पान

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
25 Apr 2017 - 4:07 pm

पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान!

आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो...

केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे... त्यामुळेच तर ते पान टिकतं ना, मस्त सांभाळून घेते २ही बाजू, जणू काही पुस्तकाची बांधणीच. खाद्यपरार्थ स्वरूपात मांडलेल्या त्या हिरव्या गडद पाना वरची ज्ञानाची भूक काही औरच! त्या पानावर जेवण असले की त्या गर्द हिरव्या रंगावर जो काही पदार्थ उठून दिसतो, त्याला तोडच नाही... पांढरा शुभ्र भात त्यावरचं नाजूक पिवळं वरण आणि त्याहून नाजूक साजूक तूप! मस्तच कॉन्ट्रास्ट, आजूबाजूला कोशिंबीर, आळूच्या वड्या, चटण्या, बटाटा भाजी अशी मंडळी तुमचं लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि तुमचं लक्ष मात्र पुरण पोळी कडे असतं!

सर्व मंडळी भुकेलेली आणि कोणीतरी सुरु करतं -वदनी कवळ घेता- आणि तुमचा हात भातावर जाण्याच्या आत एकमेकांना जोडला जातो.

सर्व मंडळी भुकेलेली आणि कोणीतरी सुरु करतं -वदनी कवळ घेता- आणि तुमचा हात भातावर जाण्याच्या आत एकमेकांना जोडला जातो. भाताची शीतं आणि पाण्यांच्या थेंबांचा ताटाभवती गोल वगैरे पारंपारिक पद्धती, हे सर्व मानापमान प्राकार संपले की डोळे हात आणि तोंड ह्यांची जी काही गट्टी जमते, विचारू नका, घास घेताना जेवढा 'आ' मोठा तेव्हढेच डोळे ही, पानावर कबड्डी खो खो सारखे देशी खेळ सुरू होतात, लिंबू/मीठ सारखे पाठीराखे, आत्ताच्या चियर लीडर्स म्हणा हवं तर, त्या वेळोवेळी तुमचा उत्साह वाढवायला तत्पर असतात, आमटी/कोशिंबीर/चटणी 'मला घ्या मला घ्या' असं अगदी प्रेमाने ओरडत असतात... मुख्य भूमिका बजावणारी पुरणपोळी / वरण भात ह्यांच्यात कमालीची स्पर्धा असते! त्यांना मदत असते आई, ताई, मामी किंवा काकू कधी आजीची. आजूबाजूची वडीलधारी माणसं आपण चोपत असलो की जरा 'सावकाश जेव', आणि सावकाश जेवत असलो तर 'अरे लेका, तरुण आहेस तू, असं काय लाजत लाजत खातोयस, खा खा... ' असं बोलून मोकळे होतातच!

ते पान मात्र जितकं द्याल त्याला तितकं सहन करत असतं! अगदी आई सारखं... कधी कधी डाव किंवा भातवाढणी लागली की फाटतंही... पण भोक नाही पडत... एका रेषेत शिस्तीत फाटतं, असो जरा नाजूक होतोय विषय.

हळू हळू पानातले सर्व पदार्थ पोटात, तो टवटवीत हिरवा अजूनच टवटवीत झालेला असतो! काही शीतं चार चांद आणि आमसुलं त्यावर नजर ना लगे ची भूमिका बजावत असतात. मी तीही नाही सोडत, अंगठ्याचा 'मॉप' करत उरले-सुरलेले संपवत 'अन्न देवता सुखी भव' हा महामंत्र म्हणत प्रेमाने त्या पानाकडे पाहतो.

क्रमश:

#सशुश्रीके

Paan

मांडणीप्रकटन