नारायण...कोण नारायण?

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
8 Apr 2017 - 11:32 am

(प्रेरणा: स्व.श्री.पु.ल.देशपांडे ह्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं अजरामर व्यक्तिचित्र: नारायण…!)

"हे बघ नारायणा..ती तुझ्यासारखी लग्नातली स्वयंसेवकगिरी मला अजिबात जमणार नाही आता",मी नारायणाला सांगून मोकळा झालो.
"का नाही जमणार पण?"
"अरे हल्ली कोणाच्या लग्नाला जायलासुद्धा जमत नाही रे.लग्नाची कामं कुठून करणार?"
"काय सांगतोस."
"इतरांच्याच काय...स्वतःच्या लग्नात जरी मी उपस्थित असलो तरी पूर्ण वेळ स्टॅण्डबाय मोडमध्येच होतो."
"आता हा स्टॅण्डबाय मोड काय असतो"
"म्हणजे आसपास सुरु असलेला अभूतपूर्व गोंधळ हा आपल्या नावानेच सुरु असूनही मी 'बघ्या' शिवाय काहीही करू शकत नव्हतो! उठ म्हटलं की उठायचं अन बसं मी म्हटलं की बसायचं ही मोठ्या भावाची आज्ञा मी तंतोतंत पाळली होती."
"हा हा हा",नारायण मोठ्याने हसला.
"हसतोस काय! म्हणूनच "नवरा मुलगा खूपच साधा आहे हो" हे वाक्य वधूपक्षाकडून दोन-चारवेळा तरी कानावर आलं."
"क्या बात है!!"
"पण त्या वाक्याचा "पढवून आणलेलं दिसतंय" असा दबक्या आवाजातला उत्तरार्ध नंतर मला हिच्याकडून कळला."
"अरे देवा!!"

"ते जाऊ दे रे...तर मी काय सांगत होतो,मुळात आता नारायणाची गरजच नाहीये कोणाला.",मी डायरेक्ट नारायणाच्या धोतरालाच हात घातला.
"अरे असं काय म्हणतोस रे?"
"हल्लीचे लग्नसोहळे किती देखणे असतात पहिले आहेस का? ते ही नारायणाशिवाय!! कुठेही नाव ठेवायला जागाच नाही बघ"
"आता नारायणचं नाही म्हटल्यावर नावं तरी कोणाला ठेवणार तुम्ही?"
"असं काही नाही..भाड्याचे नारायण मिळतात हल्ली..इव्हेन्ट मॅनेजमेन्टवाले!!"

"अरे पण घरातलं कोणीतरी लागतंच ना रे"
"मग करायच्या की उभ्या तुझ्या लिमिटेड एडिशन्स कॉप्या माझ्यासारख्या!"
"आता हे काय नवीन"
"तू कसा लग्नात डोकं गमावलेला मुरारबाजी असायचा तसे आम्ही आहोत ना डोकं गहाण ठेवलेले टिकोजी!!"
"म्हणजे?"
"आमचं डोकं स्मार्टफोनला गहाण ठेवतो ना आम्ही."
"मला काहीही कळत नाहीये. ते लिमिटेड एडिशन्स म्हणजे काय?"
"म्हणजे आम्हा टिकोजींचं कार्यक्षेत्र स्मार्टफोनच्या स्क्रीनपुरतं मर्यादित आहे आजकाल! तू एखादा प्रॉब्लेम सांगायचीच देर की लगेच सोल्युशन देतो आम्ही"

"अच्छा...मग ते पंचांगाचं वगैरे कसं करता मुहूर्त पाहण्यासाठी?"
"कशाला पाहायचाय मुहूर्त? एखादा रविवार पाहून उरकून टाकायचं लग्न.उगाच सुट्टीबिट्टी काढायची गरज नाही."
"असं कसं होईल?"
"हे बघ नारायणा तुझ्यासारखं साहेबाकडे वालपापडीची भाजी पोहोचवून सुट्टी मिळत नाही आम्हाला. आमच्या साहेबाला वालपापडी म्हणजे काय ते सुद्धा माहिते नसतं!"
"अरे मग साहेबाला बोलवायचं ना लग्नाला.चारशे लोकांच्या पंगतीत आणखी एकाची भर! काय फरक पडतो."
"नारायणा तुझं पुणं आता शनिवारवाड्यापासून स्वारगेटपुरतं नाही ऱ्हायलंय रे. साहेब राहतो नांदेड सिटीत...लग्न बोंबलायला मगरपट्ट्यात!! आणि माझ्या भाचीच्या लग्नाला कश्याला येईल रे तो?"
"असं आहे होय!"

"आणि ते पंगतीबिंगत काही नसते हं आजकाल?"
"मग काय असतं? तिथेपण घरपोच सेवा देता का?"
"बुफे असतो बुफे."
"बुफे म्हणजे?"
"म्हणजे बघ..सगळं टेबलावर मांडायचं. ज्याला जे हवं तो घेईल."
"स्वतःच्या हाताने?"
"मग काय..त्यातही आम्ही काय गम्मत करतो........"
"कसली गम्मत?"
"म्हणजे पोळी-भाजी ठेवायची एका कोपऱ्यात..वरण-भात ठेवायचा दुसऱ्या कोपऱ्यात...गोड तिसरीकडे..आणि पाणी भलतीकडेचं!"
"ह्यात काय गम्मत?"
"व्यायामसुद्धा होतो ना खाताखाता!"
"करा लेकहो तुम्हाला काय करायचंय ते.

"आता मला सांग नारायणा..तुझी खरंच काय गरज उरलीये?"
"अरे पण ती कापडखरेदी,सोनं वगैरे ह्यासाठी नको का रे कोणी बरोबर?"
"कश्याला हवंय कोणी? तू मोठा फिरायचा ना सात-आठ बायकांना घेऊन गल्लीबोळात खरदेसाठी."
"म्हणजे? आवश्यक होतं ते."
"काही गरज नाही. तुझ्या त्या सरमळकराचं लुगड्याच दुकान विकलं त्यांच्या चिरंजीवांनी. चार मजली मॉल झालाय तिथे आता. नवऱ्यामुलाच्या हातरुमालापासून नवरीच्या पोशाखपर्यंत सगळं मिळतं एकाच ठिकाणी! कश्याला वणवण फिरायचं?"
"काय सांगतोस?"
"मग!! चौथ्या मजल्यावर गेलास तर भविष्यातल्या हलणाऱ्या पाळण्याचीपण खरेदी होऊ शकते."
"बस्स..पुरे कर आता!", नारायण म्हणाला.

"अजून काय ऐकायचंय तुला?"
"अरे पण त्या वरपक्षाशी बोलायला कोणी जबाबदार व्यक्ती नको का घरात?"
"कश्याला बोलायचंय रे कोणाशी? हे बघ आजकाल आमचा फोकस फक्त नवरा-नवरीकडे असतो. मंडपात मुलाचा अन मुलीचा बाप ओळखूही येणार नाही तुला."
"फोकस म्हणजे?"
"अरे म्हणजे त्यांचे कपडे..त्यांचा मेकअप..त्यांचे फोटो..त्यांच्या सेल्फ्या...हे सगळं व्यवस्थित पार पडलं म्हणजे झालं!"
"अरे पण ते सप्तपदी वगैरे काही करता की नाही?"
"करतो ना...प्रत्येक पावलाचा वेगळा फोटो असतो अल्बममध्ये."
"अल्बमला आग लाव रे..मी काय विचारतोय..तू काय सांगतोय?"

"नारायणा..तुझ्या ना बेसिकमध्येच लोचा आहे"
"म्हणजे?"
"तू त्या अक्षता,पत्रावळी,आचारी अन बोहलं यातच गुरफटलाय अजून."
"मग आता काय नवऱ्यासोबत उभं राहून सेल्फी काढू मी?"
"हो...पत्रिकेतसुद्धा आजकाल स्पष्ट लिहिलं असतं."
"काय लिहिलं असतं?"
"कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे."
"मग पद्धतच आहे तसं लिहिण्याची."
"याचाच अर्थ कार्य सिद्धीस नेण्यास तुमची गरज नाही."
"काहीही बोलतो आहेस तू"
"असंच आहे!"
"मग पत्रिकेत आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असं तरी का लिहिलं असतं?"
"उपस्थिती प्रार्थनीय आहे नारायणा...लुडबुड प्रार्थनीय नाहीये!"
"अरे देवा!!!!"

"आता बोल??"
"आता काय बोलू?"
"नारायणा..तुझं ना जरा चुकलंच."
"हो..मलाही तसंच वाटतंय."
"तू ना सगळ्याच गोष्टी अंगावर घ्यायचास..आता बदललंय रे."
"नेमकं काय बदललंय?"
"अरे तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी इन-हाऊस फॅब्रिकेशनच्या मागे लागायचे, आम्ही सगळं आऊटसोर्स करतो!"

"खरंय तुझं..चल मी निघतो आता."
"कुठं निघालास?"
"आता माझी गरजच नाहीये म्हटल्यावर मी कशाला थांबू?"

"थांब नारायणा!!"
"आता कशाला?"
"एका गोष्टीसाठी अजूनही तुझीच गरज आहे."
"कोणती?"
"तुझ्या अंगाखांद्यावर खेळलेली सुमी तुझ्या आशिर्वादाशिवाय सासरी जाणार नाही!!"

नाकावर आलेला चष्मा सावरण्याच्या बहाण्याने नारायणाने डोळे पुसले.

"अजून एक गोष्ट....हे बुंदीचे लाडू घेऊन जा तुझ्या मुलासाठी."
"राहू दे रे.खराब होतील घरी पोहोचेपर्यंत"
"चितळ्यांकडून आत्ताच आलंय लाडूंचं पार्सल..आठ दिवसतरी काळे पडणार नाहीत!!"

त्या पार्सलकडे बघून नारायण स्वतःशीच हसला.

समाप्त

(प्रस्तुत लिखाण हे नारायणाच्या माध्यमाने सद्यस्थितीवर भाष्य करण्याचा एक प्रयत्न आहे. यातून नारायण या व्यक्तिरेखेला धक्का पोहोचवण्याचा उद्देश नाही. तरीही अनावधानाने तसे झाले असल्यास क्षमस्व !)
-- चिनार

मुक्तकवाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Apr 2017 - 12:04 pm | पैसा

आजचा नारायण आवडला!

एस's picture

8 Apr 2017 - 2:46 pm | एस

:-)

आवडला. अशोक सराफने फार बोलून अतिरंजित केलेला

पुंबा's picture

8 Apr 2017 - 9:48 pm | पुंबा

धमाल आली चिनारभौ.. जियो..

मित्रहो's picture

9 Apr 2017 - 10:14 pm | मित्रहो

मस्त आहे हल्लीचा नारायण. हल्लीचा नारायण हा असतोच कॅटरींगवाल्याकडे असतो. आपल्यातला कुणी नसतो.

पूर्वी कुणाच्या मरणाच्या वेळेला सुद्धा असाच व्यक्ती असायचा. इतर वेळेला शांत वाटनारा हा व्यक्ती तेंव्हा मात्र उत्साहात असायचा आणि त्याला तिरडी कशी बांधायची पासून सरणावर प्रेत कसे ठेवायचे यातले सारे बारकावे माहीत असायचे.

चिनार's picture

10 Apr 2017 - 9:31 am | चिनार

धन्यवाद !!

कौशी's picture

10 Apr 2017 - 8:38 pm | कौशी

आजचा नारायण मस्त साकारला.

Pradeep Phule's picture

12 Apr 2017 - 4:31 pm | Pradeep Phule

खूप छान ..