कविता म्हणजे रे काय?........ भाऊ
मला परवा कुणीतरी सहज विचारलं
आहा, छान बकरा मिळाला पकवायला
मीही मग माझ्या "प्रतिभेला" ललकारलं
र ला र जोडायचा, ट ला ट जोडायचा
चार ओळींची कशीबशी सांगड बांधायची
कधी तिला रडवायचं तर कधी त्याला
अशी अगदी सहजच "चारोळी" पाडायची
हिंदी सिनेमांची गाणी उत्तम कच्चा माल
प्रत्येक हिंदी शब्दाला चढवा मराठी साज
करत राहा उदो उदो भाषांतरीत प्रतिभेचा
त्याला म्हणायचं मित्रा "किंचित अनुवाद"
कुणी बापडं कधी खुपच सुंदर लिहतं रे
त्याच्याच शब्दांनी मग त्यालाच हाणायचं
आयजीच्या जिवावर बायजी उदार होणं
पोटटेहो, त्याले आपन "विडंबन" म्हनायचं
फ़ुलवत जातसे कवी कहाणी बारा ओळींत,
अनपेक्षित देई कलाटणी अंती दोन ओळींत,
शार्दूलविक्रीडित वृत्ताशी करी झटापट तो
बरोब्बर रे बरोब्बर, हे काव्य तर "सुनीत"
दोन दोन ओळींमध्ये सांगते मर्म आयुष्याचे
अन जखम हळव्या मनाची निमुटपणे जाणते
भाऊसाहेब पाटणकरांची जी देते याद, दोस्ता
त्या निर्मितीला ही दुनिया गझल असं म्हणते
पावसाची रीमझीम, अन त्याचं पावसावर लिहणं
ते वाचून तिच्या आठवणीने डोळ्यात पाणी येणं
सलाम असो त्या "अविनाश" च्या तरल प्रतिभेला
खुपच कमी खोदतात असं हळुवार "कविते" चं लेणं
(किंचित कवी),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
3 Oct 2008 - 12:02 pm | गणा मास्तर
एक होती भोकरवाडी
तीची आमची जमली जोडी
तिथे भेटला नाना चेंगट
लोकांना वाटे भलते झेंगट ( ट ला ट जुळला हुश्श)
मग आला शिवा जमदाडे
कपाशिच्या आळीचे त्याला कोडे
(खालच्या दोन ओळीसाठी अर्धा पाउण तास घातला, पण छे मायबाप वाचकासाठी कविता करताना कीतीही कष्ट झाले तर चालतील)
पण नव्हता बाबु पैलवान
त्याची अवघडली होती मान
(स्वगत : आता र ला र जुळवतो)
आहे आज वार शनिवार
भोकरवाडीचा बाजार
चौकात उभा राहीन म्हणतो
रसिक कोणी शोधिन म्हणतो
रसिकाने दिली दाद जर
धन्यवाद देइन दोन वर ( स्वगत :परत र ला र जमलं की गणा, आता शेवटच्या दोन ओळी कर प्रयत्न)
आहेत कवी मातब्बर
कर भावनांचे भाषांतर
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
अवांतर : वरील कविता आमची स्वतंत्र रचना आहे, अनुवाद किंवा भाषांतर नाही. या कवितेमागील प्रेरणा कविताच आहे.
अतिअवांतर पण महत्वाचे : मिपावरील नाना चेंगटांबद्दल आम्हाला अतीव आदर आहे.
3 Oct 2008 - 1:12 pm | फारतर नेने
हे फटू,
तुझी कविता आवडली. सुंदर आहे.
गणा मास्तरः जमली कि हो तुम्हाला. आता मी पण कविता पाडतो, म्हणजे लिहितो :-)
सुपरफास्ट
फारतर नेने