मन से बाता अर्थात मनोगत...

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
26 May 2017 - 1:15 pm

सध्या बराच उकाडा आहे सगळीकडे त्यामुळे सगळीकडे कुलर/एसी नाहीतर निदान फॅन ची तरी प्रचंड मागणी आहे. थोडा वेळ जरी वीज गेली तरी आपला जीव कासावीस होतो.

परवा रात्री दिवसभर दमून मस्त झोप लागली होती पण नेमकी पहाटे २/२.३० ला वीज गेली आणि घामाच्या धारांनी जीव पार कासावीस झाला. कुठे पेपर ने वारे घे कुठे पाणीच मार चेहऱ्यावर असे उद्योग चालू होते. अचानक पेपरने वारे घेता घेता मन भूतकाळात गेले.

तेव्हा मी साधारण ७/८ वीत असेल आम्ही पुण्यात कर्वेनगरला हिंगणे होम कॉलोनीत एका बैठ्या चाळीत राहायला होतो. काही कारणास्तव चाळीचे वीजेचे कनेक्शन तोडले होते आमच्या. साधारण २ वर्ष पूर्ण वीज नाही आणि १ वर्ष फ़क़्त रात्रीची वीज अशी परिस्थिती होती त्यात डोक्यावर पत्र्याचे छत. पण आत्ता १ तास वीज गेल्यावर जसा जीव कासावीस झाला होता तसा त्या ३ वर्षात कधीही झालेला आठवत नाही काय बरे कारण असेल ?

खूप विचार केला तेव्हा समजले परिस्थिती येस तीच आपल्याला बळ देत असते अशा दिवसात आणि उलट तेच दिवस माझ्या आयुष्यात मी जास्ती आनंदाने घालवले असतील असे मला आज वाटते कारण रोज रात्री कँडल लाईट डिनरचे भाग्य तेही सर्व कुटुंबासोबत फार थोड्या माणसांना लाभते आयुष्यात, चाळीतील मुला-मुलींना रात्री ओट्यावर जमा करून कंदिलाच्या प्रकाशात त्यांना भुताच्या गोष्टी सांगण्याची सवय पण त्याच २/३ वर्षातली.

घरात वीज नाही त्यामुळे शनिवारी सकाळी शाळेतून मिळेल ती बस पकडून धावत पळत घरी येऊन शक्तिमान बघायला जवळच्या (सख्या) मामाकडे जायचे हे पण एक ठरलेले असायचे खर तर आत्ता या गोष्टीचे हसायला येते पण तेव्हाची ती धडपड खूप मनापासून केलेली असायची साला. काहीवेळा मामी दार किलकिले करून नंतर ये असे म्हणून तोंडावर दार लावायची तेव्हा खूप वाईट वाटायचं नकळत स्वाभिमान वगेरे दुखावला जाऊन कित्येकदा मित्राकडे रडलोदेखील होतो. आज तीच मामी मी घरी येत नाही म्हणून सतत मला रागवत असते असो मी आणि तिने दोघांनी ती गोष्ट विस्मरणात टाकली आहे आता.

यावरून एक आठवल - कुछ इस तरह मैने ज़िन्दगी को आसा कर लिया, किसी से माफ़ी मांग ली, किसी को माफ़ कर दिया!!

याच अंधारलेल्या दिवसांनी खरे आपले कोण आहे हे सुद्धा नकळत समजत गेले त्या वयात. आधी उन्हाळ्यात आवर्जून येणारी नातेवाईक मंडळी त्या २/३ वर्षात चक्क गायबली होती १/२ जणांनी तर तोंडावर सांगितले होते कि तुमच्याकडे वीज नाही आणि टीवी व फॅनशिवाय आम्हाला काही जमत नाही. असो असतो एकेकाचा स्वभाव.

मात्र कर्वेनगरच्या त्या चाळीत काढलेले ते अतीव आनंदाचे आणि बेफिकिरीचे दिवस आठवून आजही मन हळहळायला लागते.

असो जास्ती पाल्हाळ न लावता वरच्या सगळ्या मनोगतातील तात्पर्य काय तर माणसाने नेहमी परिस्थितीशी हातमिळवणी केली पाहिजे बास...

जाता जाता ...
हल्ली वीज गेली कि माझा ८ वर्षाचा मुलगा बाबा घरात आता इनव्हटेर (हाच शब्द वापरतो तो) घ्या म्हणून मागे लागतो काळाचा महिमा बाकी काही नाही ....

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

नि३सोलपुरकर's picture

26 May 2017 - 5:18 pm | नि३सोलपुरकर

कुछ इस तरह मैने ज़िन्दगी को आसा कर लिया, किसी से माफ़ी मांग ली, किसी को माफ़ कर दिया!!

बहुत खूब .

उपेक्षित's picture

26 May 2017 - 8:15 pm | उपेक्षित

शुक्रिया

योगी९००'s picture

26 May 2017 - 7:44 pm | योगी९००

छान लेख...

कांदीवली ठाकूर कॉप्लेक्सला रहाता काय? कारण परवा रात्री २/२.३० ला ठाकूर कॉप्लेक्समध्ये वीज गेली होती. मला ही जाग आली होती. जीव कासावीस झाल्यावर रिलायन्सला फोन करण्यासाठी फोन हातात घेतला तर आलरेडी रिलायन्सकडून दिलगिरीचा मेसे़ज आणि साधारपणे ३.२५ पर्यंत वीज परत येईल असा मेसेज आला होता. ३.२७ ला वीज परत आली.

नाही पुण्यातच असतो पण आता चाळ सोडून काडेपेटीत राहतो इतकेच :)