अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका
लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती. सर्वांना आपआपल्या ताटावर बसायला आमंत्रण दिलं होतं.जांवयाचा मान म्हणून त्यांच्या ताट्पाटा सभोवती रांगोळी घालून त्याची जागा सुशोभीत केली होती.
प्रत्येकाच्या ताटात थोडं मीठ,लिम्बाची फोड,बाजुला चिमुटभर ताज्या खोबर्याची चटणी,ताटाच्या मध्यभागी गरमागरम वाटी भरून भात,त्यावर पिवळं धमक वरण, वरणावर चमचाभर साजुक तूप,वरती कडेला दोनही बाजुला वांग्याचा मसालेदार भात,आणि बटाट्याची भाजी असा थाट होता.ताटाच्या बाहेर लक्ख पितळेच्या वाटीमद्धे तांदळाची खिर,ताकाची वाटी आणि एका मोठया वाटीत घरच्याच बागेतली लोण्यासारखी मऊ शिजलेली अळुची भाजी वाढलेली होती.ही अळुची भाजी अण्णांच्या सासुबाईची खास डिश होती.
"पुंडलीक वरदे हरी विठ्ठल"
अशी घोषणा केल्यावर मंडळीनी जेवायला सुरवात केली.
अण्णांना अळुच्या भाजीचा पुर्वी पासून तिट्कारा होता.जे आपल्याला आवडत नाही ते ताटातून पटकन खाऊन टाकायचं ही त्यांची संवय.त्यानुसार ते अळुची वाटी पटकन रिकामी करून टाकीत होते.सासुबाईना खूप आनंद व्हायचा आपल्या जांवयाना आपण केलेलं अळु खूपच आवडलं म्हणून त्या परत परत त्याना वाटीत अळु वाढायच्या.आणि अण्णा तिची पाठ फिरल्यावर पट्कन अळु फस्त करायचे.असे खूप वेळ झाल्यावर त्यांना कळेना,
"काय करावं की सासुबाईना आता पुरे झालं मला अळु मुळात आवडत नाही आणि तुम्ही मला नका वाढू.हा त्यांना कसा संदेश देऊ?"
तेव्हड्यांत काही तरी विषय बोलावा म्हणून एकाने विचारलं,,
"काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडं किती?"
अण्णानी ह्या संधीचा फायदा घेवून ते म्हणाले
"तसं म्हटल तर आम्ही पांच भावंडं ह्या अळुवातून वाचलो तर! नाही पेक्षा चार."
प्रश्न करत्याला काय कळलं असेल ते कळो पण अण्णांच्या सुबुद्ध सासुबाईला याचा अर्थ कळला नसेल तर नवलच.तिने त्यांना अळु वाढायचं थांबवलं.
बोलून चालून ती अण्णांचीच सासुबाई होती म्हणा.
पण नंतर अण्णांना खूपच वाईट वाटलं.आपण असं बोलायाला नको होतं.असं त्याना वाटू लागलं.त्यांनी सासूबाईंची माफी मागितली.
ते म्हणाले,
"आपण एव्हडं आवडिने अळू वाढत होता.आणि मी ते मला आवडत नाही म्हणून ताटातून फस्त करीत होतो.यापुढे मला जो पदार्थ आवडत नाही तो शेवट पर्यंत ठेवण्याची संवय लाविन.म्हणजे तो पदार्थ ताटात असल्याने कुणी मला परत वाढणार नाही."
संध्याकाळी चहाच्या वेळेला अण्णांच्या थाळीत बेसनाचे लाडू,आणि काजूचे लाडू होते.अण्णा काजूचे लाडू आवडतात म्हणून खात होते,बेसनाचे लाडू आवडत नाहीत म्हणून त्याला हात लावत नव्हते.काजूचे लाडू जांवयाना आवडतात म्हणून सासूबाई परत परत आणून वाढत होत्या,आणि अण्णा लाडू फस्त करीत होते.
"काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडे किती?"
असा परत प्रश्न विचारील का कुणी म्हणून अण्णा परत वाट बघत होते.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
8 Oct 2008 - 10:51 pm | यशोधरा
अळूचं फदफदं, बेसनलाडू, काजूचे लाडू... =P~
8 Oct 2008 - 11:27 pm | झकासराव
"काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडे किती?"
असा परत प्रश्न विचारील का कुणी म्हणून अण्णा परत वाट बघत होते>>>>>>>>
:))
बाकी सासुरवाडीत जेवण्यचा अनुभव असाच हो. जावयाला बकासुर समजतात की काय हे कळत नाय बॉ.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
9 Oct 2008 - 12:11 am | रेवती
सामंतकाका,
वर लेखामधे जेवणाच्या ताटाचं जे वर्णन केलत त्यामुळे अगदी फार म्हणजे फार आनंद झाला.
आता दिवाळीत मीही असा स्वयंपाक करणार. माझ्या इथे अळू मिळतो. त्यात खोबरं, डाळ, दाणे, काजू घालून छान भाजी होते.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. (सध्या दिवाळी मेन्यू प्लॅनींग चाललयं ना!)
रेवती
9 Oct 2008 - 7:05 am | शितल
काका,
मस्त मजेशीर किस्सा आहे.
बाकी आलुचे फदफद अगदी मस्त लागते :)
रेवती म्हणते तसे तसेच आळुचे फदफड आमच्या कडेही आई मस्त करते. :)
9 Oct 2008 - 8:26 am | श्रीकृष्ण सामंत
यशोधरा,झकासराव,रेवती,शितल,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
रेवती, शितल,
ह्या दिवाळीच्या मेनु मधे "अळूंच फदफद" भुरकताना आमची आठवण काढा बरं का!
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Oct 2008 - 6:34 pm | रेवती
जरूर आठवण काढू. :)
रेवती
9 Oct 2008 - 12:09 pm | योगी९००
प्रत्येकाच्या ताटात थोडं मीठ,लिम्बाची फोड,बाजुला चिमुटभर ताज्या खोबर्याची चटणी,ताटाच्या मध्यभागी गरमागरम वाटी भरून भात,त्यावर पिवळं धमक वरण, वरणावर चमचाभर साजुक तूप,वरती कडेला दोनही बाजुला वांग्याचा मसालेदार भात,आणि बटाट्याची भाजी असा थाट होता.ताटाच्या बाहेर लक्ख पितळेच्या वाटीमद्धे तांदळाची खिर,ताकाची वाटी आणि एका मोठया वाटीत घरच्याच बागेतली लोण्यासारखी मऊ शिजलेली अळुची भाजी वाढलेली होती
अहो असे मस्त वर्णन करुन आमची भुक नका वाढवू...इकडे हे मिळत नाही...
खादाडमाऊ
(जिभल्या चाटत बसलेला)