३ ते १० शब्द एवढ्या लांबीच्या सुक्ष्मकथा लिहण्याचा मी प्रयत्न केला आहे. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story,nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला असावा कारण माझ्या अल्प वाचनात अजूनतरी मराठी सुक्ष्मकथा आल्या नाहीत.
पारंपारिक कथेचा जो ढाचा असतो (सुरुवात, गाभा, शेवट) त्यापेक्षा या कथांचं स्वरूप वेगळं असतं. वरवर पाहता ती कथा वाटणार नाही. ते एखादं वाक्य असेल, बातमी असेल, संभाषणामधला एक तुकडा असेल किंवा अजून काही. पण त्या मोजक्या शब्दांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा दडलेल्या असतात. आपण थोडा विचार केल्यास शब्दांमागे दडलेल्या कथा समोर येऊ लागतात. शिवाय सुक्ष्मकथांमध्ये अनेक लघु किंवा दिर्घ कथांना जन्म देण्याची क्षमता असते. खालील उदाहरणांवरून मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल.
उदा I)"मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!”
- सुभाषचंद्र बोसांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता हे आपल्याला माहीत आहे. मोदी त्यांना भेटून तो अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं. याचा अर्थ टाईम मशीनचा शोध लागला असेल आणि मोदी भूतकाळात गेले असतील अशी कथा समोर येते. पण या प्रकाराची मजा एवढ्यावरच संपत नाही.
चला अजून खोलवर विचार करू - जर टाईम मशीनचा शोध लागलाच तर सहाजिकच त्याचा वापर भूतकाळात किंवा भविष्यात फेरफार करण्यासाठी केला जाणार नाही, कमीत कमी सरकार तरी तसं करू देणार नाही अन्यथा मानवजातीचा विनाश संभवतो. असं असूनही मोदीजी हा नियम मोडायला का निघालेत? अन त्यांनी सुभाषचंद्र बोसांनाच का निवडल? की तो मोदींचा तोतया आहे?? प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनू शकेल.( हा वाचकांच्या मेँदुला अन कल्पनाशक्तीला खुराक आहे.)
अशा पद्धतीची एखादी सुक्ष्मकथा दिल्यास दहा लेखक त्यावर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या लघु किंवा दिर्घ कथा लिहू शकतील!!
उदा २: दुसरा प्रकार असा आहे की एकाच कथेतून वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळे अर्थ लागतील. जसं की ही सुक्ष्मकथा पहा:
मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला
- का बरं असं झालं असेल? कुणी म्हणेल अशाप्रकारची फॅशन आलीये म्हणून बायका पांढऱ्या साड्या नेसून बिना बांगड्यांचं फिरताहेत(अशी विचित्र फॅशन का आली याचं उत्तर शोधताना बऱ्याच विनोदी शक्यता डोक्यात येतील). कुणाला असा अर्थ लागेल की सीमेवर युद्ध सुरु आहे अन त्यात आपले हजारो सैनिक मारले जाताहेत म्हणून विधवा बायकांची संख्या वाढली (युद्ध का सुरु झालं हा गहन प्रश्न अनेक कथांना जन्म द्यायला पुरेसा आहे) कुणाला अजून वेगळा अर्थ लागेल.
अशा पद्धतीने प्रत्येक सुक्ष्मकथा आपल्याला एक छोटीशी कथा सांगून जाते अन अधिक विचार केल्यास अनेक कथांच्या शक्यता देऊन जाते. एक मात्र खरं की कथा जेवढी छोटी तेवढी लिहायला कठीण.
माझ्या अल्पमतीप्रमाणे काही सुक्ष्मकथा लिहण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येक पायरीवर थोडं थांबून विचार करावा…कथा नक्की भेटतील.
(टिप: कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत.)
१) हळदीचा बिझनेस एवढा वाढलाय की...काल अश्वत्थामा आला होता.
२) एक बातमी: शक्तिमान ब्रम्हचारी, गीता विश्वासचं तमराज किलविशसोबत लग्न.
३) मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता.
४) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!"
५) आजची ताजा खबर: राष्ट्रीय संग्रहालयातून हजारची नोट गायब.
६) मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला.
७) ३०१७: सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ पुरस्कार: सल्फर
व्हॅली, शनी.
८) बाळा, ही पृथ्वी; आपले पूर्वज इथे रहायचे.
९) मी माझ्यासोबत रस्त्याने जातांना आम्हाला मी भेटलो
( वेगवेगळ्या समांतर विश्वातले तिघेजण एकत्र आले अशी कल्पना आहे.)
१०) झाडांनी ऑक्सिजन बनवणं बंद केलंय...अरे वाS.
११) नापिकी, मेलेलं ढोर, गळ्यातलं चऱ्हाट, झाड.
१२) आज ईद....बघा पृथ्वी उगवलीये का.
१३) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव.
१४) IPL सीजन ५१७ विजेते: मंगळ रेडबुल्स.
१५) २१३५: यंत्रमानवांचा संसदेवर मोर्चा: आरक्षण आरक्षण
१६) कब्रस्थान, शॉपिंग कॉंप्लेक्स...बिचारी भूतं.
१७) स्वप्न, मी उडतोय...धपाकS...अॅम्बुलन्स.
१८) सर, कालच मेलोय, अॅडमिशन मिळेल?
१९) मी... पृथ्वीवरचा शेवटचा एलीयन.
२०) शाळा सुटली...Logout.
-------------------------------------------------
प्रतिक्रिया
9 Jan 2017 - 4:42 pm | चिनार
छान कल्पना !!
9 Jan 2017 - 4:43 pm | अत्रन्गि पाउस
..
9 Jan 2017 - 5:33 pm | अॅस्ट्रोनाट विनय
??
9 Jan 2017 - 4:50 pm | खेडूत
चांगलंय..
कारण माझ्या अल्प वाचनात अजूनतरी मराठी सुक्ष्मकथा आल्या नाहीत.
ह्या घ्या मिपावरच्या:
9 Jan 2017 - 5:30 pm | अॅस्ट्रोनाट विनय
छान आहेत कथा. माझ्या वाचनात नव्हत्या आल्या. कारण मिपा वर मी नुकताच प्रवेश केलाय. माझं आतापर्यंतच मराठी वाचन फक्त पुस्तकं आणि दिवाळी अंक..तिकडे दिसला नव्हता हा प्रकार.
9 Jan 2017 - 5:08 pm | अजया
इंटरेस्टिंग!
9 Jan 2017 - 5:36 pm | अॅस्ट्रोनाट विनय
कथा आवडल्याबद्दल सर्व मित्र मैत्रीणींचे आभार. प्रोत्साहन मिळाल्याने नवीन लिखाण करायचा हुरुप येतो.
9 Jan 2017 - 5:58 pm | ज्योति अळवणी
कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल की विस्ताराने लिहिलेले असते अशी मानसिकता असल्याने अशा संक्षिप्त कथा समजून घ्यायला अवघड जाईल बहुतेक
9 Jan 2017 - 6:38 pm | अॅस्ट्रोनाट विनय
सहसा माझा लेखनप्रवास विज्ञानरंजन आणि अदभुतिका या दोन मित्रांच्या संगतीनेच होत असल्याने काही तांत्रिक गोष्टी समजायला अडचण जाऊ शकते. तरीसुद्धा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीच्या आकलनात काही अडचण आल्यास जरूर सांगावे.
9 Jan 2017 - 6:38 pm | अॅस्ट्रोनाट विनय
सहसा माझा लेखनप्रवास विज्ञानरंजन आणि अदभुतिका या दोन मित्रांच्या संगतीनेच होत असल्याने काही तांत्रिक गोष्टी समजायला अडचण जाऊ शकते. तरीसुद्धा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीच्या आकलनात काही अडचण आल्यास जरूर सांगावे.
9 Jan 2017 - 7:02 pm | आदूबाळ
वाचकांची मानसिकता आणि अपेक्षा गेली खड्ड्यात. लेखकाने वाचकांना नेहेमी चॅलेंज केलं पाहिजे.
9 Jan 2017 - 7:08 pm | अॅस्ट्रोनाट विनय
लेखकाने वाचकांना नेहेमी चॅलेंज केलं पाहिजे.
हे मात्र अगदी खरं आहे. मराठीमध्ये हे होतांना दिसतं नाही म्हणून आपल्या वाचकांना डोकं गहाण ठेवून वाचनाची सवय लागलीये(सन्माननीय अपवाद आहेत) याला दोषी लेखकच
9 Jan 2017 - 6:05 pm | हतोळकरांचा प्रसाद
छान आहेत, ह्या आणि मन यांनी लिहिलेल्या पण! फॅमिली गेटटुगेदर वगैरेला फनगेम्स म्हणून खेळायला पण छान वाटेल!
9 Jan 2017 - 7:19 pm | अॅस्ट्रोनाट विनय
सुक्ष्मकथांचा एक भन्नाट अन मजेशीर उपप्रकार मी लवकरच मिपावर आणतोय. एक गंमत म्हणून आम्ही तो शोधला होता. तो प्रकार फन गेम म्हणून खेळायला अगदी योग्य ठरेल :)
9 Jan 2017 - 8:16 pm | Ranapratap
छान प्रकार आहे. यामुळे वाचकांची कल्पनाशक्ती वाढेल.
9 Jan 2017 - 8:27 pm | पद्मावति
खुप मस्त.
10 Jan 2017 - 9:26 am | जव्हेरगंज
10 Jan 2017 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार
आईXX
पैजारबुवा,
10 Jan 2017 - 10:13 am | अॅस्ट्रोनाट विनय
पैजारबुवा, कथा समजावून सांगाल काय
10 Jan 2017 - 12:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
आईXX
यातला अर्धा शब्द आई बद्दलचा एक उद्गार दर्शवतो. तो स्वतःच्या आई बद्दल असु शकतो किंवा दुसर्या कोणाच्याही आई बद्दल. या शब्दा मधे आपुलकी माया प्रेम दडलेले असू शकते किंवा एखाद्या बद्दल दडलेला रागही असु शकतो. या व्यक्त होणार्या भावनांच्या पाठी काही कारणे असू शकतात. आणि या भावना अशा प्रकारे व्यक्त होण्या मागे काही घटनाही घडलेली असू शकते.
उदाहरणार्थः- रस्त्यावर चालत असताना अचानक समोरुन आमिरखान चालत आला तर त्या वेळी तोंडातुन सहज उद्गार निघू शकतो "आईशॉट आमिरखान"
पैजारबुवा,
10 Jan 2017 - 12:38 pm | अॅस्ट्रोनाट विनय
हम्म...बरोबर
10 Jan 2017 - 1:06 pm | हतोळकरांचा प्रसाद
हहपुवा!! पैजारबुवा, हि शॉर्टेस्ट सूक्ष्मकथा लैच भारी! :):)
10 Jan 2017 - 4:05 pm | मराठी कथालेखक
मी तेव्हा वचन मोडले पण म्हणूनच आज तुझ्या पंचाहत्तरीला येवू शकले रे
10 Jan 2017 - 4:06 pm | महासंग्राम
.
10 Jan 2017 - 6:38 pm | अॅस्ट्रोनाट विनय
छान कथा मंदार. अजून दोन सुक्ष्मकथा
?
!
16 Jan 2017 - 3:06 pm | पक्षी
संगणकाचा मुक्तहस्ताने वापर केला, उजवा हात खूप दुखतं आहे.
17 Jan 2017 - 12:20 am | अॅस्ट्रोनाट विनय
हा प्रकार आवडला असल्यास सुक्ष्मकथांचा दुसरा भन्नाट प्रकारसुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल.
http://www.misalpav.com/node/38554