नमस्कार लोकहो !!
काही माणसं आयुष्यात अशी भेटतात की ज्यांना पाहिल्यावर वाटतं ते किती भाविक ? पण दिसतं तस नसतं. काही वेळा लोक अपरिहार्यतेमुळे भक्ती करीत असतात. पण त्यांच्या माथी उगाच शेंदूर लावला जातो. ते बिचारे त्यांचं आयुष्य जगत असतात.
या विषयावरील एक किस्सा.
एका खेड्यात नामसप्ताह आयोजित केला होता. एका विद्वान बुवांना त्यात कीर्तनासाठी बोलावले होते. गावातल्या विठ्ठलमंदिरात दिवसभर भजन, नामस्मरण, पूजाअर्चा आणि रात्री या बुवांचे कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम.
बुवांना विचित्र अनुभव आला. बुवांचं कीर्तन सुरू होतांना, गावातले सगळे लोक उपस्थित असायचे पण हळूहळू एकएक जण कटायला लागायचा. रात्रीचं कीर्तन होतं. त्यामुळे लोकांना झोप यायची. त्यांचाही नाईलाज. दिवसभर शेतात खपून बिचारे दमलेले असायचे. पण गावकीचा उत्सव म्हणून कीर्तनाला हजेरी लावणही भाग होतं.
चार दिवस असेच गेले. बुवा वैतागले. कीर्तनाच्या सुरूवातीला उत्साहाने "रामकृष्णहरी" चा होणारा गजर हळूहळू कमी होत जाऊन, कीर्तनाची सांगता करतांना म्हणायच्या " बोललो लेकुरे, वेडी वाकुडी उत्तरे" या अभंगाला केवळ एक धनगर तेवढा शिल्लक रहायचां. बाकी सारे गावकरी घरी जाऊन गाढ झोपलेले असायचे.
तो बिचारा धनगर अगदी तल्लीन होऊन कीर्तन ऐकतोय असे बुवांना वाटायचे. अगदी शेवटपर्यंत तो हजर असायचा . कीर्तन संपले की बुवांच्या पाया पडून घरी जायचा.
त्याची ही "भक्ति" पाहून बुवा गहिवरले.
बुवा त्याला म्हणाले ," बाबारे, या अख्ख्या गावात तूच एकटा खरा भक्त आहेस. बाकीचे सारे केवळ उपचार म्हणून माझ्या कीर्तनाला येतात आणि झोप आली की निघून जातात. तू मात्र तल्लीन होऊन भक्तिरसात न्हाऊन निघतोस. तू खरा भक्त, तू खरा वारकरी. तुला अनुग्रह देण्याची इच्छा मला झाली आहे. बाबारे, मी तुला ब्रह्मज्ञान सांगतो. माझ्याकडील या अमूल्य ज्ञानाचा ठेवा मी तुला अर्पण करतो".
ब्रह्मज्ञान वगैरे शब्द ऐकल्यावर तो बिचारा धनगर गडबडला.
तो म्हणाला," अहो बुवा, तुमचा गैरसमज होतोय. मला काय करायचायं ते तुमचं ब्रह्मज्ञान? अहो, मलाही तुमचं कीर्तन सुरू झालं की झोप येते. पण मी घरी जाऊन झोपू शकत नाही. कारण गावकीच्या उत्सवात प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी दिलेली असते तशी ती मला सुद्धा दिलेली आहे.
तुमच्या पायाखाली जे घोंगडं आहे ना, ज्यावर उभे राहून तुम्ही कीर्तन करता, ते माझं आहे.
त्यामुळे तुमचं कीर्तन होईपर्यंत मला झक मारत इथे थांबावं लागतं. म्होरल्या वर्षी मी सरपंचांना सांगणार आहे की , बाकी काहीही काम द्या पण हे घोंगड्याचं घोंगड माझ्या गळ्यात अडकवू नका."
जय जय राम कृष्ण हरी ||
आपला,
(हरिभक्तपरायण) धोंडोपंत
प्रतिक्रिया
9 Dec 2007 - 10:21 am | सहज
जय जय राम कृष्ण हरी ||
ह.भ.प. (हरभरे भरडण्यात पटाईत)
9 Dec 2007 - 11:01 am | राजे (not verified)
कोल्हापुर कडे असताना रोज सकाळी एका मुली साठी चांगले सहा महिने भक्ती भावाने महालक्ष्मी मंदिरामध्ये सकाळ सकाळी ७ वाजता गेलो होतो ते दिवस आठवले....;}
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
9 Dec 2007 - 1:55 pm | विसोबा खेचर
मस्त! :)
जय जय राम कृष्ण हरी ||
(इट्टलभक्त) तात्या.