दोघी ( कथा ) ( काल्पनीक )

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
3 Apr 2017 - 8:30 pm

दोघी ( कथा ) ( काल्पनीक )

चिनु आज खुप खुशीत होती . बरेच दिवसांनंतर ती आपल्या आईबरोबर समुद्र किनारी फिरायला आली होती . संध्याकाळच्या गार हवेत समोरुन येणा-या लाटांचे थेंब अंगावर झेलण्यात दोघींनाही मजा येत होती . समुद्र किनारी फारशी गर्दी नव्हती . त्यामुळे मधेच लहर आली म्हणुन चिनु एखाद्या स्वच्छंद हरणासारखी काठावरच्या वाळुत इकडुन तिकडे धावु लागली . तिच्या मागे पळताना , तिला आवरताना आईची मात्र दमछाक होउ लागली .

"चिनु ...थांब .. किती पळतेस?.. जरा हळु... पडशील कुठे तरी .. " आई काळजीने म्हणाली . तेव्हा कुठे चिनु थांबली . तेवढ्यात तिचे लक्ष समोरच पाण्याखालच्या वाळुत पडलेल्या शंख शिंपल्यांकडे गेले . अधीरतेने ती पाण्यात उड्या मारत पुढे गेली आणी तिने ते शंख शिंपले उचलले . समोरुन जोरदार लाटा येतच होत्या .

"चिनु , पाण्यात जाउ नकोस...बाहेर ये " आई घाबरुन ओरडली . तोपर्यंत चिनु चपळाईने बाहेर आली होती . आपल्याला सापडलेला खजिना आईला दाखवत ती हसत म्हणाली . "काय गं आई ..तु किती घाबरतेस ? " आईने तिला एकदम जवळ घेतले .

दोघी परत किना-यावरुन फिरु लागल्या . लाटांचे पाणी त्यांच्या पायांना स्पर्श करत होते . चिनुला परत आईची गंमत करायची लहर आली . खाली वाकुन लाटांचे पाणी ती आईच्या अंगावर उडवु लागली . या पाण्याच्या अचानक झालेल्या मा-याने आई एकदम गडबडुन गेली .

"काय गं चिनु ... तु मला पार भिजवुन टाकलंस की ? " आई लटक्या रागाने म्हणाली . आता तीही हसत हसत चिनुच्या अंगावर पाणी उडवु लागली . दोघीजणी पाणी उडवण्याच्या खेळात बराच वेळ अगदी रमुन गेल्या . दोघींना वेळेचं भानच राहिलं नाही . अखेर ब-याच वेळानंतर आईला अंधार पडल्याची जाणीव झाली .

"चिनु , अंधार पडला की . आपल्याला चांगलाच उशीर झाला वाटतं . आता आपल्याला घरी गेलं पाहिजे.. नाहितर घरचे रागावतील ." आई परत काळजीने म्हणाली .

थोड्या वेळापुर्वी समुद्र किनारी असलेली तुरळक लोकंही कधीच निघुन गेली होती . अंधार वाढतच चालला होता . आईने चिनुचा हात घट्ट पकडला आणी ती घराच्या दिशेने जाउ लागली . तिच्या डोळ्यांमध्ये आता काळजीबरोबरच भितीची छायाही दिसु लागली . चिनुला अजुन थोडावेळ खेळायचे होते . त्यामुळे ती थोड्या नाईलाजानेच आईबरोबर चालु लागली .

मागच्या अंगणातल्या परसबागेकडुन घराकडे जाणारी एक छोटी पायवाट होती . दोघीही तिथुनच जाउ लागल्या . वाटेतच त्यांना परसबागेत असलेली विहिर लागली .

"आई , मला किनई या विहिरी मधुन कधी कधी आवाज ऐकु येतात . कुणी तरी मला हाक मारतंय , मला बोलावतंय असं वाटत राहतं ." चिनु आईला म्हणाली .

आईच्या डोळ्यांतली भीतीची छाया अजुनच गडद झाली . स्वताला सावरुन ती चिनुला समजुतीच्या सुरात म्हणाली .

"चिनु , पाणवठ्याच्या ठिकाणी असं अवेळी काहि भलतं सलतं बोलु नये बाळा .. नाहीतर पाण्यातल्या आसरा रागावतात . "

आई काय बोलतेय ते चिनुला नीटसं समजलं नाही , पण तरी ती शांत बसली . कारण घर जवळ आलं होतं .

घराचं परसदार उघडुन दोघीही आतमधे शिरल्या . दाराचा उघडताना आणी मिटताना थोडासा आवाज झाला . पण सुदैवाने तो घरातल्या मंडळींना ऐकु गेला नाही . सगळी मंडळी बाहेरच्या दिवाणखान्यात बसुन टि. व्ही. बघण्यात मग्न होती . त्यामुळे या दोघी उशीरा आल्याचे कुणालाच समजले नाही .

आई आणी चिनु दोघीही आतल्या खोलीत गेल्या . आईने चिनुचे पाण्यामुळे भिजलेले कपडे बदलले . मग ती चिनुसाठी एका ताटलीत दुधभात घेउन आली आणी आपल्या हाताने भरवु लागली .

" चिनु , आता झोपायचं बरं कां " आईने नंतर चिनुला आठवण केली . पण चिनु अजुनही मनाने समुद्र किनारी रंगली होती .

"आई ..आज किती मजा आली नां .. आपण परत समुद्रावर फिरायला , खेळायला कधी जायचं ?" चिनुने आईला हसत विचारले .

" हो ..नक्की जाउ .. तु सगळ्यांशी छान वाग .. चांगला अभ्यास कर . मग आपण आजच्यासारखंच फिरायला जाउ ." आईने आश्वासन दिले .

"आई ..तु मला अंगाई म्हण नां ..म्हणजे मला छान झोप लागेल . " चिनुने नवीन हट्ट धरला .

आईला तिचा हट्ट मोडवेना . तिने चिनुचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणी चिनुला थोपटत हलक्या आवाजात ती चिनुची आवडती अंगाई म्हणु लागली . बघता बघता चिनु स्वप्नांच्या राज्यामधे हरवुन गेली . स्वप्नामधेही तिला दिसत होता तो रम्य समुद्र किनारा आणी त्या किनारी खेळणारी छोटुली चिनु आणी तिची आई ....

दुस-या दिवशी सकाळी चिनु आपल्या घरातल्या मंडळींना काल तिने आईबरोबर समुद्र किनारी केलेली धमाल रंगवुन सांगत होती . घरातली मंडळी आ वासुन तिचे बोलणे ऐकत होती . मधेच गोंधळुन सगळीजणं एकमेकांकडे पाहात होती .

भिंतीवर असलेल्या फोटोमधे चिनुची आई मंद स्मित करीत होती .

------------------------- समाप्त ------------ काल्पनीक -------------------------------------------------------

--- हि कथा लिहिताना खालील दोन गाणी डोळ्यासमोर येत होती . या दोन्ही गीतांचा आशय वरील कथेपेक्षा वेगळा आहे . कदाचित हि कथा अप्रत्यक्षरीत्या या गाण्यांवरुनच सुचली असावी . म्हणुन त्यांचा उल्लेख करीत आहे .

https://www.youtube.com/watch?v=dPdJbc2K1jU , https://www.youtube.com/watch?v=LwyjdoNSN_o

कथालेख

प्रतिक्रिया

रुपी's picture

11 Apr 2017 - 2:07 am | रुपी

छान कथा!

पद्मावति's picture

11 Apr 2017 - 3:26 am | पद्मावति

फारच मस्तं!

आपल्याला कथा आवडल्याचे कळवल्याबद्दल खुप आभार .

पैसा's picture

12 Apr 2017 - 4:19 pm | पैसा

कथा आवडली