भारत प्रचंड शिस्तबद्ध होता. जुन्या जाणकारांना लगेच कळलं असेल मी कशाबद्दल बोलतोय ते.

इ.स. १९७५ च्या जूनपासून १९७७ च्या मार्चपर्यंत भारतात आणीबाणी लागू होती. विनोबा भाव्यांनी हिला अनुशासन पर्व म्हंटलं होतं. हे नाव अगदी सार्थ होतं. लोकं स्वत:हून शिस्त पाळंत असंत. सार्वजनिक वाहतूक वेळेवर चालंत असे. माणसं बेशिस्तीत वागायला घाबरायची.

धागालेखकाने ज्यास गर्दीची बेशिस्त म्हंटलं आहे ती खरंतर भारतीय जनतेने लोकशाहीची मोजलेली किंमत आहे.

आ.न.,
-गा.पै.

अत्रे's picture

10 Jun 2017 - 7:13 am | अत्रे

लेख आवडला. मी गर्दीच्या ठिकाणी (सार्वजनिक भाषणे, टिपिकल टुरिस्ट लोकेशन्स, गर्दी असणारी मंदिरे) जायचे टाळतो. पण गर्दीचा आनंदही घेता येतो - आजूबाजूच्या लोकांना ऑब्झर्व करण्यात वेळ चांगला जातो.

काय ऑब्झर्व करता इतर लोकात?

त्यांच्या सवयी ओब्सर्व करणे. जसे कि एखादा माणूस मोबाइलवर बोलताना कसे हातवारे करत आहे. एखादा माणूस कसे तोऱ्यात चालत आहे किंवा घाबरून चालत आहे. हे ऑबझर्व करून त्यामागची स्टोरी काय असेल याचा विचार करणे.

किंवा काही टाइमपास गेम - म्हणजे किती लोक छत्र्या घेऊन चालले आहेत हे मोजणे.

हे लेख वाचा, अजून आयडिया सुचतील

https://en.wikipedia.org/wiki/People_watching
https://www.psychologytoday.com/blog/fulfillment-any-age/201504/the-expe...
http://www.wikihow.com/Begin-People-Watching

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
@ट्रेड मार्क : सहमत.

एक कुतुहल आहे. लेखात वर्णन केलेल्या इं. गांधींच्या सभेला इथले कोणी हजर होते का ?

१९७७ मध्ये मोठ्या सभेला गेलो होतो...

आमच्या डोंबोलीत त्यावेळी अटल बिहारी वाजपेई आले होते.

आणीबाणी म्हणजे काय? ते काही माहीत न्हवते. पण सभा संपल्यावर भेळ मात्र मिळाली.

त्यामुळे कुठल्याही राजकीय सभेला गर्दी फक्त कार्यकर्त्यांचीच नसते, हा धडा मिळाला. (आयला, शालेय शिक्षणापेक्षा जगात जास्त शिक्षण मिळते.लय मोठे-मोठे गुरु असतात.)

आजकाल पण जातो राजकीय सभेला, लय मज्जा मज्जा येते. कोण धरणात पाणी कसे भरावे? ह्याबद्दल मौलिक सूचना देतो, कुणी कुणाला तरी समुद्रात बुडवतो तर कुणी बोफोर्स बद्दल.

पण एक तत्व मात्र पाळतो, जास्तीत जास्त दूर आणि लगेच पळता येईल अशी जागा निवडतो.

प्रमोद देर्देकर's picture

10 Jun 2017 - 10:15 pm | प्रमोद देर्देकर

वाढती लोकसंख्या हे सर्व समस्यांच मूळ आहे.

आश्चर्य म्हणजे आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले पण एकाच्याही मनात वाढणारी जनसंख्या कशी रोखवी याबद्दल काही उपाययोजना करावी असे आले नाही. वाटलं होते मोदी काही कठोर निर्णय घेतील पण नाहीच.

काय म्हणता ? मुंडे काही वेगळचं सांगत आहेत. हा बघा पुरावा ! :)

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 10:29 pm | मुक्त विहारि

पण लक्षात घेतो कोण?

आणि हा प्रश्र्न फक्त भारतापुरताच मर्यादित नाही...

http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...

असो.....

आजकाल ह्या पृथ्वीपेक्षा आमचा ३-१३-अ७६० जास्त बरा....

३-१३-१७६०

असा बदल करून हवा आहे....

नावातकायआहे's picture

11 Jun 2017 - 8:44 am | नावातकायआहे

देश सोडा!

गवि's picture

12 Jun 2017 - 8:53 am | गवि

You are not in the traffic, you ARE the traffic.

संजय क्षीरसागर's picture

12 Jun 2017 - 9:57 am | संजय क्षीरसागर

You are the knower who can decide how to handle the Traffic :)

असंका's picture

12 Jun 2017 - 9:27 pm | असंका

ओ दादा हा फाउल आहे. हा प्रतिसाद मी आधीच दिला आहे इथे पहा.

मराठी_माणूस's picture

12 Jun 2017 - 11:51 am | मराठी_माणूस

काळ, आणीबाणी पश्चात निवडणुका घोषीत झाल्या नंतरचा . स्थळ वरुणतिर्थ कोल्हापुर. वक्ते पुल. अफाट गर्दी . मैदान पुर्ण भरलेले . भाषण संपल्यावर पुलंनी श्रोत्यांना विनंती केली की प्रथम मुलांना अणि स्त्रियांना जाउ द्या. आणि पुरुष माणसे जागच्या जागी उभी होती. कोणताही गोंधळ न होता मैदान रीकामे झाले.

संजय क्षीरसागर's picture

12 Jun 2017 - 11:58 am | संजय क्षीरसागर

फालतू आठवणी काढून स्वतः आणि आपल्याबरोबर इतरांना खंतावण्यापेक्षा, प्राप्त परिस्थितीतून मार्ग कसा काढला हे सांगणं विधायक आहे.

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 12:38 pm | मुक्त विहारि

सध्याचे काय?

आम्ही वर्तमानकाळात जगतो.

आजकाल कुठल्याही सार्वजनिक कार्याला जर बेशीस्तीचे आणि ध्वनी प्रदूषणाचे काळबोट लावल्याशिवाय पुर्ण होत नाही. (ह्यालाच आजकाल तीट लावणे असेही म्हणतील.)

अर्थात देशात आजकाल देवापेक्षा माणुसच श्रेष्ठ. (गोंदवलेकर महाराजांच्या गोंदवले इथल्या मठातून साभार..... तिथळ्या एका विश्वस्ताने हे वाक्य आम्हाला ऐकवले आहे आणि डोंबोलीत तरी पाहिलेले आहे. देवाच्या मंदिरांपेक्षा, महाराजांच्या कुटीतच गर्दी जास्त, व्यक्तीपुजेचे स्तोम वाढतच चालले आहे मग तुम्ही हातात कमळ घ्या किंवा झाडू किंवा धनुष्य बाण किंवा घड्याळ....असो, आता आमची सुक्ष्मात जायची वेळ झाली.)

संजय क्षीरसागर's picture

12 Jun 2017 - 12:57 pm | संजय क्षीरसागर

लेखाची सुरुवात बघा :

काळ : १९७१-७२ दरम्यानचा एक दिवस

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 2:00 pm | मुक्त विहारि

माझ्या संगणावर तर तुमचा हा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/reply/39973/943391) , मराठी_माणुस ह्यांच्या ह्या (http://www.misalpav.com/comment/reply/39973/943389) प्रतिसादला प्रतिसाद म्हणून दिसत आहे....

आणि

तुम्ही म्हणताय की, तुम्ही लेखाला प्रतिसाद दिला आहे.

वर्तमान स्थितीत माझाच संगणक गंडलेला दिसतोय.

माझा संगणक गंडलेला असेल तर आय माय स्वारी.

संजय क्षीरसागर's picture

12 Jun 2017 - 8:44 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसाद लेखातल्या वृत्तीला आणि तुमच्या `इथे जन्मलो हे पाप' या कृतघ्नतामूलक विधानाला आहे.

हा असाच गर्दीचा लय बेक्कार अनुभव वाघा बॉर्डरचा रोज संध्याकाळचा कार्यक्रम बघताना आला होता.
"वाघा बॉर्डर नाही बघितली तर काय बघितलं आयुष्यात?" इथपर्यंत तिथलं कौतुक ऐकल्यामुळे सहकुटुंब बघायला गेलो. प्रत्यक्षात प्रचंड गर्दी, अभूतपूर्व गोंधळ यामुळे माझी आई आणि काकू चुकून पाकिस्तानच्या हद्दीत तर नाही ना गेल्या इथपर्यंत वेळ आली होती.

एक निरीक्षण : कार्यक्रम संपल्यावर पाकिस्तानची जनता साधारण पाच-दहा मिनिटात दिसेनासी झाली होती. पण आपले लोक सुमारे पाऊण तास तिथंच रेंगाळत आणि बेशिस्तीने वागत होते. मी तर अर्धा-पाऊण आमच्या मातोश्रींना शोधण्यात घालवले.

अप्पा जोगळेकर's picture

12 Jun 2017 - 12:39 pm | अप्पा जोगळेकर

अजून जेमतेम ७० वर्षे झाली आहेत. महाकाय देश, समाज पसमाज, प्रगल्भ होण्यासाठी काही शतके जावी लागतात.
अमेरिका १७८९ मधे स्वतंत्र झाली. बाकी टिकली एवढे देश स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्राईल आणि भारत यांची तुलना बरोबर नाही.
तूर्तास युके हे नेशन नसून पॉप्युलेशन झाले आहे. नैसर्गिक न्याय.

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 1:13 pm | मुक्त विहारि

तब्बल ७० वर्षातील अधोगती बद्दल बरेच लिहिता येईल.....पण काही ठळक उदाहरणे.......

१. आपल्या देशाला अजून नक्की अशी सीमा नाही. (काश्मीरचा प्रश्र्न कमी होता म्हणून अरुणाचल प्रदेश वर चीन दावा करत आहे. "विवेक" मध्ये चीनच्या ह्या धोरणाबद्दल १९८०-९० च्या सुमारास ह्याबद्दल लेख वाचलेला होता. पण "विवेक"ला एक ठराविक शिक्का आहे, त्यामुळे........ )

२. लोकसंख्यावाढीला आळा घलण्याचे धोरण नाही.

३. रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग नाही.

४. हायवे वरचे वाढते स्पीड ब्रेकर्स. एकदा मुंबई-गोवा हायवेने प्रवास करून बघा.

५. मराठी माणसांची हळूहळू पण निश्र्चितपणे कमी होणारी केंद्रीय आस्थापनातील नौकरी आणि मराठी भाषा. (रेल्वेत आजकाल मराठी माणसांना नौकरी मिळत नाही.जे रेल्वेचे तेच स्टेट बँक ऑफ ईंडिया आणि बँक ऑफ इंडिया बाबतीत. आणि पोस्टाबाबतीत पण...) म्हणजेच एखाद्या प्रदेशावर जाणून-बुजुन अन्याय करण्याची वृत्ती.

६. कुठल्याही शासकीय आणि निमशासकीय योजनेचा उडणारा बोजवारा. (आता इथे लोकसंख्या आड येत नाही पण नियोजनशून्य नियोजन हा मूद्दा येतो. लोकांच्या पैशांचा आणि राष्ट्रीय वेळेचा दुरुपयोग) एक साधी कोकण रेल्वे बांधण्यापुर्वी बोगदे आणि पूल जरी ४ ट्रॅकचे केले असते तरी खूप मोठे काम झाले असते. कारण आता ती २ ट्रॅकची होई पर्यंत गर्दी ४ ट्रॅक पर्यंत जाणार.आपला लोकसंख्या वाढीचा दर अफाट आहे.)

टिकली एव्हढे देश देखील ह्या अशा अडचणी रस्त्यात येवू देत नाहीत, त्यामुळेच त्यांचा वेळ, पैसा आणि परीश्रम त्यांच्या देशाच्या उन्नतीला कारणीभूत ठरतात.

असो,

उंच इमारतींच्या पायथ्याला झोपड्या आहेत की हिरवीगार कुरणे? हे बघणे जास्त मह्त्वाचे.

अप्पा जोगळेकर's picture

12 Jun 2017 - 2:06 pm | अप्पा जोगळेकर

काका, १९७० पर्यंत भारतात दुधाची इतकी टंचाई होती की सकाळी ७ नंतर दूध मिळत नव्हते असे वडील सांगतात. सणासुदीला त्यांच्या दूधवाल्याला आधीच सांगून ठेवावे लागायचे नाहीतर दूध वगैरे काही नाही. अन्नाची पण हीच अवस्था आहे. 'मिलो' च्या कथा तुमच्या पिढीतल्या लोकांकडूनच ऐकल्या आहेत.
परिस्थिती हळूहळू बदलते आहे.
कोकण रेल्वे हे तर एक आश्चर्य आहे. मुंबई गोवा हायवे चे नविन काम पाहिले काय. ६ लेनचा रस्ता आहे.
मराठी माणसे सरकारी नोकरीत, केंद्रीय आस्थापनेत नाहीत किंवा कमी आहेत हे बरेच आहे. नोकरी सुरक्षित असली की माणसाची अधोगती होते.
तुम्ही आखाती देशात बराच काळ वास्तव्य केल्यामुळे तुमच्या अपेक्षा कदाचित खूप उंच आहेत.

संजय क्षीरसागर's picture

12 Jun 2017 - 8:48 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही आखाती देशात बराच काळ वास्तव्य केल्यामुळे तुमच्या अपेक्षा कदाचित खूप उंच आहेत.

किंवा सध्या भरपूर वेळ असल्यामुळे मागल्या `जन्मीचं पाप वगैरे' भन्नाट विधानं करुन, धुनी पेटती ठेवण्याची मजा घेतायंत .

कदाचित नाही......

माझ्या अपेक्षा उंच ही नाहीत किंवा असा विचार करणारा मी एकमेव पण नाही.

माझ्या ओळखीतले/शाळेतले जितके जण बाहेरच्या देशात स्थाईक झाले ते परत आले नाहीत.

असो,

वरील प्रतिसाद हा अप्पा जोगळेकर ह्यांनाच आहे.

प्रीत-मोहर's picture

12 Jun 2017 - 9:09 pm | प्रीत-मोहर

लेख आवडला

दशानन's picture

12 Jun 2017 - 10:02 pm | दशानन

कधी निघताय???
नाही, टाटा करायला येतो हवं तर.

बाकी, ही फक्त गर्दी नाही आहे, जगातील सर्वात तरुण असलेली लोक शक्ती आहे. फक्त एकच बाजू पाहू नका, कधी कधी दुसरी बाजू पण पहा, देवा शपथ काय आनंद मिळतो... फक्त नजर ठेवा, चांगल्यावर वाईट सांगायला काय हो जगभराचा मीडिया बसला आहे त्याचसाठी.

पैसा's picture

12 Jun 2017 - 10:23 pm | पैसा

शिस्त नाही हे अगदी खरे आहे. आता परवा परवाच एका खाजगी सुपरमार्केटमधे बिलाच्या लाइनीत उभी होते. चार पैकी फक्त एका काउंटरवरची बाई काम करत होती. बाकी तिघेजण बोंबलत फिरत होते. पहिला आठवडा म्हणून बर्‍यापैकी गर्दी होती. बिल करायला वेळ झाला आणि लाईन लागली तसे ओरडून अजून एकीलाकाउंटरवर येऊन बसायला भाग पाडले. त्याबरोबर लोक गडबड गोंधळ करत तिकडे धावले की तिथे घोळका तयार झाला. दरम्यान माझ्यामागून दोघांनी पुढे येऊन एकच वस्तू आहे म्हणत बिले करून घेतली. एक वस्तू म्हणताना एकट्याची बायको आतून अजून चार वस्तू घेऊन आली. मी आ वासून बघतच आहे. माझ्या बास्केटमधेही चार पाच वस्तूच आहेत. तेवढ्यात अजून एकजण एक्स्क्युज मी म्हणत माझ्या पाठीमागून हात पुढे करायला लागली आणि बिलवाली तिची वस्तू हातात घ्यायला लागली तेव्हा माझा संयम संपला. मग मी त्या बाईचा हात सरळ मागे ढकलला आणि लायनीत रहा म्हटले. बिल करणारीला पण विचारले की मालक वरच्या मजल्यावरआहेत हे माहीत आहे. जाऊन तक्रार करू का? तेव्हा कुठे तिने बिल केले. म्हणजे शिस्तीत लायनीत उभे रहाणारे मूर्ख ठरायची वेळ येते शेवट.

धर्मराजमुटके's picture

12 Jun 2017 - 10:52 pm | धर्मराजमुटके

अगदी ! लायनीत कोणाचा नंबर पहिला हे लाईनमधे कोठे उभे आहोत यावरुन ठरत नाही तर कोणाचा हात बिलिंग काऊंटरवरच्याला पहिला दिसतो यावर ठरतो आजकाल !

किसन शिंदे's picture

13 Jun 2017 - 5:47 pm | किसन शिंदे

डी-मार्ट का?

पैसा's picture

13 Jun 2017 - 8:36 pm | पैसा

फोंडयात आहे एक बोरकर म्हणून. गोव्यात अजून दोन तीन आहेत त्यांची. पण मला वाटते कुठच्याही स्टोअर मध्ये गेले तरी असलेच अनुभव येतात. आपण ४ लोकांच्या आधी बिल करून घेतले म्हणून मोठे कौतुक वाटते लोकांना.

या धाग्यावर सांप्रत प्रतिसादांची गर्दी झाल्यामुळे निखळ अभ्यासपूर्ण मत मांडण्याचा मनोदय सोडून देत आहे! ;-)

कुमार१'s picture

13 Jun 2017 - 12:59 pm | कुमार१

सर्व प्रतिसादकांचे आभार !

सतिश गावडे's picture

13 Jun 2017 - 2:32 pm | सतिश गावडे

काहीही हं कुमार.
आता तुम्ही असेही लिहाल की आपले लोक रहदारीचे नियम पाळत नाहीत.

किसन शिंदे's picture

13 Jun 2017 - 5:46 pm | किसन शिंदे

=))

लहानपणी शाळेतल्या सायकल स्टॅण्डवर एकाच्या सायकलीची हवा काढण्याचे पाप माझ्याकडून झाले होते, त्याचा परिणाम म्हणून मोठेपणी जिथे तिथे बेशिस्तपणे गाड्या चालवणारी लोकच समोर येतात. ;)

अभिजीत अवलिया's picture

13 Jun 2017 - 7:08 pm | अभिजीत अवलिया

दिवंसेन्दिवस नियम पाळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अगोदर लोक फक्त शहरात रस्त्याच्या उजवीकडून गाड्या चालवत होते. आता हे लोन हायवेला पोचले आहे. गेल्या महिन्यात मुंबईला जात होतो तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेला एक्सप्रेस वे आणि जुन्या हायवेचा कॉमन भाग सोडून असणाऱ्या भागात पण बरेचसे दुचाकीस्वार उजवीकडून जात होते. भारतात रस्त्याचा अर्धा भाग डावीकडून गाडी चालवणाऱयांसाठी आणि अर्धा उजवीकडून चालवणाऱयांसाठी ठेवला गेला तर फार बरे होईल.

वरुण मोहिते's picture

13 Jun 2017 - 8:59 pm | वरुण मोहिते

आणि अतिविचार हे भारतात राहण्यास धोकादायक आहेत . यु नो ते इन्जुरीयस टू हेल्थ आठवतंय का .. लोल

चित्रपटगृहात जाऊन शांतपणे चित्रपट पाहणे हे सुख सुद्धा हल्ली मिळत नाही.
काय काय शिकवायचे आहे आपल्या जनतेला ??

हे दोन अनुभव वाचा