अंबरनक्षी

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
4 Jun 2017 - 6:08 pm

अंबरनक्षी
======

सुखाच्या जाणिवेपोटी
निद्रीस्तदामिनी झाली
नेणीवलकेर लहरता
निर्झरली शब्दमाऊली

उरले ना रितेपण रिते
आठवसाठले रांजण
डोळ्यातील आसवांनी
आता भरले गं आंगण

त्या क्षितिजरेषेवरती
झेपावला मानसपक्षी
विलंबित जलदांसाठी
उमलली ही अंबरनक्षी

ही सांज ढळण्याआधी
तेवते गाभारसमई
स्मरणातील उत्सवसंध्या
पांघरते गर्दनिळाई

- सांजसंध्या
4.6.2017

शांतरसकविता

प्रतिक्रिया

शार्दुल_हातोळकर's picture

5 Jun 2017 - 1:13 am | शार्दुल_हातोळकर

सुरेख !!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2017 - 6:11 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह!

सांजसंध्या's picture

6 Jun 2017 - 6:57 pm | सांजसंध्या

शार्दुल हातोळकर आणि अतृप्त आत्मा आभार आपले.
इतर मान्यवरांचेही मूक वाचनाबद्दल आभार.

किसन शिंदे's picture

6 Jun 2017 - 10:54 pm | किसन शिंदे

कळलं काही नाही, पण काहीतरी भारी वाचल्यासारखं वाटलं.

रच्याकने कुणी ही कविता अर्थासहीत उलगडून देईल काय.

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2017 - 12:00 am | संजय क्षीरसागर

लय गंडली आहे, शब्द जोड चुकीचे झाले आहेत, काही चमत्कृतीपूर्ण शब्दयोजना (उदा. विलंबित जलदांसाठी) अर्थहिन आहेत.

थोडक्यात, कविता अनुभवातून उतरलेली नाही तर चमत्कृतीपूर्ण शब्दरचनेतून कुणाला तरी, काही तरी अर्थ बोध होईल, अशी कवियत्रीला आशा असावी.

सांजसंध्या's picture

7 Jun 2017 - 4:38 pm | सांजसंध्या

तुम्ही कविता म्हणून वाचली का ? माफ करा हं.

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2017 - 7:29 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला प्रतिसादावरुन लक्षात आलं नाही का ?

आणि माफी कशापायी ?

तुम्ही अर्थ लिहीलात तरी तो फार ओढून- ताणून शब्दात बसवल्यासारखा होईल.

बघा प्रयत्न करुन :)

सांजसंध्या's picture

8 Jun 2017 - 7:52 am | सांजसंध्या

तुम्ही म्हणता तेच खरे. मी काय लिहीले ते तुम्हालाच ठाऊक असणार. मला कसा त्याचा अर्थ कळेल ? आभार आपले सर.

एकच संक्षीप्त मार्‍या पण क्या सॉल्लीड मार्‍या!! =))

संजय क्षीरसागर's picture

8 Jun 2017 - 4:05 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसाद कवितेवर आहे, तुम्हाला हतोत्साह करण्याचा उद्देश नाही. कवितेतून काव्यविषय व्यक्त होत नाही हा मुद्दा आहे. तुमच्याच प्रतिसादातले विरोधाभास पाहा :

तुम्ही म्हणतायं :

१) प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली.

मग तुम्ही स्वतःच विचारतायं :

२) नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ?

आता या अर्थव्यक्तीसाठी तुमची शब्दयोजना पाहा :

नेणीवलकेर लहरता
निर्झरली शब्दमाऊली

म्हणजे कुठल्या तरी बॅकमेमरी `नेणीवेत लहरल्यामुळे', सुखाच्या जाणीवेनं `झोपलेल्या प्रतिभेतून' ही कविता झरली आहे !

असा स्टार्टींगलाच घोळ आहे.

३) पुढे अशा ओळी येतात :

त्या क्षितिजरेषेवरती
झेपावला मानसपक्षी
विलंबित जलदांसाठी
उमलली ही अंबरनक्षी

अर्थविदित करतांना तुम्ही म्हणता की क्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पना

थोडक्यात, तुमचा मानसपक्षी अनुभवातल्या अमर्याद शक्यता व्यक्त करण्यासाठी ऑलरेडी क्षितीजाकडे झेपावला आहे. तुम्ही पुन्हा त्याला मागे खेचतायं (विलंबित जलदांसाठी) कारण बरेच दिवस पाऊस (कविता) झालेला नाही. शिवाय क्षितीज आणि आकाश या एकमेकांना बिलगून असलेल्या गोष्टी आहेत. आता मन त्या अमर्याद शक्यतांचा वेध घेणार का प्रतिमांची ही गर्दी (अंबरनक्षी) पाहाणार ?

याला बॅक-अँड-फोर्थ ऑफ इमॅजिनेशन म्हणतात. थोडक्यात अभिव्यक्त काय करायचं याची निश्चिती नसल्यामुळे अनेक कल्पनांची भाऊ गर्दी होते. मग अशा कल्पना अगम्य शब्दात बसवायचा प्रयत्न होतो. परिणामी कविता अर्थहिन होते.

तुम्हाला चांगली कविता करायची असेल तर दोन गोष्टी करा :

१) काव्यविषय हा एकसंध उत्कट अनुभव असला पाहिजे आणि कविता त्या अनुभवाशी इमान राखणारी असायला हवी, आणि

२) इथल्या लल्लू-पंजू सदस्यांचे ज्यांना कवितेतलं काही गम्य नाही, रिमार्क फाट्यावर मारा.

सांजसंध्या's picture

8 Jun 2017 - 6:43 pm | सांजसंध्या

ज्यांना कवितेतलं काही गम्य नाही, रिमार्क फाट्यावर मारा.>>> तेच तर केलं ना! पण समजत नाही असे दिसतेय.

समजेल अशी अपेक्षा ठेऊ देखील नका =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2017 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आशयाचा शोध आवडला. कविता वाचली होती. पण, आता कविता अजून सोपी झाली आभार.

-दिलीप बिरुटे

दशानन's picture

7 Jun 2017 - 12:02 am | दशानन

ही सांज ढळण्याआधी
तेवते गाभारसमई
स्मरणातील उत्सवसंध्या
पांघरते गर्दनिळाई

वाह! शब्द रचना आवडली.

मुरारबाजी's picture

7 Jun 2017 - 3:22 pm | मुरारबाजी

कविता आवडली !!

सांजसंध्या's picture

7 Jun 2017 - 4:40 pm | सांजसंध्या

अर्थ नक्की सांगेन यावेळी. कुणाला प्रयत्न करायचा असल्यास थांबते काही काळ.
उत्सुकता आहे.

सांजसंध्या's picture

7 Jun 2017 - 4:41 pm | सांजसंध्या

सर्वांचे आभार.

सूड's picture

7 Jun 2017 - 5:06 pm | सूड

टँजंट गेली

शरदिनीबाइंची माइल्ड व्हर्जन आहे.
समूहगान: उलालालेउलाओ, उलालालेओ.

सांजसंध्या's picture

8 Jun 2017 - 7:47 am | सांजसंध्या

गेल्या चार ते पाच वर्षात एकही कविता नव्याने लिहाविशी वाटली नाही. अस्वस्थता असताना ज्याप्रमाणे कविता येते तशी सगळं छान चालू असताना नाही येत असं वाटू लागलं होतं. मुद्दामून लिहायची तर मग त्याला गीतलेखनच म्हणावे लागेल. याच अवस्थेच्या विचारातून लिहावंसं वाटलं. एखाद्याची प्रेरणा अस्वस्थता, तीव्र भावना असेल त्याला सामान्य परिस्थितीत कविता प्रसन्न होईल का ? दामिनी म्हणजे वीज. प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली.

पण ज्यातून आपण पूर्वी काही लिहीलं ती अनुभूती कुठेतरी असणारच की. बॅकमेमरी किंवा नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ? असं काहीसं या कवितेत म्हणायचे आहे. क्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पना. अशा काही प्रतिमांचा वापर केला आहे.
यापेक्षा जास्त संत्रं सोलवत नाही.

सांजसंध्या's picture

8 Jun 2017 - 7:50 am | सांजसंध्या

विलंबित जलदा बद्दल

जलद म्हणजे ढग. पावसाळा लांबल्याने ढग उशिरा आले आहेत. तसंच कवितेच्या बाबत झालेले आहे.
पण जेव्हां कल्पनेच्या क्षितिजावर पावसाची (कवितेची) शक्यता दिसू लागते तिच्या स्वागताला अंबरात नक्षी उमटली असं काहीसं. प्रत्यक्ष पाऊस येण्याआधी आकाशात रंगांची उधळण होते तसंच प्रत्यक्ष कविता होण्या आधी मनाच्या आकाशात प्रतिमांची गर्दी दाटून येते असं काहीसं...

कवी / कवयित्रीने अर्थ समजावून सांगू नये असे वाटतं. रचना आहे ज्याला जे जे आवडेल ते घ्यावे बाकी सोडून द्यावे व रचनेचा आंनद घ्यावा, खूपच मनात प्रश्न निर्माण होत असतील तर व्यक्तिगत संपर्क निर्माण करून समजवून घेणे योग्य.

सांजसंध्या's picture

9 Jun 2017 - 12:31 am | सांजसंध्या

कवी / कवयित्रीने अर्थ समजावून सांगू नये असे वाटतं >>>> पटले

पुंबा's picture

9 Jun 2017 - 10:25 am | पुंबा

अगदी अगदी..