मी सध्या काय करतो ?
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या अब्जावधी लोकांपैकी मी एक !
एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या विश्वात माझी ओळख ही आमच्या गल्लीतल्या तिसऱ्या घराच्या पलीकडे जाणार नाही हे मी आधीच ओळखलं होतं. ते ही त्या घरात गोडलिंब आणायला आई मला वारंवार पाठवायची म्हणून! असं असताना, मी सध्या काय करतो हा प्रश्न एखाद्या मुलीलाचं काय अगदी कोणालाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय! अनेक वर्षांनी एखाद्या ठिकाणी गर्दीत मी दिसलोच तर 'देवा,हा अजून आहेच का ?'असा प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझ्याविषयी असणाऱ्या ह्या सार्वत्रिक अनास्थेचं एकमेव कारण,'मी तेंव्हातरी काय करायचो?' या प्रश्नाच्या उत्तरात आहे!
तसं आमच्या लहानपणी लोकसंख्येचा उद्रेक वगैरे व्हायचा असल्यामुळे एका वर्गात 'साठ-सत्तरचं'(!) मुलं असायची. अश्यावेळी उजवीकडल्या दुसऱ्या लाईनीतील पाचव्या बाकड्यावर बसलेल्या माझ्याकडे बाईंचं लक्ष जाण्याची शक्यता कमीच होती. त्यासाठी वर्गात असलेली अप्रतिम प्रकाशयोजना आणि आमचा एकंदरीतच शैक्षणिक अंधार ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. तरीसुद्धा कर्मधर्मसंयोगाने बाईंनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं देण्यासाठी हात वर केला तरी तो त्यांना दिसत नसे. वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं हे ब्राउनी पॉईंट्स मिळवण्यासारखं असतं. त्याचा प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अप्रत्यक्ष फायदे असतात. तर ब्राउनी पॉईंट आमच्या नशिबात नव्हते. मग आम्ही वर्गात फेमस कसे होणार? मग एखादी मुलगी आमच्याकडे कशी बघणार? आणि “मी सध्या काय करतो” हा प्रश्न तिला कसा पडणार? तसं शाळेतल्या एका पद्धतीप्रमाणे, तिमाही-सहामाही परीक्षेचा निकाल सांगताना वर्गात त्या त्या विद्यार्थ्याला पुढे बोलावून मोठ्याने सांगायचे. इथे फेमस व्हायचा थोडाबहुत चान्स होता. पण आमचा रोल नंबर चाळीस-बेचाळीस आणि मार्कही साधारण तेव्हढेच !! त्यामुळे पुढे जाऊन निकाल घेऊन येण्याची परिक्रमा मी ०.००३ सेकंदात पूर्ण करायचो. मग तीसुद्धा संधी गेली (त्या शिक्षकांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल कारण्याएवढं कायद्याचं ज्ञान त्यावेळी नव्हतं ह्याची खंत वाटते.) तसं वर्गात जोड्या लावण्याचे प्रकार भरपूर चालायचे. पण जोडी 'लावण्यायोग्य' अशीही स्वतःची ओळख मी कधी निर्माण करू शकलो नाही. आणि मी स्वतः लावलेल्या जोडीची व्हॅलिडिटी अट्ठेचाळीस तासाच्या वर टिकत नव्हती. शाळेच्या वार्षिक उत्सवात हिंदी-मराठी गाण्यांवर मुलामुलींचे नाच बसवण्यात यायचे. तिथेही आमची वर्णी कधी लागली नाही. फारच फार 'शूर आम्ही सरदार' या गाण्यासाठी कोरस मध्ये मला उभं करायचे. बरं शाळेत जाऊद्या, पण रिक्षातून येताजाता एखाद्या मुलीशी ओळखबिळख व्हावी म्हणावं तर बोंबलायला आमचं घर शाळेच्या बोडख्याशी! प्रार्थनेचा 'पssssssssssहिsssssssला नमस्कार' सुरु झाल्यावर घरून निघालं तरी पाचव्या नमस्कारापर्यंत मी शाळेत पोहोचायचो. अश्या प्रकारे आमचं शालेय जीवन तर 'ती'च्याविनाच गेलं.
'कॉलेजमध्ये गेल्यावर भेटतेच ना बे' या एकमेव आशेवर आम्ही शालेय शिक्षण पूर्ण केलं. पण मधल्या या कालखंडात जग किती बदललंय हे आमच्या ध्यानातच आलं नाही. शाळेतल्या "चल हो बाजूला" म्हणणाऱ्या साळकाया- माळकाया आता "ओह एक्सक्यूज मी प्लीज" म्हणत होत्या. अन आम्ही अजूनही "आय माय कमीन सर?" च्या पलिकड़े गेलो नव्हतो. त्यांच्या नवीन कोऱ्या स्कुटया आमच्या हर्क्युलस बाबाच्या शेजारी ऐटीत उभ्या राहायच्या. आता ब्राउनी पॉईंट्स मिळवायची पद्धतही बदलली होती. त्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करून नोट्स वगैरे काढाव्या लागायच्या. चला एकवेळ ते ही केलं असतं, पण नोट्स काढायला समोरचा कुठल्या विषयावर बोलतोय हे तरी कळायला हवं ना? आमच्यातले काही उत्साही कार्यकर्ते प्रॅक्टिकलच्या वेळी मुलींना मदत करायला जायचे. जणू इंजिनाचा शोध यांच्या परसातचं लागला होता या थाटात बोलायचे. मला तर व्हर्नीयर (का कॅलिपर काय म्हणतात ते?) वापरून रीडिंगही घेता येत नव्हतं. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे माझे कॉलेजमधले मित्र 'जोड्या लावणे' खेळत नव्हते. 'अबे कोणाशीही लाव पण लाव' अशी भूमिका असायची. कारण त्यांचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. शेवटी काही सीनियर्सनी,'नजरेत येण्यासाठी' आम्ही गँदरिंगमध्ये वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये सामील व्हावं असं सुचवलं.पण आमची 'नसलेली ख्याती आणि असलेले गुण' बघता आम्हाला दरवेळी एकच कमिटी मिळायची. डिसिप्लिन कमिटी !! केंद्रीय मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्र्याचं जे स्थान असतं तेच कॉलेज गॅदरिंगमध्ये डिसिप्लिन कमिटीचं असतं. त्यांना कोणीही विचारत नाही! उलट नुसतेच उभे असतात म्हणून एखादयाची बॅग पकडायची जबाबदारी त्यांच्यावर येते. गॅदरिंगच्या त्या दोन दिवसात एखाद्या मुलीने मदत मागितलीच तर ती जास्तीत जास्त 'ह्या नाटकाची प्रॅक्टिस कुठे सुरु आहे रे?' एवढं विचारण्यापुरती असते! शेवटी आमचं कॉलेजही तिच्याविनाच गेलं.
अर्थात या सगळ्यासाठी इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही. पण आत्यंतिक वेंधळेपणा, अफाट न्यूनगंड आणि तरीसुद्धा असलेली बेफिकीर वृत्ती(किंवा निर्लज्जपणा म्हणा हवं तर) परमेश्वराने आमच्यांतच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही. बरं एवढं असताना मुलींनी इंप्रेस व्हावे ही मनीषा तरी बाळगू नये, पण नाही ना ! येताजाता एखाद्या मुलीने चुकून एकदा जरी आमच्याकडे बघितलं तर स्वप्नांचे इमले डायरेक्ट वरातीपर्यंत पोहोचायचे! नंतर ह्याच मुलींच्या लग्नाच्या वराती आमच्या डोळ्यासमोरून गेल्या.
या परिस्थितीत ती सध्या काय करते हा प्रश्न मला शंभर मुलींच्या बाबतीत पडत असला तरी मी सध्या काय करतो असं प्रश्न एक शंभरांश मुलींनाही पडणार नाही.आणि पडलाच तर त्याचे तिच्या मनातले संभाव्य उत्तरं खालीलप्रमाणे नसावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !
"तो सध्या काय करतो?....कॉलेजमधून बाहेर पडला असेल ना एव्हाना?
--चिनार
प्रतिक्रिया
25 Jan 2017 - 8:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पांडुरंग सांगवीकर _/\_!!!
25 Jan 2017 - 9:35 pm | चिनार
म्हणजे काय? कळल नाही
26 Jan 2017 - 3:46 pm | संजय पाटिल
'कोसला' वगैरे वाचा
26 Jan 2017 - 3:50 pm | संजय पाटिल
अरे, एकदम झकास... हे र्हायलं..
25 Jan 2017 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा
@केंद्रीय मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्र्याचं जे स्थान असतं तेच कॉलेज गॅदरिंगमध्ये डिसिप्लिन कमिटीचं असतं. ›››
वारल्या गेलो आहे. ![http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF](http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF)
![http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif](http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif)
जबरदस्त चौकार षटकार हानल्याती!
25 Jan 2017 - 9:01 pm | यशोधरा
भारी!
25 Jan 2017 - 9:08 pm | ज्योति अळवणी
मस्तच! मग नक्की काय करता सध्या?
25 Jan 2017 - 9:54 pm | खेडूत
झकास लिहीलंय..
अगदी आमचीच ष्टोरी की ओ...!
25 Jan 2017 - 10:01 pm | आदूबाळ
छान लिहिलंय!
25 Jan 2017 - 10:02 pm | पद्मावति
मस्तच.
25 Jan 2017 - 10:15 pm | एस
हाहाहा! एकेक पंच पुलंची आठवण करून देणारा!
रच्याकने, पांडुरंग सांगवीकर नाही माहीत? ;-)
25 Jan 2017 - 10:45 pm | प्रभू-प्रसाद
25 Jan 2017 - 10:45 pm | प्रभू-प्रसाद
25 Jan 2017 - 10:52 pm | पैसा
मस्त खुसखुशीत!
25 Jan 2017 - 11:25 pm | गौतमीपुत्र सातकर्णि
जब्बरी
25 Jan 2017 - 11:27 pm | रातराणी
जबरदस्त! सध्या तुम्ही फक्त लिहीत राहा :)
25 Jan 2017 - 11:54 pm | संजय क्षीरसागर
कंप्लीट आऊट ऑफ बॉक्स विचार करता येणं हे विनोदी लेखनाचं गमक आहे आणि ते तुझ्याकडे पुरेपूर आहे. जस्ट ग्रेट ! कीप इट अप.
26 Jan 2017 - 12:29 am | फेदरवेट साहेब
पांड्या पांड्या लेका बलीष्टर का नाही रे झालास.
.. अफलातून लेखन....
(पांड्या पांड्या ह्या वाक्याला आमच्या प्रोफाइल पीक सोबत जोडून पाहा ( गोष्ट इफेक्ट) अत्यंत क्षीण असे हसू आले तर आमचे अखंड पाईप चोखत बसायचे कष्ट भरून पावले असे आम्हाला म्हणता येईल)
26 Jan 2017 - 7:12 am | उगा काहितरीच
य्ये ब्बात ! मस्त लेख.
26 Jan 2017 - 8:23 am | साहेब..
एकेक पंच पुलंची आठवण करून देणारा!
सुरुवातीला थोडासा असा मी असामी चा फील आला.
26 Jan 2017 - 8:34 am | रेवती
हा हा हा.
भारी लिहिलयत.
26 Jan 2017 - 9:08 am | चिनार
धन्यवाद!!
26 Jan 2017 - 9:08 am | चिनार
धन्यवाद!!
26 Jan 2017 - 10:10 am | समीर_happy go lucky
मुजरा भौ !!!! शब्दश: जबरदस्त
26 Jan 2017 - 1:06 pm | बबन ताम्बे
लिहित रहा .
26 Jan 2017 - 1:46 pm | चौथा कोनाडा
...
हे फक्त वानगी दाखल !
धम्माल क्लासिक ! लै भारी लेखन !
ल्हित र्हा, ल्हित र्हा, ल्हित रहा !
26 Jan 2017 - 6:30 pm | जावई
पोठात गोळा उठला हसून हसून...!
26 Jan 2017 - 10:30 pm | सचिन काळे
आवडलं!!!
26 Jan 2017 - 11:08 pm | स्रुजा
हाहाहाहा.. अरे काय !! भारी पंचेस आहेत.. हहपुवा
27 Jan 2017 - 10:56 am | रुपी
प्रेरणा घ्यायच्या नादात इकडे प्रतिसाद द्यायचा राहिला :)
तुम्ही या लेखासाठी दंडवत घ्या! फारच भारी लिहिलंय. असेच आम्हाला हसवत रहा आणि प्रेरणा देत रहा :)
27 Jan 2017 - 12:07 pm | सूड
असा मी असामी च्या सुरुवातीच्या ओळी आठवल्या.
27 Jan 2017 - 12:32 pm | सस्नेह
भारी खुसखुशीत ! =))
रच्याकने, मी सध्या कायप्पावरच्या 'ती' चे मेसेजेस मोजते =))
27 Jan 2017 - 2:55 pm | वेल्लाभट
क्लास लिवलंय ! वाह
27 Jan 2017 - 4:00 pm | कवितानागेश
.मस्तच
27 Jan 2017 - 4:55 pm | पाटीलभाऊ
भारी...मस्त आणि खुसखुशीत...!
27 Jan 2017 - 6:25 pm | धर्मराजमुटके
अगदी आमचीच ष्टोरी.
मात्र यत्ता ७ वीत असतांना आम्ही वर्गातील पोरींवर दर शुक्रवारी आणण्यात येणार्या संतोषीमातेच्या गुळ आणि चण्याच्या प्रसादाच्या खरेदीत "२५ पैशाचा घोळ केला" असा खळबळजनक आरोप करुन वर्गात वर्ल्डफेमस झालो होतो आणि मग बर्याच जणींच्या नजरेत येण्याऐवजी डोळ्यावर आलो होतो याची याद यानिमित्ताने आली.
27 Jan 2017 - 6:41 pm | पद्मावति
मात्र यत्ता ७ वीत असतांना आम्ही वर्गातील पोरींवर दर शुक्रवारी आणण्यात येणार्या संतोषीमातेच्या गुळ आणि चण्याच्या प्रसादाच्या खरेदीत "२५ पैशाचा घोळ केला" असा खळबळजनक आरोप करुन वर्गात वर्ल्डफेमस झालो होतो
=))) खी, खी, खी......27 Jan 2017 - 10:10 pm | चावटमेला
झक्कास!!!
31 Jan 2017 - 7:37 am | एमी
हा हा हा =)) मस्त जमलाय लेख!
31 Jan 2017 - 10:56 am | अभिजीत अवलिया
मस्त हो चिनार राव. एक मार्कांचा अपवाद वगळता स्वतः:ची स्टोरी तुमच्या लेखणीतून उतरली आहे असेच वाटले.
13 Nov 2019 - 2:26 pm | किल्लेदार
ज्जे बात... धमाल लेख !!!
13 Nov 2019 - 2:35 pm | श्वेता२४
तुमचे लेखन नेहमीच आवडते. हेही आवडलं.
13 Nov 2019 - 2:45 pm | जॉनविक्क
14 Nov 2019 - 2:45 pm | चाणक्य
हे वाचायचं राहिलं होतं चिनारचं. मस्तच आहे.