होळीच्या निमित्ताने

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
12 Mar 2017 - 7:47 pm

आपण आजवर अनेक कथा एकल्या आणि वाचल्या आहेत होळी सणासंदर्भात! त्यातली सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहित असणारी कथा म्हणजे  दुष्ट हिरण्यकष्यपू राजाची! हिरण्यकश्यपू राजाने आपला मुलगा प्रल्लाद श्रीविष्णूचा भक्त आहे हे समजल्यानंतर त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे अग्नीमध्ये न जळण्याचा वर मिळालेल्या होलिकेला त्याने प्रल्लादकडे पाठवले. होलीकेने प्रल्लादाला आपल्या मांडीत बसवले आणि चारही बाजुने अग्नी प्रज्वलित करून घेतला. प्रल्लादाने डोळे मिटून श्रीविष्णूची प्रार्थना करायला सुरात केली आणि आपल्या भक्ताची हाक एकून श्रीविष्णूने होलिकेचे दहन केले. प्रल्लाद अग्नीतून सुखरूप बाहेर आला तो दिवस पौर्णिमेचा होता. त्या दिवसाला आता होळी पौर्णिमा म्हणतात आणि आपण दुष्ट प्रवृतीचे दहन करण्यासाठी प्रतीकात्मक होळी पेटवतो.

दुसरी एक कथा अशी देखील प्रचलित आहे की पार्वतीला शिवाला प्राप्त करून घ्यायची इच्छा होती. परंतु शिव तपश्चर्येला बसले होते. त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवाने त्यांच्यावर मदनबाण सोडला. तपश्चर्या भंग झाल्याने शिव चिडले आणि त्यांनी त्यांचा तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले. परंतु शांत झाल्यावर त्यांची नजर पार्वतीवर पडली आणि ते तिच्यावर मोहित झाले आणि शिव-पार्वतीचा विवाह झाला. या कथेवरून वासनात्मक आकर्षणाचे दहन करण्यासाठी होळी पौर्णिमेला प्रतीकात्मक होळी पेटवली जाते.

अजून एका कथे अंतर्गत कंसाला जेव्हा समजले की त्याचा वध करु शकणारा कृष्ण गोकुळात सुखरूप वाढतो आहे त्यावेळी त्याने पुतना या राक्षसीला कृष्णाच्या वधासाठी पाठवले. त्यावेळी तिने स्तनपानातून कृष्णावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. परंतु कृष्णाने तिचा वध केला. पुतना वधाचा म्हणजेच पर्यायाने वाईट कृत्याचा नाश म्हणून होळी दहन होते... अशी ही एक पुराण कथा आहे. 

अजून एका पौराणिक कथेत सांगितले आहे की ढुंढी नावाची एक राक्षसी होती. तिला मनुष्य वा देवांपासून मृत्यू येणार नाही किंवा कोणत्याही ऋतूमध्ये मृत्यू येणार नाही; असा वर ब्रम्हदेवाने दिला होता. या वराचा दुरूपयोग करून ती रघु नावाचा राजा राज्य करत असताना लहान मुले, माणसे यांना त्रास देऊ लागली. या राक्षसीणीची पिडा निवारणार्थ एका पुरोहिताने उपाय सुचविला की फाल्गुनी पोर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर लाकडांचा ढीग रचून तो पेटवावा. त्या अग्निच्या भोवती लहान मुलांनी फेऱ्या मारून नाचावे, गाणी गावीत, टाळ्या वाजवाव्यात, बराच गलका करावा. संध्याकाळ म्हणजे ना दिवस ना रात्र. फाल्गुन महिना म्हणजे ना खूप थंडी ना कडक उन्हाळा. लहान मुले असल्याने देव किंवा मानव नाही... अशा प्रकारे तिला मिळालेल्या वराचे खंडन होऊ शकते. त्याशिवाय अशा प्रकारे तयार झालेल्या ध्वनीनिर्मिती व अग्नी होमाने ती राक्षसी मरेल. हा उपाय रघु राजाने केला व ती राक्षसी मरण पावली. तोदिवस "अडाडा" आणि "होलिका" या नावाने प्रसिद्ध झाला.

आपण यातली कोणतीही कथा विचारात घेतली तरी त्यातून एकच विचार पुढे येतो की सत्याचा असत्यावर विजय होतो.... चांगल्या प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय होतो... किंवा सदाचाराचा दुराचारावर विजय होतो. अर्थात आपण त्यातील अतिरंजीतता दूर केली तर एक महत्वाची बाब आपल्या लक्षात येईल की असत्य किंवा दुराचार किंवा वाईट विचार-वाईट प्रवृत्ती यांचे दहन जादूने किंवा आपोआप होत नाही. प्रत्येक कथे मध्ये 'देव' नामक एक घटक आहे जो अशा वाईट गोष्टी दूर करतो. जर आपण पूराण कथा खऱ्या मानायच्या ठरवलच तर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की त्याकाळासाठी ज्यांनी दुराचार, असत्य किंवा वाईट विचार याविरुद्ध बंड केले ते त्याकाळातील लोकांसाठी कोणी देव नव्हते. तर स्वच्छ मनाचे आणि प्रमाणिक आचार असलेले त्यांच्यासारखेच त्यांच्यातलेच कोणी व्यक्ति होते.

यातून एक सिद्ध होते की आपण जे विचार करतो किंवा जे आचरण करतो त्याच कालांतराने रूढी बनतात आणि कदाचित् शेकडो-लाखो वर्षानंतर त्याच परंपरा म्हणून सर्वमान्य होतात. म्हणून जुन्या रूढी, परंपराच अंतिम सत्य न मानता त्यात कालानुरूप बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी देव नामक कोणीतरी अवतार घेण्याची वाट न बघता आपल्यातल्या वाईटाचा नाश आपणच केला पाहिजे; म्हणजे आपोआपच चांगुलपणा हाच एक विचार तयार होईल पुढे हीच रूढी बनेल आणि कालांतराने तीच परंपरा असेल. 

होळीच्या निमित्ताने एक विचार मांडायचा प्रयत्न केला आहे... एवढच!

मांडणीविचार

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

12 Mar 2017 - 8:54 pm | जव्हेरगंज

रोचक!

ज्योति अळवणी's picture

12 Mar 2017 - 11:39 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

स्वीट टॉकर's picture

14 Mar 2017 - 1:26 pm | स्वीट टॉकर

"त्यासाठी देव नामक कोणीतरी अवतार घेण्याची वाट न बघता आपल्यातल्या वाईटाचा नाश आपणच केला पाहिजे" ज्योतीताई, खरी गोम तर इथेच आहे.

आपल्यातल्या वाईटाचा नाश करणं हीच तर खरी देवपूजा आहे. पण ते अतिशय अवघड आहे त्यामुळे बहुतांशी लोक तिकडे फिरकतंच नाहीत. मात्र देवपूजेचा आव तर आणायचा असतो. त्यामुळे उपासतापास, व्रतवैकल्य वगैरेंवर भर देणं जरूरीचं होतं.

किसन शिंदे's picture

14 Mar 2017 - 2:18 pm | किसन शिंदे

प्रल्हाद ना?

ज्योति अळवणी's picture

14 Mar 2017 - 6:35 pm | ज्योति अळवणी

अगदी खरं स्वीट टॉकर. आपल्यातला चांगुलपणा जागवण महत्वाच. आपल्याला ते माहीतही असत. पण तरीही ते असं समोरून कोणीतरी सांगितलं की कदाचित आपण त्याचा थोडा जास्त सिरियसली विचार करू असे नाही का वाटत.... निदान मला तरी असं वाटत.

नमकिन's picture

18 Mar 2017 - 9:11 am | नमकिन

इथे प्रत्येकाला मीच बरोबर ही प्रबळ भावना असल्याने दुस-याच्या चुका काढत लोक फिरत असतात व स्वतः कसे नेहमी बरोबर असतो या अवस्थेत वावरतात, त्यामुळे पुढे जाणे महामुष्किल.
खरं/खोटं, चूक/बरोबर, योग्य /अयोग्य, नैतिक /अनैतिक या भानगडीत पडणार नाहीं. स्वयं चिकित्सा करत स्वसंस्कार करत रहाने इष्ट.