नको तेवढे सत्य..... सत्यानाश !

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
10 Apr 2017 - 9:51 am

लहानपणी शिकविले होते, बोलावे नेहमी खरे
मनात एक ओठात दुसरे, हे वागणे नाही बरे
.....
आता वाटते, असे सांगणे होते कां खरेच चांगले?
मनातले खरे ऐकून झालेय कधी कोणाचे भले?
.....
कालच असे झाले, नवीन साडी होती नेसली
पदर आखूड वाटला, सैलसर वेढे होते खाली
.....
कंटाळा आला ठीक करायचा, म्हटले ह्याना विचारू
अहो, चांगली दिसतेय, की पुन्हा नेसून सुधारू?
....
हे तरी अस्से नां, एरवी पुस्तकात डोके खुपसून
आज मात्र नेमके ह्यांनी पाहिले नीट लक्ष देऊन
....
“शी शी अग काय हे कशी नेसलीय भोंगळ
म्हणतील तुला मैत्रिणी किती ही अजागळ
....
तुझी ती सरिता बघ, कशी साडी नेसते चोपून
बघणारे सुद्धा बघतात सारखे सारखे मागे वळून
....
भोंगळ साडी नेसलेय इतपत सांगणे ठीक होते,
कारण मनात कोठेतरी, मलाही ते माहीत होते
....
पूर्ण सत्य बोलायची ह्यांना होती काही गरज?
सरिताचे कौतुक करून ओढवला नां गहजब?
....
“अग जरा नीट नेस” असे नुसते म्हणायचे
कशाला कुणाविषयीचे मनातले खरे सांगायचे?
....
मी मग धुसपूस करून, ओरडले खूप ह्यांच्यावर
स्वयंपाक तुम्हीच करा, मी जातेय सरिता बरोबर
....
आता सांगा, ह्यांचे सत्य सांगणे होते कां चांगले?
मनातले खरे सांगून झालेय कधी कोणाचे भले?
-अरुण मनोहर

हास्यकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 Apr 2017 - 5:37 pm | पैसा

:)

माहितगार's picture

13 Apr 2017 - 11:59 am | माहितगार

:)