स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Mar 2017 - 12:16 pm

या लेख शिर्षकात प्रयूक्त पारिभाषिक संज्ञा : स्त्री म्हणजे woman, निवडस्वातंत्र्य म्हणजे right to make ... choices, भारतीय राज्यघटना म्हणजे Constitution of India, अनुच्छेद २१ म्हणजे article 21. इथे प्रत्येक शब्द एवढ्या साठी दिला की कायदे विषयक वाचन करताना प्रत्येक शब्द सुटा आणि एकत्र वाचण्याची सवय असलेले चांगले. आणि दुसरे ज्या शब्दाच्या अर्था बाबत द्विधा स्थिती असते तेथे मूळ इंग्रजी शब्द बघावयाचा -आणि न्यायालय त्याचा काय अर्थ काढते ते पहावयाचे - असते हे माहित रहावे म्हणूनही.

स्वातंत्र्य या शब्दासोबत मला न टळता आठवणारे न. कुरुंदकरांचे वाक्य म्हणजे 'स्वातंत्र्य हे संस्कृती सिद्ध असते', स्वातंत्र्य उपलब्ध राहण्यासाठी व्यक्तिला स्वतःलाही प्रयत्न करावे लागतात तसे कुटूंब, समाज, कायदे आणि शासनाचीसुद्धा साथ लागते आणि या सर्वांवर न्यायालयाचा अंकुषही हवाच. स्वातंत्रोत्तर भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला जशी काही कर्तव्ये सांगते तशीच काही मुलभूत अधिकार बहाल करते. यात अनुच्छेद १९ नुसार अभिव्यक्ती, शांतीपूर्ण संघटन, व्यवसाय, भारतात कुठेही जाण्याचा अधिकार इत्यादी सर्वसाधारणपणे आपण सर्वजण जाणतोच. भारतीय राज्य घटनेत असाच एक वरकरणी साधासुधा दिसणारा अनुच्छेद आहे तो म्हणजे अनुच्छेद २१.

हा अनुच्छेद साधासुधा का म्हणावयाचे तर हा अनुच्छेद व्यक्तिच्या कायद्याने स्विकारलेल्या अपवादा व्यतरीक्त जिवीत्वाच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणाची हमी देतो, एकदा अधिकार देणार म्हणले कि एवढी हमी सहाजिक आहे हे सर्वसाधारणपणे गृहीत धरले जाणार आणि मग या अनुच्छेदात एवढे विशेष काय असे वाटणार. पण यातील 'जिवीत्वाचा अधिकार' (राईट टू लाईफ) मधील जिवीत्व या शब्दाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षात अत्यंत व्यापक करत नेली आहे आणि ती आता अनेक गोष्टींना स्पर्ष करते -हे अनेक गोष्टींना स्पर्ष करणे एवढे वाढवले आहे की यातीलच काही गोष्टी परस्परांना च्छेद देऊ शकतात मग त्याबद्दल भविष्यात न्यायपालिका काय म्हणते त्याकडे डोळे लावून बसावे असो. (याच अनुच्छेदाच्या प्रतिष्ठा वि. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या वेगळ्या बाबीसाठी आधीचा मिपा लेख). या लेखाची व्याप्ती मुख्यत्वे करुन महिलांबद्दल असल्यामुळे आपण तिकडे वळूयात.

या अनुच्छेदाची जी व्याप्ती वाढली त्यात १९९४च्या राजगोपाल वि. तामिळनाडू राज्य(सरकार) केसमधील निकाल देताना, मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद २१ च्या अनुमानावरून मान्यकारत स्थुल मार्गदर्शक तत्वे घालून देताना खाजगीपणाचा अधिकार केस बाय केस न्यायालयीन निर्णयांच्या स्वरूपात उत्क्रांत होत जाण्याची शक्यता परिच्छेद २७ मध्ये व्यक्त केली तर परिच्छेद २६ उपपरिच्छेद १ मध्ये "....A citizen has a right to safeguard the privacy of his own, his family, marriage, procreation, motherhood, child-bearing and education among other matters...." हे मार्गदर्शक तत्व आणि खाजगीपणाच्या अधिकाराच्या सर्वसाधारण मर्यादांकडेही निर्देश केला होता. यातील प्रायव्हसी मुलभूत अधिकारात मोडते का आणि असेल तर नेमकी व्याप्ती काय आहे याचे एक्सप्लनेशन अशात केंद्र सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे मागीतल्याची बातमी होती, त्याचे पुढे काय झाले ते अद्याप ऐकिवात नाही असो.)

उपरोल्लेखीत अधिकार प्रायव्हसी बाबत झाला. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा २८ ऑगस्ट, २००९ मधील निकालाने व्याप्ती वाढवत reproductive choices बाबत स्त्रीयांना केवळ निवड स्वातंत्र्यच बहाल केले नाही तर तो परिच्छेदाने स्त्रीयांच्या निवडस्वातंत्र्याची कोणकोणते दरवाजे खुले केले ते पहाणे जसे रोचक आहे तसेच २८ ऑगस्ट, २००९ चा निकाल आणि आत्ता अगदी अलिकडे म्हणजे १६ जानेवारी १९१७ला 'मीरा संतोष पाल' खटल्यात २८ ऑगस्ट, २००९ च्या खटल्यातील परिच्छेद माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधोरेखीत केला आहे. तो परिच्छेद खाली उधृत करतोच, पण ज्यांना पुरेसा वेळ असेल तर अगदी हा धागा मधात सोडून दोन्हीही निकाल मूळातून वाचावेत (एखादी कादंबरी वाचावे तसे वाचन सोपे असावे विषय मात्र गंभीर आणि एका अर्थाने मानवी जिवीत्वा बद्दल परस्पर विरोधी निकाल देताना कायदा मानवीय जिवनाचे मुल्य आणि व्यक्तिंचे जिवीत्वाच्या अधिकाराचा समतोल आणि स्त्रीयांच्या निवडीच्या स्वातंत्र्याच्या भाष्यापर्यंत माननीय न्यायालय कसे पोहोचते ते पहाणे खरेच शब्दात वर्णन नकरता येणारे आहे कारण मला तरी दोन्हीही निकाल अत्यंत स्पृहणीय वाटले.)

Suchita Srivastava & Anr vs Chandigarh Administration on 28 August, 2009 या पहिल्या निकालात एका मानसिक आजारी निराधार स्त्रीवर स्त्री आधार केंद्रात लैंगिक शोषण होते, अपराधी मिळत नाही, मानसिक आजारी स्त्री आपला लैंगिक शोषणाचा अनुभव चांगला नसल्याचे नोंदवतानाच पोटातील बाळ हवे आहे असे म्हणते, पण ती स्वतः ते बाळ सांभाळू शकेल का आणि त्या बाळाला कोणत्या सामाजिक स्थितीतून जावे लागेल हे माहित नाही त्यावर उच्च न्यायालय कंपलसरी गर्भपात मान्य करते मात्र सर्वोच्च न्यायालय तो निर्णय बाजूला ठेवत निराधार स्त्रीसाठी सरकार पालक आहे असे सांगून त्या मानसिक आजारी स्त्रीचे निवड स्वातंत्र्य सर्वोपरी आहे आणि त्या संबंधाने सर्व व्यवस्था उपलब्ध करण्याचे सरकारला फर्मावले जाते. तर Meera Santosh Pal And Ors vs Union Of India And Ors on 16 January, 2017 या निकालातील परिस्थिती एकदम वेगळी आहे. गर्भाशयातील मुलाच्या वाढी संबंधाने समस्या आहेत, आईच्या जिवीत्वाला खतरा आहे कायद्या खाली नेमुन दिलेल्या आठवड्यांपलिकडे जाऊनही स्त्रीच्या गर्भपात करून घेण्याच्या इच्छेस सर्वोच्च न्यायालय आरोग्य विषयक खात्री करुन मान्यता देते. वर म्हटल्या प्रमाणे निकाल एका परिच्छेदात सांगता येतील पण त्या निर्णयांना येण्याची न्यायालयीन विचार प्रक्रीया कशी होते हे पहाण्यासाठी ते निकाल निस्चितच वाचावेत असे आहे.

आता तो परिच्छेद :

.....There is no doubt that a woman’s right to make reproductive choices is also a dimension of “personal liberty” as understood under Article 21 of the Constitution of India. It is important to recognise that reproductive choices can be exercised to procreate as well as to abstain from procreating. The crucial consideration is that a woman’s right to privacy, dignity and bodily integrity should be respected. This means that there should be no restriction whatsoever on the exercise of reproductive choices such as a woman’s right to refuse participation in sexual activity or alternatively the insistence on use of contraceptive methods. Furthermore, women are also free to choose birth control methods such as undergoing sterilisation procedures. Taken to their logical conclusion, reproductive rights include a woman’s entitlement to carry a pregnancy to its full term, to give birth and to subsequently raise children.....”

संदर्भ

मी वर म्हटल्या प्रमाणे प्रत्येक शब्द, वाक्प्रचार सुटा आणि मग एकत्रित वाचून पहाणे उपयूक्त ठरावे. आणि एकुण इंपॅक्ट लक्षात येण्यासाठी दोनदा ते तिनदा तरी नक्कीच वाचावा असे सुचवावेसे वाटते.

स्त्रीवादी चळवळ अधून मधून भारतीय न्यायपालिका त्यांच्या अपेक्षेला अजून पुरेशी उतरलेली नाही अशी टिका करतात किंवा जुने उगाळतात पण शहाबानो, ट्रिपल तलाक ते मंदिर प्रवेशाच्या संदर्भाने येऊ घातलेले निकाल ते हे दोन निकाल पाहीले तर भारतीय न्यायपालिके बाबतचे मत बदलण्यास निश्चित मदत होऊ शकेल असे वाटते. असो.

उपरोक्त परिच्छेद आणि

"....A citizen has a right to safeguard the privacy of his own, his family, marriage, procreation, motherhood, child-bearing and education among other matters...."

या परिच्छेद/वाक्यांच्या मराठी अनुवादात मराठी विकिपीडियात वापरण्याच्या दृष्टीने साहाय्य हवे आहे. मराठी विकिपीडियावरील भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ लेखात उपरोक्त केसेसची माहिती अद्याप भरलेली / लिहिलेली नाही कुणि उपरोक्त केसेस वाचून मराठी विकिपीडियावरील लेख अद्ययावत करण्यात सहभागी होऊ शकेल तर उत्तमच.

* या लेखातील उपयूक्त प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पातून वापरले जाऊ शकतील या म्हणून या धाग्यास आलेले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

* उत्तरदायकत्वास नकार लागू

संस्कृतीआरोग्यमाहिती

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

9 Mar 2017 - 1:13 pm | गामा पैलवान

माहितगार,

यावर कसली चर्चा अपेक्षित आहे ते नीटसं उमगलं नाही. इंग्रजी परिच्छेदांचे भाषांतर/अनुवाद करण्यासाठी सहाय्य हवं आहे का?

तुमच्या कार्यास लाख लाख अभिवादने!

आ.न.,
-गा.पै.

इंग्रजी परिच्छेदांचे भाषांतर/अनुवाद करण्यासाठी सहाय्य हवं आहे हे खरेच अहे- माझा वेळ वाचतो. तो अनुवाद तसा मोठा नाही मीही करु शकलो असतो, पण या निमीत्ताने इतरांनाही विषयाचा जवळून परिचय करुन घेण्याची संधी मिळते असे वाटते.

जनातलं मनातलं म्हणजे लेख सदर आहे, चर्चा केलीच पाहीजे असे काही नाही न्यायालयीन निकालांचे दुव्यांचा परिचय करवणे हा ह्या धाग्याचा मुख्य उद्देश . अर्थात चर्चेसाठी यात विषय शोधायचे असतील तर बरेच आहेत. कायदा अथवा निकालाचे परिच्छेद खरेतर चार-पाचदा पण किमान दोन - तीनदा वाचल्या शिवाय त्यातील बारकावे कळत नाहीत.

तुम्ही चर्चेचा विषय काढलाच आहे तर माझ्या मता प्रमाणे प्रथम दर्शनीतरी, परिच्छेदातील स्त्रीचे निर्णय स्वातंत्र्य दिपीका पदुकोण च्या जाहीरातीतल्या प्रमाणे पुर्ण नसले तरी 'मेरी मर्जी'च्या बरेच जवळ जाते. हे लक्षात घ्या की व्याप्ती वाढताना केवळ अविवाहीतेचाही नाहीतर मानसिक दृष्ट्या अपंग स्त्रीचाही मातृत्वाचा अधिकार मान्य केला गेल्याचे निकालांमधून दिसतेच आणि अशा प्रसंगी स्त्रीला पालक नसतील तर सरकार पालनकर्ता आहे.

कुटुंब नियोजन विषयक धोरणॅ बनवताना राज्य आणि केंद्र सरकारला हे निर्णय लक्षात घ्यावे लागणार आहेत.

तिसरे; विवाहीत स्त्रीलासुद्धा मुल हवे आही की नको; तसेच लैंगिक संबंध नाकारण्याचा अधिकार अधोरेखीत होतोच आहे. शिवाय
बर्थ कंट्रोल मेथड नाकारावयाचाही अधिकार मिळतो आहे. आता यात तिच्या जोडीदाराचे मत वेगळे असेल जसे की जोडीदाराला (नवर्‍यास) मुल नको आहे बर्थ कंट्रोल मेथड वापरावयाची आहे तर त्याच्या अधिकारांचे काय ? या विषयातील मतभिन्नतेसाठी त्याला कदाचित घटस्फोट मागावे लागतील का आणि मग घटस्फोटांचे प्रमाण वाढू शकेल का ? हे दुसर्‍या बाजूचे भिविष्यातील मुद्दे झाले.

पण स्त्रीयांच्या दृष्टीने वरचा पॅरेग्राफ भारतीय समाजात सध्या उपलब्ध निवड स्वातंत्र्या पेक्षा अधिक निवडस्वातंत्र्याची ग्वाही देत आहे हे निश्चितपणे वाटते अर्थात मी लेखाच्याच सुरवातीस म्हटले आहे स्वातंत्र्य हे संस्कृतीसिद्ध असते, स्वातंत्र्याचा निर्वेध लाभ होण्यासाठी कुटुंब समाज सरकार न्यायालये या सर्वांची साथ लागतेच.

माहितगार's picture

9 Mar 2017 - 1:53 pm | माहितगार

वरचा परिच्छेद वाचताना केवळ बहुसंख्यकच स्त्री डोळ्यापुढे ठेऊ नका, अल्पसंख्यांक स्त्रीयांच्याही अधिकाराच्या व्याप्तीत एकसारखी वाढ आहे आणि त्यांच्या बाबतीतील कायद्यांना वेगळ्या भुमिकेतून पहाण्याची संधी न्यायालयांना हा परिच्छेद देतो (असे माझे मत).

माहितगार's picture

10 Mar 2017 - 3:20 pm | माहितगार

काल का परवा संसदेने पगारी मॅटर्निटी रजा कालावधी १२ आठव्ड्यावरुन २६ आठवडे केला म्हणजे जवळपास ३ महिन्यावरुन ६ महिन्यावर आणला आहे.

न्यायालयाचा वरचा निर्णय प्रायव्हसीचा आणि निवडीचा अधिकारही देते, मग स्त्री कर्मचार्‍यास नव्यानेच जॉब दिला जाताना -किंवा समजा एखाद्या नटीला काम दिले जाते आहे- एम्ल्पॉयमेंट अ‍ॅग्रीमेट मध्ये प्रेग्नंसी डिस्क्लोजर किंवा नॉन प्रेग्नंसी क्लॉज एम्प्लॉयरला कितपत ठेवता येऊ शकेल ? कारण रजेचा कालावधी ६ महिन्यांपर्यंत गेला आहे. म्हणजे अगदी एम्प्लॉयमेंट घेताना डिसक्लोज नाही केले नौकरी हातात घेतली आणि लगेच ६ महिने गायब हेही एम्प्लॉयरला त्रासदायक होऊ शकते का ?

एमी's picture

5 Jul 2017 - 9:23 am | एमी

अजून एक बातमी
http://indianexpress.com/article/india/supreme-court-allows-abortion-of-...

खरंतर यासाठी कोर्टात जावे लागावे हेच चुकीचे आहे. सरकारने आणि समाजाने या असल्या निर्णयात काहीही लुडबुड करू नये. आई आणि डॉक्टर यांच्यावर तो निर्णय सोडून द्यावा.

गामा पैलवान's picture

5 Jul 2017 - 11:39 am | गामा पैलवान

अॅमी,

सरसकट भ्रूणहत्या होऊ नयेत म्हणून न्यायालयाने घातलेली मर्यादा मलातरी उचित वाटते. प्रस्तुत बाब अत्यंत दुर्मिळ आहे असं वाटतंय. त्यामुळे २४ आठवड्यांच्या पलीकडल्या गर्भपातास न्यायालयाची अनुमती घ्यायला हवीये.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

5 Jul 2017 - 12:30 pm | माहितगार

तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी मिपाचर्चेत भारतीय खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वकीलांचा भरणा असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणले आहे. कायदेच अधिक व्यवस्थीत असतील आणि लोक पाळत असतील तर न्याययंत्रणा आणि लोकांवरचा ताण कमी राहील. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही.

लेटेस्ट बातमी आणि निकाल वाचले नाहीत पण समतोल साधत अधिक लवचिकतेच्या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सध्याच्या कायद्यात किरकोळ बदल करण्याचे सुचवले असल्याचे आठवते. अर्थात कायदे विषयक सुधारणा प्रत्यक्षात कायदे मंडळ आणि शासनाची जबाबदारी आहे. कायदेच अधिक लॉजीकल असतील तर न्याय यंत्रणेवरचा ताण आणि नागरीकांवरचाही आपसूकच कमी होण्यास मदत होते. पण प्रत्यक्षात कायदे मंडळातील प्रतिनिधी लोकभावनेवर अवलंबीत्व केला खोलात जाऊन कायदे आणि परीणाम अभ्यासतील 'लॉजीक' व्यवस्थीत लावतील याची गॅरंटी नसते. सहसा वरीष्ठ सभागृहाने कायदे अधिक न्याहाळून बारकावे तपासून सुधारणा सुचवव्यात अशी अपेक्षा असते. पण राज्यसभा खासदारसुद्धा कायद्यांच्या मसुद्यांवर लक्ष केंड्रीत करण्या पेक्षा, लोकसभा खासदारांच्या मागोमाग अधिकतम वेळ राजकीय कुरघोडीवर खर्च करताना दिसतात. असो.

खरंतर यासाठी कोर्टात जावे लागावे हेच चुकीचे आहे. सरकारने आणि समाजाने या असल्या निर्णयात काहीही लुडबुड करू नये. आई आणि डॉक्टर यांच्यावर तो निर्णय सोडून द्यावा.

असहमत. सरकार आणि कोर्ट The Medical Termination Of Pregnancy Act, 1971 नुसार निकाल देत आहे आणि "स्पेशल केस" म्हणून. २० आठवड्यानंतर गर्भपात केला तर जिवाला धोका आणि/किंवा भ्रूणहत्या होतील म्हणून कदाचित असा कायदा केला असेल. जर कुणाला Medical Termination Of Pregnancy Act, 1971 पटत नसेल, तर नियमानुसार कायदा बदलून घ्यावा.

उदय's picture

13 Jul 2017 - 12:51 pm | उदय

Meera Santosh Pal And Ors vs Union Of India And Ors on 16 January, 2017 या केसमध्ये खरा मुद्दा आहे seeking directions to the respondents to allow her to undergo medical termination of her pregnancy. माझ्या मते, वरील केसमध्ये अनुच्छेद २१ चा संबंध बळंबळं आणला आहे, खरा मुद्दा Medical Termination of Pregnancy Act, 1971 आहे.

या केसमध्ये कोर्टात जायची वेळ आली कारण "The MTP Act, 1971" नुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. जर एखाद्या डॉक्टरने तसा प्रयत्न केला तर कदाचित त्याच्यावर खटला होईल, कदाचित शिक्षा पण होईल किंवा मेडिकल लायसेन्स पण रद्द होईल, अशी परिस्थिती असताना २० आठवड्यानंतर कुणी डॉक्टर तयार पण होणार नाही. त्यामुळेच कोर्टात जावे लागले, असे सत़्कृतदर्शनी दिसत आहे.

मूळ निकाल हा आहे:
The crucial consideration in the present case is whether the right to bodily integrity calls for a permission to allow her to terminate her pregnancy. The report of the Medical Board clearly warrants the inference that the continuance of the pregnancy involves the risk to the life of the pregnant woman and a possible grave injury to her physical or mental health as required by Section 3 (2)(i) of the Medical Termination of Pregnancy Act, 1971. Though, the pregnancy is into the 24th week, having regard to the danger to the life and the certain inability of the fetus to survive extra uterine life, we consider it appropriate to permit the petitioner to terminate the pregnancy. The overriding consideration is that she has a right to take all such steps as necessary to preserve her own life against the avoidable danger to it.

to preserve her own life => हे अनुच्छेद २१ नुसार आहे.

थर्ड ट्रायमिस्टर मध्ये डॉक्टर गर्भपात करत नाहीत कारण ते जिवाला धोकादायक असते, म्हणून बहुधा बंदीचा नियम करण्यात आला आहे. माझ्या मते डॉक्टर जास्त सविस्तर सांगू शकतील.

माहितगार's picture

13 Jul 2017 - 6:55 pm | माहितगार

आम्ही डॉ. सुबोध खरे साहेबांचे खरडीने लक्ष वेधून, चर्चेचे सादर निमंत्रण दिले आहे. चर्चा सहभागासाठी सर्वांचे आभार

सुबोध खरे's picture

13 Jul 2017 - 7:30 pm | सुबोध खरे

१९७१ चा गर्भपाताचा कायदा आला त्यावेळेस सोनोग्राफी सारखी आधुनिक निदान तंत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे गर्भाचे वय अचूक पणे सांगणे शक्य नव्हते. त्यात असंख्य स्त्रियांची पाळी अनियमित असते बऱ्याच स्त्रियांना आपली पाळी नक्की केंव्हा आली ते सांगता येत नसे. अनेक कुमारी माता आपले दिवस गेले हे लपवत असत ( आजही लपवतात). जोवर पोट दिसू लागते तोवर बरीच वेळेस उशीर झालेला असतो.
गर्भाचे वय साधारण २७ ते २८ आठवड्यांचे असते तेंव्हा त्याची फुप्फुसे प्रगल्भ होतात आणि गर्भ श्वास घेऊ शकतो म्हणजेच जन्माला आलेले मूल स्वतःच्या बळावर जिवंत राहू शकते.(viable)
पूर्वी कुमारी माता आणि मतिमंद किंवा बलात्कारित स्त्रिया यांचा बेकायदेशीर गर्भपात केल्यावर अशी परिस्थिती उद्भवत असे कि मुलगी पाच किंवा सहा महिने गरोदर आहे सांगते म्हणून गर्भपात केला तर जन्माला आलेले मूल हे स्वतः श्वासोच्छवास करून जगात जिवंत राहत असे मग अशा मुलाला प्रत्यक्ष इतर उपायाने मारणे आवश्यक होते. हा प्रत्यक्ष खून/ हत्याच आहे. अशी परिस्थिती कायदेशीर गर्भपात केल्यावर उद्भवू नये म्हणून एक सुरक्षित कालावधी म्हणून कायद्यात २० आठवड्याची मुदत दिलेली होती(असावी)
वरील दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केल्यावर गर्भपाताची २० आठ्वड्यापर्यंत ठेवलेली मुदत हा त्यावेळेस केलेल्या कायद्याप्रमाणे (१९७१) बरोबर होती असे वाटते. आता (४६ वर्षानंतर) सोनोग्राफीमुळे मुलाचे अचूक वय १ आठवड्याच्या फरकाने सांगता येते. शिवाय इतर अनेक रक्ताच्या चाचण्या उपलब्ध आहेत ज्यामुळे गर्भाची फुप्फुसे प्रगल्भ(lung maturity) झाली आहेत काय हे ठरवता येते. या मुळे गर्भपात केलेला गर्भ स्वतः हून जिवंत राहू शकेल काय हे सांगणे आता सहज शक्य आहे.
दुर्दैवाने २० आठवड्यापर्यंत गर्भाचे सर्वच अवयव पूर्णतः विकास पावत नाहीत त्यामुळे काही जन्मजात व्यंगे ही त्यांनतर निर्माण होतात किंवा वाढत जातात शिवाय मुलामध्ये निर्माण होणारी सर्वच्यासर्व जन्मजात व्यंगे किंवा आजार हे २० आठवड्यापर्यंत खात्रीशीररित्या निदान करता येतेच असे नाही. कारण तोवर एकतर गर्भाची वाढ आणि विकास पूर्ण झालेला नसतो आणि गर्भाचा आकार लहान असल्यामुळे. (साधारण २० आठवड्याला गर्भाची लांबी ५ ते ६ इंच असते) काही व्यंगे दिसत नाहीत
यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ आता गर्भपात २४ आठवड्यपर्यंत कायदेशीर करा असे आग्रहाने सांगत आहेत. कारण या कालावधीपर्यंत निर्माण झालेली किंवा निदान करण्यायोग्य जन्मजात व्यंगें तरी टाळता येतील. याच्या पेक्षाजास्त पुढे गर्भपात केल्यास मूल स्वतःहुन जिवंत राहण्याची शक्यता वाढत जाते आणि अशा मुलाचा जीव घेणे म्हणजे हत्या होईल म्हणून २४ आठवडे हि मर्यादा ठेवली आहे. या कालावधी नंतरहि गर्भामध्ये अनेक व्यंगे निर्माण होतात परंतु तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असल्यामुळे त्याची हत्या करण्याची परवानगी देण्याची शक्यता कायद्यात बसणारी नाही.
जाता जाता-- गर्भाचे लिंग हे सोनोग्राफीमध्ये १४-१५ आठवड्यालाच समजू शकते त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये म्हणून कायद्याची मर्यादा २० आठवड्यापर्यंत ठेवली यात तथ्य नाही असे वाटते. मुळात १९७१ साली हा कायदा केला तेंव्हा सोनोग्राफी अस्तित्वातच नव्हती

प्रतिसाद दिल्याबद्दल अतिशय आभार डॉक _/\_

मला महत्वाचे वाटलेले मुद्दे + काही शंका:

१९७१ चा गर्भपात कायदा अस्तित्वात आला तेव्हा
• गर्भाचे वय अचूकपणे सांगणे शक्य नव्हते
• गर्भाचे लिंग अचूकपणे सांगणे शक्य नव्हते

===
आता जी सोनोग्राफी मशीन आहेत त्याचा वापर करून
• गर्भाचे वय नक्की कळते
• गर्भाचे लिंग हे १४-१५ आठवड्यालाच समजू शकते.
• त्यामुळे सध्याच्या २० आठवडे मुदतीचा स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये म्हणून का-ही-ही उपयोग नाही!

===
गर्भाचे वय साधारण २७ ते २८ आठवड्यांचे असते तेंव्हा त्याची फुप्फुसे प्रगल्भ होतात आणि गर्भ श्वास घेऊ शकतो म्हणजेच जन्माला आलेले मूल स्वतःच्या बळावर जिवंत राहू शकते.(viable) >> हे बोल्ड इटालीक्स अंडरलाइन वगैरे करायला हवे. काही अतिशहाणें २० आठवड्याचा गर्भ viable असतो सांगत फिरतात!

बादवे मी मआंजावरच वाचल्यासारखं वाटतंय की फुफ्फुसे प्रगल्भ सगळ्यात शेवटी ie 34-36 आठवड्यात होतात. त्यामुळे त्याआधी जन्मलेल्या बाळांना पेटीत ठेवावे लागते. माझी मेमरी मला धोका देतेय का??

===
काही जन्मजात व्यंगे ही २० आठवड्यानंतर निर्माण होतात किंवा वाढत जातात.

त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ आता गर्भपात २४ आठवड्यपर्यंत कायदेशीर करा असे आग्रहाने सांगत आहेत.

२४ आठवडयानंतरही गर्भामध्ये अनेक व्यंगे निर्माण होतात परंतु तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असल्यामुळे त्याची हत्या करण्याची परवानगी देण्याची शक्यता कायद्यात बसणारी नाही. >> काही विकसीत देशात गर्भपाताचे लिमिट 26 ते 28 आठवडे आहे ते कसे काय? भारतातील डॉक्टर 24 या आकड्यापाशी कसे पोचले? Viable तर 27-28 आठवड्यानंतर होतो ना?

सुबोध खरे's picture

14 Jul 2017 - 9:57 am | सुबोध खरे

भारतातील डॉक्टर 24 या आकड्यापाशी कसे पोचले? Viable तर 27-28 आठवड्यानंतर होतो ना?
बऱ्याच वेळेस स्त्रियांची पाळी फारच पुढे मागे असते. त्यामुळे पाळी चुकल्यास मोजलेले आठवडे बरोबर असतीलच असे नाही. दुसरी गोष्ट सोनोग्राफी मध्ये येणारे आठवडे हे गर्भाच्या वाढीप्रमाणे असल्याने सरासरी काढून ठरवले जातात. यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते यात पाच फुटाच्या आदिवासी स्त्रीचा गर्भ जरी २५-२६ आठवड्याचा ठरवला तरी तो प्रत्यक्ष २८ आठवड्याचा असू शकतो. त्यामुळे या परिस्थितीत गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? या स्तव हि ४ आठवड्याचा सुरक्षा कालावधी ( margin of safety) ठेवलेला आहे.

सुबोध खरे's picture

14 Jul 2017 - 10:09 am | सुबोध खरे

फुफ्फुसे प्रगल्भ सगळ्यात शेवटी ie 34-36 आठवड्यात होतात. त्यामुळे त्याआधी जन्मलेल्या बाळांना पेटीत ठेवावे लागते. माझी मेमरी मला धोका देतेय का??
फुफ्फुसे प्रगल्भ होणे म्हणजे काय? तर बाळ बाह्य साधनांनी का होईना पण श्वास घेऊ शकेल. २८ आठवड्या अगोदर फुप्फुसे प्रसारण पावण्यासाठी त्यात असणारा द्रव हा तयारच होत नाही त्यामुळे अशा गर्भाची फुप्फुसे कृत्रिम श्वासोच्छवास( ventilator) लावूनही शरीराला प्राणवायूचा पुरवठा करू शकत नाहीत. हा द्रव तयार झाला तरीही मूल श्वासोच्छवास करू शकते परंतु स्वतःला गरम ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याला शरीरातूनच काढावी लागल्याने त्याची वाढ होत नाही म्हणून असे मूल श्वास स्वतः घेत असेल तरी गरम काचेच्या पेटित ठेवले तर त्याच्या ऊर्जेचा अपव्यय होत नाही आणि ते आईच्या पोटात असलेल्या परिस्थितीप्रमाणे झपाट्याने वाढू शकते.
लक्षात घ्या ६० किलोच्या आईला दीड ते दोन किलोच्या गर्भाला "आपल्या शरीरात" गरम ठेवण्यासाठी(३७'से) फारसे कष्ट पडत नाहीत पण तेच २० मिली जठराची क्षमता असलेल्या गर्भाला प्यायलेल्या दुधातून ऊर्जा निर्माण करून स्वतःला गरम ठेवण्यात फार कष्ट होतात. म्हणून अशी कमी वजनाची/ कालावधीची मुले रुग्णालयाच्या बाहेर दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. ( गरिबी मुळे बालमृत्यूचे हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे).

एमी's picture

14 Jul 2017 - 4:36 pm | एमी

डॉक,

दोन्ही प्रतिसादांना एकत्रित उप्र:

बऱ्याच वेळेस स्त्रियांची पाळी फारच पुढे मागे असते. >> हम्म. तीन महिन्यातून एकदाच पाळी येणार्या स्त्रीया माहित आहेत

===
दुसरी गोष्ट सोनोग्राफी मध्ये येणारे आठवडे हे गर्भाच्या वाढीप्रमाणे असल्याने सरासरी काढून ठरवले जातात. यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते यात पाच फुटाच्या आदिवासी स्त्रीचा गर्भ जरी २५-२६ आठवड्याचा ठरवला तरी तो प्रत्यक्ष २८ आठवड्याचा असू शकतो. >> च्यक च्यक झोल आहे की ही पद्धत!! 25-26चा ठरवला गेलेला गर्भ 28चा असू शकतो किंवा 23चा असू शकतो. आईची उंची किती आहे त्यावर अवलंबून... मग सरळ आईची उंचीच इनपुट म्हणून देऊन त्याचा गर्भाच्या उंचीशी रेशो काढून मगच वय का काढत नाहीत??

===
गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? >> ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन.

===
फुफ्फुसे प्रगल्भ होणे म्हणजे काय? तर बाळ बाह्य साधनांनी का होईना.…......... ( गरिबी मुळे बालमृत्यूचे हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे). >> पण मग 28 आठवड्याचा गर्भदेखील खरोखरच viable नसून 'viable in incubator' आहे की!!

सुबोध खरे's picture

14 Jul 2017 - 7:03 pm | सुबोध खरे

ऍमी ताई
तीन महिन्यातून एकदाच पाळी येणार्या स्त्रीया माहित आहेत
लग्न झाल्यावर सात वर्षे पाळी न आलेली मग औषधोपचारा करून एक मुलगा झाल्यावर परत ८ वर्षे पाळी न आलेली ३७ वर्षाची पहाडी( उत्तरांचली) स्त्री मी पाहिली आहे.
पिट्यूटरी ग्रंथीत असलेल्या ट्युमरमुळे अशी स्थिती होउ शकते.
मग सरळ आईची उंचीच इनपुट म्हणून देऊन त्याचा गर्भाच्या उंचीशी रेशो काढून मगच वय का काढत नाहीत??

पाच फूट दोन इंचाच्या स्त्रियांचे वजन ४५ते ७५ (अधिक) कितीही असते मग त्या स्त्रीच्या उंचीचा इनपुट काय द्यायचा. दुसरी गोष्ट जन्माला न आलेल्या गर्भाची उंची १३-१४ आठवड्यानंतर अचूक मोजणे अशक्य असते याचे कारण गर्भाने मन वर खाली केली किंवा पाठीचा कणा वाकवला तर उंचीत मोठ्या प्रमाणात फरक पडतो त्यामुळे या कालावधी नंतर बाळाचे वाढ (आणि वजन) मोजण्यासाठी डोक्याचा घेर पोटाचा घेर आणि मांडीच्या हाडाची लांबी अशा तीन गोष्टी मोजल्या जातात आणि एवढे करूनहि सांख्यिकीतील बदल (STATISTICAL VARIATION) यामुळे त्यात २ आठवड्याचा फेरफार येऊ शकतो.
आपल्या स्वतःच्या दोन हाताच्या अंगठ्यांचे ठसे जर जुळत नाहीत तर दोन स्त्रिया किंवा त्यांच्या गर्भात फरक मोठ्या प्रमाणावर असू शकतो.
ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी.
जन्म स्त्रीने दिला आहे. बाळ जन्माला आले डॉक्टरनी त्या स्वतः श्वास घेत असलेल्या बाळाचे काय करायचे?. आईलाच द्यायला लागेल. ज्या आईला हे मूळ नकोच आहे ती काय करते ? कुठे तरी संडासच्या मागे गटारात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून चालती होते. अशी अनेक बालके जगली वाचली तर शेवटी अनाथाश्रमात पोहोचतात. यात मानवाधिकार फार लांब राहतो.
पण मग 28 आठवड्याचा गर्भदेखील खरोखरच viable नसून 'viable in incubator' आहे की!!
सगळ्याच मुलांना इन्क्युबेटर लागतो असेहि नाही किंवा ती मुले मग निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडतात. अशा बालकांना इन्क्युबेटर न देता मरु द्यायचे हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टिने कितपत योग्य आहे हे समाजानेच ठरवायचे आहे. ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे. कारण एका विशिष्ट परिस्थितीपर्यंतच वैद्यकशास्त्र हे काम करू शकते. उद्या एखादा असेही म्हणून शकेल कि अनाथाश्रमातील मूल आजारी असेल तर त्याला मरू द्या कि. सामाजिक प्रश्न सोडवणे हे समाजाचे काम आहे.
एक उदाहरण म्हणून दुसऱ्या दिवशी फाशी दिल्या जाणारया गुन्हेगाराला जर आज हृदय विकार आला तर तुरुंगातील डॉक्टरने त्याचा जीव वाचवणे हे त्याचे कर्तव्य आहे. नाही तरी तो उद्या मरणारच होता मग आज मेला तर काय फरक पडतो हा विचार डॉक्टरनी करायचा नसतो.
२४ आठवड्यपर्यंत गर्भपातास परवानगी द्यावी असे वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे याची कारणे मी सांगितली. किती कालावधी पर्यंत गर्भपात हा कायदेशीर आहे हे समाजानेच( कायदे पंडित आणि लोकप्रतिनिधी) ठरवायचे आहे.

माहितगार's picture

14 Jul 2017 - 8:12 pm | माहितगार

ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे.

ह्या तत्वाचाही अ‍ॅमी ताईंना विसर पडत असावा अथवा ते त्या गांभिर्याने लक्षात घेत नसाव्यात.

पिट्यूटरी ग्रंथीत असलेल्या ट्युमरमुळे अशी स्थिती होउ शकते. >> हम्म.

===
"यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते" या वाक्यांवरून मला वाटलं कि फक्त आईची आणि गर्भाची उंची मोजून त्यावरून गर्भाचे वय ठरवतात.

"डोक्याचा घेर+पोटाचा घेर आणि मांडीच्या हाडाची लांबी अशा तीन गोष्टी मोजल्या जातात" म्हणजे मला वाटले त्यापेक्षा जास्त गुंतागुंत आहे.

आणि एवढे करूनहि सांख्यिकीतील बदल (STATISTICAL VARIATION) यामुळे त्यात २ आठवड्याचा फेरफार येऊ शकतो. >> हम्म. म्हणजे अजूनही गर्भचे वय तंतोतंत कळत नाहीच.

===
जन्म स्त्रीने दिला आहे. बाळ जन्माला आले डॉक्टरनी त्या स्वतः........ यात मानवाधिकार फार लांब राहतो. >> 24 आठवड्यानंतर कायदेशीर गर्भपात करता येतात त्या देशांत काय करतात ते शोधायला हवे.

नकोशी मुलं कुठेतरी सोडून देणे हे पूर्वपार चालत आले आहे. अनाथाश्रम वगैरे आत्ताआत्ता 2-300 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यातदेखील युद्ध किंवा दुष्काळ चालू असेल तर मुलं मरून जायची. आणि त्यांना मरू द्यायचे. पर्याय काय आहे? मूळ प्रश्न हा आहे कि पालकांनाच नको असलेल्या मुलांची जबाबदारी समाजाने घ्यावी का? माझं उत्तर घेऊ नये.
त्यातपरत biologically disadvantageous स्थितीत असल्याने यात स्त्रीच अडकते. मग तिने ती जबाबदारी घ्यावी का? समाजाने ती जबाबदारी तिच्यावरच लादावी का? लादु नये. गर्भपात किंवा नवजात मूल कुठेतरी सोडून देणे हे कायद्याने गुन्हा असावे का? असू नये.

काही दिवसापूर्वी यासगळ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणारा एक छान लेख वाचला होता त्याची लिंक शोधते.

===
हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टिने कितपत योग्य आहे हे समाजानेच ठरवायचे आहे. ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे. कारण एका विशिष्ट परिस्थितीपर्यंतच वैद्यकशास्त्र हे काम करू शकते. उद्या एखादा असेही म्हणून शकेल कि अनाथाश्रमातील मूल आजारी असेल तर त्याला मरू द्या कि. सामाजिक प्रश्न सोडवणे हे समाजाचे काम आहे. >> हे आवडले.

उपाशी बोका's picture

15 Jul 2017 - 2:46 am | उपाशी बोका

गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? >> ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन.

अतिशय असंवेदनशील प्रतिसाद

अतिशय असंवेदनशील प्रतिसाद >> हे तीन शब्द लिहायला डु आयडी वापरायची गरज नव्हती :)

काही विकसीत देशात गर्भपाताचे लिमिट 26 ते 28 आठवडे आहे ते कसे काय?

कुठल्या देशात असा नियम आहे? आणि तो "रेग्युलर" नियम आहे की "स्पेशल केस"मध्येच वापरायचा नियम आहे?

२० आठवडे योग्य की २४ आठवडे योग्य, २४ आठवडे चालेल मग २६ का नको किंवा ३० का नको, या वादात पडत नाही.
पण इतकी माहिती आहे की थर्ड ट्रायमिस्टर मध्ये डॉक्टर सहसा गर्भपात करत नाहीत, कारण तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असतो.
अधिक माहितीसाठी: https://en.wikipedia.org/wiki/Late_termination_of_pregnancy

एमी's picture

14 Jul 2017 - 6:08 am | एमी

https://en.m.wikipedia.org/wiki/Abortion_in_Canada

Abortion in Canada is legal at all stages of pregnancy[1] and is governed by the Canada Health Act .[2] While some non-legal obstacles exist,
Canada is one of only a few nations with no legal restrictions on
abortion. [3][4] Regulations and accessibility vary between
provinces. [5]
Prior to 1969 all abortion was illegal in Canada, the Criminal Law Amendment Act, 1968-69 introduced by Pierre Trudeau 's Liberal government legalized abortion as long as a committee of doctors signed off that it was necessary for the physical or mental well-being of the mother. In 1988, the Supreme Court of Canada ruled in R. v. Morgentaler that the existing laws were unconstitutional and struck down the 1969 law. The then governing Progressive Conservatives attempted, but failed, to pass a new abortion law, and since then Canada has had no criminal laws governing the subject, and abortion is a decision made by a woman with her doctor. Without legal delays, most abortions are done at an early stage.

माहितगार's picture

14 Jul 2017 - 12:36 pm | माहितगार

कॅनडाने हे टोक ते ते टोक गाठलेले दिसते. स्पेसिफीक कायदे बनवण्याची जबाबदारी संसदेची असली तरी भारतीय घटनेचा अनुच्छेद २१ अधिक चांगला समतोल साधण्यास मदत करेल असे वाटते कारण जेव्हा नवजात प्रेग्नंसी व्हाएबल असेल तेव्हा अनुच्छेद २१ त्याच्या जिवनाचे रक्षण करण्यासही आपोआप सांगतो; त्यामुळे भारतीय कायद्यात व्हाएबलीटीच्या मुद्यावर (आणि डॉ. खरे म्हणतात तसे नवे तंत्रज्ञान प्रगती लक्षात घेऊन) काही अजून सुधारणा केल्या जाऊ शकण्यास वाव असावा कॅनेडीअन टोक ही गाठले जाईल असे वाटत नाही.

भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते पण भारतात आयर्लंड स्टाईल धार्मिक दृष्टीकोणाचा दबाव कमी आहे. तर युरोमेरीकेत स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कमी असली तरी धार्मिक दबाव ते 'टोकाचे फेमिनीस्ट' वादात कायदा हेलकावे घेत राहत असावा.

कॅनडाचा स्टँड अगदी योग्य वाटतो. मला एकुणात viable ही संकल्पनाच झोल वाटतेय.

तुमच्याच लेखातून 'It is important to recognise that reproductive choices can be exercised to procreate as well as to abstain from procreating.' किंवा दुसर्या शब्दात 'Woman doesn't owe a fully grown child to a specific man or to a society or to a particular government' हे बेसिक मान्य असायला हरकत नसावी.

===
भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते. >> हा स्त्रीभ्रूणहत्या प्रकार काही मला कळत नाही. मुळात जे viableच नाही त्याची हत्त्या कशी काय होऊ शकते??
आणि नैसर्गिकरित्या स्त्री-पुरुष गुणोत्तर 1:1 कसे काय असू शकेल??
बाकी प्राण्यात काय असतं नर-मादी गुणोत्तर??

माहितगार's picture

14 Jul 2017 - 6:09 pm | माहितगार

कॅनडाचा स्टँड अगदी योग्य वाटतो. मला एकुणात viable ही संकल्पनाच झोल वाटतेय.
तुमच्याच लेखातून 'It is important to recognise that reproductive choices can be exercised to procreate as well as to abstain from procreating.' किंवा दुसर्या शब्दात 'Woman doesn't owe a fully grown child to a specific man or to a society or to a particular government' हे बेसिक मान्य असायला हरकत नसावी.

हा टोकाचा फेमिनीझम आहे ? ते काही असो, भारतीय राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार आणि अनुच्छेद २१ ने येणारा जिवीत्वाचा अधिकारांचा लाभ अधिक सयुक्तीकपणे देण्यास भारतीय न्यायसंस्था राजी असली तरीही, मुलभूत अधिकार आणि अनुच्छेद २१ ने येणारा जिवीत्वाचा अधिकार केवळ स्त्रियांसाठी राखीव नाही आणि भारतीय घटनेतील मुलभूत अधिकार अटींसह येतात ते अमर्याद नसतात हे इथे लक्षात घेणे प्रॅक्टीकल असावे.

reproductive choices ची निवड आणि fully grown child ला owe करणे या भिन्न बाबी असाव्यात. owe हा शब्द दास्यत्व आणि मालकी या पातळीवर तर पोहोचत नाही ना या बद्दल revisit करण्याची गरज असावी. एक fully grown child ला पित्याची इमोशनल गरज नसते हे म्हणणे वस्तुनिष्ठतेस आहे या बद्दल साशंकता वाटते.

स्त्रियांनी इतरांचे मानवाधीकार नाकारण्याचा आग्रह धरला, जसे की स्वतःच्या मुलाच्या जिवीत्वाचा अधिकार तर अशा स्त्रीयांना स्वतःसाठी मानवाधीकार मागण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहतो या बद्दल प्रश्नचिन्हे उभी केली जाण्यास जागा तयार होते किंवा कसे ?

ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन.

निवडीचे स्वातंत्र्य हवे पण त्या सोबत येणारी जबाबदारी नको आहे ? जबाबदारी आली की ती इतरांवर झटकावी हा कोणता न्याय झाला ? अनिर्बंध गर्भपाताच्या स्वातंत्र्याने कितीसे लोकसंख्या नियंत्रण होईल ?

एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, आपणास मतांतर स्वातंत्र्य आहे, पण आपलेच मत म्हणजे समाजाचे अथवा सरकारचे असा आपला ग्रह नसेल असे वाटते. असो.

एमी's picture

15 Jul 2017 - 5:25 am | एमी

टोकाचा काय हा तर फेमिनिझमदेखील नाही.

https://en.m.wikipedia.org/wiki/Late_termination_of_pregnancy इथून गर्भपात करण्यास उशीर होण्यामागची कारणे:

• 71% Woman didn't recognize she was pregnant or misjudged gestation
• 48% Woman found it hard to make arrangements for abortion
• 33% Woman was afraid to tell her partner or parents
• 24% Woman took time to decide to have an abortion
• 8% Woman waited for her relationship to change
• 8% Someone pressured woman not to have abortion
• 6% Something changed after woman became pregnant
• 6% Woman didn't know timing is important
• 5% Woman didn't know she could get an abortion
• 2% A fetal problem was diagnosed late in pregnancy
• 11% Other

याखेरीज इतर जास्त गंभीर कारण असू शकतात उदा. http://www.misalpav.com/node/37743 किंवा तुम्ही धाग्यात दिलेली पहिली केस किंवा बोको हराम...

प्रत्येक अनप्लानड प्रेग्नंनसी वेगळी. त्यामुळे एकचएक ब्लँकेट कायदा तिथे लावून चालत नाही. मग प्रत्येकीला कोर्टात धाव घ्यावी लागावी का? त्यात अजून होनार्या डिलेचे काय?

===
एक fully grown child ला पित्याची इमोशनल गरज नसते हे म्हणणे वस्तुनिष्ठतेस आहे या बद्दल साशंकता वाटते. >> हे कुठून आलं मध्येच?

===
स्त्रियांनी इतरांचे मानवाधीकार नाकारण्याचा आग्रह धरला, जसे की स्वतःच्या मुलाच्या जिवीत्वाचा अधिकार तर अशा स्त्रीयांना स्वतःसाठी मानवाधीकार मागण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहतो या बद्दल प्रश्नचिन्हे उभी केली जाण्यास जागा तयार होते किंवा कसे ? >> nice argument :)

माहितगार's picture

15 Jul 2017 - 8:01 am | माहितगार

Late_termination_of_pregnancy म्हणजे प्रलंबित गर्भपाता बाबत, स्त्रीच्या स्वतःच्या जिवास धोका निर्माण होणे अथवा वर डॉक्टर म्हणतात तसे नवजात गर्भातील दुर्धर व्याधी लक्षात येणे हि कारणे जस्टीफायेबल असू शकतात. आपण वर दिलेली बाकी सर्व यादी व्यक्तिगत अथवा सामाजिक आळशीपणाच्या जोडीस हलगर्जीपणाची उदाहरणे आहेत, इतरांच्या हलगर्जीपणाची शिक्षा श्वास घेऊ लागलेल्या नवजात अभ्रकास द्यावी असे वाटत नाही. आळशी आणि हलगर्जी लोकांना जेवढा जगण्याचा अधिकार आहे तेवढा नवजात अभ्रकासही असलाच पाहीजे किमानपक्षी जगात पहीला श्वास घेताना त्याने हलगर्जीपणा केला नाही अशा लोकांची या जगास नितांत आवश्यकता आहे त्यांना जगवलेच पाहीजे असे माझे मत आहे.

निवडीचे स्वातंत्र्य हवे पण त्या सोबत येणारी जबाबदारी नको आहे ? जबाबदारी आली की ती इतरांवर झटकावी हा कोणता न्याय झाला ? >> काय कळले नाय. कोणत्याही स्त्रीने 20 आठवड्यानंतर गर्भपात करायचा नाही अशी निवड करण्याचे स्वातंत्र्य समाजाला किंवा सरकारला हवे; पण मग सांभाळा तुम्हीच ती मूलं अशी जबाबदारी दिली की ती त्या बाईवरच झटकावी हा कोणता न्याय??

===
एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, आपणास मतांतर स्वातंत्र्य आहे, पण आपलेच मत म्हणजे समाजाचे अथवा सरकारचे असा आपला ग्रह नसेल असे वाटते. असो. >> ऑ माझे मत म्हणजे माझेच मत असणंर ना?

कोणत्याही क्षेत्रात स्वतःच्या (आणि काही वेळा समाजाच्याही) अळशीपणातून आणि हलगर्जीपणातून निर्माण झालेल्या जबाबदार्‍या पार पाडाव्याच लागतात. व्यक्ति अक्षम ठरली तर समाज अशा जबाबदार्‍या कमी जास्त यशस्वीतेने पार पाडतच असतो. वरील चर्चेतील काही अपवादात्मक शक्यता सोडल्या तर योग्य निर्णय घेण्यासाठी ५ ते ६ महिन्यांच्या कालावधी भरपुर झाला. वेळेत निर्णय न घेणे हि चुक आहे ती नवजात बालकाने त्याची किंमत मोजण्याचे कोणतेही कारण नाही.

शिवाय प्रोक्रीएशनची मानसिक गरज केवळ स्त्रीयांना नसते ती पुरुषांनाही तेवढीच असते. अशी एक केस घ्या की विवाहीत दांपत्त्या पैकी स्त्रीने नवरा आवडलेला नसतानाही त्याच्या संपत्ती आणि उत्पन्नाकडे पाहून विवाह केला बाळंतपणात तिला उपरती ७ व्या महिन्यात म्हणजे उशीरा झाली आपल्याला हा नवरा काय आवडत नाही सध्याचे मूल पाडून आपण वेगळा नवा संसार थाटूया. पण नवरा महाशयांनी तर आपला पुर्ण जीव बाळ बाळंतीणीवर लावला आहे. विवाहच बाळ व्हावे म्हणून केला आहे. पहीले ५ महिने गर्भ श्वासच घेत नाही वगैरे कारणेही ठिक आहेत पण एक श्वास घेऊ लागलेल स्वतःच्या रक्ताच्या बाळावर आईने नसेल जिव लावला पण बापाने भावनीक जिव लावला असेही होऊ शकते. अशा केस मध्ये कायद्याने दिलेल्या वेळेत निर्णय न घेण्याची चुक कुणाची ? चुक स्त्रीची ती नवजात बालकाने आणि सोबत बापानेही भोगायची हा कोणता न्याय होऊ शकेल ?

इतरांची मते वेगळी असू शकतात, पण एका बाबतीत माझे मत ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांशी अल्पसे जुळते, अगदी बलात्काराच्या केस मध्येही गुन्हेगारास शिक्षा द्यावी. ज्या बाळाचा काही गुन्हा नाही त्या बाळास किमान श्वास घ्यायला लागल्या नंतर शिक्षा देऊ नये. एक उदाहरण घ्या एका स्त्रीने असंबंधीत पुरुषाचे मुल दत्तक घेतले, होऊ नये पण दत्तक देणार्‍या बापाकडून स्त्रीचा मानभंग झाला. आता मानभंग झाला म्हणून दत्तक घेतलेले मूल मारुन टाकण्याचे समर्थन होईल का ? २० आठवड्यांच्या आधी निर्णय घेणे एक वेळ ठिक आहे कायदाही तशी परवानगी देतो. पण जगात नुकतीच उमलणारी कळी ६ व्या महिन्यानंतर खुडावी असे वाटत नाही. या बाबत संबंधित स्त्रीयांचेही समुपदेशन व्हावयास जागा असावी.

पिलीयन रायडर's picture

14 Jul 2017 - 8:29 pm | पिलीयन रायडर

भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते. >> हा स्त्रीभ्रूणहत्या प्रकार काही मला कळत नाही. मुळात जे viableच नाही त्याची हत्त्या कशी काय होऊ शकते??
आणि नैसर्गिकरित्या स्त्री-पुरुष गुणोत्तर 1:1 कसे काय असू शकेल??
बाकी प्राण्यात काय असतं नर-मादी गुणोत्तर??

मुद्दा कळाला नाही. स्त्री भ्रुण हत्या ही मुळात हत्या नाही हे म्हणण्याचं कारण समजु शकते. पण अशा हत्यांनी (किंवा गर्भपातांनी) काहीच फरक पडत नाही असे म्हणायचे आहे का?

viable नसलं तरी गर्भपाताचे कारण होणार्‍या बाळाचे लिंग असेल तर तो गर्भपात चुक नाही का? अगदी कॅनडातही गर्भपाताला काही आडकाठी नसली तरी गर्भपाताचे कारण आईची शाररिक अथवा मानसिक अवस्था हे असु शकते, गर्भ स्त्री आहे म्हणुन गर्भपातास परवानगी असेल असे वाटत नाही. असूही नयेच ना.

आणि १:१ गुणोत्तर निसर्गतः असुच शकत नाही. पण स्त्री भ्रुण हत्या (किंवा स्त्रीगर्भपात?) जर हे गुणोत्तर मानवी हस्तक्षेपामुळे एका बाजुला खेचल्या जात असेल तर ते ही अयोग्यच आहे. मुळात हे गुणोत्तर १:१ ठेवायला लिंगनिदान आणि त्यावर आधारित गर्भपातास रोखणारा कायदा बनवलाच नाहीये. जे काही गुणोत्तर नैसर्गिकरित्या राखले जाणार असेल ते राखले जावे हाच उद्देश असावा. बाकी प्राण्यांशी तुलना करायचीच असेल तर त्यांच्यात गर्भपात असतात का? खास करुन लिंगाधारित गर्भपात?

सहज गुगल केले असता हा एक पेपर मिळाला. - https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1569153/

त्याचा अ‍ॅबस्ट्रॅक्ट -

In the absence of manipulation, both the sex ratio at birth and the population sex ratio are remarkably constant in human populations. Small alterations do occur naturally; for example, a small excess of male births has been reported to occur during and after war. The tradition of son preference, however, has distorted these natural sex ratios in large parts of Asia and North Africa. This son preference is manifest in sex-selective abortion and in discrimination in care practices for girls, both of which lead to higher female mortality. Differential gender mortality has been a documented problem for decades and led to reports in the early 1990s of 100 million “missing women” across the developing world. Since that time, improved health care and conditions for women have resulted in reductions in female mortality, but these advances have now been offset by a huge increase in the use of sex-selective abortion, which became available in the mid-1980s. Largely as a result of this practice, there are now an estimated 80 million missing females in India and China alone. The large cohorts of “surplus” males now reaching adulthood are predominantly of low socioeconomic class, and concerns have been expressed that their lack of marriageability, and consequent marginalization in society, may lead to antisocial behavior and violence, threatening societal stability and security. Measures to reduce sex selection must include strict enforcement of existing legislation, the ensuring of equal rights for women, and public awareness campaigns about the dangers of gender imbalance.

कॅनडा चीन आणि व्हिएतनामधे गर्भपात on request होतो म्हणजे कारण विचारत नाहीत.

viable नसलं तरी गर्भपाताचे कारण होणार्या बाळाचे लिंग असेल तर तो गर्भपात चुक नाही का? ....असूही नयेच ना. >> काय चूक काय बरोबर हे तुम्ही किंवा समाज कसे ठरवू शकता? ते पण जबाबदारी घेत नसताना...

आणि १:१ गुणोत्तर निसर्गतः असुच शकत नाही. पण स्त्री भ्रुण हत्या (किंवा स्त्रीगर्भपात?) जर हे गुणोत्तर मानवी हस्तक्षेपामुळे एका बाजुला खेचल्या जात असेल तर ते ही अयोग्यच आहे. मुळात हे गुणोत्तर १:१ ठेवायला लिंगनिदान आणि त्यावर आधारित गर्भपातास रोखणारा कायदा बनवलाच नाहीये. जे काही गुणोत्तर नैसर्गिकरित्या राखले जाणार असेल ते राखले जावे हाच उद्देश असावा. बाकी प्राण्यांशी तुलना करायचीच असेल तर त्यांच्यात गर्भपात असतात का? खास करुन लिंगाधारित गर्भपात? >> 15 ते 50 अशी साधारण 35 वर्ष स्त्री फरताईल असते जर ती सतत सलगपणे मुलं जन्माला घालत राहिली तर काय रेशो येतो स्त्री-पुरुष चा आणि गर्भनिरोधक साधन वापरून तोच रेशो कसा राहतो??

पिलीयन रायडर's picture

15 Jul 2017 - 7:02 am | पिलीयन रायडर

एक मिनिट, तुमचा मुद्दा नक्की काय आहे?

केवळ होणारे मुल "स्त्री" आहे म्हणुन कुणाला (कुणालाही हं.. आई किंवा वडील.. कुणालाही) त्या बाळाची जबाबदारी नको असणं आणि म्हणुन त्यांनी गर्भपात करवुन घेणं तुम्हाला योग्य वाटतं का? वाटत असेल तर तसं का?

मला फार उत्सुकता आहे स्त्री भ्रुण हत्या योग्य कशी काय असु शकते हे ऐकण्याची.. कुठल्याही अँगलने विचार केला तरी मला तुमचं म्हणणंच लक्षात येत नाहीये..

बाकी प्रश्न हा माणसाने पुरुष संततीच हवी म्हणुन स्त्री गर्भ पाडण्याचा असल्याने, त्यामुळे गुणोत्तर कसे बदलते आणि त्याचे परिणाम हा आहे. बाकी नैसर्गिक गर्भधारणेत हे गुणोत्तर कसे असते, प्राण्यांमध्ये कसे असते, गर्भनिरोधक वापरले तर कसे असते हे प्रश्न मला इथे गैरलागु वाटतात. कारण लिंग तपासुन केवळ स्त्री गर्भ पाडल्याने हे गुणोत्तर बदलते , त्याचे अनेक अनिष्ट सामाजिक परिणाम आहेत आणि म्हणुनच लिंगनिदानावर बंदीचा कायदा आहे. हे इतकं स्पष्ट आहे की ह्यात नक्की कशावर चर्चा करायची हेच कळालेले नाही. तुम्ही इतर परिस्थितींमध्ये येणार्‍या गुणोत्तराची तुलना करण्याचा प्रयत्न करताय पण तो खरंच गरजेचा आहे का?

लिंगाधारित गर्भपाताचे इतके ढळढळीत परिणाम समोर असताना...

https://en.wikipedia.org/wiki/Sex-selective_abortion

त्यातही हे वाचा - https://en.wikipedia.org/wiki/Sex-selective_abortion#Societal_effects

एमी's picture

15 Jul 2017 - 3:29 am | एमी

वरील विकी लिंक मधूनच

England and Wales: In 2015, 8% of abortions occurred after 12 weeks; 0.1% occurred at or over 24 weeks. >> at or over

Because the Centers for Disease Control and Prevention's annual study on abortion statistics does not calculate the exact gestational age for abortions performed past the 20th week, there are no precise data for the number of abortions performed after viability. [18] In 1997, the Guttmacher Institute estimated the number of abortions in the U.S. past 24 weeks to be 0.08%, or approximately 1,032 per year. >> past 24 weeks

Some countries, like Canada, China (Mainland only) and Vietnam have no legal limit on when an abortion can be performed. >> no legal limit

सुबोध खरे's picture

14 Jul 2017 - 7:12 pm | सुबोध खरे

कॅनडाच्या वरील किंवा इतर दुव्यांमध्ये मूळ गर्भपाताला परवानगी द्यावी कि नाही याबद्दलच उहापोह आहे. किती कालावधी पर्यंत याची परवानगी असावी असा संदर्भ मला कुठेही सापडला नाही. ( नजरचुकीने तो राहून गेला असल्यास त्याचा संदर्भ दिल्यास बरे होईल)
पाश्चात्य देशात ख्रिस्ती धर्माचा प्रभाव बराच आहे आणि त्यातील कॅथॉलिक पंथाचे लोक गर्भपाताचे अत्यंत कडवे विरोधक असतात. त्यामुळे बऱ्याच पाश्चात्य देशात गर्भपाताला मोठ्या प्रमाणावर विरोध करणारे लोक आहेत.
अशा स्त्रियांची सोनोग्राफी करताना गर्भामध्ये व्यंग असेल तरी या स्त्रिया गर्भपात करून घेत नाहीत आणि ईश्वराने अशा "विशेष"मुलाची काळजी घ्यायला मला मुद्दाम "निवडले आहे" असे मानून त्याला जन्म देतात आणि आयुष्यभर त्या बालकाला स्वतःला आणि त्यांच्या नंतर त्या विशेष बालकाच्या भाव बहिणींवर एक जबाबदारी चे ओझे टाकले जाते.
https://www.usnews.com/news/best-countries/articles/2016-02-08/10-countr...

कॅनडाच्या वरील किंवा इतर दुव्यांमध्ये मूळ गर्भपाताला परवानगी द्यावी कि नाही याबद्दलच उहापोह आहे. किती कालावधी पर्यंत याची परवानगी असावी असा संदर्भ मला कुठेही सापडला नाही. ( नजरचुकीने तो राहून गेला असल्यास त्याचा संदर्भ दिल्यास बरे होईल) >> माझ्या कालच्या 6.08 am आणि आजच्या 3.29 am च्या प्रतिसाद मध्ये संदर्भ मिळेल.

===
पाश्चात्य देशात ख्रिस्ती धर्माचा प्रभाव बराच आहे ......जबाबदारी चे ओझे टाकले जाते.>> हा तर अजूनच झोल आहे. केवळ बर्डेन. सध्या चार्ली गार्डच्या बातम्या चालू आहेत त्यात पोप आणि trump पण सहभागी झालेत https://en.m.wikipedia.org/wiki/Charlie_Gard_treatment_controversy

पिलीयन रायडर's picture

14 Jul 2017 - 8:31 pm | पिलीयन रायडर

उत्तम चर्चा. डॉ. खरेंचे प्रतिसाद आवडले.

एमी's picture

15 Jul 2017 - 3:31 am | एमी

+1.

बाकीच्याना थोड्या वेळाने उत्तर देते.