सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक )
संध्याकाळचे सहा वाजत आले होते . राधाबाई आपल्या घराच्या दारापाशी उभ्या राहुन मोठ्या आतुरतेने शामरावांची वाट पाहात होत्या . थोड्याच वेळात समोरुन संथपणे चालत येणारी कोट , धोतर आणी डोक्यावर टोपी घातलेली शामरावांची मुर्ती त्यांना दिसली तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला .
त्या लगबगीने आत जाउन पाण्याचा तांब्या आणी भांडे घेउन आल्या . आता त्यांच्या मनातल्या उत्सुकतेची जागा एका काळजीने घेतली .
शामरावांनी घरात येताच हातातला टिफीनचा डबा राधाबाईंकडे दिला . खुर्चीवर बसुन ते घोटभर पाणी प्यायले . एका हाताने धोतराच्या सोग्याने ते वारा घेउ लागले . आज एकुण शामराव बरेच दमलेले दिसत होते . ते काहितरी बोलतील म्हणुन राधाबाईंनी थोडा वेळ वाट पाहिली . शेवटी न राहवुन त्यांनीच चिंतेने विचारले .
"अहो , तुम्ही शेठजींना पैशांबद्दल विचारलंत नां ? काय म्हणाले शेठजी ? आपलं काम झालं नां ? "
शामराव हा प्रश्नांचा भडिमार ऐकुन दचकुन आपल्या तंद्रीतुन जागे झाले . राधाबाई त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात होत्या . शामरावांनी किंचीत हसत आपल्या कोटाच्या खिशातुन एक मोठे पुडके काढुन राधाबाईंकडे दिले . राधाबाईंनी सुटकेचा श्वास सोडला . आणी ते पुडके काळजीपुर्वक खणामधे ठेवुन दिले .
"हो . आपलं काम झालं . सुमीच्या लग्नासाठी पैसे हवे आहेत म्हणल्यावर शेठजींनी लगेच मला पैसे दिले . " शामराव समाधानाने म्हणाले .
"देवच पावला म्हणायचा . " राधाबाई डोळे मिटुन हात जोडत समाधानाने म्हणाल्या . त्यांची एक मोठी काळजी दुर झाली होती .
शामराव हे गावातल्या शेठजींच्या पेढीवर हिशेबनीस म्हणुन काम करत होते . त्यातुन मिळत असलेल्या थोड्याफार कमाईत त्यांचा आणी राधाबाईंचा संसार अनेक वर्षे निगुतीने चालला होता . सुमी आणी बंड्या हि त्यांची दोन मुले . सुमी मोठी , नुकतीच पदवीधर झालेली . तर धाकटा बंड्या हा शाळेत आठवीत शिकत होता .
थोरली सुमी हि शिकवण्या घेउन आपल्या घरातल्या खर्चाला जमेल तसा थोडाफार हातभार लावत होती . शामराव , राधाबाई हे दोघे तिच्या लग्नासाठी प्रयत्न करीत होते . अलिकडेच शहरातल्या एका स्थळाकडुन तिला होकार आला होता . बघता बघता लग्न ठरुन पुढच्या महिन्यातली तारीख पक्की झाली . सुमीच्या लग्नासाठी खर्चाची व्यवस्था कशी करायची हा मोठाच प्रश्न शामराव आणी राधाबाईंना पडला .
अखेरीस बराच खल होउन , शेवटी शामरावांनी शेठजींकडुन खर्चाची रक्कम कर्जाऊ घ्यावी असे ठरले . त्यातल्या त्यात हाच एकमेव आशेचा मार्ग त्यांना दिसत होता . पण त्याचबरोबर "शेठजी आपल्याला एवढी मोठी रक्कम देतील का ? " अशीही धाकधुक त्यांना मनात कुठेतरी वाटत होती . पण आज त्यांची सर्व काळजी दुर झाली होती . शेठजींनी फारसे आढेवेढे न घेता , लगेचच कर्जाची रक्कम देउ केली होती . एक मोठा प्रश्न आज मिटला होता .
"अगं , गेली अनेक वर्षं मी शेठजींकडे नोकरी करतो आहे . तेवढा विश्वास आहे माझ्यावर शेठजींचा . म्हणुनच तर त्यांना आज संध्याकाळी मुंबईला जायचे होते , पण त्या गडबडीतही त्यांनी आधी माझे काम केले . माझी पैशाची व्यवस्था करुन मगच ते बाहेर पडले . " शामराव स्वतावरच खुष होउन सांगत होते . राधाबाई त्यांचे बोलणे मोठ्या कौतुकाने ऐकत होत्या . तेवढ्यात शामरावांसाठी चहा घेउन सुमी आली . तिने वडीलांकडे चहाची कपबशी दिली .
"आता काय सुमीचं लग्न मोठ्या थाटामाटात होणार . काय सुमे ? " शामराव चहा घेताना सुमीकडे पाहात गमतीने म्हणाले .
सुमी काही न बोलताच लाजुन आतमधे पळाली . शामराव आणी राधाबाई दोघांनाही हसु आवरले नाही . आता लग्नाची तयारी कशी कशी करायची , याबद्दल शामराव आणी राधाबाई दोघांमधे खलबते सुरु झाली . दोघेही एकमेकांना आठवतील त्या गोष्टींच्या सुचना देत होते . बंड्या बाजुला उभा राहुन त्या दोघांची सगळी चर्चा उत्साहाने ऐकत होता . घरामधे आपल्या ताईच्या लग्नाची गडबड सुरु आहे हे त्याच्या लक्षात आले होते .
"आताच येताना मी हरिसदन कार्यालयाच्या मालकाला भेटुन आलो . उद्याच जाउन पंधरा हजार रुपये भरुन लग्नाच्या तारखेचे बुकींग करुन टाकतो . मग आयत्या वेळी गोंधळ नको . "
"आम्ही उद्याच रमणलाल सोनाराकडे जाउन , दागिन्यांची मापे देउन येतो . रमणलालला निम्मे पैसे उद्याच देउन दागिने लवकर घडवायला बजावले पाहिजे . नाहितर तो फार वेळ लावतो . "
"गोपाळभाउंच्या दुकानात जाउन उद्याच साड्या , कापड , कपडे यांचीपण खरेदी केली पाहिजे . लग्नाचा बस्ता सगळे तिथुनच घेतात . बंड्यासाठीही आता नवीन कपडे घ्यायला हवेत . तेही चांगले फुलबाह्यांचे . काय बंड्या .. खुश ना ? "
आपल्याला नवे कपडे मिळणार , तेही फुल बाह्यांचे हे ऐकताच बंड्याने आनंदाने जागच्या जागी एक उडी मारली . बिचारा , गेली कित्येक वर्षे शेजारच्या नितीनदादाचे जुने कपडे वापरुन कंटाळला होता . तेच ते जुनाट , मळकट कपडे घालुन कळकट झालेला त्याचा चेहरा आता चांगलाच उजळला .
"हो .. आणी कुणा कुणाला काय आहेर , मानपान करायचा , तीही खरेदी उरकुन घ्या . नंतर कुणाची तक्रार नको . "
"आणी निमंत्रण पत्रिकांचं काय ? त्याचा मजकुर काय ठेवायचा ? कुणाकुणाची नावे लिहायची ? उद्याच जाउन शारदा प्रेसच्या तात्याभाउंना भेटले पाहिजे . त्यांना एकदा अॅडव्हान्स दिला की प्रश्न मिटला . ते काम चांगलं करतात . "
संध्याकाळचे पावणे सात वाजले होते . या वेळेला रेडिओ सुरु करुन मग शांतपणे सातच्या बातम्या ऐकायच्या , हा शामरावांचा नेहमीचा शिरस्ता होता . त्याप्रमाणे त्यांनी रेडिओ सुरु केला . पण आज त्या जुनाट रेडिओने कायमची मान टाकलेली दिसत होती . नुसताच खरखराट ऐकु येत होता . बरेच प्रयत्न करुन , फटके मारुनही रेडीओ सुरु होत नव्हता . शेवटी कंटाळुन शामरावांनी तो रेडीओ चालु करण्याचा नाद सोडुन दिला .
"हा जुनाट , बिघडलेला रेडिओ नकोच आता . उद्याच शांतीमलच्या दुकानात जातो , आणी एखादा चांगला सेकंड हँड टिव्ही विकत घेउन येतो .. तोही रंगीत टि.व्ही ."
वैतागुन शामराव म्हणाले . आपल्या घरी टि .व्ही. , तोही रंगीत टि.व्ही. येणार हे ऐकताच बंड्याने परत एकदा आनंदाने उडी मारली . बिचारा गेली कित्येक वर्षे निमुटपणे शेजारी पाजारी जाउन टि.व्ही. बघत असे . कंटाळला होता अगदी .
"हे बाकी बरं झालं . मुलीच्या सासरकडचे लोक आपल्याकडे कधी आले तर , आपल्याकडे साधा टि . व्ही. नाही म्हणुन त्यांनी आपल्याला नावं नकोत ठेवायला आता ." राधाबाई आनंदाने म्हणाल्या . ते दोघेही लग्नाच्या खरेदीचे बेत आखण्यात अगदी रंगुन गेले . उद्या त्यांना बरीच खरेदी , बरीच तयारी करायची होती .
संध्याकाळचे सात वाजले होते . घरोघरीचे टि.व्ही सुरु झाले होते . देशभरात टि.व्ही.वर एक महत्वाचे निवेदन प्रसारीत करण्यात येत होते . लोकं लक्षपुर्वक हे निवेदन ऐकत होते . त्यावर एकमेकांशी तावातावाने चर्चा करत होते .
------------- समाप्त ---------------------------- काल्पनीक -----------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
22 May 2017 - 5:14 pm | प्रचेतस
लिहिलंत छान पण कथा खूपच प्रेडिक्टेबल वाटली.
22 May 2017 - 5:25 pm | चांदणे संदीप
याच्याआधीही आताच्यासारखाच नोटाबंदीचा खेळ झालेला का?
22 May 2017 - 5:32 pm | अभ्या..
हम्म्म. पण आता तुम्हाला प्लॉट मस्त रंगवता येऊ लागले आहेत. जर्रा कथाबीजाला खतपाणी दिले की कथा एकदम तरारुन येईल.
22 May 2017 - 5:35 pm | धर्मराजमुटके
नोटा बंद होणार म्हणून त्या दिल्या तरी काय झाले ? केवढे औदार्य ते या कलीयुगात ? आजकाल कोणी फाटकी लंगोटी कोणास देतो ना !
22 May 2017 - 5:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कथाबिज.
कथेचा रोख बराच आधी समजायला सुरुवात होतो... कदाचित हा विषय खूप वेळा चर्चिला गेला असल्याने असेल.
संध्याकाळचे सात वाजले होते.
याऐवजी "संध्याकाळचे आठ वाजले होते." असे लिहिले तर कथेतला तांत्रीक दोष (टेक्निकल एरर) दूर होईल.22 May 2017 - 5:50 pm | दशानन
+1
लेखाची सुरवात, व्यक्ती व त्यांची नावे हे काळ योग्य नाही आहेत. कथा येथेच फसली आहे.
असो, छान प्रयत्न पण अजून लेखन बीज कडे लक्ष देने गरजेचे.
23 May 2017 - 3:28 pm | दाह
+१
सहमत. शेठजींच्या पेढीवर शामराव कामाला असणं, नवऱ्याची बायकोने आतुरतेने वाट पाहणं, सुमीचं लाजून चूर होऊन आत पळणं, फुल बाह्यांच्या शर्टचं आकर्षण , रंगीत टीव्ही घरी नसणं आणि बातम्यांसाठी रेडियोवर अवलंबून असणं हे सर्व वर्णन वाचून कथा साधारणपणे सत्तरीच्या दशकातील असावी असच वाटून जातं.बाकी लेखनकौशल्य आवडलं.
23 May 2017 - 5:36 pm | संजय पाटिल
सहमत !!!
22 May 2017 - 6:28 pm | जव्हेरगंज
मस्त रंगवली आहे!!!
22 May 2017 - 7:24 pm | सिरुसेरि
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया व सुचनांबद्दल खुप आभारी आहे . हि कथा क्राउन किंवा डायनोरा टिव्हीच्या काळात घडलेली वाटते आहे खरी .
23 May 2017 - 6:09 pm | ज्योति अळवणी
वरच्या सर्व मतांशी सहमत. प्रयत्न चांगला
23 May 2017 - 6:26 pm | पैसा
जरा वेगळ्या वातावरणात अजून फुलला असता.
24 May 2017 - 6:47 am | रुपी
कथा आवडली. चांगली रंगवली आहे.
2 Jun 2017 - 11:19 pm | चौथा कोनाडा
कथा आवडली. पुढील भाग कधी टाकताय ?
( सध्याच्या नोटाबंदीच्या चर्चेमुळे कथेच्या शेवटी टीव्हीवर नोटाबंदीचे निवेदन प्रसारित असे वाटते, पण कथा इररिस्पेक्टिव्ह ऑफ नोटाबंदी वाचली तर छान ओघवती उत्सुकता चाळवणारी आहे. प्रचेतस म्हणातात कथा प्रेडिक्टेबल वाटली, पण मला अजिबात नाही वाटली)
वेगळे सुत्र घेवुन कथा आणखी पुढे नेता येईल. प्रयत्न नक्की करा.