त्या तिथे, पलीकडे... टेकाडे

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
8 Jun 2017 - 5:45 pm

शाळा भरायच्या एक-दीड तास आधी घरून निघणारी 'इंटरनॅशनल स्कूल' ला जाणारी मुलं पाहिली कि आपला 'बालपणीचा काळ किती सुखाचा' होता ते जाणवतं. पुण्यात एरंडवणे भागात बालपण गेलं. शाळा सायकलने ५ मिनिटे आणि कॉलेज १५ मिनीटांवर.

अर्थात शाळा, कॉलेज, ऑफिस इ. गोष्टी घरापासून अगदी जवळ असणारे इतरही अनेक भाग पुण्यात आहेत. मात्र ह्याचबरोबर अजून एक ठिकाण ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. ते म्हणजे माझी लाडकी 'हनुमान टेकडी'. कर्वे रस्त्यासारख्या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यालगत हे एक अदभुत जग वसलेलं आहे.

अगदी लहानपणी आमच्या सोसायटीतल्या ठाकूर काकांबरोबर आम्ही सगळी लहान मुलं संध्याकाळी टेकडी वर जायचो. घरापासूनच पायी निघायचं, ते ‘केळेवाडी’ चा डांबरी रस्ता चढून टेकडीवर पोचायचं. दीड-दोन तासांची पायपीट व्हायची. क्वचित परत येताना बाजूच्या झाडीत ससे आणि मोर देखील दिसायचे; त्याचं फार अप्रूप वाटायचं. टेकडीवर अंधार पडत असताना गायब झालेले कावळे पोटात येऊन कोकलायला लागायचे. त्यात भरीस भर म्ह्णून घरी येताना केळेवाडीच्या झोपड्पट्टीमधून भाकरीचा खरपुस वास यायचा. रस्त्याने थोडं खाली उतरलं कि विठ्ठलाच्या देवळात कीर्तन चालू झालेलं असायचं. 'आधी पोटोबा, मग विठोबा' म्हण ऐकली कि कायम भाकरीचा वास आणि विठ्ठलाचे हे देऊळ डोळ्यासमोर येतं.

पुढे सातवी-आठवी इयत्तेपासून सायकलिंग वाढलं तसं मित्रांबरोबर लॉ कॉलेज रोड च्या 'कांचन गल्ली’त सायकल लावून त्या बाजूने टेकडी चढत जायचो. कांचन-गल्लीतले उच्चभ्रू लोकांचे बंगले डोळे विस्फारून बघायचो. मोठं झाल्यावर आपला देखील लॉ कॉलेज रोड / प्रभात रोड ला बंगला असावा असं वाटायचं.

आयुष्याच्या विविध टप्प्यामध्ये, विविध कारणास्तव आणि विविध वेळी टेकडीवर जाणं झालं. शाळेत असताना सोसायटीला मित्रांबरोबर गम्मत म्ह्णून हिंडायला. नववीत असताना WWF (World Wildlife Fund. काहींना माझ्या तब्येतीकडे बघून World Wrestling Federation वाटू शकतं म्हणून मुद्दाम खुलासा केला!) तर्फे पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण, उन्हाळ्यात टेकडीवरील झाडांना पाणी घालणे, पक्षीनिरीक्षण ह्या अनेक कारणाने अनेक वेळा गेलो. कॉलेज मध्ये गेल्यावर वेगळ्या 'पक्षीनिरीक्षणासाठी' जाणे झाले. अभ्यास करून कंटाळा आल्यावर गार वारा खायला टेकडीवर जाणे व्हायचे. अधून-मधून फिटनेसचं खूळ डोक्यात शिरायचं मग 'कॅलरीज जाळायला' टेकडी चढणे आणि जॉगिंग. नोकरी चालू झाल्यानंतर शनिवार-रविवार मित्रांसोबत टेकडीवर भेटायचो. जीवनाच्या ह्या प्रत्येक टप्प्यात टेकडी ने खूप छान साथ दिली.

निरनिराळ्या ऋतूंत टेकडीचं बदलणारं रूप बघायला मजा येते. उन्हाळ्यात पानगळतीमुळे सगळीकडे वाळलेल्या पानांचा गालिचा असतो. त्यामुळे टेकडी तपकिरी रंगाची दिसते. पावसानंतर हिरवळ आणि असंख्य रानफुलांनी टेकडीचं रुपच पालटून जातं. हे म्हणजे खाकी ड्रेस घालून रोज दिसणारा पोस्टमन एखाद्या लग्नात भारीचे कपडे घालून दिसल्यावर जसं होईल त्यापैकी आहे! इतके वर्षं हा कायापालट बघूनही मनात दर वेळी विचार येतो कि इतके महिने हिरवळ आणि रानफुलांच्या बिया जमिनीखाली पावसाची वाट बघत तग धरून कश्या रहात असतील?

IMG_20170518_132327_HDR

IMG_20161007_095735_HDR

टेकडीचा विस्तार इतका प्रचंड आहे कि तुमच्या आवडीनुसार तुम्ही टेकडीवर वेगवेगळ्या स्पॉट्स ना जाऊ शकता. केवळ व्यायामापूरतं जायचं असल्यास सकाळी ६:३० सुमारास कांचन-गल्ली मार्गे चढाई करावी. मारुतीच्या देवळापाशी २ मिनिटे दम खाऊन वेताळ टेकडीच्या पायथ्यापर्यंत जॉगिंग करावे. थोडा अधिक वेळ असल्यास थोडं पुढे खाणीपर्यंत जाऊन 'क्षणभर विश्रांती' घ्यावी. सोन्याची खाण पाहूनदेखील इतकं सुख मिळणार नाही तितकं ही दगडाची खाण बघून मिळतं.

IMG_20161007_092920_HDR

निवांत वेळ असेल तर इतरही अनेक ठिकाणं आहेत. वेताळ टेकडीवर जाऊ शकता. खाणीत उतरू शकतो. खाणीच्या पुढे चालत जाऊन वॉच टॉवर वर जाता येतं. मोरांचा आवाज आला तर त्यांना शोधत-शोधत टेकडी उतरून खाली गोखलेनगर पर्यंत जाता येतं. इतकं करून नाहीच दिसले तर 'वन्स-मोर' देऊन बघावा! मुख्य पायवाटे खेरीज अनेक छोट्या पायवाटा आहेत त्या एक्सप्लोर करायला फार मज्जा येते. पक्षीनिरीक्षण करण्यात रस असेल तर ARAI (Automotive Research Association of India) च्या परिसरात हिंडावे. उडणारे पक्षी बघण्यात विशेष रस नसल्यास 'कुत्री घेऊन चालणारे गोरेपान 'पक्षी' बघायचे असल्यास वेताळ टेकडी च्या पायथ्याशी असलेल्या मारुती मंदिरापाशी तळ ठोकावा!

IMG_6201

सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुमच्या आवडी (आणि सवडी) नुसार टेकडी वर जाऊ शकता. लहान मुलं बरोबर असल्यास खाणींच्या जवळ दगड आणि पक्ष्यांची पिसे गोळा करीत हिंडावे. संध्याकाळी जास्त रेंगाळता येत नाही कारण अंधार पडायला लागला कि निघावेच लागते. उन्हं सहन करायची तयारी असल्यास सकाळी मनसोक्त हिंडता येते. पाणी शक्यतो बरोबर घेऊ नये, मोकळेपणाने फिरता येत नाही! टेकडीवर सकाळी २-३ तास हिंडून सडकून तहान-भूक लागल्यावर वैशाली-रूपालीत जाऊन इडली-डोश्याचा फडशा पाडावा. संध्याकाळ असल्यास गणेश भेळ! वेळ कमी असल्यास नुसता उसाचा रस प्यावा.

वेताळ टेकडीपासून चतुर्श्रुंगी मंदिरापर्यंतचा ट्रेक वर्षातून एकदा करायलाच हवा. देवीचे भक्तगण पायऱ्या चढून देवळात येत असताना आपण डायरेक्ट कळसाजवळून एन्ट्री मारणे भारी वाटते. पुन्हा आल्या वाटेने परत जाण्याचा उत्साह नसल्यास सरळ खाली उतरून रिक्षा पकडावी. देवीचा आशीर्वाद असेल तर रिक्षावाला तुम्हाला इच्छित स्थळी सोडायला हो देखील म्हणेल कदाचित!

आपल्या मोबाईल मध्ये जुन्या-नवीन गाण्यांचं कितीही जबरदस्त कलेक्शन असलं तरी टेकडीवर गाणी स्पीकरवर लावू नये. तिथल्या गोड शांततेचा भंग होतो. मोठ्याने गाणी लावत फिरणाऱ्या लोकांना 'गांधीगिरी' करून (जुने!) हेडफोन्स वाटावेत असं अनेकदा मनात येतं. इतकं करूनही बधले नाहीत तर जवळच्या शिवसेना कार्यालयात संपर्क साधेन मी.

आवडत्या मित्र-मैत्रिणींबरोबर खाणीपाशी खाण्याचा प्रोग्रॅम मस्त होतो. कोरडी भेळ पार्सल आणावी. गवतावर कागद पसरून आवडीनुसार मटकी-कांदा-ठेचा मिक्स करून गप्पा मारत मारत खावी. घासागणिक आयुष्य वर्षा-वर्षाने पुढे जाते!

उन्हाळ्याच्या दिवसांत संध्याकाळी चिल्ड बिअर चे कॅन घेऊन देखील थोडं आडवाटेला 'बसू' शकता. मात्र आजूबाजूला पोलीस अथवा पोलिसांना 'तक्रार करू शकणारी' लोकं नाहीत ना ह्याची काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांत पहाटे उठून थर्मास मध्ये कॉफी घेऊन सूर्योदयापूर्वी टेकडी गाठावी. टीव्ही वर 'कॉफी विथ करण' बघण्यापेक्षा टेकडीवर 'कॉफी without any कारण' जास्त छान वाटते.

IMG_20160306_184942

भुतांच्या गोष्टी सांगणारा मित्र असल्यास रात्री ११ च्या सुमारास अमावास्येच्या 'अशुभ' मुहूर्तावर टेकडी चढत जावे. बरोबर मोबाईल फोन आणि बॅटरी नेणे भ्याडपणाचे लक्षण समजले जाते. वडा-पिंपळाची झाडे, मोठ्या आकाराची घुबडे आणि बाजूला असलेलं 'वेताळाचे' मंदिर आवश्यक अशी वातावरणनिर्मिती छान करतात. दुपारी वेळ असल्यास टेकडीवरील झाडाखाली पुस्तक वाचत ताणून द्यावी.

पहिल्या पावसाची मजा अनुभवायची असल्यास आकाशात काळे ढग जमा होताच तडक टेकडी गाठणे जरुरीचे आहे. पावसाच्या सरीनंतर येणारा मृदगंध आणि गारवा अनुभवायलाच हवा एकदा तरी.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा मला वेताळ टेकडी च्या व्हॅलीतील ARAI कंपनीत काम करणाऱ्या लोकांचा जास्त हेवा वाटतो! रोज ऑफिस ला जाता-येता टेकडीचं दर्शन. लंच टाइम मध्ये खाणीपर्यंत फेरफटका. अहाहा! (ARAI मध्ये ऑडिट विभागात व्हेकन्सी असल्यास कृपया मला सांगा हं नक्की. पगार थोडा कमी दिला तरी हरकत नाही).

गेली ३० वर्षे टेकडीवर जातोय. तेव्हा नवीन लग्न झालेली जोडपी; आता नातवाबरोबर चालताना दिसतात. पण ही हनुमान टेकडी मात्र अजूनही ऊन-वारा-पाऊस-प्रदूषण सहन करूनसुध्दा नव्या नवरीप्रमाणे कोवळी दिसते. चिरतरुण राहण्याचा वर मिळाला असावा हनुमानाकडून कदाचित....

Ashish Subhedar

प्रवासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 6:05 pm | मुक्त विहारि

आयला,

इथे आमचे भाड्याचे घरच टेकडीच्या पायथ्याशी आणि एक जागा धरणापाशी.

मोरच काय कधी कधी बिबट्यापण दिसतो.

उपेक्षित's picture

9 Jun 2017 - 1:46 pm | उपेक्षित

ते तुमचे झाले आमच्या सारख्यांचे काय मूवी ?

बाकी लेख झकास जमलाय सरनोबत.

साधे, सोपे आणि सरळ.....

पुण्यात जशा टेकड्या आहेत तशा इतर गावांत पण आहेतच आणि त्या त्या गावांतील टेकडी पण तशीच सुंदर असते.

हां, आता एखादा लेख जर पुण्यातील एखाद्या अनवट ठिकाणाबद्दल आला असता तर गोष्ट वेगळी.

श्रीखंडाचे पाणी पियुष म्हणून पिणार्‍या बर्‍याच पुणेकरांना, पुण्याचेच कौतूक जास्त. आमच्याकडची भेळ अशी अन आमच्याकडे जेवण असे.......

शिवाय पुण्यात ह्या ठिकाणी लोकं स्पीकर लावतात आणि तरी पण कुठलाही पुणेकर त्याला आक्षेप घेत नाही, ह्यात पुणेकरांची सहनशीलता मात्र नकीच दिसून येते आणि अशी सहनशीलता आमच्यात मात्र नाही.

आमच्या डोंबोलीत परवा एका गृपने पण असाच स्पीकर लावयाचा प्रयत्न बागेत केला होता, पण त्यांना योग्य त्या भाषेत समजावले. काय करणार? सार्वजनिक ठिकाणी आवाज करू नये आणि कोण करत असेल तर त्याला त्याच्या भाषेत समजवून सांगावे , असे निदान आम्हाला समजते.

उपेक्षित's picture

9 Jun 2017 - 6:27 pm | उपेक्षित

;) असो

Ranapratap's picture

8 Jun 2017 - 6:32 pm | Ranapratap

एकदा टेकडी वर जायला पाहिजे

खेडूत's picture

9 Jun 2017 - 12:10 pm | खेडूत

मस्त आठवणी सांगितल्यात.
सेनापती बापट मार्ग अन गोखलेनगरचा परिसर टेकड्यांनी वेढला गेलाय.
असेच मीही गेली अनेक दशके या टेकड्यांवर जात आहे. लहानपणी ९/१० व्या वर्षी वेताळ टेकडीवर सुट्टीतल्या दुपारी बाकीच्या ग्रूपपासून चुकून भरकटलो होतो आणि कसाबसा घरी पोहोचलो. त्याकाळी अत्यंत सुनसान जागा होती ती. आता टेकडीवरच इमारती झाल्यामुळे टेकडीवर जावेसे वाटत नाही.
हनुमान टेकडीवरून सूर्योदय पहाताना गोपाळ कृष्ण गोखलेंची आठवण येई. तिसरीच्या इतिहासात ते या टेकडीवर येऊन बसत असा उल्लेख होता. त्यामुळे आपणही पुढे खूप मोठे होणार असे मनात येई! अन वयाने झालोदेखील....

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2017 - 12:52 pm | संजय क्षीरसागर

पत्रकारनगर मधून टेकडीवर जाणं, तिथून पुढं दगडाची खाण, मग मूड असेल तर चतु:शृंगीपर्यंत जायचं किंवा मग वेताळ देवळाच्या परिसरात आकाशाखाली शांत बसायचं. तिथून परत फिरुन खाली आल्यावर दोन-तीन जॉइंटस आहेत तिथे खाणं-पिणं करायला मजा येते.

खट्याळ पाटिल's picture

9 Jun 2017 - 2:39 pm | खट्याळ पाटिल

भारी लेख , खूप आवडला , एक नंबर चाबूक

एस's picture

9 Jun 2017 - 3:28 pm | एस

नॉस्टॅल्जिक!

सचिन काळे's picture

9 Jun 2017 - 4:53 pm | सचिन काळे

हनुमान टेकडीवर जायला मलाही आवडेल. फोटो तर अतिसुंदर आहेत.