तलाक

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 May 2017 - 5:16 pm

डॉ. सुधीर रा. देवरे

ही पोस्ट केवळ उत्सुकता आणि जाणून घ्यावे या हेतूने लिहीत आहे. म्हणून या पोस्टचा अर्थ कोणी धार्मिक वा राजकीय या अंगाने घेऊन गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. मी या विषयाकडे सामाजिक प्रबोधन म्हणून पाहतो. सगळ्याच धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध या विचारधारेतून झालेले हे लिखाण आहे:
परदेशात राहणार्‍या माझ्या एका उच्चशिक्षित मुस्लीम मित्राला विचारलं, ‘आजच्या काळात तोंडी तीन तलाक विषयी तुमचं मत काय आहे?’ मित्र म्हणाला, ‘आपण धार्मिक बाबींवर न बोललेलं बरं. आपण आरएसएस विचारांचे आहात का?’ त्याचे उत्तर ऐकून मी चपापलो. एखाद्या प्रश्नावर आपण भूमिका घेतली तर आपल्याला कोणत्यातरी विचारधारेत बळजबरी ढकलले जाते. म्हणून भूमिका घेताना आपण प्रतिगामी ठरवले जाणार नाहीत ना याची काळजी कशी घ्यायची? (तलाकच्या बाजूने बोललं तर आपण पुरोगामी ठरू का?) असं काही ठरवलं जाण्यापेक्षा कितीही गंभीर विषयांवर भूमिका न घेणंच चांगलं अशा पध्दतीने तटस्थ राहण्याचा हा काळ आहे. (तलाकला विरोध करणारे फक्‍त आरएसएसचे लोक असतील तर आजचे मुस्लीम विचारवंत, सर्व मुस्लीम महिला आणि न्यायालये आदी आरएसएसच्या विचारधारेतले समजावेत का? आरएसएस आपल्या अनिष्ट प्रथांचे उदात्तीकरण करत असेल तर तलाकच्या विरोधात बोलायला या संघटनेलाही नैतिक अधिकार नाही.) आजच्या काळात तोंडी तलाक हा प्रश्न धार्मिक वा राजकीय कसा होऊ शकतो? असलाच तर हा सामाजिक प्रश्न आहे.
1985 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना शहाबानो तलाक प्रकरणाचा निकाल लागला आणि त्या महिलेला नवर्‍याने पोटगी द्यावी असा कोर्टाने आदेश दिला. या वेळीच तोंडी तलाक बेकायदेशीर ठरवला गेला होता. मात्र काही कडव्या धर्मांधळ्या लोकांकडून राजीव गांधीची दिशाभूल केली गेली. म्हणून संसदेत कायदा होऊन तोंडी तलाकला कायदेशीर पाठिंबा मिळाला आणि तलाक पीडित महिलेला ‍आर्थिक मदतीसाठी कायम वफ्फ बोर्डाकडे हात पसरावे लागले.
याच दरम्यान ‘निकाह’ नावाचा हिंदी सिनेमा आला. (खरं तर या चित्रपटाचे नाव ‘तलाक’ असायला हवं होतं.) चित्रपट ‍अभिजात म्हणता येणार नसला तरी या चित्रपटाने तलाक पीडित महिला कशी उध्वस्त होते, यावर छान भाष्य करून तात्कालीन एका पिढीचे प्रबोधन केले होते. सलमा आगा आणि गुलाम अली यांनी गायलेल्या गजला अप्रतिम. चित्रपटात सलमा आगा यांनीच काम केले आहे.
अलिकडेच एका टीव्ही वाहिनीने (इंडिया टीव्ही) स्टींग ऑपरेशन करून तलाकला प्रोत्साहन देणार्‍या काही धार्मिक मुल्ला- मौलवींना उघडे पाडले. चुकून तलाक दिला गेला म्हणून त्याच महिलेशी निकाह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल असं या धर्मगुरूंना विचारण्यात आलं. हलाला- हमबिस्तर होण्यासाठी ते स्वत: तयार झाले. त्यासाठी एक लाख रूपये सुध्दा मागण्यात आले. ही ‘हमबिस्तर’ची बात कुणाला (आणि त्यांच्या घरी तर) अजिबात कळता कामा नये हे ही त्यांनी सांगितले. कारण हे लोक ‘बालबच्चेवाले’ (स्वत:चे तरूण मुलं असलेले) होते म्हणे. म्हणजे त्यांच्या इज्जतीचा पंचनामा होणार होता. हलाल- हमबिस्तर होणे ही बाब धार्मिक असेल तर त्यासाठी लपवाछपवी का? धार्मिक पुण्य कमवण्याचे काम असेल तर या लोकांनी (धर्मासाठी) हे कृत्य उघडपणे प्रचार करून करायला हवे. अशा कामांसाठी वरून एक लाख रूपये लाच घ्यायला धर्माने सांगितलं का? ज्याअर्थी या गोष्टी लपून छपून केल्या जातात त्याअर्थी धर्माच्या नावावर चाललेल्या या वाईट प्रथा आहेत हे मुल्लाही अप्रत्यक्षपणे आपल्या वागण्याने कबूल करतात.
सर्वच धर्मात वाईट प्रथा होत्या. अजूनही आहेत. काही वाईट प्रथा काळाची मागणी म्हणून बंद झाल्या. धर्माचा ठेका घेतलेले लोक इतके सनातनी असतात की ते आपल्या अनिष्ट प्रथा सहजासहजी सोडायला तयार नसतात. म्हणूनच धर्म संस्थापकाला सुध्दा सुळावर जावे लागते.
माझे अनेक मुस्लीम मित्र आहेत. पण याबाबतीत त्यांना सखोल माहिती नाही. मी कुराण वाचले. मराठी अनुवाद वाचला. त्यात मला तलाक संबंधी काही वाचायला मिळालं नाही. कदाचित अनुवादातून तो भाग सुटून गेला असावा. (माझे अज्ञान म्हणून इथे मी काही प्रश्न उपस्थित करतो. माझ्यासहीत जे जे कोणी याबाबतीत अज्ञानी आहेत त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूने.)
‘शरियत’ हा कुराणचा भाग आहे का स्वतंत्र? तोंडी तलाक नेमक्या कोणत्या संदर्भात आहे? कोणकोणत्या कारणांनी दिला जातो? ग्रंथात तलाकचे गौरवीकरण केले असेल तर त्यासाठी नेमके कोणते युक्‍तीवाद केले गेलेत? तलाक त्या विशिष्ट काळासाठी ‘कालाय’ म्हणून योग्य होता की तो सार्वकालिक (आजही) योग्य आहे? तोंडी तलाक हा भाग प्रक्षिप्त असावा का? ‘हलाला’ हे काय आहे? त्याच नवर्‍याशी पुनर्विवाहासाठी दुसर्‍याशी तात्पुरता निकाह लावून ‘हमबिस्तर’ होण्यामागे नेमके काय तत्वज्ञान आहे?
हे सर्व प्रश्न जाणकारांना विचारण्यासाठी उपस्थित केले आहेत. ज्या ज्या कोणाला याची माहिती असेल त्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी इथे लिहावे ही विनंती.
(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

समाजलेख

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा

तलाक.. तलाक... तलाक...! ;)

आरएसएस आपल्या अनिष्ट प्रथांचे उदात्तीकरण करत असेल तर तलाकच्या विरोधात बोलायला या संघटनेलाही नैतिक अधिकार नाही.

असं कसं? मी फालतू लिहितो पण मला तुमच्या फालतू लिखाणावर टीका करायचा पूर्ण अधिकार आहे. जे चूक आहे ते चूकच आहे. तसं म्हटलं तर मग जगात कुणालाही कुणावरही टीका करायचा नैतिक अधिकार नाही, कारण संपूर्णपणे निर्दोष असं या जगात काहीही नाही.

माहितगार's picture

2 May 2017 - 2:31 pm | माहितगार

ब्लॉग आणि इतर सोशल मिडीयापेक्षा मिसळपावसारखी चर्चात्मक संकेतस्थळे अशा चर्चांसाठी अधिक उत्तम असतील हे खरे. अर्थात आपण जेव्हा धागा लेखक 'समाज प्रबोधन' हा शब्द प्रयोग करत आहेत तेत्व्हा समाज प्रबोधनासाठी अपेक्षीत श्रोतृवृंद मिसळपाव डॉट कॉम किंवा इतर मराठी व्यासपीठांवर आहे का ? कदाचित समाज प्रबोधनापेक्षा आपल्याशी नित्य सामाजिक संपर्कात नसलेल्या आपल्याच बांधवांबद्दल अधिक जाणून घेणे इतपत उद्देश फार तर सफल होऊ शकावा असे वाटते, हे लिहिण्याचा उद्देश अपेक्षा फारही उचांवणे आणि यश न येणे याने जो अपेक्षाभंग होतो तो टाळणे होय. असो .

हलाला’ हे काय आहे? त्याच नवर्‍याशी पुनर्विवाहासाठी दुसर्‍याशी तात्पुरता निकाह .....मागे नेमके काय तत्वज्ञान आहे?

आपल्याकडे काही स्मृतींनुसार संन्यास घेतल्या नंतर पुन्हा गृहस्थाश्रमात येता येत नसे. परित्यक्तेला पतीने पुन्हा स्विकारण्यात मात्र काही अडचण नव्हती हे ही खरे. संन्यास घेतल्या नंतर पुन्हा गृहस्थाश्रमात येताना शब्दपुजेमुळे एक मराठी कुटूंब कसे छळले गेले हे महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवले गेले आहे . मराठी भाषेस जसे संत ज्ञानेश्वर लाभले तसे त्यांच्याही धर्मात कुणा संत ज्ञानेश्वरासारखा जन्म घेऊन धर्माचे स्वभाषेत दर्शन देणारा योगी जन्मणे अद्याप बाकी असावे.

बाकी त्या धर्मात त्याच नवर्‍याशी पुनर्विवाहासाठी सरळ सोय नाही म्हणजे लावावयाचा दुसरा निकाह तात्पुरता लावा असाही उद्देश त्या धर्मात नसावा ( या संदर्भाने दिली जाणारी उदाहरणे खरीच प्रातिनिधीक आहेत का हे तपासण्याची गरज कदाचित असावी) , एकदा तलाक दिल्यानंतर स्त्रीस इच्छा होऊनही वापस प्राप्त करणे सहज प्राय नाही हे लक्षात घेऊन तलाक दिले जाऊ नयेत असा काही सकारात्मक अर्थ शोधायचा प्रयत्न केल्यास ठिक अन्यथा शब्दपुजे पलिकडे त्यात अधिकृत असे काही तत्वज्ञान नसावे.

अर्थात सरळ घास खाण्या एवजी आडवळाणाने घास खाणे थोडक्याने झालेल्या विलगतेला वापस येण्याची सहज संधी न देता शब्दपुजे खातर टाळण्या जोग्या बंधनात अडकवणे स्पृहणीय नाही पण व्यक्ति आणि शब्दपुजेत अडकलेल्या समुदायाला ते सांगणार कोण ?

....हा भाग प्रक्षिप्त असावा का?

इतिहासकालीन बहुसंख्य धर्मांच्या धर्म ग्रंथांचे लेखन होण्या पुर्वी असंख्य दशके / शतके स्मरण आणि पाठांतरांवर अवलंबून होते. देव आणि प्रेषितांनी चुका केल्या नाहीत असे गृहीत जरी धरले तरी स्मरण करून पुढच्या पिढ्यांकडे देणारी माणसे माणसेच होती स्मरणात ठेवताना चुका घडल्याच नसतील हे कसे सांगणार ? हे लक्षात न घेता तथाकथीत सनातन मंडळी शब्दपुजेस चिटकून असतात. तर्कशास्त्र आणि विज्ञानाची पुस्तके काढून बसले तर तार्कीक उणीवा नाहीत ना हे तपासून पुन्हा तोच प्रश्न सांगणार कोण ?

तलाकच्या प्रश्नाच्या बाबतीत बाहेरच्यांना जाणवते त्या प्रमाणात समस्या त्यांची त्यांना जाणवते का ? नसेल तर का जाणवत नाही ? याच एक कारण होणारे विवाह मोठ्या प्रमाणावर कझीन ब्रदर्सशी एक्सटेंडेड कुटूंबातच होत रहातात त्यामुळे कदाचित मुलांना तेवढे इनसेक्युरीटी फिलींग येत नसावे. मुलांचा वडीलांच्या प्रॉपर्टीत इनहेरीटन्स कायम असतो प्रश्न पत्नीचा शिल्लक राहतो ती तलाक मिळाल्या नंतर माहेरी येते इद्दत इत्यादी कंपलसरी काळानंतर दुसरा विवाह लावून तिची व्यवस्था लावूनदेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे किमान समस्येकडे समस्या म्हणून पहाण्यापासून दुर्लक्ष करता येते. किंवा या स्थितीतून जाणार्‍या महिलांची आणि मुलांची आत्मचरीत्रेही फारशी वाचण्यास सापडत नाहीत त्यामुळे त्या समाजात समस्यांबद्दल आपापसात मनमोकळी चर्चा होणे कठीण रहात असू शकते हि एक बाजू.

समजा तलाकच्या मुद्द्यावर समजा प्रागतिक कायदे स्विकारले गेले तरी त्यांच्या महिलांच्या मुलभूत समस्यांचा निपटारा होणार का या बद्दल साशंकता शिल्लक राहते. इस्लाम स्त्रीस प्रॉपर्टी बाळगण्याचा पुर्ण अधिकार देत असला तरी शिक्षण संवाद दळण वळण यावरील प्रत्यक्ष बंधनांमुळे त्या संपत्तीच्या अधिकारांपासून वंचित राहतात. मेहेरचा अधिकार बहुतांश कागदावर आहे तो प्रामाणिकपणे स्त्रीला न्याय देणार्‍या शुद्ध हेतुने कितपत पाळला जातो ? असे प्रश्न ज्यांना कुणाला मुस्लिम मित्र आहेत त्यांनी आपल्या मुस्लिम मित्रांना विचारून पहाण्यास हरकत नसावी.

त्या त्या समाजातील प्रश्नांना त्या समाजातील स्त्रीयांनीच प्रतिनिधीत्व करणे केव्हाही हितावह असू शकते स्त्री राजकीय प्रतिनिधी सुद्धा सुरवातीस सनातन भूमिकाच घेतात पण राजकारणात स्थिर स्थावर झाल्यानंतर समस्यांच्या निदानाकडे लक्ष लागते. यादृष्टीने विधानसभा आणि लोकसभेत स्त्रीयांना १/३ं जागा देणे हि खरेतर सर्वोत्तम पॉलीसी असावी. नागालँड सारख्या अनपेक्षीत ठिकाणाहूनही स्त्रीयांचे राजकीय आरक्षणास विरोध झाला आणि स्त्रीयांचे राजकीय आरक्षण बोलघेवडे पणा किती केला तरीही प्रत्यक्षात येत नाही कारण प्रस्थापित हितसंबंध कुणालाही फारसे दुखावून नको आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थातून पुढे येणार्‍या स्त्रीयांना अधिक चांगले ट्रेनिंग देऊन पुढे पडण्याच्या संधी उपलब्ध केल्या गेल्यास नेतृत्व उभे राहील जे स्वतःच्या समस्यांचा स्वतः अभ्यास करुन योग्य राजकीय निदान प्रत्यक्षात आणेल. हा लांबचा मार्ग असला तरीही अधिक खात्रीशीर मार्ग असावा असे वाटते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 May 2017 - 5:19 pm | डॉ. सुधीर राजार...

नमस्कार. आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. माहितगार यांची विस्तृत चर्चा केली त्याबद्दल विशेष अाभार.

गामा पैलवान's picture

2 May 2017 - 6:21 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुधीर राजाराम देवरे,

विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद. तुमची ही एक शंका सोडवतो :

‘हलाला’ हे काय आहे? त्याच नवर्‍याशी पुनर्विवाहासाठी दुसर्‍याशी तात्पुरता निकाह लावून ‘हमबिस्तर’ होण्यामागे नेमके काय तत्वज्ञान आहे?

नवऱ्याने आपल्या एखाद्या बायकोस तलाक दिला असेल तर लगेच तो उलटवता येत नाही. जरी त्याला पश्चात्ताप झाला तरीही. अशा वेळेस बायको दुसरा तात्पुरता नवरा शोधते. ता.न. ची शय्या सजवून एक ऋतू सरला की ती त्याच्यापासून तलाक घेते. अशा रीतीने ती पहिल्या नवऱ्याकडे परत येण्यासाठी सज्ज होते. या प्रकरणात तात्पुरत्या नवऱ्याची चांदी होते. त्याला एक बाई उपभोगायला मिळतेच शिवाय वरती सेवा पुरवल्याचे पैसेही मिळतात. म्हणून इंग्लंडमध्ये हा एक धंदा झाला आहे. नुकताच बीबीसीवर या प्रकारावर एक लेख येऊन गेला : http://www.bbc.co.uk/news/uk-39480846

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

3 May 2017 - 12:03 am | संजय क्षीरसागर

हलाल-ए-हमबिस्तर असा तो शब्द आहे. हलाल म्हणजे जे करणं गुन्हा नाही असं कृत्य आणि हमबिस्तर म्हणजे शय्यासोबत.

माणसानी काय सॉल्लीड युक्त्या शोधल्यात तेवढ्या एका नेमक्या गोष्टीसाठी !

तेजस आठवले's picture

2 May 2017 - 7:12 pm | तेजस आठवले

आरएसएस ने तोंडी तलाक ला विरोध केल्याची लिंक देऊ शकाल का ?
आरएसएस च्या अनिष्ट प्रथा कुठल्या? आणि त्यांचे उदात्तीकरण आरएसएस कसे करते ? ह्यावर अधिक माहिती दिलीत तर आभारी राहीन . धन्यवाद.

पैसा's picture

2 May 2017 - 10:53 pm | पैसा

पण बोलायची चोरी.

तलाक या विषयावर नवीन माहिती मिळाली. हलाल ए हम बस्तर या भयंकर पद्धती बद्दल वाचल्यावर तर मुस्लिम महिलांची अवस्था किती दयनीय होत असेल याची कल्पनाही करवत नाही.

मराठी_माणूस's picture

4 May 2017 - 10:44 am | मराठी_माणूस

संमं नी काही प्रतिसादा कडे लक्ष देउन संपादीत कराव्यात.