प्लासिबो - समाधान
प्लासिबो विषयी विचार करता मनात जे आले ते लिहित आहे. आपण अनेकदा प्लासिबो हा शब्द ऐकला आहे. वैद्यकशास्त्रात रुग्णाला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ न देता जेव्हा औषध नसलेला पदार्थ त्याचे समाधान व्हावे म्हणुन देतात तेव्हा त्याला प्लासिबो म्हणतात. रुग्णाचे समाधान करणे हाच त्याचा हेतू असतो आणि बरे होण्याची मनात इच्छा असलेला रुग्ण ते 'फसवे औषध' घेउन बरा सुद्धा होत असतो.
माझी आजी म्हातारपणाने थकली होती. तिला सारखे काहीतरी होत आहे असे वाटून डॉरक्टकडे जायचे असायचे. मग अनेकदा आमचे नेहमीचे डॉक्टर गंभीर चेहर्याने तिला कोणत्यातरी साध्या गोळ्या देत आणि 'जास्त त्रास झाला तर दवाखान्यात भरतीकरुन सलाईन लावावे लागेल' असे सांगत. मग पुढे काही दिवस तिला एकदम बरे असे आणि डॉक्टर किती हुषार आहेत ते आम्ही ऐकत असू ! खरेतर प्लासिबो प्रकार माहित नसताना सुद्धा आपण अनेकदा तो वापरत असतो. लहान मुल पडले तर त्याला 'आला मंतर कोला मंतर, कोल्ह्याची आई कांदे खाई, बाळाचा बाऊ उडुन जाई ।' हा मंत्र घालून त्याला बरे वाटते.
शब्द सूक्ष्म असतात. शब्दापेक्षा कृतीवर किंवा वस्तूवर आपला जास्त विश्वास बसतो. नुसते लग्न झाले असे म्हणालो तर मनावर ठसत नाही. आंगठ्यांची देवाण घेवाण, मंगळसूत्र, वरमाला यामुळे मनावर ते ठसते. देवाला नुसता नमस्कार करुन भागत नाही. अंगारा लावला, प्रसाद खाल्ला की मनावर देवाच्या दर्शनाचा संस्कार ठसतो. मला वाटते की कृती अथवा स्थूलावरचा विषास हेच प्लासिबोचे तत्व आहे.
मागे एकदा एका संताच्या चरित्रात एक प्रसंग वाचला होता. कुणालातरी बरे नाही म्हणून एक माणूस औषध मागण्यासाठी त्या संताकडे येतो. संत म्हणतो की वाटेल बरे त्यांना. पण आलेला मनुष्य नुसताच उभा राहतो. मग तो संत शेजारच्या दिव्यातल्या तेलाचे चार थेंब हातावर देतो आणि सांगतो की हे आजार्याच्या तोंडात सोडा त्यांना बरे वाटेल. तो मनुष्य समाधानाने परततो. हे स्थूल वस्तूचे महात्म्य. एका मराठी संताच्या चरित्रात अशीच एक घटना आहे. कुणी व्यक्ती काशी यात्रेला निघते आणि त्यांना मुळव्याधीचा बराच त्रास होऊ लागतो. ती व्यक्ती या संताला म्हणते की यात्रा संपेपर्यंत तरी काही उपाय करा. यावर तो संत शेजारच्या तुळशीची चार पाने देउन ती वस्त्राला बांधून ठेवा असे सांगतो. पुढे काशी यात्रेत त्या व्यक्तीला फारसा त्रास होत नाही. याबद्दल त्या संताला विचारता तो म्हणतो 'अहो, सूर्याचे पिल्लू ते झाकून किती लपणार !'. पहा पण नुसती पाने जवळ ठेवण्याने त्या यात्रेकरुला मानसिक धैर्य आले. संताचे आशिर्वाद सोबत आहेत याची खात्री वाटली. आणि यात्रा कमी त्रासात झाली.
ज्योतिषाकडे गेले असता तोडगे ऐकण्याची अनेकांची ईच्छा असते. त्याशिवाय लोकांना चैन नसते. चार महिन्याने दिवस बदलतील असे म्हटले तर समाधान होत नाही. सोळा सोमवार करा, दिवस बदलतील, भाग्य उजळेल हा उपाय मात्र भारी वाटतो. रत्न, खडे, गंडे हे सुद्धा असेच प्लासिबो आहेत की काय असे मला वाटते.
प्लासिबो हा वैद्यकशास्त्रीय शब्द असला तरी संकल्पना म्हणून मी तो इतरत्र वापरुन पाहिला. तुम्हाला दिसलेले प्लासिबो सुद्धा येथे लिहा.
-- लिखाळ.
प्रतिक्रिया
10 Oct 2008 - 11:04 pm | यशोधरा
माझे प्लासिबो, माझी आई आणि मित्र मैत्रिणी :) त्यांच्याशी बोलले की मनात फारश्या शंका रहात नाहीत...
11 Oct 2008 - 3:01 am | शितल
यशोधराच्या मताशी १०१ % सहमत. :)
11 Oct 2008 - 1:09 am | रेवती
ते जे आज्जीचं उदाहरण दिलंत, ते तंतोतंत खरं आहे. माझ्या एका आज्जीला असे सारखे डॉक्टर लागायचे. त्यांनी येऊन क्रोसीन दिली तरी चालायचे (ती त्या डॉ. ना भला माणूस म्हणायची).
याच्या बरोब्बर विरूद्ध प्रकार दुसर्या आज्जीचा. मला काही झालं नाहिये असा धोशा. मग उचलून डॉ. कडे न्यावे लागायचे. दिलेल्या औषधांबरोबर थोडा आल्याचा रस किंवा गुळ हळद घेतली तर? मग डॉ. घ्या म्हणायचे. तीला इतकं बरं वाटायचं.
रेवती
11 Oct 2008 - 2:31 am | नंदन
प्लासिबो इफेक्ट आणि स्थूलावरचा विश्वास हे थोडे वेगवेगळे असले, तरी त्यांचे परिघ एकमेकांना बरेचसे एकमेकांना छेदत असावेत. पटकन आठवणारे उदाहरण म्हणजे, कास्ट अवे मध्ये टॉम हॅन्क्स एका नारळावर नाक-डोळे काढून त्याच्याशी गप्पा मारतो हे.
स्थूलावर, जे जे जाणवण्यासारखे आहे (टँजिबल) त्यावर अधिक भरवसा ठेवण्याच्या वृत्तीमुळे ही तत्त्वज्ञाने ईश्वराचं स्वरूप निर्गुण, निराकार आहे असं सांगत असली तरी आपल्याला त्याचे सगुण रूपच भावते. मूर्तिपूजा मान्य नसणार्या इस्लाममध्येही काबाला प्रतीकात्मक महत्त्व आहेच की.
हाच विषय जर पुढे वाढवायचा झाला, तर देव (किंवा पाप-पुण्य, स्वर्ग-नरक) ही संकल्पनाच सर्वात मोठा प्लासिबो असेल, नाही? एकटेपणात सोबत देणारा, वाईट काम केल्यावर शिक्षा आणि चांगले काम केल्यावर त्याचे फळ देणारा अदृश्य प्लासिबो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Oct 2008 - 3:16 am | धनंजय
पूर्वी मी वैद्यकाची प्रॅक्टिस करत असे तेव्हा कुटुंबातल्या व्यक्तीचा उपचार कधी करत नसे. (त्यांनी वैद्यकीय माहिती विचारली तर उत्तर जरूर देत असे.)
रुग्ण-डॉक्टर संवाद एक विधी सुद्धा असतो - डॉक्टरने गुरुतुल्य पात्र वठवायचे असते, आणि रुग्णाने शिष्याचे पात्र वठवायचे असते. याचा "बरे वाटण्याशी", "आपली कोणी काळजी वाहातो आहे, असे वाटण्याशी" संबंध आहे.
ज्यांनी माझी लंगोट बदलली आहे, लहानपणी भांडाभांडी केलेली आहे, त्यांच्याबरोबर ही पात्रे वठवणे शक्य नसते. ते पात्र वठल्याचा प्लासेबो फायदा माझ्या नातेवाइकांना मिळावा, म्हणून मी त्यांना आपल्या मित्रांकडे पाठवत असे.
13 Oct 2008 - 12:44 am | भडकमकर मास्तर
एकदम सहमत....
....
जवळच्या नातेवाईकांवर उपचार करताना कधीही न येणारे दुर्मिळ प्रॉब्लेम / गुंतागुंत होते (निदान तशी शक्यता निर्माण होईल की काय असा जास्त दबाव येतो खरा)...आणि मग असे का झाले याचे उत्तरे देणे अवघड होते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
11 Oct 2008 - 6:51 am | प्राजु
आंमृतांजनची ती डबी उशीखाली घेऊन झोपायची सवय आहे. असं नाही की रात्री तिला ते आंमृतांजन लागतं पण ती डबी उशाखाली असेल तर तिला बरं वाटतं.
एकदा मला हवी होती म्हणून मी तिला न विचारत ती डबी घेतली, तर रात्री तिला झोप नाही लागली. ती १२.०० वाजता उठून माझ्या खोलीत आली आणि म्हणाली,"तायड्या, माझी आंमृतांजनची डबी पाहिली आहेस का? मला झोप येत नाही गं डबी उशिखाली असल्याशिवाय" मला तेव्हा हसू आले पण नंतर त्यामगची मानसिकता समजली. तीच प्लासिबो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Oct 2008 - 9:21 am | प्रकाश घाटपांडे
औषधं जान्हवी तोयम्
प्रकाश घाटपांडे
11 Oct 2008 - 9:30 am | फटू
खुप छान वर्णन केलं आहे राव...
देव सा-या चराचरात व्यापून उरला आहे पण त्या देवाला नमस्कार केल्याचं समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपण एखाद्या मुर्तीच्या पायाशी नतमस्तक होतो...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
11 Oct 2008 - 9:51 am | चतुरंग
इंग्लिश वैद्य एडवर्ड बाख याने ह्या औषधांची सुरुवात केली.
त्याच्या मते कुठलाही आजार हा मनोकायिकच असतो. फक्त मटेरिअलिस्टिक (भौतिक) औषधांनी कुठलीच व्याधी समूळ नष्ट होत नाही. मानसिक उपचार आधी महत्त्वाचे.
प्रत्यक्षातही आपल्याला बरेच वेळा असे दिसते. माझा मुलगा पडतो आणि त्याला खरचटते तेव्हा मी त्याला असेच सांगतो "अरे हे तर काहीच नाही, मी केवढंतरी लागून घ्यायचो तरी मला काही व्हायचं नाही. तू तर कसला शूर आहेस. चल पळ." रडू बरंच आटोक्यात येतं आणि थोड्या वेळाने तो विसरुनही जातो.
मनाची उभारी गेली की शरीराची साथ मिळत नाही आणि वरवर धडधाकट दिसणारी माणसेही खचतात. मनाला नैराश्याने ग्रासले की शरीर रोगी व्हायला लागते.
लिखाळराव मस्त वेगळा विषय हाताळल्याबद्दल अभिनंदन! :)
(अवांतर - येडा खवीस ह्यांच्या 'मांत्रिक' उपचारांनी प्लासीबो परिणाम साधला जात असेल आणि रुग्णाचे मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक शोषण न होता, वेड्यावाकड्या अंधश्रद्धा न जोपासल्या जाता जर उपचारांचा परिणाम होऊन योग्य मार्ग सापडत असेल तर असे उपचार अनैतिक ठरु नयेत. पण तसे अभ्यासपूर्ण स्पष्ट दाखले त्यांनी देण्याची तयारी दर्शवायला हवी.)
चतुरंग
11 Oct 2008 - 10:24 am | अरुण वडुलेकर
खूपच चांगला लेख आणि त्यावरची तितकीच मार्मिक चर्चा. असे विषय नेहमीच चर्चेला यावेत.
मीही माझा एक अनुभव मांडतो. मीही एक पारंपारिक फलज्योतिषाचा अभ्यासक आहे.
पण दैवी उपाय, गंडेदोरे,तोडागे यावर माझा विश्वास नाही. मी तसे सल्लेही सहसा कुणाला देत नाही.
सहसा म्हणण्याचे कारण असे की कधी कधी चांगल्या कारणासाठी अशा प्लासिबोचा आधार घ्यावा लागतो.
एके दिवशी एक उच्च शिक्षित विवाहिता माझाकडे आली आणि तिच्या स्वप्नात रोज वाघ येतो ,त्याची खूप भीति वाटते,
या साठी पत्रिका पाहून कांही उपाय सांगा असा आग्रह धरून बसली. मी तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाण्याचा सल्ला
दिला पण मझ्याकडे येण्यापूर्वी ती चिकित्सा झालेली आहे असे ती म्हणाली. तीची कावरीबावरी आणि हताश मुद्रा मला विचारात
टाकती झाली.मग मलाएक उपाय सुचला. मी तिची पत्रिका पाहिली (?) आणि तिला विचारले की
' तू किंवा तुझ्या घरातील अन्य कोणी देवीला एखादा नवस बोलले आणि तो फेडायचा राहिला असें कांही झाले आहे कां?'
तर ती जरासे आठवून म्हणाली की, तिच्या पहिल्या प्रसूतीनंतर तिला बाळाला घेऊन देवीच्या दर्शनाला जायचे होते,
पण अनवधानाने ते राहून गेले. मग मी तिला आमच्या नाशिकच्या सांडव्यावरच्या देवीच्या ( ती व्याघ्रासनी आहे) दर्शनाला जाऊन
तिची ओटी भरायला सांगितले आणि तोपर्यंत रात्री उशाखाली एक हळकुंड घेऊन झोपायला सांगितले.
तो हळकुंडाचा उपाय तिने लगेचच केला आणि दुसरे दिवशी, 'रात्री छान झोप लागली होती 'असा फोन केला.
11 Oct 2008 - 4:57 pm | लिखाळ
यशोधरा, शितल,
शब्दापेक्षा स्थुलावर-कृतीवर जास्त विश्वास या न्यायाने दिले जाणारे प्लासिबो असे खरेतर म्हणण्याचा उद्देश आहे. आपले जिवलग आपल्यासाठी चांगले समुपदेशक आहेत त्यामुळे आपल्या समस्या त्यांच्या शब्दानेच सुटतात हे चांगलेच आहे. प्रतिसादासाठी धन्यवाद.
रेवती आणि प्राजू,
आपण म्हणता ते बरोबर आहे, झंडु बाम, हिंग-गुळ हे त्यांचे खरे समाधान करणार्या वस्तू असणार. प्रतिसादासाठी धन्यवाद.
ज्यांना फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्या घरातले ज्येष्ठ अनेकदा अनावश्यक तपासण्यातून सुटतात. :)
नंदन,
तुमचे म्हणणे खरे आहे. मनाला निर्गुण ब्रह्म कल्पिता येत नाही. ते सगुणात आणावेच लागते. नाहितर विचार खुंटतात. पण अनेकदा सगुणात त्याला आणले की अनेकांचा विवेक खुंटतो. असे त्रांगडे आहे :)
धनंजय,
>>रुग्ण-डॉक्टर संवाद एक विधी सुद्धा असतो - डॉक्टरने गुरुतुल्य पात्र वठवायचे असते, आणि रुग्णाने शिष्याचे पात्र वठवायचे असते. याचा "बरे वाटण्याशी", "आपली कोणी काळजी वाहातो आहे, असे वाटण्याशी" संबंध आहे. <<
हे या चर्चेसंदर्भात ठळक अक्षरात लिहिण्यासारखे वाक्य आहे. डॉक्टर हा समुपदेशक असतो असे आपले संपादकियातले मत आठवते.
फटु,
प्रतिक्रियेबद्दल आभार.
प्रकाशराव,
छान लेख प्रतिसादात दिल्याबद्दल आभार. तुम्ही काय सगळे संदर्भ खिशात ठेउनच असता का? ताबडतोब उपलब्ध करुन देता याची कमाल वाटते.
चतुरंग,
पुष्पौषधींचा उल्लेख केलात ते फार चांगले झाले. मागे निराशेबद्दलच्या गुंडोपंतांच्या चर्चेत मी पुष्पौषधी+समुपदेशन असा विषय काढला होता त्याची आठवण झाली.
अरुणराव,
तोडग्यांबद्दल अतिशय मार्मिक प्रतिसाद दिलात. ओटी भरणे हा सुद्धा मनावर संस्कारच. पण वाघाचे स्वप्न हा उल्लेख वाचून कार्ल युंग यांचे आर्केटाईप्स आठवले.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
--लिखाळ.
11 Oct 2008 - 9:40 pm | दामुअण्णा
खुप छान विषय निवड्ला याबद्द्ल आभार.
वैद्यकशास्त्र हा आमचा व्यवसाय असल्याने प्लासिबो शिवाय आमचे पानही हलत नाही. काही वेळा त्याने ऊत्तम फायदा होत असला तरी त्याला मर्यादा आहेत.
<<<<<त्याच्या मते कुठलाही आजार हा मनोकायिकच असतो. फक्त मटेरिअलिस्टिक (भौतिक) औषधांनी कुठलीच व्याधी समूळ नष्ट होत नाही. मानसिक उपचार आधी महत्त्वाचे.
>>>>>
हे मात्र पूर्ण सत्य नाही. आमच्या शल्यशास्त्रात तर त्याला फारसा वाव नाही. अतिद्क्षता विभाग , मेंदूविकार, अपघात, इ. मध्येही त्याला स्थान नाही.
अवांतर - - हे माझे मिपावरचे पहिले लिखाण आहे. फार वेळ लागतो लिहायला. कदाचित सवय नसल्यामुळे असेल .
12 Oct 2008 - 4:09 pm | लिखाळ
>>वैद्यकशास्त्र हा आमचा व्यवसाय असल्याने प्लासिबो शिवाय आमचे पानही हलत नाही. काही वेळा त्याने ऊत्तम फायदा होत असला तरी त्याला मर्यादा आहेत.<<
दामुअण्णा, प्रतिसादासाठी आभार. प्लासिबोच्या मर्यांदांबद्दल कृपया लिहा ना.. अजून काही नवे आयाम कळतील.
>>अवांतर - - हे माझे मिपावरचे पहिले लिखाण आहे. फार वेळ लागतो लिहायला. कदाचित सवय नसल्यामुळे असेल .<<
मिपावर स्वागत आहे. येथे टंकलेखन करणे सोपे आहे. सरावाने जमेलच.
--लिखाळ.
11 Oct 2008 - 10:24 pm | स्वाती दिनेश
शब्दापेक्षा कृतीवर किंवा वस्तूवर आपला जास्त विश्वास बसतो.
देवाला नुसता नमस्कार करुन भागत नाही. अंगारा लावला, प्रसाद खाल्ला की मनावर देवाच्या दर्शनाचा संस्कार ठसतो. मला वाटते की कृती अथवा स्थूलावरचा विषास हेच प्लासिबोचे तत्व आहे.
अगदी अगदी...
लेख आणि त्याला पूरक प्रतिसाद दोन्ही आवडले.
स्वाती
12 Oct 2008 - 7:38 am | सहज
लेख आणि त्याला पूरक प्रतिसाद दोन्ही आवडले.
12 Oct 2008 - 4:10 pm | लिखाळ
स्वातीताई आणि सहजराव,
प्रतिसादासाठी आभार.
--लिखाळ.
12 Oct 2008 - 10:11 am | विसोबा खेचर
हम्म! आजारपणाच्या बाबतीत हे खरे वाटते. कारण आजारपणातून बरे होण्याकरता मनाची उभारीही तेवढीच असावी लागते.
पुष्कळदा औषधांसोबतच "माझा माझ्या डॉक्टवर ठाम विश्वास आहे आणि त्याचे औषध घेतले की मला हमखास बरे वाटतेच..!"
हा विश्वासदेखील आपल्याला बरे करण्याकरता मदत करत असतो.
मी जेव्हा जेव्हा आजारी पडलो आहे तेव्हा तेव्हा मी स्वत: या प्लासिबोचा अनुभव घेतला आहे! :)
परंतु अंगारे, धुपारे, दोरे,गंडे इत्यादी प्लासिबोंवर इतरांचा असेल परंतु व्यक्तिशः माझा मात्र विश्वास नाही..
असो, प्रत्येकाची मतं, प्रत्येकाच्या समजुती..!
तात्या.
12 Oct 2008 - 4:14 pm | लिखाळ
>>आजारपणाच्या बाबतीत हे खरे वाटते. कारण आजारपणातून बरे होण्याकरता मनाची उभारीही तेवढीच असावी लागते.<<
बरोबर आहे. या उभारीवरच अनेक लोक असाध्य आजारुतही बाहेर येतात.
>>परंतु अंगारे, धुपारे, दोरे,गंडे इत्यादी प्लासिबोंवर इतरांचा असेल परंतु व्यक्तिशः माझा मात्र विश्वास नाही..
असो, प्रत्येकाची मतं, प्रत्येकाच्या समजुती..! <<
हे ठीकच. आपल्या मनाने देवाचा अंगारा लावण्यापर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपल्या या विश्वासाचा इतर लोक फायदा घ्यायला लागतात तेव्हा मात्र अश्या भोळेपणाचा तोटा होतो असे वाटते.
--लिखाळ.
13 Oct 2008 - 1:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला डॉक्टरकडे रुग्ण म्हणून जाण्याची वेळ आली की डॉक्टरकडे बघून बरं वाटलं पाहिजे असं वाटतं. चहू दिशांनी व्याप्ती वाढलेला, दात खराब असलेला, व्यसनी, ड्रग-ऍडीक्ट वगैरे दिसणारा डॉक्टर बघूनच मला मी आणखी आजारी पडेन असं वाटतं. याच कारणासाठी ठाण्यातल्या एका प्रसिद्ध "आयुर्वेद वाचस्पती"कडे जाणं बंद केलं. ज्याला स्वतःचंच शरीर नीट सांभाळता येत नाही तो मला काय बरा करणार असं वाटतं.
आणि जो डॉक्टर मला मला समजेल अशा भाषेत मला काय झालंय, काय प्रकारचं औषध देतोय अशा गोष्टी एकिकडे सांगतो त्या डॉक्टरवरतर मी लगेचच विश्वास ठेवते.
3 Nov 2015 - 2:24 pm | अत्रुप्त आत्मा
प्लासिबोची गरज असलेले लोक अनुभवले असल्यामुळे लेखन मनाला अगदी भिडलं...
तसेच ,एक बहुमोल लेख आणि चांगल्या प्रतिक्रया आहेत..अस वाटल्यामुळे
सदर लेख मुद्दाम वर काढत आहे.
3 Nov 2015 - 8:38 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी सहमत आहे २००८ नंतर मिपावर अनेक लोक आले आहेत.त्यांच्या माहितीसाठी योग्य उत्खनन केले आहे. तुमच्या अनुभवाची भर टाकली तर अजून उत्तम