भेळ पुराण ...
मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..पण चविष्ट असते (च असे नाही पण ;) ) पुण्यातली भेळ मात्र साग्रसंगीत मुरमुरे ,पापडी .भावनागरी ,एक नंबर शेव ,पापडी ,गाठी शेव , खारेदाणे, तिखट बुंदी ,मिरीचीचा ठेचा ,काळे मीठ, चिंच खजुराची चटणी वर कांदा टोमाटो हे सगळे मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात मोठ्या चमच्याने एकजीव केले जाते आणि त्यावर पुन्हा भुरभूरलेली बारीक शेव,कोथिंबीर आणि कांदा... बाय डिमांड वरून पुन्हा थोडी खजूर चिंचेची चटणी , सिझन असेल तर थोड्या कैरीच्या बारीक फोडी आणि हि स्वाहा करायला चमचा म्हणून दिलेली पाणीपुरीची कडक पुरी (खरा खवय्या हि पहिल्याच घासाला भेळे बरोबरच खाऊन टाकतो आणि भेळवाला मराठी असला तरी "भय्या ऑर एक पुरी देना" म्हणून हक्काची असल्या सारखी अजून एक पुरी मागून घेतो आणि मग ती सुद्धा कशी बशी दोन घासच टिकवतो आणि उर्वरित भेळ मुकाट्याने कागदी चमच्याने खातो ;) ) ... वाsss .... हि सुद्धा चविष्ट आणि अप्रतिम असते (च असे नाही पण ;) ) फक्त या गोष्टी योग्य ठिकाणी खायला हव्या ... पुण्यातील आजून एक भेळ म्हणजे मटकी भेळ ... जाड भाजके पोहे , १ नंबर शेव ,काळे मीठ ,खारेदाणे ,बुंदी , नायलॉन पोह्याचा चिवडा , कांदा कोथिंबीर ,झणझणीत मिरीचीचा ठेचा , ( काही ठिकाणी कांदा लसून चटणी सुद्धा ) फक्त जीरापुड ,धनापूड ,हळद मीठ घालून उकडलेली मटकी ,कुठे कुठे त्यात समाविष्ट असलेले हरबरे हे सगळे एकत्र करून ,लिबू पिळून छान कालवून घ्यायचे त्यावर वर पुन्हा प्रेमाची बारीक शेव आणि आनंदाचे चार खारे शेगदाणे आणि बुंदी , मग कोथिंबीर भूभूरून ग्राहकाच्या हातात द्यायचे आणि मग आपण ते कागदी चमच्याने मिटक्या मारत स्वाहा करायचे ... वाsss !! यात पुन्हा निवडीचा अधिकार म्हणजे फरसाण भेळ हवी का चिवडा भेळ ... सांगली ची भेळ आजून वेगळी म्हणजे भडंग भेळ हि पण जबऱ्याच आवर्जून आस्वाद घ्यावा अशीच ... प्रत्येक खाण्याच्या पदार्थाला चव आणण्यात भर घालते ते तिथले पाणी , प्रत्येक गावचे पाणी वेगळे त्यामुळे पदार्थाला चव हि वेगळी ... प्रत्येक गावाची एक वैशिष्ट्य असते , सांगलीला ची भेळ सांगलीतच छान वाटेल पुण्यातील पुण्यातच आणि कोल्हापूर ची कोल्हापुरातच . बनवणारी व्यक्ती वेगळी , हाताची चव वेगळी . त्यामुळे एकंदरीत खाणे या प्रकाराला च प्रांतवादात अडकवू नये असं मला वाटत
इति श्री भेळ पुराण अध्याय पहिला समाप्त !! :) :) -- सौरभ पारखे :)
प्रतिक्रिया
3 Feb 2017 - 2:10 pm | फेदरवेट साहेब
आम्हाला वाटले होते पूर्ण महाराष्ट्रातील भेळ ह्या दैवी खाद्याचा आढावा घेतला जाईल. पण कसले काय राव, तुमचा महाराष्ट्र पुणे मुंबई सांगली कोल्हापुरातच आटोपला. नाशिकची चिवडा भेळ नाही का बाकी ग्रामीण पुणे जिल्ह्यातली तिखट भेळ पण नाही. इ ना चॉलबे दादा.
3 Feb 2017 - 4:05 pm | मोदक
+१११
कोल्लापूरकर तर निसत्या राजाभाऊच्या भेळेवर याच्या तिप्पट लेख छापतील.
3 Feb 2017 - 4:17 pm | रेवती
लेखन आवडले. अध्याय दुसरा कधी येणार?
3 Feb 2017 - 5:14 pm | ज्योति अळवणी
मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..
यात कांदा, उकडलेला बटाटा, कैरी, शेवसुद्धा असते हो. जुहू आणि चौपाटीच्या भेळेत टोमॅटो देखील घालतात. लसूण चटणी, पुदिना चटणी आणि मग खजूर चिंच चटणी असा प्रकार मस्त पातेल्यात एकत्र करून मग कागदाच्या द्रोणात टाकतात. त्यावर बारीक शेव आणि वाटल्यास गोड चटणी अजून. मस्त फ़ंडा आहे मुंबई भेळेचा!
Anyways तुमचं भेळ पुराण वाचून मात्र मजा आली
3 Feb 2017 - 6:15 pm | Ranapratap
असे खुसखुशीत, चम चमीत लिखाण वाचून तोंडाला पाणी सुटले राव. अशा ठिकाणचे पत्ते द्या ना.
3 Feb 2017 - 6:43 pm | पैसा
पण थोडक्यात आवरलंत. मटकी भेळ हा प्रकार कधी ऐकला नव्हता.
3 Feb 2017 - 7:05 pm | अजया
मटकी भेळ नुकतीच सरसला खाण्यात आली.
भेळ खावी ती मुंबईतच ;) प्रांतीय अभिमान खाण्यात चालतो!
राजाभाऊंच्या भेळेसाठी कोल्हापूरात शोधत शोधत जाऊन खाल्ली एकदाची ती भेळ. बात कुछ जमीं नहीं!
3 Feb 2017 - 7:17 pm | गवि
एका मुंबई भेळेच्या व्हेरियंटमधे दही रगडा आणि उकडलेला बटाटा असंही खाल्लंय.
सांगलीत फार पूर्वी संभा आणि टेक्सास ओली भेळ या दोन्ही प्रसिद्ध झाल्या होत्या.
शिवाजीनगर पुणे इथे झटका भेळ. ते वृद्ध गृहस्थ आता नसणार.
मुंबईत व्हीटीजवळ बझारगेटनजीक गोल्डन भेळ (विना कुरमुरे, फक्त फरसाण, पापडी, शेव आणि चटण्या, कांदा इ.) हीदेखील आवडायची.
5 Feb 2017 - 2:31 pm | यशोधरा
झटका भेळवाले काका आता नाहीत, त्यांचा मुलगा चालवतो दुकान.
3 Feb 2017 - 8:44 pm | भीमराव
तुम्ही कुठेही भेळ खा, कितीही चविष्ठ असली तरी त्याला आमच्या ऊसतोड कामगारांसोबत येना-या हॉटेलांमधल्या भेळीची चव काय येनार नाही,
चुरमुरा, शेव, चिंचेपासुन तयार केलेला तिखट-आंबट-गोडसर द्रव पदार्थ, मधुनच डोकावनारा चुकार खारा शेंगदाणा व त्यात मिसळलेला बारीक चिरलेला कांदा, या सर्व शुल्लक पदार्थांचं पातेल्यात पळीनं केलं जाणारं ते स्वर्गीय चविचं मिश्रण, वरुन टाकलेली थोडीशीच कोथींबीर, सोबत चवीला तळलेली मिर्ची........
त्या हॉटेलातल्या माशा, बनवनाराचे कळकटले कपडे या कशाचाच विचार न करता प्रत्येक जन मनापासुन या भेळीची वाट पाहतो ते तिथल्या ओरीजनल चविसाठी
3 Feb 2017 - 9:33 pm | तुषार काळभोर
१) रास्ता पेठेतली Interval
२) पुणे नगर रस्त्यावर आळंदी फाट्यावर सोमेश्वर मटकी भेळ
३) सासवड रस्त्यावर वडकीची मटकी भेळ
४) (ही खाल्ली नाही कधी, पण बरंच ऐकलंय) सातारा रस्त्यावर कात्रज घाटाच्या बरंचसं पुढे कैलास भेळ
4 Feb 2017 - 9:48 pm | सांरा
पन बोला बे कोनी....
4 Feb 2017 - 10:35 pm | मनिमौ
विसरलात. चिंच चटणी आणी हिरवी मिरची न घालता एक ट्रेड सिक्रेट असलेली चटणी घालून बनणारी ही भेळ बाकी ठिकाणी कुठे मिळत नाही. . किंचीत हळद घालून परतलेले चूरमुरे त्यावर कांदा कोथिंबीर टोमॅटो आणी ही स्पेशल चटणी आहाहा
4 Feb 2017 - 11:04 pm | गवि
आतापर्यंत विविध ठिकाणी वाचलेल्या सोलापूरच्या खादाडी स्पेशालिटीजवरुन एकदा फक्त खादाडीसाठी सोलापूर दौरा करणं भाग आहे.
साधारण किती दिवस पुरतील? राहायला चांगली हाटेले कोणती?
तीन दिवसांत ६ जेवणं, सहा नाश्ते घेता येतात.
तस्मात बेस्ट खाण्याची ५-७ ठिकाणं सुचवल्यास आभारी असेन.
5 Feb 2017 - 1:01 pm | अभ्या..
प्रिय गविकाका (असे मला एका डॉक्टरांनी म्हणण्यास सांगितले आहे. ;))
आपल्या सोलापूरातली ठिकाणे स्पेशालिटीवाईज.
राहणे: (अर्थात माझे घर आहेच)
हॉटेल प्रथम, त्रिपूरसुंदरी, बालाजी सरोवर (हे फोर स्टार)
एश्वर्या, सिटीपार्क, लोटस (लक्झरी)
अजिंक्य, दीपगिरी, वगैरे वगैरे नॉर्मल
.
नाश्ता:
सुधा इडली
सात रस्त्याची इडली
दत्त ची पुरीभाजी
अण्णा साऊथ इंडीयन
ओमसाई दावणगेरी
.
चटकमटक:
आंध्रा भजी रायचूर भजी
दालवडा
भैय्याची भेळ आणि कचोरी
पवार भेळ (जरा जरा कल्याण भेळसारखी)
पार्कावरची पाणीपुरी
भाग्यश्रीचा वडा
एसएसचा संगमवडा
मिरची भजी
डिस्को भजी (एकदा अर्धी तळलेली भजी कापून परत क्रिस्पी तळतात. मसाले टाकून देतात. चखना आयटम)
सुनीलची मिसळ
मेहबूबची लस्सी
प्रजा कोल्ड्रिंक्स (आइस्क्रीम सोडा आणि कसाटा)
सातरस्त्यावरचे पायनापल
चाटीगल्लीतली चमन भेळ, उकाळा आणि दहीवडा
शीतल शर्माचा समोसा
नवीन आलेला चिमणी समोसा
पवनकुमारचे वडा श्याम्पल
करुणाची कचोरी आणि हातपापडी (सोबत झुणका)
बाशूभाईची अंडा भुर्जी अन अंडा टोस्ट
साखरपेठेतली बटाटा भजी.
.
जेवण(शाकाहारी)
ब्राह्मणी जेवण (अनादी, प्रीती)
लिंगायत जेवण (अन्नपूर्णा डायनिंग हॉल)
राजस्थानी आणि गुजराती (रसिक आणी पांचाली)
अजिंक्य, अंगराज, नसले, सुनील, शीतल, मंत्रालय, सुगरण, धनश्री (हे सगळे एकाच चवीचे पण सोलापूरी जेवणाची क्वालिटी एक लंबर )
पंजाबी (सोलापूरात आम्ही खात नाही, माहीत नाही पण बहुतेक हॉटेलात मिळतात)
कडक भाकरी, शेंगा भाजी, शेंगा चटणी, आख्खा मसूर, शेव भाजी, घाटी शेरवा, मटकी फ्रय, मेथी मलई, धपाटे, थालीपीठ, खवा पोळी, शेंगा पोळी, दही, घी राईस, वगैरे वगैरे स्पेशालिटीज बर्याच ठिकाणी मिळतात.
.
मांसाहारी
शीग मटण (चकोले, स्वाद)
तुळजापूरी मटण, हिरवे मटण, चारु बोवा, आंध्रा मटण, (आनंद, शीतल)
सावजी आणि भावसार मटण,(श्रवण, सावजी, वैशाली, महालक्ष्मी) खिमा उंडे, मटण आचार, दालचा खाना, मोगलाई रेशमी वगैरे कबाब. प्याराडाईज बिर्यानी , चाचा बिर्यानी, सावजी बिर्यानी.
बीफ बर्याच ठिकाणी मिळते. माहीती नाहीत डिशेस.
मासे जास्त मिळत नाहीत. विजापूर रोड कडे काही ठिकाणी फेमस आहेत.
.
पान: जाधव आणि इतर बरीच ठिकाणे झाली आहेत.
.
स्वीटस
आप्पा हलवाई, स्वस्तिक, आनंद, करुणा, शर्मा, नटस, अन्नपूर्णा. ह्या चेन्स गावात सगळी कडे आहेत.
.
पेस्ट्री अन केक
बॉम्बे बेकरी, डॅनिश, पफनपेस्ट्री.
.
बाकी अजून आठवेल तसे सांगेन. ;)
5 Feb 2017 - 3:19 pm | गवि
बाब्बौ.. महिन्याभराचा बेत झाला की हा तर..
6 Feb 2017 - 2:10 pm | तुषार काळभोर
सिद्धेश्वर पूर्णाब्राम्ह ची पुरी भाजी
कृष्णा चं ice क्रीम
किनारा ची बासुंदी
Oasis च ice क्रीम
चाटे गल्लीतील सँडविच वाला
गणेश भुवन चा डोसा
(अवांतर : मागील वर्षी लघूकथा स्पर्धे आधी या मित्राने सदस्यनोंदणी केली होती. बहुतेक अजून झाली नाहिये)
6 Feb 2017 - 5:24 pm | अभ्या..
हे सगळं पण भारीय. मी विसरलो होतो. थ्यांकू हिंदकेसरी.
बाकी ते अवांतरातला मित्र कोण रे? लावू आपण वशीला. ;)
6 Feb 2017 - 8:13 pm | गवि
आता तर फारच टेम्पटेशन झालं.
जेव्हा येईन तेव्हा कळवीन. आजुबाजूला भटकंतीयोग्य काही आहे का? फार फारच पूर्वी पक्षीमित्र संमेलनाला आलो होतो. मेनका गांधींच्या उपस्थिती अन् भाषणाने प्रचंड प्रभावित झालो होतो. गोल्ड फिंच पेठ हे एक नाव आठवतं.
आणि मग नंतर तामिळनाडूत रहात असताना ट्रेन बदलण्यासाठी सोलापूरला उतरायचो. तेव्हा स्टेशनसमोर जिथे मिळेल तिथे खायचो.
आठवणी, ऋणानुबंध ऑलरेडी आहेच.
7 Feb 2017 - 8:47 am | प्रचेतस
तेर्,नळदुर्ग, कुडाळसंगम, विजापूर पाहता येईल.
5 Feb 2017 - 1:16 pm | अभ्या..
ऑफकोर्स.
शिवाय बार्शीतली एक गुंडाची भेळ.
चुरमुर्याचा तळलेला कांदा अन लसूण घातलेला जहाल तिखट चिवडा, तळलेल्या पोह्यांची जोड, ओल्या हरबर्यांची उसळ, शेव, कांदा. बस्स. एवढ्या साहित्यतून अगदी माफक दरात मिळणारी ही भेळ. पहिल्याच घासात डोळ्यातून पाणी येणार. सोबत गुडदानी मिळते.
आजकाल आंबट चिंबट लेडीज भेळांच्या प्रकाराने ह्याचे प्रस्थ कमी झालेय. एकेकाळी एका भेळेच्या गाड्यावरुन ह्या माणसाने घर हाटेल अन जागा घेतल्या हे खरे.
5 Feb 2017 - 1:22 pm | मनिमौ
यांची खारी वॅनिला केक. नव्या पेठेतील तृप्ती च सॅडविच. कन्ना चौकातील पाणीपुरी.
5 Feb 2017 - 1:32 pm | अभ्या..
दिवेकर राहिलेच. :(
कन्ना चौकातील पाणीपुरीवाल्याची मूळ शाखा दाजी पेठेत. व्यंकटेश देवस्थानम जवळ. तेथे भजी पण भारी मिळतात.
5 Feb 2017 - 4:18 pm | तिमा
विले-पार्ले पूर्व, एम.जी. रोड येथे शर्मा भेळ, पार अमेरिकेहून आलेली माणसे पण एकदा तरी खाऊनच जातात. पण त्याची स्पेशालिटी: पाणीपुरी.
6 Feb 2017 - 8:17 pm | गवि
फार फार पूर्वी पार्ल्यात राहायचो. तेव्हा पार्लेश्वरनजीकच्या टर्नवर "रुचिसागर" म्हणून लै भारी लहानसंच हॉटेल होतं. आता शिल्लक नसेलच. काळाचा रोडरोलर. नेहमीचंच.